अजूनकाही
‘मैं ये एज-वेज में विश्वास नहीं करता, सर.’
‘अरे, लेकिन एज-वेज कोई भूत है क्या, कि तुम इसपर विश्वास नहीं करते…’
‘सर… वो कहते हैं ना … 50 is new 40...’
‘वैसे 40 भी तो new 30 हुआ ना सर…!’
‘कौन प्रवीण तांबे?’ या सिनेमामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेने साकारलेले क्रिकेटपटू प्रवीण तांबे असे एकेका वाक्यातले सरस प्रश्न विचारतात आणि त्याच-त्याच पठडीत विचार करणाऱ्या व्यवस्थेला अगदी सहज आव्हान देतात.
ज्या क्षेत्रामध्ये तुमचं वय, फिटनेस, शारीरिक क्षमता या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात, त्यावरून तुमच्या करिअरचे नियम ठरवले जातात, त्याच क्षेत्रामध्ये प्रवीण तांबे नावाचा एक हट्टी, जिद्दी माणूस असलेले नियम मोडून स्वत:चे नियम बनवतो. हे नियम कुठले, तर There is only one rule that There is no rule... असे!
खरंच माझ्यासारखे अनेक जण जे फारसं क्रिकेट बघत नाहीत, आयपीएल पाहत करत नाहीत, त्यांना हाच प्रश्न पडला असेल- ‘कोण प्रवीण तांबे?’ सिनेमाच्या सुरुवातीलाच राहुल द्रविडने खास त्याच्या शैलीत या क्रिकेटपटूची ओळख करून दिली आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
प्रवीण तांबे हे असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी वयाच्या ४१व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं, त्यांनी ‘कॅरेबियन प्रिमियर लीग’ही खेळली आहे. रणजीमध्ये खेळण्याचं आपलं स्वप्नं त्यांनी चिकाटीने पूर्ण केलं. या सिनेमाबद्दलच्या एका मुलाखतीत प्रवीण तांबेंना विचारलं गेलं, ‘तुमच्यावर सिनेमा बनवायचा आहे, हे तुम्हाला कळलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं?’ त्यावर प्रवीण तांबेंचं उत्तर होतं, ‘एवढ्या लगेच सिनेमा कशाला?… अजून खेळायचं आहे मला…!’ ‘मुझे खेलना हैं’ या एकाच वाक्यात त्यांचं उत्तर संपलं. मग श्रेयसनेच सांगितलं, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की, मला इतक्यातच जीवनगौरव का देताय तुम्ही… अजून बरंच काम करायचं आहे मला! ‘मुझे खेलना हैं...’ हे जणू प्रवीण तांबेचं ब्रीदवाक्य, राष्ट्रगीत आहे... आणि त्यासाठी ते प्राणांची बाजी लावायला तयार आहेत!
हा सिनेमा क्रिकेटपटू प्रवीण तांबेंवर असला तरी ती एका सामान्य माणसाच्या अ-सामान्य बनण्याची कहाणी आहे. मुंबईतल्या एका चाळीत राहणाऱ्या एका निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबातल्या प्रवीण तांबेंचा त्यांच्या स्वप्नांवर अतीव विश्वास आहे. ते दिवस-रात्र फक्त आणि फक्त क्रिकेटचा विचार करतात आणि क्रिकेटचाच श्वास घेतात. आपल्या स्वप्नांशी जराही तडजोड न करणारा हा अ-सामान्य खेळाडू त्याच्यासाठी काय-काय करतो, याची ही अविश्वसनीय कहाणी आहे. त्याचं वर्णन करायचं तर शब्द शोधावे लागतात आणि शोधलेले शब्दही अपुरे पडतात.
तो स्वत: हिरा आहे आणि तरीही केवळ १५०० रुपयांच्या पगारावर हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या एका छोट्याशा कारखान्यात काम करतो… दिवसा क्रिकेट खेळता यावं म्हणून रात्र- रात्र जागून आपण कल्पनाही करणार नाही, अशा ठिकाणी काम करून चार पैसे मिळवतो... आणि तिथे होणारी अवहेलना सहन करूनही त्याच्या स्वप्नांचं मार्दव जराही कमी होत नाही!
संसाराची, मुलाबाळांची आर्थिक गरज भागवताना नाकीनऊ आले, तरी हा माणूस आपल्या स्वप्नांना एकटं पडू देत नाही… एकेका पैशाची जुळवाजुळव करताना, गुणवत्ता असूनही सोसावे लागणारे अपमान सहन करताना आपल्या मनाची श्रीमंती जराही ढळू देत नाही...
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
श्रेयसने याआधी साकारलेला इक्बालही असाच हट्टी, जिद्दी पण कथेतला. आणि हा तर अगदी खराखुरा माणूस, कुठल्याही कथेला वरचढ ठरणारा. श्रेयसच्या इक्बालमुळेच त्याच्या या चित्रपटाबद्दल खूप उत्कंठा होती. म्हणून मी हा चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या पाहिला...
प्रवीण तांबेंची व्यक्तिरेखा श्रेयस तळपदे अक्षरश: जगला आहे. हा मनस्वी कलाकार प्रवीण तांबेंमधला क्रिकेटपटू आणि त्याहीपेक्षा त्यांच्यामधला माणूस आपल्यासमोर आहे तसा उभा करतो आणि विकेट्स घेऊन मॅच जिंकता जिंकता आपलं मनही जिंकून घेतो. ही कोणत्याही स्वप्नवादी माणसाची आणि त्याच्या स्वप्नासाठी जगणाऱ्या त्याच्या जिवलगांची कहाणी आहे…
अपघात झाल्यानंतर प्लॅस्टरमधला पाय सोडवून घेऊन खेळण्यासाठी धावणारा… खोटं बोलून आपली स्वप्नं पूर्ण करता येत नाहीत असं म्हणणारा आणि कुठल्याही संकटापुढे हार न मानणारा हा खेळाडू साकारताना श्रेयस त्या भूमिकेशी एकरूप झाला आहे. जणू हे सगळं त्याच्याच बाबतीत घडतं आहे आणि अगदी आत्ताच्या क्षणाला घडतं आहे!
अभिनेत्री अंजली पाटील यांनी साकारलेल्या वैशाली तांबेंच्या व्यक्तिरेखेच्या मी प्रेमात पडले. प्रवीण तांबेंच्या पहिल्या भेटीपासूनच त्यांच्या स्वप्नांचीही जोडीदार झालेली त्यांची पत्नी अंजली पाटील यांनी खूप लोभसपणे साकारली आहे.
दिग्दर्शक जयप्रद देसाई प्रवीण व वैशाली तांबे यांच्या अत्यंत संघर्षमय आणि तरीही मनभावन जगात घेऊन जातात आणि ‘मानवी चैतन्य’ (Human spirit) म्हणजे काय ते हळूवारपणे सांगतात. मुंबईतल्या एका छोट्याशा चाळीत - जिथे फारशी जागाच नाही - अनेक वेळा श्वास गुदमरू शकतो, अशा ठिकाणी या दोघांनी त्यांच्या स्वप्नांना, नात्यांच्या हळूवार बंधांना छान जपलं आहे. निळ्यानिळ्या समुद्रकिनारी, चंदेरी वाळूमध्ये रमण्याची स्वप्नं पाहणाऱ्या, या दोघांच्या जगात दिग्दर्शक जयप्रद देसाई, अभिनेता श्रेयस तळपदे आणि अंजली पाटील यांच्यासोबत आपण रमून जातो. इतकं की, या दोघांचं जग आपलंच बनून जातं आणि त्यांची स्वप्नंही आपल्याला आपलीच वाटू लागतात...
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या सिनेमाची कथा आणि पटकथा किरण यज्ञोपवित यांनी खूप छान रंगवली आहे. ‘सक्सेसफुल हुआ तो ग्रेट, नहीं तो पागल’ असे संवाद लिहिणारे कपिल सावंत यांच्या लेखनालाही दाद द्यायला हवी.
या सिनेमाबद्दल सांगताना श्रेयस म्हणतो- ‘There is no expiry date to your dreams...’ खरंच आहे ते! तुमचा तुमच्या स्वप्नांवर आणि तुमच्यावर अढळ विश्वास असेल तर जग कसं आहे, ते काय म्हणतं याची तमा बाळगण्याची गरज नाही... तुमच्या जगण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सर्वांत महत्त्वाचं!
म्हणूनच, तुमची स्वप्नं आणि वास्तव यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला थोडंसं अडखळल्यासारखं होईल, ती सोडून द्यावीशी वाटू लागतील, तेव्हा तेव्हा या सिनेमाची गोष्ट आठवून पाहा... तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या स्वप्नांच्या प्रेमात पडाल आणि त्यांच्यासाठी जगू लागाल!
..................................................................................................................................................................
लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.
artikulkarni262020@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment