अजूनकाही
२०२१ हे साल ‘रामप्रसाद की तेरवी’, ‘पगलाईट’, ‘शेरनी’, ‘83’ या हिंदी चित्रपटांनी गाजवलं. विषय, आशय, अभिनय, दिग्दर्शन आणि अभ्यासपूर्वक मांडणी, यामुळे हे चित्रपट इतर चित्रपटांच्या तुलनेत उजवे ठरले. अभिनय अथवा वेगळा विषय या दृष्टीनं बघण्यासारखे, पण इतर काही कारणांनी फसलेल्या चित्रपटांमध्ये ‘रश्मी रॉकेट’, ‘तुफान’, ‘बॉब बिश्वास’, ‘धमाका’ यांची नावं घ्यावी लागतात; तर ‘साईना’, ‘बिग बुल’, ‘अजीब दास्तान’, ‘हसीन दिलरुबा’, ‘डायल १००’, ‘मिमी’, ‘२०० हल्ला हो’, ‘थलैवी’, ‘हम दो हमारे दो’, ‘मीनाक्षी सुन्दरेश्वर’, ‘चंदिगढ करे आशिकी’ अशी अनेक नावं आहेत. ‘राधे’, ‘भूज’, ‘बेल बॉटम’, ‘सूर्यवंशी’, ‘बंटी और बबली २’, ‘सत्यमेव जयते २’, ‘अंतिम’ असे काही चित्रपट मात्र अपेक्षाभंग करणारे आणि प्रेक्षकांचा वेळ वाया घालवणारे ठरले. विशेष म्हणजे ‘सूर्यवंशी’ हा २०२१मधील सर्वांत जास्त नफा मिळवणारा चित्रपट ठरला. २०२०मध्ये ‘तानाजी’ हा फसवा इतिहास सांगणारा चित्रपट सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा ठरला होता. इतक्या सुमार दर्जाचे चित्रपट प्रेक्षक डोक्यावर का घेतात?
२०२१मध्ये आलेल्या चित्रपटांचं निर्मितीच्या दृष्टीकोनातून अवलोकन केल्यास असं दिसतं की, चित्रपट आता स्टुडिओमधून बाहेर पडला आहे. अनेक चित्रपट त्या त्या स्थळी, लोकांच्या गर्दीत, भर वस्तीत चित्रित केले जात आहेत. रस्त्यामध्ये, दाटीवाटीनं वसलेल्या वस्तीमध्ये चित्रीकरण केल्यास संबंधित चित्रपट अधिक वास्तवदर्शी वाटतो. ‘गली बॉय’सारखे चित्रपट धारावीमध्ये चित्रित करण्यात आल्यानं त्यातले बारकावे मनाचा ठाव घेतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आतापर्यंत अनेक चित्रपटांचं शुटिंग मुंबईत आणि जवळपासच्या शहरा-गावांमध्ये व्हायचं. पूर्वी मराठी चित्रपटांची निर्मिती कोल्हापूरमध्ये व्हायची. नंतर ती पुण्यात आली आणि पुण्यातून मुंबईला गेली. मुंबईत अनेक स्टुडिओ स्थापन झाले, वाढले. हळूहळू चित्रपट स्टुडिओमधून मुंबई-पुण्यासारख्या शहरांत आणि जवळपासच्या गावामध्ये चित्रित केले जाऊ लागले. स्टुडिओमध्ये प्रोसेसिंग, साउंड, व्हीएफएक्स इफेक्ट, संकलन अशी कामं अजूनही केली जातात. परंतु स्टुडिओमध्ये चित्रीकरण करण्याचं प्रमाण कमी झालं आहे.
तर प्रश्न असा आहे की, २०२१ साली आलेल्यांपैकी किती चित्रपटांचं चित्रीकरण मुंबईत – महाराष्ट्रात झालं?
अनेक चित्रपटांतलं शुटिंग बारकाईनं बघितल्यास त्यात उत्तर प्रदेश दिसतो. अर्थात हा बदल एका रात्रीत झालेला नाही. ‘बंटी और बबली’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘मनकर्णिका’, ‘मसान’, ‘मुक्काबाज’, ‘मुल्क’, ‘गुलाबो सिताबो’, ‘तनु वेड्स मनु’, ‘आर्टिकल 15’, ‘गुंजन सक्सेना’, ‘दावत-ए-इश्क’, ‘जॉली एल एल बी’, ‘हसीन दिलरुबा’, असे अनेक चित्रपट आणि बऱ्याच वेब-सिरीज उत्तर प्रदेशात चित्रित झाल्या आहेत, होत आहेत. ‘उमराव जान’सारखा चित्रपट उत्तर प्रदेशात चित्रित होणं समजण्यासारखं आहे, परंतु कथेची मागणी नसतानाही निर्माते–दिग्दर्शक उत्तर प्रदेशाची निवड का करत असावेत?
मध्यंतरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांना भेटले. त्यामागचा उद्देश त्यांनी जाहीर केला होता. कोणत्याही राज्यानं चित्रपटसृष्टी उभी करण्यास पुढाकार घेतला, तर ते स्वागतार्हच आहे. उत्तर प्रदेशात चित्रपटसृष्टी स्थापन करताना त्यांनी काही सोयी-सवलती दिल्या, चित्रीकरण परवानग्यांमध्ये सुलभता आणली.
आज भारतात उत्तर प्रदेश चित्रीकरणासाठी सर्वांत जास्त सोयी-सवलती असलेलं राज्य आहे. नोव्हेंबर २०२१मध्ये ५२वा चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये भारतातील सर्वांत अधिक सोयी-सुविधा देणाऱ्या राज्याचा पुरस्कार उत्तर प्रदेशला देण्यात आला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने नॉयडामध्ये फिल्म सिटी स्थापन करण्यासाठी १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यात राजकारण असलं तरी चित्रपटसृष्टीसाठी ही आनंदाची बाब आहे, हे निर्विवाद. महाराष्ट्र सरकार या संदर्भात काय पावलं उचलतेय?
‘अर्धसत्य’, ‘सरगम’ या चित्रपटांचं चित्रीकरण पूर्वी वाई (जि. सातारा)मध्ये झालं होतं. परंतु ते प्रमाण तुरळक होतं. अगदी अलीकडे प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेले ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’, ‘गंगाजल’ अशा अनेक चित्रपटांचं चित्रीकरण वाईत झालं आहे. ‘स्वदेश’, ‘दबंग’, ‘सिंघम’, ‘इश्किया’, ‘ओंकारा’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’पर्यंत अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाकरता वाई हे गाव अनेक निर्मात्या-दिग्दर्शकांसाठी सर्वांत सोयीचं होतं. त्यामुळे या गावातील अनेकांना रोजगार मिळाला होता. मॉब सीनपासून हॉटेल-जेवणाच्या कंत्राटापर्यंत अनेक जणांना कामं मिळाली होती. अचानक एका राजकीय पक्षाच्या ‘कार्यकर्त्यां’नी चित्रीकरण करणाऱ्या ठिकाणी जाऊन दमदाटी करून पैसे वसुली करण्यास सुरुवात केली. अशी खंडणी द्यावी लागल्यामुळे अनेक हिंदी निर्मात्यांनी तिथून काढता पाय घेतला. परिणामी या परिसरातील अनेकांचा रोजगार गेला, तरी त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने चकार शब्द काढला नाही.
प्रश्न फक्त वाईचा नाही. महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी परवानग्या घेणंही जिकिरीचं झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बाह्य-चित्रीकरणं किती होतात, त्यांचं प्रमाण का कमी झालं, त्यासंदर्भात काय पावलं उचलावीत, याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. असंच होत राहिलं तर भविष्यात मुंबईतील फिल्मसिटीमध्ये फक्त टीव्ही शो आणि मालिकांचं स्टुडिओमध्ये चित्रीकरण होत राहील आणि मुंबईचं ‘चित्रनगरी’ हे बिरूद इतिहासजमा होईल. याकरता सर्वपक्षीय खासदार-आमदार यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातही चित्रपटसृष्टीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
पण लक्षात कोण घेतो?
..................................................................................................................................................................
लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.
suhass.kirloskar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment