अजूनकाही
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले.
या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्ही त्यामध्ये गांधी म्हणून काम करा, अशी विनवणी करतात. राव तयार होत नाहीत. आजवर त्यांनी ऑफिसचे काम आणि घर एवढेच केलेले असते. टीव्ही-सिनेमा त्यांना माहीत नसतो. मग अभिनय कसा करणार? पण कुटुंबीय विनवण्या करू लागतात. टीव्ही-सिनेमामध्ये पैसा असतो. आपले आयुष्य बदलेल म्हणून ते जबरदस्ती करतात. नाही-होय करता करता राव तयार होतात.
सिरिअलचे शूटिंग सुरू होते, तसतसे त्यांना गांधी माहिती होऊ लागतात. गांधींच्या विचाराचा त्यांच्यावर प्रभाव पडू लागतो. मग ते दैनंदिन जीवनातही गांधींप्रमाणेच वावरू लागतात. चित्रीकरणाच्या वेळी गांधीजींच्या आयुष्याची पाने पुढे सरकत असताना आपण किती कोरडे, वरवरचे आणि स्वकेंद्रित जगत होतो, याची खंत त्यांना वाटू लागते. गांधींच्या मार्गावर जगणे किती अवघड आहे, हे त्यांना जाणवू लागते. पुढे त्यांच्या वागण्यातील बदलामुळे कुटुंब दुरावते. ते दुःखी-कष्टी होतात. आपले खासगी आयुष्य आणि गांधी साकारणे, हे त्यांना कष्टप्रद होऊ लागते. त्यांना आतून वाटू लागते की, आपण या भूमिकेच्या नेमके विपरीत आहोत. गांधी होण्याची नैतिकता आपल्यात नाही.
दरम्यान चित्रपटात राव यांज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा इकबाल त्यांना भेटतो आणि मलादेखील एखादी भूमिका मिळावी, यासाठी हट्ट धरतो. राव त्याला सेटवर घेऊन जातात. दिग्दर्शक इकबालला गोडसेची भूमिका देतात. ही गोष्ट इकबालच्या वडिलांना समजते. ते राव यांच्याकडे जाऊन विनंती करतात की, काहीही करा, पण इकबालला गोडसेची भूमिका देऊ नका. पुढे सेटवर काही लोक येऊन इकबालला गोडसे करू देऊ नका, अशी दमदाटी करतात. एकंदरच समाजातून दबाव येऊ लागतो आणि इकबालला गोडसेच्या भूमिकेतून काढून टाकावे लागते. राव यांना दुःख होते की, आपण एका चांगल्या मुलाचा अभिनयाचा हट्ट पुरवू शकलो नाही.
चित्रपटातील या दोन गोष्टी, म्हणजेच गांधी साकारणे आणि गोडसे साकारणे हे किती परस्पर विसंगत आहे, हे लक्षात येते. केस्लोव्हस्कि या जगप्रसिद्ध दिगदर्शकाच्या म्हणण्यानुसार जर एखादी भूमिका किंवा पात्र कलाकाराला वठवायचे असेल, तर तो त्या संबंधित भूमिका/पात्राच्या विचारधारेशी जुळता (अगदी दिग्दर्शकदेखील) असायला हवा. त्याला सामाजिक भान असायला हवे. दैनंदिन आयुष्यात तो त्या भूमिकेशी प्रामाणिक असायला हवा. तरच तो भूमिकेला न्याय देऊ शकतो.
सध्या गाजत असलेल्या अमोल कोल्हे प्रकरणाकडे आपल्याला या अनुषंगाने पाहता येईल. एकीकडे दैनंदिन, सामाजिक आणि राजकीय जीवनात पुरोगामी, अहिंसावादी भूमिका; तर दुसरीकडे अभिव्यक्तीच्या आणि कलेच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली गोडसेची भूमिका, हे कितपत योग्य ठरते? अभिव्यक्ती आणि कलेचे स्वातंत्र्य हे शरद पोंक्षेना लागू होईल, पण अमोल कोल्हे यांना नाही. पोंक्षे सामाजिक, राजकीय जीवनातur गोडसेवादी आहेत आणि कलेच्या सांस्कृतिक संदर्भातसुद्धा. त्यांची भूमिका बिलकुल मान्य नसली तरी ती दुटप्पी नाही, हे अमोल कोल्हे यांनी लक्षात घ्यावे. याचा अर्थ गोडसे कुणीच करायचा नाही, असा नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे म्हणणे आहे की, ‘शिवाजी महाराज, रामराज्य या विषयांवरील चित्रपटांत जर कुणी औरंगजेब, रावणाची भूमिका केली, तर ती व्यक्ती ते पात्र होत नाही. त्यामुळे आपण चित्रपटांकडे कला म्हणून बघितले पाहिजे.’ ही मांडणी फसवी आहे. समजा उद्या चित्रपट बनवणारे त्यात औरंगजेबाला नायक आणि शिवाजी महाराजांना खलनायक दाखवायला लागले, तर महाराष्ट्रात अशा चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कुणीतरी करेल? तो चित्रपट तरी बनेल का?
हे मान्य की, चित्रपट म्हटल्यावर कुणाला तरी ती भूमिका करावीच लागेल. पण त्याचा एकूण आशयच गोडसेचे केवळ ‘उदात्तीकरण’ असेल, तर? ‘कुरुमावतार’सारख्या चित्रपटात एका मुस्लीम बापाला वाटते की, माझ्या मुलाने गांधींजींवर गोळ्या झाडू नयेत, तर ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सद्य भारतीय समाजात, विशेषत: महाराष्ट्रात गोडसेचे जोमाने उदात्तीकरण सुरू असताना एका पुरोगामी पक्षाच्या कलाकार नेत्याला त्यात वावगे वाटू नये, हे त्याच्या एकूण नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असेच म्हणावे लागेल.
संबंधित प्रकरणात जितेंद्र आव्हाड त्यांचे स्वपक्षीय साथीदार असूनदेखील त्यांनी या कृतीला विरोध दर्शवला आहे. नेमके हेच नैतिक धारिष्ट सांस्कृतिक राजकारणात महत्त्वाचे असते. त्यांचीदेखील भूमिका याला अनुसरूनच होती की, कलेचे स्वातंत्र्य म्हणून ‘गब्बरसिंग’ (काल्पनिक) करा, पण गोडसे हा ‘काळा इतिहास’ आहे आणि त्याची भूमिका पुरोगामी पक्षाच्या खासदाराने करणे, हे सांस्कृतिक राजकारणात मोठी आवर्तने निर्माण करू शकते. त्याचे भान कोल्हे यांना असायला हवे. त्यामुळे आपली राजकीय, सामाजिक भूमिका सांस्कृतिक (कलेपासून) वा खासगी आयुष्यापासून वेगळी असू शकत नाही. हेच खऱ्या अर्थाने कलेचे नैतिक अधिष्ठान आहे, हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
२००९ साली भाजपचे जसवंत सिंग यांचे ‘जिना : इंडिया, पार्टिशन अँड इंडिपेंडन्स’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात त्यांनी महंमद अली जिना कसे श्रेष्ठ आहेत, असे मत मांडले होते. त्या वेळी भारतीय जनता पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारे धाडस दाखवत नसेल, उलट शरद पवार अमोल कोल्हे यांचीच बाजू घेत असतील आणि आव्हाडांचे मत व्यक्तिगत आहे, असे म्हणत असतील तर ही भूमिका सांस्कृतिक राजकारणाच्या दृष्टीकोनातून घातक आहे, असेच म्हणावे लागेल.
..................................................................................................................................................................
लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.
advbaabar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Dheeraj Patil
Sun , 23 January 2022
सिनेमा सिनेमासारखा बघितला गेला पाहिजे. पण खर आहे. आता राजकीय वाट निवडल्यामुळे या गोष्टी कदाचित लक्षात ठेवायला लागणार.