‘झुंड’ थिएटरबाहेर पडल्यावरही आपला पिच्छा सोडत नाही. आपले खरे रूप बघणे सर्वांनाच आवडते असे नाही, तरीही अधूनमधून अशा आरशात बघायला हवे...
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘झुंड’चं एक पोस्टर
  • Mon , 07 March 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा झुंड Jhund अमिताभ बच्चन Amitabh Bachchan नागराज मंजुळे Nagraj Manjule

‘झोपडपट्टीमधली मुलं तशीच असतात’, ‘त्या रिकामटेकड्या मुलांबरोबर खेळू नकोस’, ‘चांगल्या संगतीत राहा’ अशा पद्धतीची वाक्ये मध्यमवर्गीय घरातल्या मुलांना अनेकदा ऐकवली जातात. ती मुले तशी का राहतात, शाळेत का जात नाहीत, त्यांचे रोजचे प्रश्न काय असतात, हे जाणून घेण्याची फार कमी जणांना उत्सुकता असते. कोणता तरी उत्सव किंवा कोणाची जयंती वगैरे साजरी करताना ही मुले जोरजोरात स्पीकर लावून सगळा परिसर दणाणून सोडतात. पुन्हा आपण त्यांच्याविषयी तिटकारा व्यक्त करतो. आपण दुटप्पी असतो. आपल्याला झोपडपट्टी खिडकीमधून दिसेल इतकी जवळ नको असते, पण त्याच वस्तीतून घरकामाला येणाऱ्या बायका फार लांबून आल्या तर त्यांना पैसे जास्त द्यावे लागतील, त्यामुळे आपल्या ती वस्ती थोडी जवळ, पण नजरेच्या पलीकडे हवीशी वाटत असते. त्या वस्तीमध्ये कधीही पाऊल न टाकता आपण त्याबद्दल ठाम समजुती करून घेतो आणि गैरसमज पसरवण्यात हातभार लावतो.

समाजात असे अनेक विरोधाभास एकाच वेळी नांदत असतात. करोनामुळे ही दरी वाढली आहे. हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांना प्रवेश देण्यासाठी त्यांची तपासणी केली गेली, लसीकरण केल्याचे पुरावे त्यांच्याकडून घेतले. याच न्यायाने आपले लसीकरण प्रमाणपत्र आपण त्यांना दिले का? राजकारणी लोकही त्यांना निवडणुकीसाठी वापरून घेतात. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

नागराज मंजुळे लिखित, दिग्दर्शित ‘झुंड’ हा हिंदी सिनेमा आपल्याला अशाच एका वस्तीचा, त्यातल्या मुलांचा विचार करायला प्रवृत्त करतो. सिनेमाची भाषा जाणून घेऊन समाजातील एका वर्गाचे प्रश्न मांडणाऱ्या ‘फँड्री’ या अप्रतिम सिनेमात शेवटच्या प्रसंगात एक दगड प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला गेला, हेच सांगण्यासाठी की, ही दरी वाढवण्यासाठी कोण कारणीभूत आहे. तो दगड कोणाला लागला का? कारण सिनेमाकडे करमणूक याच स्वरूपात बघण्याची आपल्याला सवय झाली आहे. त्यामुळे दृश्य माध्यमाचा वापर करून नागराजने बरेच काही सांगितले, पण आपण बघितलेच नाही.

त्यानंतर लोकांची नस पकडणारा परंतु या कॅमेऱ्याच्या भाषेतून बरेच काही सांगणारा ‘सैराट’ नागराजने काढला. पण लोकांनी त्यात प्रेमकथा बघितली, त्यातल्या गाण्यावर ताल धरला आणि दिग्दर्शक जे सांगू पाहतोय, तिकडे दुर्लक्ष करून चारचौघांत त्याचे कौतुक करणे टाळले. आजवर नागराज ‘पिस्तुल्या’, ‘पावसाचा निबंध’, ‘अनपॉझड्’ अशा अनेक दर्जेदार कलाकृतींमधून व्यक्त झालाय आणि त्यांमधून त्याने समाजातील दाहक सत्य समोर आणले आहे.

त्याचीच पुढची पायरी म्हणजे ‘झुंड’ हा सिनेमा. विजय बोराडे (अमिताभ बच्चन) निवृत्त होत असतानाच एका झोपडपट्टीमध्ये येतात, तिथल्या वस्तीत मुले कशा पद्धतीने वेळ घालवतात, कशी मारामारी करतात, हे सर्व बघतात आणि त्यांचा वेळ सत्कारणी लावावा, या उद्देशाने त्यांना फुटबॉल शिकवण्याचे ठरवतात.

सुरुवातीला त्यांना मुले प्रतिसाद देत नाहीत, नंतर खेळण्यासाठी पैशाचे आमिष दाखवणे, त्यानंतर एक दिवस वस्तीत न जाणे, त्या मुलांनी शोध घेत त्यांच्या घरी येणे आणि पैशासाठी नव्हे तर काही नवीन शिकण्यासाठी फुटबॉल खेळणे, हे सर्व विजय यांच्या आणि मुलांच्या नजरेतून आपण बघतो. वस्ती, वस्तीमध्ये खेळण्यासाठी केलेली जागा, त्यानंतर ठरवलेला ‘सद्भावना’ सामना, त्याच वेळी त्यांना पडणारा प्रश्न – “ये सद्भावना क्या होती है?”, दुसऱ्या टीमच्या कोचने (किशोर कदम) त्या मुलांना ‘झुंड’ (जंगली प्राण्यांचा तांडा) असे संबोधणे, कोणालाच सन्मानपूर्वक वागणूक न मिळणे, “यांना कशाला आणलं आहे या मैदानावर?’ अशा भावना व्यक्त होणाऱ्या नजरा, हे सर्व सिनेमाच्या तंत्राचा वापर करून उत्तम प्रकारे दाखवले आहे. ‘झुंड’ची प्रत्येक फ्रेम बोलकी केली आहे.

‘सैराट’मध्ये असहाय्य नायिका ज्या बसस्टॉपवर वाट बघत उभी असते, तिथेच ‘महिला सक्षमीकरणा’बद्दल जाहिरात दिसते. ‘पिस्तुल्या’मध्ये पाटा-वरवंटा विकणारी स्त्री दिसते, त्याच वेळी खेडेगावात पोहोचलेला मिक्सर दिसतो. ‘झुंड’मध्ये असे अनेक प्रसंग जागोजागी दिसतात. आंबेडकर जयंतीसाठी वर्गणी मागायला गेलेल्या वस्तीतल्या मुलांना तिथला दुकानदार काय म्हणतो आणि त्याच्या दुकानात कोणाचे छायाचित्र असते, यावरून आपल्याला प्रेक्षक या नात्याने जे प्रतीत होते, ते महत्त्वाचे. पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा फुटबॉलसारख्या खेळामधून अनेक गोष्टी शिकवता येतात, हे आपण या सिनेमात बघतो. आपणच केलेला कचरा सर्व मुले उचलून स्वच्छतेचे धडे कोणत्याही लेक्चरशिवाय शिकतात. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘असं कधी घडत नसतं’ म्हणणाऱ्यांच्या माहितीसाठी, नागपूरचे फुटबॉल कोच विजय बरसे यांनी केलेल्या ‘स्लम सॉकर’ या उपक्रमावर आधारित हा सिनेम आहे. त्यांनी पत्नी रंजना आणि मुलगा अभिजितच्या सहयोगाने क्रीडा विकास संस्था, नागपूर ही संस्था स्थापन केली. त्यांच्या कार्यावर ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात एक भाग दाखवला गेला होता. त्यांचा ‘TEDx talk’ही ऐकण्यासारखा आहे. विजय बरसे २० वर्षांपासून मुलांना फुटबॉल शिकवत आहेत. चार लाखांहून अधिक असलेले त्यांचे विद्यार्थी भारतभर पसरले आहेत. 

असे असले तरीही हा सिनेमा ‘बायोपिक’ नाही. कथा-पटकथा-संवाद लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सिनेमाची सुरुवात झोपडपट्टीमधील वास्तव दृश्यांचे कोलाज दाखवून केली आहे. कॅमेरा असा काही फिरवला आहे की, आपल्याला त्या वस्तीमधील जीवन, त्यातले बारकावे, तिथली उद्योजकता, तिथली घरे, दुकाने, गल्ल्या, तिथले व्यवहार दाखवता दाखवता पुढे काय वाढून ठेवले असेल, याची कल्पना येते.

सुधाकर रेड्डी यांची अप्रतिम, अर्थवाही सिनेमॅटोग्राफी प्रेक्षकांशी होणाऱ्या मूक संवादाचा एक भाग आहे. झोपडपट्टीच्या बोळा-बोळातून, फुटबॉलच्या मैदानाभोवती, वेगवेगळ्या मुलांच्या दृष्टीकोनातून कॅमेरा असा फिरला आहे की, तिथले वातावरण आपल्यात झिरपते. वैभव दाभाडे, कुतुब इनामदार यांचे संकलनही दाद देण्यासारखे आहे. 

नागराज मध्यंतरापूर्वी फुटबॉल टीम तयार करतात आणि मध्यंतरानंतर त्या मुलांची स्वतःची ओळख पटवण्यासाठी दारोदारी होणारी कुतरओढ दाखवतात. ती दृश्ये आपल्याला विचार करायला लावतात.

भटक्या माणसाला ठावठिकाणा नसतो, शिवाय सरकार दरबारी त्याची नोंदही नसते. संवादलेखक नागराज मंजुळे यांचे संवाद त्या मातीतले आहेत. पटकथालेखक नागराज मंजुळे यांनी वस्तीतल्या अनेक पात्रांची सुरेखरीत्या गुंफण केली आहे. अमिताभ बच्चन यांनी उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व उभे केलेले नाही, ही या चित्रपटाची जमेची बाजू. ते मुलांचे कोच या नात्याने समोर दिसतात, तरीही सिनेमा त्यांचा होत नाही, तो त्या मुलांचा आहे. अमिताभ आहे, म्हणून नागराज यांनी सिनेम हातातून सोडलेला नाही, हे विशेष.

अमिताभचा मोनोलॉग अर्थातच उत्तम. आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यांनी ‘सैराट’ गाजवला असला तरी त्यांच्या भूमिकांची लांबी वाढवलेली नाही. रिंकी राजगुरू सावळीच दाखवली आहे, त्यामुळे ती त्या गावातली वाटते. किशोर कदम, ज्योती सुभाष, रामदास फुटाणे, भारत गणेशपुरे यांच्या भूमिका कमी लांबीच्या पण उल्लेखनीय. छाया कदम यांना संवाद जवळजवळ नाहीतच, पण त्या नजरेतून बोलल्या आहेत. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

खरी बाजी मारली आहे ती वस्तीतल्या मुलांचा अभिनय करणाऱ्या अनेक कलाकारांनी. ही मुले अभिनय करत आहेत असे वाटतच नाही. त्याचे श्रेय निर्विवाद दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांचेच आहे.   

वस्तीतल्या मुलावर प्रेम करणारी कॉलेजमधली मुलगी, क्लायमॅक्ससाठी पळापळ, अशा काही कमर्शियल तडजोडी खटकणाऱ्या आहेत. अजय-अतुल यांचे संगीत सिनेमाच्या प्रकृतीला साजेसे असले तरी त्यांच्या गाण्यामध्ये आता तोचतोचपणा जाणवतो. ‘अभी मुझ में कहीं’, ‘जीव रंगला’ अशा मेलडी असलेल्या गाण्यातले अजय-अतुल पुन्हा दिसावेत. तसे काही प्रसंग या सिनेमात होते. रॅप साँग चांगले जमून आले आहे, कारण रॅपची प्रकृती बंडखोरीला साजेशी आहे. त्याचे प्रत्यंतर ‘गली बॉय’मध्येही आले होते.

नागराजच्या दिग्दर्शनामुळे सिनेमाची तीन तासाची लांबी खटकत नाही. कोणत्याही कलाकृतीचा आनंद घेतल्यानंतर आपण त्याविषयी विचार करत राहतो, असे झाले तर ती कलाकृती श्रेष्ठ. ‘झुंड’ बघून आपण थिएटर बाहेर येतो, तेव्हा बराच वेळ तो विषय आपला पिच्छा सोडत नाही. आरशामध्ये खरे रूप बघणे सर्वांनाच आवडते असे नाही, तरीही जाणीवा जागृत असलेला सहृदयी समाज या नात्याने आपण अधूनमधून अशा आरशात बघायला हवे. ‘थप्पड’, ‘आर्टिकल 15’ अशा सिनेमांचे महत्त्व यासाठीच आहे.

‘झुंड’ अनुभवल्यानंतर काही जणांना झोपडपट्टीमध्ये जावेसे वाटले, आपल्या घरी काम करण्यासाठी रोज येणाऱ्यांच्या घरी जावेसे वाटले, त्यांच्या मुलांना काही शिकवावे असे वाटले, तरी खूप झाले!

.................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Shridhar Marathe

Tue , 08 March 2022

परीक्षण आवडले. हा चित्रपट बघायचा आहेच पण या परिक्षणामुळे त्याची उत्सुकता अधिक वाढली. धन्यवाद !


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......