अजूनकाही
प्रिय अनुपम अंकल,
साष्टांग सलाम.
मी तुमच्या अभिनयाचा प्रचंड चाहता आहे. मी ज्याचा विरोधक राहिलो आहे, अशा पक्षाचा प्रचार तुम्ही करत आहात. तरीही तुमच्याबद्दल माझा आदर किंचितही कमी झालेला नाही. माहीत नाही का असं होतंय. पण मी तुमच्या अभिनयाचा निखळ चाहता आहे.
तुम्ही माझ्या वेदनांवर हास्याची/समाधानाची फुंकर घातलेली आहे. आजही घालता. त्यामुळेच मी तुम्हाला प्रत्येक भूमिकेत पसंत केलं. भरभरून प्रेम व आत्मीयता दिली. त्यामुळेच कदाचित भाजप व संघविचारांची भूमिका तुम्ही निवडली, तरीही मी तुमचा आजही तेवढाच आदर आणि सन्मान करतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
एफटीआय प्रकरणात टीका झाल्यानंतर तुम्ही उघडपणे ‘होय, मी मोदींचा चमचा आहे’, असं विधान केलं. तुम्ही स्वत:ला ‘जमुरा’ म्हणून घेतलं. मला फार दु:ख झालं. पुढे तुम्हाला ‘ले मेरे जमुरे...’ म्हणत तुमच्या आकांनी पद्म सन्मान दिला. त्या वेळी मला खूप आनंद झाला. तुम्हाच्या नावे शुभेच्छा संदेश पाठवला. तुम्ही घेतलेल्या राजकीय भूमिकेसाठी नव्हे, तर अभिनयासाठी तुम्हाला हा सन्मान दिलाय, असं मी स्वत:च्या मनाला समजावलं. तुमच्यावर मीम्सचा पाऊस पडला. मला फार वाईट वाटलं. अशा अनेक मीम मेकर्सना ब्लॉकसुद्धा केलं.
पुढच्या काही प्रसंगात तुम्ही, ‘मी अजूनही भाड्याच्या घरात राहतो’, असं म्हटलं. त्या वेळीही मला खूप व्यथा झाल्या. इतका मोठा अभिनेता, इतका प्रसिद्ध, लोकप्रिय व असंख्य सिनेमे (काम) करूनही स्वतचं घर घेऊ शकला नाही, त्याबद्दल मनाला फार बोचलं.
१७ मार्च २०२२ रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाचे चरित्रनायक म्हणून अनुपम अंकल आपण एक ट्विट केलं. त्यात लिहिलं, ‘द काश्मीर फाईल्स नें ६ दिन में ८० करोड़ कमायें है...’
शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत हा आकडा १०७ कोटी झाल्याचे तुम्ही जगाला सांगितलं. कदाचित हा सिनेमा आपल्याला स्वत:चं घर, बंगला किंवा डुप्लेक्स मिळवून देऊ शकतो. ज्यात तुम्ही आनंदाने राहू शकता. एसी खोलीत बसून भाजपचा प्रचार करू शकणार. परंतु आपला हा आनंद मला झेपू शकणार नाही. कारण ते घर तुम्ही माझ्या देश-धर्मबांधवांना शत्रूस्थानी आणून उभे करून मिळवलेलं असेल.
संबंधित सिनेमात तुम्ही आखलेल्या धोरणामुळे समाजात मुसलमानांविरोधात घृणा व विद्वेष माजली आहे. त्यामुळे हजारो देशबांधवाची घरे उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवतो. त्यात अनेक देशबांधवांचा मृत्युदेखील होऊ शकतो. उरलेले बेघर होऊ शकतात. रस्त्यावर अन्नान्न फिरतील. कदाचित त्यांच्यापुढे अस्तित्वाचे प्रश्नही निर्माण होऊ होतील.
तुम्ही काश्मिरी पंडितांचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित सिनेमा केलाय, असं उघडपणे म्हणत आहात. परवा एका न्यूज चॅनेलवर आपल्याला रडू कोसळलं असं ऐकलं. तुमच्या दु:खात सहभागी होता आले नाही, याचे वाइट वाटते. रुबिका लियाकतने तुम्हाला कवटाळल्याचे मीम्स पाहून तुमच्या वेदनांशी समरूप झालो. परंतु त्यावरचे टुकार व विनोदी मीम पाहून हसू का रडू, कळलेच नाही.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
काश्मिरी पंडितांच्या वेदनांना जागा करून दिल्याबद्दल तुमचे आभार. पण या बाजारू सिनेमामुळे कोट्यवधींचा गल्ला जमेल, पण पंडितांचा प्रश्न सुटणार नाही, हे तुमच्यासहित सबंध जगाला माहीत आहे. २०१४ पूर्वी तुम्हाला काश्मीर प्रश्न ही हिंदू-मुस्लीम समस्या नसून राजकारण्यांनी बनवलेला मुद्दा आहे, असं वाटत होतं.
हिंदू-मुस्लीम इत्तेहादविषयी तुम्ही सातत्याने बोलत होता. लोकांचे भ्रम दूर करत होता. पण २०१४नंतर तुम्हाला देशातील व नंतर काश्मीरचे मुस्लीम शत्रू वाटायला लागले. तुम्ही त्यांच्याबद्दल खूपच अनाप-शनाप उद्गार काढले. तरीही मी तुम्ही मला आवडत राहिला. तुमच्या जन्मदिनी तुम्हाला शुभेच्छा पाठवत राहिलो.
चालू महिन्यात तुमचा वाढदिवस होता, त्या वेळी भरभरून शुभेच्छा दिल्या. लंबी उम्र व उत्तम आरोग्याच्या सदिच्छा दिल्या. पण तुम्ही भारतीय मुस्लिमांची उम्र छोटीच राहावी, हे भाजप समर्थकांचे धोरण पूर्ण करण्यासाठी देव पाण्यात घालून बसला आहात, हे उमजतं त्या वेळी वेदना होतात.
२९ जून २०१० साली तुम्ही लिहिता, “माझे मन काश्मीरसाठी रडते. राजकारण आणि दहशतवादाने ही जन्नत तेथील जनतेसाठी नरक बनवून सोडली आहे. हिंदू-मुस्लीम दोघांसाठी.”
काश्मीर प्रश्नावर होणाऱ्या राजकारणामुळे आपण व्यथित झाला होता. त्या वेळी ३ सप्टेंबर २०११ला तुम्ही लिहिता, “समस्या काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांची नाही. आम्ही वर्षानुवर्षे एकमेकांसोबत शांततेत राहिलो. हे सर्व राजकारण्याचे कारस्थान आहे...”
३० डिसेंबर २०१२ साली तुम्ही एक ट्विट केलं, त्यात लिहिलं, “विसरू नका. माफही करू नका. आम्हाला काश्मिरी मुस्लिमांसह पंडित महिलांचाही विसर पडता कामा नये. दोघेही कमी-अधिक प्रमाणात समान दुःखातून गेले आहेत.”
पंडिताच्या समस्येला धार्मिक रंग देण्यास विरोध करत तुम्ही १९ जानेवारी २०१३ला तुम्ही लिहिलंय, “मी पाहतोय की, काही लोक काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या आक्रोशाला धार्मिक रंग देत आहेत. हा मुद्दा धर्माचा नाही. हा मुद्दा हिंदू-मुस्लीम दोघांनी भोगलेल्या मानवी दुःखाबद्दल आहे.”
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
२०२२ साली तुम्हाला ही समस्या स्थानिक मुस्लिमांनी उपस्थित केलेला मुद्दा वाटतो. विचारसरणीत इतका ९० अंशीय बदल का घडला, याबद्दल आश्चर्य वाटलं. पण जवळपासची राजकीय परिस्थिती पाहता, जरासा व्यावहारिक झालो. भावनिक न होता वेळीच स्वत:ला सावरले.
निव्वळ चर्चेत राहण्यासाठी अनुपम अंकल आपण आपला विवेक व शालीनता राजकारण्याकडे गहाण ठेवली, याबद्दल राहून राहून फार वाइट वाटतं. चर्चेत राहणं मुद्दा नसेल तर लोकप्रियता हा मुद्दा असावा का? कदाचित तोही नसेल. तुम्ही राजकीय भूमिकेशिवायदेखील लोकप्रिय होता आणि पुढेही राहणार इतकेच नाही तरी अजरामर राहणार. तुम्ही केलेल्या अभिनयाने/सिनेमातील चरित्र भूमिकांनी तुम्हाला आपल्या आयुष्याला पुरतील इतकी मोठी शिदोरी दिलीय.
मग भाजपचा अनुनय करून पैसा कमावणे हा तर तुमचा उद्देश नाही ना! माझ्या आतल्या मनाला वाटतं तेही नसेल. पण तुमची किरकोळ विधाने पाहून आपल्या आकांना खूश ठेवण्यासाठी व वेगवेगळे लाभ मिळवण्यासाठी आपण आपल्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. प्रामाणिकपणाने विचार करा, आपणास पैसा हवाय की, लोकांचं निखळ व निस्पृह प्रेम! माझं मन सांगते, तुम्ही दोघांपैकी जनतेच्या निखळ प्रेमाची निवड कराल!
कारण सामान्य जनतेचे सांसारिक उद्ध्वस्तीकरण करून तुम्हाला पैसा कमवण्याची हौस नसावी. त्यामुळे रक्तलांच्छनातून मिळवलेला पैसा तुम्ही लाथाडाल, अशी अपेक्षा आहे.
पैसाही मुद्दा नसेल तर आपण शांत चित्त राहून, एकांतात बसून, विवेकाशी संवाद साधून अंतर्मनात डोकावून पाहा. तिथं तुम्हाला रक्तबंबाळ झालेल्या रकबरचं थडगं दिसेल, तिथं तुम्हाला उनाचे ते कोरडे दिसतील. गोवंश हत्येच्या नावाने झालेल्या मृतांच्या शेकडो विधवांच्या आर्त वेदना व कोरडी झालेली अश्रू दिसतील.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
तिथंच तुम्हाला रोहिल वेमूलाच्या अस्थी दिसतील. बुलंदशहरच्या पोलीस अधिकाऱ्याचं न्यायासाठी झटणारे कुटुंब दिसेल, धर्मांच्या नावाने छळ केलेल्या बलात्कार पीडितांचे हुंकार दिसतील. कठुआची आठ वर्षांची निरागस आसिफा दिसेल. हिंदू धर्माचे उदात्तीकरण करत बलात्काराच्या दोषींना समर्थन देण्यासाठी काढलेली मिरवणूक दिसेल. कोविड काळात गंगा किनारी पुरलेली मृतदेह दिसतील. वेळेवर उपचार मिळाला नाही म्हणून मरण पावलेला रोहित सरदाना दिसेल..
तरीही तुम्ही संवेदनाहीन झाला असाल तर ईश्वर तुमचे भले करो. माझं तुमच्यावरील निखळ प्रेम तसूभरही कमी होणार नाही. पण इथून पुढे मात्र तुमच्या राजकीय भूमिकेची कठोर चिकित्सा करत राहील.
तुमचा एक सिनेचाहता...
कलीम अजीम, पुणे
.................................................................................................................................................................
लेखक कलीम अजीम ‘डेक्कन क्वेस्ट’ या द्विभाषिक वेबपोर्टलचे संपादक आहेत.
kalimazim2@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment