‘ट्रान्सेंडन्स’, ‘इन टाइम’ आणि ‘हर’ : भविष्यात डोकावणारे तीन सिनेमे
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
समीर शिपूरकर
  • ‘ट्रान्सेंडन्स’, ‘इन टाइम’ आणि ‘हर’ या सिनेमांची पोस्टर्स
  • Sat , 05 March 2022
  • कला-संस्कृती इंग्रजी सिनेमा ट्रान्सकेंडन्स Transcendence इन टाइम In Time हर Her

काळ इतक्या वेगानं आणि इतक्या अतर्क्य पद्धतीनं बदलतो की, पुढं नक्की काय काय होईल, हे सांगणं अशक्य आहे. आज आपण जगत असलेली तांत्रिक प्रगती ५० वर्षांपूर्वी कुणाच्या स्वप्नातही नव्हती. म्हणूनच हे सिनेमे भविष्यातलं वास्तव दाखवणारे आहेत की, काल्पनिक आहेत, हेही सांगणं तसं अवघड आहे.

‘इन टाइम’ (In time, 2011, Director – Andrew Niccol)

वेळ हेच चलन झालंय आता. ‘टाईम इज मनी’ म्हणायचे, ते खरंच प्रत्यक्षात उतरलंय. प्रत्येकाच्या हातावर एक डिजिटल घड्याळ उमटलेलं आहे. त्यात वेळ दिसते. खरं तर काळ दिसतो असं म्हणावं लागेल.  कुणाचे ४ तास, कुणाचे १०० तास, कुणाची १०० वर्षं, तर अगदी मोजक्या लोकांची हजार वगैरे वर्षं. जितका वेळ लिहिला आहे तितकं तुमचं आयुष्य. गरिबाचं पोट हातावर असतं म्हणतात तेही इथं प्रत्यक्षात आहे.

वेळ संपलेली माणसं चालता बोलता पटकन जागच्या जागी मरून पडतायत. जर मरायचं नसेल तर काम करा. कमाई वेळेच्या हिशोबात मिळेल. म्हणजे जगण्यात एखादा दिवस जमा होईल. पुन्हा उद्याची चिंता आहेच. गरीब लोक कुत्र्यासारखे राबतायत. सारखे हाताकडं बघतायत, पण श्रीमंत लोकांना असल्या भानगडी नाहीत. त्यांच्याकडं प्रचंड वर्षं साठून आहेत. म्हणजे काही हजारात त्यांचं आयुष्य आहे. दरम्यानच्या काळात ते म्हातारे होणार नाहीत. त्यांच्या त्वचेवर सुरकुतीसुद्धा पडणार नाही. पैशांनं पैसा जसा वाढतो तसा काळानं काळ वाढतो. काळ आला पण वेळ नाही वगैरे भानगडी श्रीमंतांना लागूच होत नाहीत.

एक गोची आहे. हातात हात घालून, हात पिरगळून दुसऱ्याची वर्षं स्वेच्छेनं किंवा बळजबरीनं काढून घेणं शक्य आहे. त्यामुळं गरीब आपल्याला लुटतीलही भीती श्रीमंतांना सतत आहे.

एकमेकात फार मिसळायलाच नको म्हणून श्रीमंतांनी त्यांचा गाव दूर वसवला आहे. त्याला मोठ्ठा टोल द्यावा लागतो. म्हणजे तिकडं आत जाताना आपल्या आयुष्यातली शंभर का हजार वर्षं टोलला द्यावी लागतात. त्याउप्पर ज्याची लायकी त्यानेच पुढं जाण्याचं धाडस करावं.

तर असा हा साधारण प्लॉट आहे. तपशील सांगत नाही. याही सिनेमात भरपूर काय काय घडतं. मारामाऱ्या होतात. एक चांगला थ्रिलर बघायला मिळतो, पण मुद्दा तो नाहीय. मार्क्सची थिअरी भविष्यात घालून अतिशय सर्जनशील पद्धतीनं ही गोष्ट रचली आहे.

जुन्या परिभाषेला लोक कंटाळले आहेत, हे जाणून हुषार लोकांनी आपला मुद्दा नीट मांडण्यासाठी थ्रिलरची वाट निवडली आहे, असं वाटत राहतं.

गोष्ट खरी असो वा खोटी, मोलाची आहे हे नक्की.

‘हर’ (Her​, 2013, Director - Spike Jonze)

‘ग्लॅडिएटर’ सिनेमा बघितला असेल आणि अलीकडचा ‘जोकर’ सिनेमा बघितला असेल, तर चक्रावून जाल. कारण रोमच्या राजाचा खलनायकी रोल करणारा तोच माणूस ‘जोकर’मधला भेदक विनोदवीरही असू शकतो आणि तोच माणूस ‘हर’मधला हिरोसुद्धा असू शकतो, हे पटणं जरा अवघडच जातं.

याकीन फिनिक्स (Joaquin Phoenix) हा या सिनेमात जवळजवळ एकटाच नायक आहे. आणि त्याच्यासोबत असलेली त्याची मैत्रीण आपल्याला एकदाही दिसत नाही. कारण ती माणूसच नाहीय. म्हणजे खरंच नाही. कारण ती आहे कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टिम. पण ती म्हणजे साधीसुधी नाहीय. ती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप विकसित झाल्यानंतरची. सध्या वापरात असलेल्या सिरी आणि अलेक्सा या स्त्रिया तिच्यासमोर फारच किरकोळ. कारण ‘हर’मधली स्त्री नुसती कामांची आठवण करणारी नाहीय, नुसती कॅलेंडर सांभाळणारी नाहीय, तर ती माणसासारखा संवाद साधणारी आहे. खरं तर कॉम्प्युटरमधली साधी ऑपरेटिंग सिस्टम ती. तिला ना स्त्रीचा आवाज, ना पुरुषाचा, पण हौस म्हणून आपला नायक स्त्रीचा आवाज निवडतो. मग ती स्त्री त्याच्या आयुष्याचा भाग बनून जात खरी मैत्रीण जशी बोलेल, समजून घेईल, समजावून सांगेल तशी त्याच्याशी वागत राहते.

भोवतालातल्या माणसांशी जमवून घेताना अडचण येणारा, शक्य असेल तर एकटं राहू इच्छिणारा असा आधुनिक जगातला आपला नायक आहे. तरी अर्थातच माणूसपणाच्या त्याच्या बेसिक गरजा तशाच शाबूत आहेत. म्हणजे सोबत कुणीतरी असावं, एखादी स्त्री आयुष्यात असावी असं त्याला अर्थातच वाटतं आहे. तर ही नवी आभासी मैत्रीण अशी मिळालीय की, जी कोणत्याही अटी घालत नाही, रागावत चिडत नाही, नेहमी हसून बोलते. शिवाय ती भलती हुषार आहे. तल्लख आहे. आवाजातला बारीक बदलही तिच्या नजरेतून सुटत नाही. मूड बघून ती चावट बोलू शकते. वात्रट बनू शकते. लैंगिक उत्तेजना मिळावी असं काही बोलून कोंडीत पकडू शकते.

तर अशा भन्नाट मैत्रिणीबरोबर आपला नायक दिवसरात्र बेभान होऊन जगत जातो, प्रेमात डुंबत जातो, तिच्यात जीव अडकवत जातो. वास्तव आणि आभास, खरा अनुभव आणि डिजिटल अनुभव यांच्यातल्या सीमारेषा पुसट होत होत नाहीशा होतात.

आणि एका क्षणी त्याला लक्षात येतं की, आपल्याला इतकं जवळ करणारी ही मैत्रीण एकाच वेळी हजारो लोकांना त्याच प्रकारे रिझवत आहे. केवळ आपण नव्हे तर अनेकांना अशीच भुलवत आहे. मग आपण इतकं खाजगी जग उभं केलं त्याला अर्थ काय? तिचं जीवघेणं सुंदर हसू, तिच्या सहवासात आलेला लैंगिक अनुभव.... त्याचा अर्थ काय लावायचा? सगळ्या तांत्रिक प्रगतीच्या एव्हरेस्टवर तो बसतो, तेव्हा त्याच्या शेजारी बसतं ते पुन्हा आदिम एकाकीपण. त्या रडवेल्या एकाकीपणात त्याचे मूळ प्रश्न आणखीनच गर्द होऊन जातात.

‘ट्रान्सेंडन्स’ (Transcendence, 2014, Director – Wally Pfister)

एक शास्त्रज्ञ आहे. तो संशोधन यावर करतोय की, मानवी मनात असलेला जो consiousness आहे, जी संपूर्ण जाणीव आहे, ती इंटरनेटसारख्या जालात ओतता येईल का? तर याचं काम जोरात सुरू आहे. या प्रयोगाला विरोध करणारा एक आक्रमक, हिंसक गट आहे. त्या गटाला या प्रकाराची प्रगती नको आहे. त्या हातातले लोक आपल्या शास्त्रज्ञावर हल्ला करतात आणि त्याला विषबाधा करतात. आता तो काही दिवसांचाच सोबती. मग या हिरोची जीवघेणी धडपड सुरू होते आणि काळाशी स्पर्धा सुरू होते. आपण मरायच्या आत आपलं मन-विचार-भावना-बुद्धिमत्ता-भावना-बुद्धिमत्ता हे सगळं त्या इंटरनेटला जोडून त्याद्वारे जिवंत राहता येईल का?

सिनेमाच असल्यामुळं मध्ये बरंच काय काय होतं आणि शेवटी त्याच्या मनासारखं होतं. एकीकडं तो देह ठेवतो आणि दुसरीकडं आपला आत्मा जणू अमर करतो. क्षणार्धात इंटरनेटच्या  माध्यमातून तो सर्वत्र पसरतो. सर्वत्र म्हणजे खरोखरच सगळीकडं. इंटरनेटचं जाळं पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टींना जोडलं गेलंय. म्हणजे माणसांना, वस्तूंना, यंत्रांना, कारखान्यांना, गाड्यांना, टीव्हीला, बंदुकीला, दगडधोंडेवाळूला इत्यादी इत्यादी.

म्हणजे आपला ना दिसणारा शास्त्रज्ञ आता चराचराला व्यापून उरला. अणूरेणूत शिरला. म्हणजे तो जणू ईश्वरच झाला, पण तो आधी माणूस होता. म्हणजे माणसाचं मन त्याच्याजवळ होतं. माणसाचं मन अर्थात विकारी असणार. हो ना? मग तेच झालं शेवटी. इतकी तांत्रिक प्रगती झाली, तो गृहस्थ अमर झाला, पण त्याचे विकारही अजरामर झाले. त्याला राग येऊ लागला, ईर्ष्या वाटू लागली, आपली सर्वंकष सत्ता असली पाहिजे, असं त्याच्या मनानं घेतलं. जणू एकविसाव्या शतकातले अनेक राष्ट्रप्रमुख जसे वागतायत, तसं त्याला वाटू लागलं. म्हणजे शेवटी प्रश्न तांत्रिक प्रगतीचा उरला नाही. तो प्रश्न झाला माणूस आणि यंत्रतंत्र यांच्यातल्या आदिम संबंधाचा. शेवटी सिनेमाच तो. मग त्यात अजूनही खूप काय काय होतं आणि अनेक प्रश्न आपल्या मनात रुजवून सिनेमा संपतो. एखाद्याला प्रश्न जरी पडले नाहीत, तरी चांगला थ्रिलर बघायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षकाला मिळतं.

तर असे हे तीन सिनेमे. संवेदनशील माणसाला विचारात पाडणारे, अस्वस्थ करणारे. आपलं माणूसपण नेमकं कशात आहे, तंत्रज्ञान वाढून शेवटी कुठं पोचणार आहे याबाबत नव्यानं विचार करायला लावणारे.

आज एक वर्ग तंत्रज्ञानाबाबत चेकाळल्यासारखा वागतो आहे. जे नवं येईल ते तो बेभानपणे आत्मसात करतो आहे. त्याला कसलेही प्रश्न पडत नाहीत. हे सगळं मिळून काय चाललं आहे, कुठं चाललं आहे याची त्याला फिकीर नाही.

दुसरा एक वर्ग इतिहासात डुंबणारा आहे. इतिहासाचा विषय निघाला की, त्याला गरगार वाटतं. कुणी ७० वर्षांच्या विचारात तर कुणी सोळाव्या शतकात कुणी अकराव्या शतकात लटकलेला आहे. यांना भविष्यकाळात काय घडेल, काय घडलं पाहिजे याबाबत काही वाटत नाही. जणू ‘future blind’ असल्यासारखी परिस्थिती आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अजून एक वर्ग आहे, जो आपापल्या अस्मितांमध्ये गुरफटलेला आहे. आपल्या गटाचा अजेंडा पुढं रेटत नेणं इतकाच आयुष्याचा अर्थ त्याला ठाऊक आहे. आपल्या गटाबाहेर काय चालू आहे, यानं त्याला फार फरक पडत नाही.

गंमत म्हणजे हे तिन्ही गट तांत्रिक प्रगतीचा अ-चिकित्सक स्वीकार करतात. तांत्रिक प्रगती ही तारतम्याने झाली पाहिजे, असं क्वचितच कुणाला वाटतं.

वर बघितलेले तीन सिनेमे किंवा ‘ब्लॅक मिरर’सारख्या वेबसेरिज आपल्याला मनोरंजन करता करता सावध करण्याचा प्रयत्न करतात.

एक चांगलं बाहे की, हे तिन्ही सिनेमे ‘आम्ही वेगळे आहोत’ असा दावा करत नाहीत. कलात्मक आहोत नाहीत, याच्या द्वंद्वात अडकत नाहीत. गाड्यांची पळापळ, बंदुका घेऊन मारामारी असं सगळं दाखवत, हवं तसं मनोरंजन करत हे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोचतात. मेनस्ट्रीम हॉलिवुड सिनेमा बनवून लोकांना विचारात पाडता येतं, याचं अजून एक उदाहरण सिद्ध करून हे सिनेमे मनात घर करून राहतात. 

.............................................................................................................................................

लेखक समीर शिपूरकर डॉक्युमेंटरी फिल्ममेकर असून अवकाश निर्मिती या संस्थेतर्फे डॉक्युमेंटरी बनवणे, प्रसार करणे हे काम करतात.

sameership007@gmail.com       

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख