ठाकूरांचं ते चित्र चावलं म्हणजे चांगला दंशच झाला म्हणा ना! दंश म्हणा, डंख म्हणा - काहीही म्हणा!! पण चावा होता मोठा जीवघेणा...
कला-संस्कृती - चित्रनामा
चंद्रमोहन कुलकर्णी
  • डावीकडे १९७६च्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या दिवाळी अंकातलं बाळ ठाकूर यांचं चित्र, उजवीकडे बाळ ठाकूर
  • Wed , 16 March 2022
  • कला-संस्कृती चित्रनामा बाळ ठाकूर Bal Thakur मौज प्रकाशन गृह Mouj Prakashan Gruh महाराष्ट्र टाइम्स Maharashtra Times वि. वा. शिरवाडकर V. V. Shirwadkar लढाई War कुत्री Dogs

साल होतं एकोणीसशे शहात्तर आणि माझं वय होतं वीस.

पुण्याच्या ‘अभिनव कला महाविद्यालया’त मी अ‍ॅप्लाईड आर्ट्सचं शिक्षण घेत होतो. अ‍ॅप्लाईड आर्ट्स ह्या शब्दातला नेमकेपणा कळण्याचं वय आणि ज्ञान तेव्हा नव्हतं. तेव्हा आम्ही आमच्या कोर्सला आपलं साधं ‘कमर्शियल आर्ट’च म्हणायचो.

साहित्याचं, शब्दांचं, संकल्पनांचं आकलन कमी असण्याच्या वयात होतो मी. चित्रकलेचंसुद्धा आकलन तेव्हा चांगलं होतं, असं म्हणण्याचं धाडस मी करू शकत नाही. साहित्यातलंही आकलन अगदी ‘नव्हतं’ म्हणण्याइतकं कमी. आजही मला वाटतं की, साहित्यातलं माझं आकलन चित्रकलेपुरतं. तेव्हा तर ते तेवढंही होतं की, नाही कोण जाणे!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

पण वाचन भरपूर, पुस्तकं तर होतीच, पण साप्ताहिक, मासिकं, वार्षिकं अशी नियतकालिकं आणि अनियतकालिकं सपाटून वाचायला मिळण्याचा तो काळ. दिवाळी अंक भरपूर.

कोर्सच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षात असल्यामुळे जाहिरातीसाठी केल्या जाणाऱ्या इलस्ट्रेशन या विषयाची चांगली माहिती झालेली होती. ‘स्टोरी इलस्ट्रेशन’ किंवा कथा-कविता-कादंबऱ्यांसाठी चित्र हा प्रकार, आज आहे तसाच तेव्हाही दुर्लक्षित होता.

पण मी मात्र स्टोरी इलस्ट्रेशनची मिळतील तशी आणि तेवढी फुटकळ काम करत होतो. ह्या प्रकाराला ‘स्टोरी इलस्ट्रेशन’ असं भारदस्त नाव आहे, हेही तेव्हाच कळलं, इतका नवा होतो मी. काही चांगलं वाचलं, पाहिलं की झटका बसायचा. जे वाचलं, पाहिलं ते कळायचं किती, पोचायचं किती नि अंगात, मेंदूत पाझरायचं किती, ह्याचा काही अंदाज नसायचा. 

झटका मात्र बसायचा! दंश व्हायचा काही गोष्टींचा.

असाच एक खोलवर दंश झाला, बाळ ठाकूरांचा! अकस्मातच! एकोणीसशे शहात्तर सालचा ‘महाराष्ट्र टाइम्स’चा दिवाळी अंक वाचत होतो. मला आठवतंय, वर्गातच बसलो होतो; अर्थात नेहमीच्या जागेवर म्हणजे मागच्या बाकावर. मुखपृष्ठावरचं देऊसकरांनी केलेलं पोर्टेट आणि न्यूजप्रिंटवर छापलेला, कमल शेडग्यांनी केलेली उत्तम मांडणी असलेला दिवाळी अंक वाचत-पहात होतो.

पानं उलटता उलटता वि. वा. शिरवाडकरांच्या ‘लढाई’ कथेपाशी आलो नि ठेचकाळलोच. कथा वाचायला सुरुवात करायच्याआधी जीवघेण्या रेषारेषांच्या वेगवान चित्राच्या मोहजालात अडकलोच पहिल्यांदा. एखादं असं काही जीवघेणं वयाच्या विसाव्या वर्षात पाहिलं, की मनाची काय अवस्था होते, हे आजही ४०-४५ वर्षांनंतरही आठवतं. अंगावर चक्क शहारे उमटतात. मणक्यावरून मेंदूपर्यंत मुग्यांचं वारूळ वारूळ होतं.

चित्राच्या खाली छोट्या टायपात एका कोपऱ्यात लिहिलेलं होतं -

चित्र : बाळ ठाकूर

बाळ ठाकूर ह्या नावाचा तेव्हा पहिल्यांदा दंश झाला होता मला. त्यांच्या रेषेचा. त्यांच्या कॉम्पोझिशनचा दंश.

(रेषेला ‘लाईन’ आणि रचनेला ‘कॉम्पोझिशन’ असं म्हणायचं असतं आर्टस्कूलमध्ये!)

कॉम्पोझिशन ही गोष्ट तेव्हा मी नव्यानंच शिकत होतो. ठाकूरांचं हे चित्र पाहण्याआधी मी मासिकअंकामधली पुष्कळ मोठमोठ्या चित्रकारांनी काढलेली चित्रं पाहातच होतो. निरखत होतो, मनात साठवत होतो, कळतनकळत अभ्यासही करत होतो. पण ‘दंश’ ज्याला म्हणतात तो ह्या चित्राचा! त्या रचनेचा, मांडणीचा, कॉलममधल्या मजकुराची झिगझॅग मांडणी (त्यानंतर जसजसं शिकत गेलो त्यानंतरचा शब्द : ‘लेफ्ट अलाईन’ आणि तांत्रिक माहितीचा मनात अहंभाव निर्माण होण्याच्या काळात : ‘क्यू एल’) पानाच्या ब्लीडपर्यंत छापलेल्या चित्राचा, ‘लढाई’ या अक्षराचा आणि इतरही अनेक गोष्टींचा वेगवेगळा आणि एकत्र मिळून असाही परिणाम त्या दंशाभोवती होताच.

पण त्याबद्दल थोडं वेगळं, विस्तारानं नंतर कधीतरी बोलू.

एकत्र परिणामाविषयी थोडासा जाताजाता उल्लेख करायचाच झाला, तर तो करता येईल ‘लढाई’ ह्या अक्षराचा. मी त्या वेळी प्रथम हे अक्षर पाहिलं, तेव्हा लेटरिंग म्हणून मला ते आवडलं होतं. कारण कमल शेडग्यांचा, इंग्रजी फॉन्टवरून देवनागरी लिपीतली अक्षरं करण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे, हे लक्षात आलं होतं. आज त्या अक्षरांकडे पाहताना लेटरिंग म्हणून मला ते आवडत असलं तरी कथेच्या आशयापेक्षा फारच भिन्न व्यक्तिमत्त्वाचं झालंय असं वाटतं आणि म्हणून मला ते एका अर्थानं आज आवडत नाही. संपूर्ण अंकात त्यांनी सगळ्या शीर्षकांना याच प्रकारचं लेटरिंग केलंय आणि त्याबद्दल त्यांचा काही निश्चित असा एक विचार होता, असणार हे कबूलच!

पण ह्याबद्दल नंतर कधीतरी.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................ 

तर, ठाकूरांचं ते चित्र चावलं म्हणजे चांगला दंशच झाला म्हणा ना!

दंश म्हणा, डंख म्हणा - काहीही म्हणा!!

पण चावा होता मोठा जीवघेणा.

पण सर्वांत आधी धक्का बसला, तो रेषेच्या दर्जाचा!

रेषेला दर्जा असतो, हे जाणवण्याचं ते वय होतं, पण ते म्हणजे नक्की काय, आणि का, हे समजण्याचं नव्हतं. त्या वयात हे चित्र बघून वाटलं, ‘आयला, आपणही कुत्र्यांची स्केचेस करतोयच की!’ तेव्हा तर मी स्केचिंगन वह्याच्या वह्या भरायचो. गिधाडाचं स्केच कधी केलं नव्हतं, पण कुत्र्यांची स्केचेस केली होती. अगदी व्हिक्टर प्रेरार्डच्या अ‍ॅनॉटॉमी ड्रॉईंगच्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन कुत्र्यांच्या अ‍ॅनॉटॉमीचाही अभ्यास करत होतो आम्ही सगळे!

कुत्र्याचा पूर्ण अभ्यास. कुत्र्याचा सुटा सुटा अभ्यास. कान-नाक-पंजे-दात-शेपटी-बरगड्या तंगड्या. उभं कुत्रं. बसलेलं कुत्रं. धावणारं, उडी मारणारं असे सत्तर प्रकार.

मात्र कुत्र्यांच्या जमावाचं चित्र मी पहिल्यांदाच पहात होतो. ह्या जमावाच्या चित्रानंच तर आमचा एकूणच अभ्यास कुठं कमी पडतोय, हे क्षणार्धात लक्षात आणून दिलं. शेपट्या उंचावलेल्या, शेपटी हलवणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडीचं हे चित्र आहे, एकेकट्या कुत्र्याचं नाही, हे लक्षात आल्यानं आपल्याला होत असलेला हा दंश कशाकशाचा आहे, हेही हळूहळू लक्षात येऊ लागलं.

हेही लक्षात आलं, की, कमर्शिअल आर्ट करताना आपण वस्तूंची, यंत्रांची आणि डब्यांच्या, टायर ट्यूबच्या जाहिरातीसाठी चित्र काढताना रोटरिंग कंपनीचा जो एअरोग्राफ पेन वापरतोय, त्या टेक्निकल पेनानं ही अशी जिवंत लाईन बापजन्मी येणार नाही!!

कुत्र्यांच्या शेपट्या, त्यांच्या प्रजातीप्रमाणं नि स्वभावाप्रमाणं (कथेत म्हटल्याप्रमाणे) कुणी कुलंगी, कुणी विलायती, रस्त्यावरची प्रेमळ, विक्राळ, खंगलेली, त्यांची देहबोली, त्यांचे कान, तोंडं, ढुंगणं ह्या सगळ्यासाठी काहीतरी क्रोकविलसारखं निब असलेला टाक किंवा फाऊंटन पेन असं काहीतरी टूल वापरलं असणार- हे ध्यानात येत होतं.

गिधाडांच्या चोचीसाठी, नखांसाठी, पंखांसाठी आणि एकूणच मघाशी सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांच्या अवयवांसाठी आणि निर्माण होणाऱ्या; तिथे चाललेल्या गदारोळासाठी केलेल्या रेषांचं अ‍ॅप्लिकेशन धक्कादायक होतं. गिधाडं आपल्या नजरेला समांतर आहेत, कुत्र्यांकडे आपण किंचित वरच्या अँगलनं पाहतो आहोत, झुंड चितारताना कुत्र्यांच्या आकाराचा झुंडीचा पुढे पुढे लहान लहान होत गेलेला आणि पुढे पुढे तर रेषेतच रूपांतर होत गेलेलं पाहताना माझे डोळे विस्फारत गेले.

रेषांमुळे रेषांमधल्या भरलेल्या जागा बोलतातच, पण रेषांमधल्या मोकळ्या जागा जास्त बोलतात.

रेषा एकमेकांवर आदळून आदळून गाठी गाठी तयार होतात. काळे ठिपके, काळे डाग, काळे अगम्य आकार, चित्रसदृश वेडेवाकडे काळे घटक निर्माण होतातच.

हे घटक बेफाम हलतात. उडतात, किंचाळतात, भुंकतात. घटकांची लक्तरं होतात, रेषा एकमेकांवर तुटून पडतात, लचके तोडतात. रेषांची गिधाडे आणि गिधाडांच्या रेषा हुंकार करत खाली उतरतात. कुत्री विदीर्ण होतात. लोंबतात, लोंबकळतात, वाताहत होते, क्रोध अनावर होतो रेषांमुळे. रेषांची गिधाडे नि रेषांच्या शेपट्या. ही यात्रा रक्ताळलेली. रक्ताचा प्रक्षोभ. रेषा पातळ होते, यात्रा पुढे जाते, पराकोटीला पोचते, रेषा थरथरते, पातळ होते. रेषा तुटते, तशी यात्राही तुटते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ठाकूरांची रेषा मला माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी दंश करते, डंख मारते, चावते, फोडते, जखमा करते.

 

ठाकूर हे जग सोडून जातात.

रेषा मागे ठेवतात.

दंश मागे ठेवतात.

जखमा राहतात. रहाव्यात.

जखमांचे हे घाव भरून येऊ नयेत कधीच.

खपली धरू नये त्यावर, कधीच.

ठाकूरांचं विस्मरण होऊ नये, कधीच.

.................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा : बाळ ठाकूर : एक सिद्धहस्त ‘रेषा’ - रविमुकुल

.................................................................................................................................................................

परवा एकदा घरी माळा आवरत होतो.

अचानकच २०१३ सालचा मौजेचा अंक टपकन खाली पडतो. माळा आवरायचं सोडून मी अंक चाळत बसतो. अंक चाळता चाळता मिलिंद बोकीलच्या ‘नायक’ कथेसाठी मी काढलेल्या कुत्र्यांची चित्रं पाहतो. चित्रं समोर येताच ही कुत्री मला ४० वर्षं मागं नेतात. ह्या कुत्र्यांच्या रेखाटनांपासून त्या कुत्र्यांच्या रेखाटनांशी मी थांबतो.

झुंड म्हटलं की, बाळ ठाकूरांनी काढलेली कुत्री अंगावर धावून येतात.

शिरवाडकर, ठाकूर, कुत्री, गिधाडं, रेषा - डोकं भंजाळून जातं.

हा मूळ लेख ‘दंश’ या नावानं ‘ललित’ मासिकाच्या मार्च २०२२च्या अंकात प्रकाशित झालाय. पूर्वपरवानगीसह साभार

.................................................................................................................................................................

लेखक चंद्रमोहन कुलकर्णी मराठीतील प्रसिद्ध चित्रकार आणि मुखपृष्ठकार आहेत.

chandramohan.kulkarni@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......