‘केडी’ : ८० वर्षांचा म्हातारा केडी आणि आठ वर्षांचा कुट्टी यांच्या अनोख्या मैत्रीची कथा!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर
  • ‘केडी’ची दोन पोस्टर
  • Wed , 12 January 2022
  • कला-संस्कृती चलत्-चित्र केडी KD

रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली मैत्री चिरकाळ टिकणारी असते, कारण त्यामध्ये कोणताही अभिनिवेश, अंतस्थ हेतू नसतो. एकमेकाला कमी लेखणे नसते, अपेक्षा नसतात, मानापमान नसतात. मैत्री कोणाचीही कोणाहीबरोबर होऊ शकते. तिला वयाचे बंधन नसते, भाषेची आडकाठी नसते. ‘केडी’ हा चित्रपट अशाच दोन अनोख्या मित्रांची कथा आहे. एकाचे वय आहे ८० वर्षांचे आणि दुसऱ्याचे वय आहे आठ वर्षांचे! दोघांची मैत्री आयुष्याच्या अशा वळणावर जमते, जेव्हा त्यांना आयुष्यात आलेल्या अनुभवाचे चटके उदध्वस्त करणारे ठरतात.

‘केडी’ हा ८० वर्षांचा म्हातारा कोमामध्ये बरेच दिवस असल्यामुळे त्याला मुले कंटाळतात आणि कागदपत्रांवर सह्या घेऊन त्याला ‘तलईकुथल’ करून कायमचा अलविदा करायचे नियोजन करतात. तलईकुथल ही भीषण तमिळ परंपरा आहे. यात वृद्ध व्यक्तीच्या आजारपणाला नातेवाईक कंटाळले असतील, तर तिच्या डोक्यावर खोबरेल तेल थापले जाते आणि त्यानंतर त्या व्यक्तीला अनेक शहाळ्यांचे पाणी प्यायला दिले जाते. त्यामुळे तिची किडनी काम करणे बंद होते आणि ती व्यक्ती ‘नैसर्गिकरित्या’ मरते. मुले अशा प्रकारे वडिलांना मारण्याचे नियोजन करत असतात, त्याच वेळी ‘केडी’ला जाग येते आणि तो घरातून पोबारा करतो. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मजल-दरमजल करत करत एका गावामध्ये पोहोचतो. खिशात दमडी नसली तरी रोज मटण बिर्याणी खाण्याची विलक्षण आवड असल्यामुळे केडी मिळेल ती कामे करावयास सुरुवात करतो. एके दिवशी त्याची आठ वर्षांच्या कुट्टी या इरसाल मुलाशी गाठ पडते. सुरुवात कुट्टीच्या खोडकरपणाने झालेल्या भांडणातून होते आणि नंतर कुट्टीला खरे बोलल्याबद्दल शिक्षा झाल्यामुळे तो त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो.

दोन विरुद्ध टोकाची व्यक्तिमत्त्वे असली तरीही समदुःखी असल्यामुळे त्यांची मैत्री गहिरी होते. कुट्टीच्या शब्दात सांगायचे झाले तर, “केडी, मी अनाथ आहेच, पण तुला मुले आणि कुटुंब असूनही तुम्हीसुद्धा अनाथच आहात, पण एवढे वाईट वाटून घेऊ नका. निदान तुम्ही माझ्यासारखे लहानपणी अनाथ झाला नाही, किती वेळ असे अश्रू ढाळणार? जरा माझ्याकडे बघा, आयुष्याचा आनंद घ्यायला शिका.” दुसऱ्या एका संवादात ‘करूप्पू दुराई हे तुमचं नाव जरा जुन्या वळणाचे आहे. ते बदलून आपण केडी हे नाव ठेवू, असं कुट्टी म्हाताऱ्याला सांगतो.

अशा संवादांमधून झालेल्या मैत्रीमध्ये आठ वर्षाचा कुट्टी आयुष्य कसे जगावे, याचे काही मंत्र देतो. ८० वर्षाचा केडी चिमुरड्याकडून मिळालेल्या सल्ल्यामुळे भारावून जातो. कुट्टी केडी आजोबाच्या दहा इच्छा बकेट लिस्ट स्वरूपात पूर्ण करण्याचा चंग बांधतो. त्यानंतर पुढे जे काही घडते, ते ‘नेटफ्लिक्स’वर बघण्यासारखे आहे.  

सबरीवसन षण्मुगम आणि मधुमिता सुंदररामन यांनी या दोन तासांच्या चित्रपटाची कथा अशी काही विणली आहे की, आपण त्या दोघांच्या मैत्रीमध्ये गुंतून जातो. चित्रपटात प्रत्येक प्रसंग कथेशी इमान राखणारा आहे आणि त्याला चटपटीत संवादाची फोडणी दिली आहे. पुढे काय होणार याची आपण अटकळ बांधत राहतो, पण प्रत्येक वेळी आपला अंदाज चुकत राहतो, कारण आपण ‘फिल्मी’ काहीतरी होणार, अशी अपेक्षा करतो, तिथेच कथा-पटकथा लिहिणाऱ्यांनी बाजी मारली आहे.

सिनेमॅटोग्राफर मेयेंदीरन यांनी खेडेगावातील सौंदर्य फार अप्रतिमरीत्या टिपले आहे. गावातील काही स्त्रिया विहिरीमधून पाणी भरून घरी चालल्या आहेत. त्या वेळी केडी म्हणतो, “आहाहा, काय ते श्वास रोखून धरायला लावणारे दृश्य, डोळ्याला सुखावणारे, आमचं टी कल्लूपट्टी गाव हो, तुम्हाला काय वाटले?तुम्हाला सांगतो, माझी मुलगी इतकी अप्रतिम मटण बिर्याणी करते की, त्या बिर्याणीच्या वासाने माणूस मरणाच्या दारातून परत येईल.”

या नर्मविनोदी चित्रपटाची इंग्रजी सबटायटल इतकी चपखलपणे लिहिली आहेत की, शाब्दिक विनोदामधला ‘पंच’ त्यामध्ये प्रतीत होतो. त्यामुळे आपण तमिळ चित्रपट बघत आहोत, असे वाटत नाही. चित्रपट ग्लोबल करायचा असेल तर त्याची सबटायटल तितक्याच उत्कृष्ट दर्जाची असायला हवीत, हे तमिळ-मल्याळम चित्रपटकर्त्यांनी जाणले आहे. हे मराठी चित्रपटसृष्टीने शिकण्यासारखे आहे. अलीकडेच काही मराठी चित्रपटांची सबटायटल काही वेळ मुद्दाम सुरू केली आणि विनोदी संवादाचे/गाण्यांमधील काव्याचे भीषण भाषांतर बघून चक्रावून गेलो. असा चित्रपट तामिळनाडू / केरळ / भारताबाहेरील अमराठी प्रेक्षक कसा बघणार? 

कार्तिकेय मूर्ती यांचे संगीत थेट गावातल्या वळणाचे आहे. ‘टकल टकलिंग’ हे गाणे तर चित्रपटाचा एकूणच मूड तीन मिनिटात सांगणारे आहे. सारंगी, बासरी, नादस्वरम अशा वाद्यांचा वापर पार्श्वसंगीतामध्ये केल्यामुळे आपण चित्रपट ऐकताना दक्षिण भारतामधल्या त्या खेड्यात जातो. मधुमिता सुंदरम यांचे दिग्दर्शन अप्रतिम आहे. अनेक प्रसंग बघताना ‘क्या बात हैं’ अशी  उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपण बरेच वेळा देतो. 

प्रसंगामध्ये प्रेक्षकांना गुंगुवून ठेवण्याचे सामर्थ्य दिग्दर्शकाचे आहे. गुरु कोण आणि शिष्य कोण, अशा विरोधाभासी पार्श्वभूमीवर चित्रित केलेला संवाद अप्रतिम आहे. आठ वर्षांचा कुट्टी म्हाताऱ्या केडीला सांगतो- “मला आई-वडील नसल्यामुळे कोणत्याही कुटुंबाचे कायम आकर्षण वाटत राहिले, पण आता तुमच्यासारख्या (कुटुंबवत्सल) माणसाची म्हातारपणी झालेली ही दुरवस्था बघून मला आता समाधान वाटते की, मला कुटुंब नाही. इतरांचा विचार सोडा, आयुष्य मजेत जगा, मीच टीव्ही आणि मीच रिमोट, माझे आयुष्य माझ्या कल्पनेप्रमाणे मी जगणार असे ठरवा आणि बघा, आयुष्य किती सुंदर आहे. उद्याची कशाला काळजी करताय? असे किती आयुष्य राहिले आहे?”

या प्रसंगाच्या चित्रणानंतर केडीचे बदललेले आयुष्य काही कोलाजमध्ये फार सुरेखरीत्या दाखवले आहे. कुट्टी पोपटासारखा न बोलता सहजगत्या बोलून जातो आणि केडीच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणतो, ते बघण्यासारखे आहे.    

नागविशाल या बाल कलाकाराचे कौतुक करावे तितके कमीच. चित्रपट बघताना हा प्रश्न पडतो की, नागविशाल अभिनय करत आहे की, हा बालक मुळात असाच आहे? “मी शाळेत कधी गेलो नाही, पण शाळेत जाणाऱ्या मुलापेक्षा मी स्मार्ट आहे,” असे वाक्य त्याच्या तोंडी आहे. ते त्याला शोभते. प्रेक्षकांची मने जिंकताना नागविशालने सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला.

मु रामस्वामी यांनी केडी साकारताना दुःखी, चिंताग्रस्त, बालसुलभ आनंदी, समाधानी असे अनेक भाव व्यक्त केले आहेत. मुळात हे दोघे अपरिचित चेहऱ्याचे नायक असलेला चित्रपट तयार करणे, हे धाडस दाखवणाऱ्या निर्मात्यांना सलाम.

तामिळ आणि मल्याळम चित्रपटात असे अनेक प्रयोग होत आहेत. शिवाय ते चित्रपट बघण्यासाठी त्या राज्यात प्रेक्षकवर्ग थियेटरमध्ये जातो, हे विशेष. त्यामुळेच ही प्रादेशिक चित्रपट सृष्टी दिमाखात उभी आहे. चित्रपट तयार करताना, त्याचा ग्लोबल विचार करून विषयांचे वैविध्य जपणाऱ्या तमिळ – मल्याळम चित्रपटकर्त्यांना सलाम.  

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......