‘गहराईयाँ’ : नावावरून किंवा थ्रिलर म्हणून बघितल्यास भ्रमनिरास होईल, मादक ट्रेलरवरून बघण्याचा निर्णय घेतलात तर क्षणिक आनंद मिळेल
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘गहराईयाँ’ या सिनेमाची पोस्टर्स आणि त्यातील काही दृश्यं
  • Tue , 15 February 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा गहराईयाँ Gehraiyaan दीपिका पदुकोन Deepika Padukone सिद्धांत चतुर्वेदी Siddhant Chaturvedi अनन्या पांडे Ananya Panday धैर्य करवा Dhairya Karwa

प्रेम कोणावरही करावे, केव्हाही करावे, आनंदी असताना करावे, दुःखी असताना करावे, नवरा-बायकोने एकमेकांशी करावे, थोडे फार मतभेद झाले, तर तत्परतेने मित्र-मैत्रिणींशी करावे. पण प्रेम म्हणजे शारीरिक संबंध, असे दाखवायचे असेल तरी त्याला आध्यात्मिक मुलामा देण्यासाठी ‘गहराईयाँ’ असे नावे द्यावे.

किनाऱ्यावर असलेल्या टोलेजंग इमारती दिसतील, अशा बेताने समुद्रात सैर करणाऱ्या छोट्या बोटीमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रिया आहेत. सांगा पाहू यांचे एकमेकांशी काय नाते आहे? अलिशा आणि करण एकमेकांच्या मिठीत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत, असं दिसतंय. झेन आणि तिया यांनी लग्न केलं आहे. पण हे काय चौघांच्या ग्रुप सेल्फीमध्ये कोणी कोणाचा हात धरला आहे? (उसळणाऱ्या लाटा) समुद्राच्या कडेकडेने फिरून कंटाळा आल्यामुळे आता ते किनाऱ्यावर उतर आहेत. उतरताना त्यांचे एकमेकांशी घट्ट नाते दिसते, पण त्या दोघांचे नेमके काय बिनसले आहे? अलिशा करणबद्दल झेनला काही सांगता सांगता झाडीत कुठे गेली? (जोरदार उसळणाऱ्या लाटा) करण आणि तिया इकडे काय करत आहेत? अच्छा, ते शाळेपासून एकमेकांचे मित्र आहेत. म्हणून त्या दोघांचा एकांतवास सुरू आहे?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आता पुन्हा नवरा-बायकोच्या जोड्या एकत्र आल्या. त्या दोन्ही जोड्यांचे एकमेकांशी बिनसले आहे की नाही? अरेच्या? आपापल्या रूममध्ये आल्यानंतर ते इथेही प्रणय करत आहेत. (पुन्हा एकदा उसळणाऱ्या लाटा) नवरा-बायको आनंदात आहेत म्हणून प्रणय करत आहेत. त्यांचे एकमेकांशी बिनसले आहे, म्हणून ते मित्र-मैत्रिणीबरोबर प्रणय करत आहेत. (गोव्यात उसळणाऱ्या लाटा)

कोणीच कोणाशी बोलत नाही. त्यामुळे मतभेद नेमके कोणत्या मुद्द्यांवर आहेत, याबद्दल जोडप्याने एकमेकांशी चर्चा केल्यास प्रेक्षकांचा रसभंग होईल. त्यामुळे प्रत्येक प्रश्नावर एकच मात्रा. प्रेक्षक चित्रपट बघायला आले आहेत, हे लक्षात ठेवून त्यांना काय ‘दाखवायचे’ आहे, हे भान ठेवायला हवे.

शिवाय निर्माता करण जोहर असल्यामुळे हा प्रश्न उच्चभ्रू समाजाचा आहे. त्यामुळे चित्रपटातील कोणतेही पात्र ‘आर्थिक परिस्थिती’ बिकट आहे, असे म्हणत असेल तर त्याचा अर्थ शंभर कोटींचा सौदा झाला नाही, आता दरमहा एक कोटी एवढ्याच उत्पन्नात कसे होणार? दरमहा ठराविक उत्पन्न मिळावे, यासाठी बिचारी दीपिका पदुकोण योगा-अ‍ॅरोबिक्स क्लासेस घेते, त्याचे तिला लाखो रुपये मिळतात, असे तिच्या राहणीमानावरून दिसते. परंतु योगा शिकवताना एकाग्रतेचे आसन माहीत नसल्यामुळे ती अनेक आसने करता करता मोबाईलवर आलेल्या मेसेजला तत्परतेने उत्तर देत असते.

सिद्धांत चतुर्वेदी एकदा योगा क्लासेसमध्ये योगगुरू दीपिकाला भेटायला येतो आणि तिला म्हणतो, ‘मलाही योगा शिकव’. तो सिद्धांत असल्यामुळे दीपिका त्याला एक आसन त्याचे हात पकडून असे काही शिकवते की, त्यांचा एक नवाच गुंता तयार होतो.  (गेट वे ऑफ इंडियाजवळ जोमात उसळणाऱ्या लाटा)

चित्रपटाला ‘गर्भितार्थ’ असावा, यासाठी नसिरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांना वडिलकीचा सल्ला देणाऱ्या भूमिका दिल्या आहेत, परंतु त्यांना मोक्याच्या क्षणी काहीच करू दिलेले नाही. नायिका आपल्या वडिलांशी (नसीर) बोलताना चार वाक्यांत सहा वेळा ‘फ’कारादी शब्द वापरते. अर्थात शिव्यांचे वावडे असण्याचे काहीच कारण नाही, पण मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात वापरले जाणाऱ्या शिव्या बापाबरोबर वाद घालताना वापरल्या जात नाहीत, भलेही तो देश भारत असो वा अमेरिका. नेमके याच ठिकाणी लाटांवर लाटा दाखवायला संकलक-दिग्दर्शक विसरले.   

असे अनैतिक संबंध बराच वेळ चवीने दाखवल्यानंतर म्हणजे अडीच तासाच्या चित्रपटात सव्वा तासानंतर लेखक-दिग्दर्शकाला हा चित्रपट थ्रिलर आहे, याची आठवण होते. एका पात्राने खून केलेला असूनही अनेक उपदव्याप करणाऱ्या एखाद्या पात्राविषयी सहानुभूती निर्माण करण्याचे दिग्दर्शकाचे प्रयत्न फसतात. नातेसंबंधांची मानसिकता हा विषय बाजूला पडतो आणि जवळीक  दाखवणे महत्त्वाचे ठरते, हेच या चित्रपटाचे अपयश आहे.   

माणूस पैशाने सुखी होत नाही, मानसिक समाधानाने तर नाहीच नाही, अनैतिक संबंधाने होऊ शकतो, परंतु त्यामुळे फारच अवघड अशी गुंतागुंत निर्माण होते, असा काहीसा अर्थ काढण्यास लेखक-दिग्दर्शक प्रवृत्त करतात आणि मनोवेध मागे पडतो. कारण निर्माता-दिग्दर्शकाची प्राथमिकता कशाला आहे, हे पहिल्या तासात पुढे येते.  

चित्रपटाचा फोकस पहिल्या तासाभरात चुकला नसता तर चित्रपट उत्तम होऊ शकला असता.  नंतर चित्रपटाची हाताळणी अशी केली आहे की, प्रेक्षक ना नायिकेच्या बाजूने असतो, ना नायकाच्या. चित्रपटातील अनेक पात्रे जसा विचार करतात तसा विचार पोलीस का करत नाहीत, हा हिंदी चित्रपटात नेहेमीच प्रश्न पडतो. त्यामुळे खून करणारे पात्र उजळ माथ्याने वावरते शिवाय प्रेक्षकांची सहानुभूतीसुद्धा मिळवते. 

दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदीचा अभिनय उत्तम आहे. कौशल शहा यांची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम.

शकून बात्रा यांच्या कथेवरून आयेशा देवित्रे, सुमित रॉय यांनी पटकथा लिहिली आहे. शकून बात्रा यांनी वूडी अ‍ॅलनचा आपल्यावर प्रभाव असल्याचे मान्य केले आहे, परंतु या चित्रपटाची कथा–पटकथा वूडी अ‍ॅलन दिग्दर्शित ‘मॅच पॉइंट’वर आधारित असल्याचे कुठेही सांगितले नाही. तरीही ‘मॅच पॉइंट’ हा शकूनचा आवडता चित्रपट आहे. रिमेक केल्यास त्याची रोयल्टी द्यावी लागते ही आर्थिक बाजू आपण समजून घेतली तरीही करण जोहरच्या उच्च निर्मितीमध्ये वेशभूषेव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही काटकसर जाणवत नाही. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘मॅच पॉइंट’मधील टेनिसच्या पार्श्वभूमीऐवजी नेहमी समुद्र दाखवणे, इंग्रजी वातावरणाला पर्याय म्हणून नायिका योगगुरू दाखवणे, यामुळे चित्रपट ‘भारतीय’ होत नाही. कोणत्याही प्रश्नावर नवरा-बायकोऐवजी मित्र-मैत्रिणीबरोबर उठता-बसता शरीरसंबंध हा एकच पर्याय लेखक-दिग्दर्शकाने शोधल्यामुळे कोणत्याही जोडप्याला भेडसावणारे प्रश्न प्रेक्षकांच्या मनाला भिडत नाहीत.

या संबंधातून गरोदर राहणे, शेवटच्या तासाभरात थ्रील आणणे, हे सर्वच ‘मॅच पॉइंट’ चित्रपटाशी मेळ खाणारे आहे. त्यानंतर कोणी कोणाचा खून केला, यामध्ये बदल केल्यामुळे रिमेकचे खापर फुटण्याचे टाळले आहे. कलेमध्ये कोणाकडून स्फूर्ती घेणे साहजिक आहे, परंतु रिमेक न करता रूपांतर करायचे असेल तर त्यासाठी काही विचार करणे गरजेचे आहे, तो ‘गहराईयाँ’मध्ये दिसत नाही.  भारतीय परिस्थितीचा विचार करून रूपांतर कसे करावे, याची आदर्श उदाहरणे विशाल भारद्वाज यांनी ‘ओमकारा’, ‘मकबूल’, ‘हैदर’ यांसारख्या चित्रपटांतून दाखवली आहेत. 

थोडक्यात, ‘गहराईयाँ’ या नावावरून किंवा थ्रिलर आहे अशा भावनेतून हा चित्रपट बघितल्यास भ्रमनिरास होईल, मादक ट्रेलरवरून बघण्याचा निर्णय घेतलात तर पहिल्या तासाभरात क्षणिक आनंद मिळेल.           

.................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Shridhar Marathe

Wed , 16 February 2022

यथायोग्य परीक्षण


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......