बराक ओबामांचं एकंदरीत आयुष्य अचंबित करणारं, प्रेरणादायी व ‘चमत्कार’ म्हणता येईल असंच आहे!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • ‘In Pursuit of a More Perfect Union’ या डॉक्यु-सिरीजचं एक पोस्टर आणि ओबामांचं एक चित्र
  • Sat , 01 January 2022
  • कला-संस्कृती चलत्-चित्र इन अ पर्सुअट ऑफ अ मोअर परफेक्ट युनियन In Pursuit of a More Perfect Union बराक ओबामा Barack Obama

“The best way to not feel hopeless is to get up and do something. Don’t wait for good things to happen to you. If you go out and make some good things happen, you will fill the world with hope, you will fill yourself with hope.”
 Barack Obama

अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक हुसेन ओबामा यांच्या आयुष्यावर ‘HBO’वर एक ‘In Pursuit of a More Perfect Union’ या नावाची डॉक्यु-सिरीज आहे. यात त्यांच्या आयुष्याचा प्रवास अगदी बारकाव्यांसकट (दीड-दोन तासांचा एक एपिसोड) उलगडून दाखवला आहे.

मा‍झ्यासारख्या मिश्र जातीय व्यक्तीला हा प्रवास जवळचा वाटला. २००८मध्ये ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा मी एका आयटी कंपनीत एचआर होते. तोपर्यंत मला ओबामांबद्दल काही विशेष माहिती नव्हती. आफ्रिकन व आफ्रिकन-अमेरिकन लोकांबद्दलचं वाचन व ओबामा यांची एकंदरीत लो-प्रोफाईल प्रतिमा, यामुळे ओबामांबद्दलचं माझं पहिलं मत सकारात्मक होतं. त्यांचा कार्यकाळ भारतीय आयटीसाठी चांगला राहिला. पण त्या वेळी वय व समज या दोन्ही गोष्टी कमी असल्यानं मी एकंदरीत ओबामांना समजून घेण्यात कमी पडले.

ही डॉक्यु-सिरीज पाहिल्यावर मी ओबामांचं ‘Dreams From My Father’ हे पुस्तक वाचलं. यात सुरुवातीच्या काळातील ओबामांच्या जडणघडणीविषयी सविस्तर माहिती मिळते. मिश्रवंशीय ओबामांनी प्रांजळपणे आपले अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. १९६१ साली गोरी अमेरिकन आई व कृष्णवर्णीय आफ्रिकन वडील यांच्या पोटी जन्माला आलेल्या ओबामांचा सुरुवातीचा प्रवास स्वत:ची ओळख शोधण्याचा अखंड प्रयत्न वाटतो. आई-वडील विभक्त झाल्यानंतर त्यांच्या आईनं इंडोनेशियातील व्यक्तीशी दुसरं लग्न केलं. त्यामुळे ओबामांचं बालपण त्यांच्या गोऱ्या आजी-आजोबांकडे गेलं. त्यांच्या मायेमुळे आफ्रिकन वंशाच्या लोकांमध्ये गोऱ्या लोकांविषयी जी भीती, चीड निर्माण होते, ती त्यांच्यात झाली नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ओबामांच्या आईला दुसऱ्या पतीपासून एक मुलगी झाली. वडिलांनी ओबामांच्या आईशी लग्न करण्यापूर्वी व त्यांच्या आईशी घटस्फोट झाल्यानंतरही अनेक लग्नं केली. त्या सर्व सावत्र भावंडांशी ओबामांचे चांगले संबंध आहेत. कदाचित गोऱ्या आजी-आजोबांशिवाय कोणीच नातेवाईक नसल्यानं ‘आपलं कोणीतरी आहे’ या भावनेतून ओबामांनी या सावत्र भावंडांशी संबंध ठेवले असावेत.

सावत्र वडिलांसोबत घालवलेला वेळ, तिथलं वातावरण हेसुद्धा ओबामांच्या सर्वसमावेशक स्वभावाला पूरक ठरलं. एका विशिष्ट संस्कृतीत बालपण घालवणाऱ्या मुलांपेक्षा वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या मुलांमध्ये सहसंवेदना जास्त आढळून येते. स्त्रियांना ज्या पद्धतीची वागणूक मिळते, त्याचा प्रचंड मोठा परिणाम त्या घरातील मुलांवर होतो. ज्या घरात निर्णय घेणार्‍या, नोकरी करून घर सांभाळणाऱ्या स्त्रिया असतात आणि त्यांना बरोबरीची वागणूक मिळते, त्या घरातील मुलांच्या मनातील स्त्री प्रतिमा वेगळी असते. ही मुलं स्त्रियांबाबतीत संवेदनशील असतात. याउलट ज्या घरात स्त्रियांना नीट वागणूक मिळत नाही, तेथील मुलांना स्त्रीविषयी चांगल्या भावना नसतात.

ओबामांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टीकोन त्यांच्या आईशी असलेल्या नात्यातून आकारास आल्याचं दिसतं. त्यांच्या आईचं स्वतंत्र आयुष्य गोऱ्या आजी-आजोबांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हतं. त्यामुळे ओबामा अनेक गोष्टींत, प्रामुख्यानं शिक्षणाच्या बाबतीत भाग्यवान ठरले. त्यांच्या शाळेत १६०० विद्यार्थ्यांमध्ये फक्त चार विद्यार्थी आफ्रिकन होते. मिश्र जात/धर्म/वंशाच्या लोक दोन्ही बाजूचे नसतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये अलगीकरणाची भावना प्रचंड तीव्र असते. पण आफ्रिकन वंशाच्या लोकांच्या चर्चसाठी काम करणं ही ओबामांच्या आयुष्यातील अत्यंत सकारात्मक घटना ठरली. त्यातून त्यांना ‘आफ्रिकन-अमेरिकन’ ही ओळख मिळाली.

यातूनच पुढे ओबामांच्या राजकीय आयुष्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. २७व्या वर्षी हार्वर्डमध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या ओबामांनी ४७ वर्षी अमेरिकेच्या पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांचा इतक्या वेगात प्रवास कसा झाला, याचं उत्तर त्यांची हार्वर्ड विद्यापीठात शिकत असतानाची भाषणं पाहिली की मिळतं. प्रचंड आत्मविश्वासानं बोलणारे ओबामा पाहताना वय व परिपक्वता यांचा संबंध किती, असा प्रश्न पडतो.

ओबामांच्या सर्व प्रवासात आई, आजी-आजोबा यांच्याइतकाच महत्त्वाचा वाटा पत्नी मिशेल यांचाही आहे. एका मिश्रवंशीय व्यक्तीशी लग्न करणं व त्याला समजून घेऊन भक्कम साथ देणं, हे महाकठीण काम त्यांनी केलं. राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुकीत त्यांच्या ‘पूर्ण’ आफ्रिकन नसल्याच्या टीकेला मिशेलनी जे उत्तर दिलं, ते ओबामांच्या विजयात मोठं काम करून गेलं. ओबामांना ‘गोऱ्या अमेरिकन लोकांनी ‘काळा’ म्हणून नाकारणं’, ‘काळ्या आफ्रिकन लोकांनी ‘अर्धा गोरा’ म्हणून नाकारणं’ हे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला कसलंही राजकीय व सामाजिक पाठबळ नसताना हिलरी क्लिंटनसारख्या गोऱ्या स्त्रीला हरवून डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणं आणि निवडणूक जिंकणं, ही ओबामांच्या हुशारी, चातुर्य व आत्मविश्वासाची साक्ष आहे.

अर्थात ओबामांसारख्या मिश्रवंशीय, आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीची अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होणं, हा खरं तर गोऱ्या अमेरिकनांच्या अहंकारावर मोठाच आघात होता. ओबामांचा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा प्रवाससुद्धा खडतर होता. ते ज्या वाटेवरून चालत होते, त्यावर आधी कोणीही आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती चालली नव्हती. ओबामा नवखे, साधारण परिस्थितीतून संघर्ष करून वर आलेले. त्यांची देहबोली व आवाज त्यांच्या घट्ट रुजलेल्या जाणीवा व जीवन मूल्यं दाखवतात. नशीबानं त्यांना साजेशी जोडीदारीण मिळाली. तिने त्यांना मन:पूत साथ दिली. आणि त्याच वेळी स्वत:चं अस्तित्वही ठसठशीतपणे जाणवून देत ओबामांचा तोलदेखील सांभाळला.

भारतात एखादी मिश्रवंशीय व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर जाईल? भारतात सामाजिक ओळख जाती-धर्मातून येते. आणि तीच राजकीय भांडवल व हत्यार म्हणून वापरली जाते. मिश्रवंशीय व्यक्ती भले कितीही हुशार व प्रामाणिक असतील, पण त्यांच्याकडे तथाकथित शुद्ध भारतीय लोक नेहमीच संशयानं बघतात. मी स्वतः मिश्रजातीय आहे. माझ्या ओळखीतली अनेक आंतरधर्मीय/जातीय लग्नं केलेली जोडपी आहेत. त्यांना मुलं आहेत. या मुलांना आजी-आजोबा, मामा-मामी, काका-काकू अशा नातेवाईकाचं प्रेम व स्वीकृती मिळत नाही. त्यामुळे या मुलांना सहसा आई-वडिलांशिवाय दुसरं जग माहीत नसतं.

गेल्या वर्षात लेखनाच्या निमित्तानं माझा खूप लोकांशी संबंध आला. जेव्हा जेव्हा मी मा‍झ्या आई-वडिलांच्या लग्नाबद्दल मी सांगितलं, तेव्हा तेव्हा ९५ टक्के लोकांच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात हा विरोधाभास असून गेल्या काही वर्षांत वाढलेल्या जाती-धर्म दुहीचा परिणाम आहे. मा‍झ्या बालपणापेक्षा (८०-९०च्या दशकांत) गेल्या काही वर्षांत जात व धर्म यांच्याशी संबंधित भावना जास्त प्रखर झाल्या आहेत. मा‍झ्या ओळखीतल्या काही आंतरजातीय\धर्मीय जोडप्यांनाही हा बदल जाणवतो आहे.

सर्व प्रकारच्या लग्नांत (आणि स्त्री-पुरुष नात्यांत) भांडणं होतात, परंतु आंतरजातीय\धर्मीय जोडप्यांचे वाद/भांडण झालं की, त्याचा संबंध थेट जातीशी/धर्माशी लावला जातो. हुशारीनं त्याभोवती गोष्टी फिरवल्या जातात. कारण समाजाला अशी लग्नं अयशस्वी होतात, ती करू नये, हे सांगायला कारण मिळतं. म्हणून आंतरजातीय\धर्मीय जोडप्यांनी जास्त विचारपूर्वक वागण्याची गरज असते.

आई-वडील एकाच धर्माचे/जातीचे असल्यावर त्यांच्या मुलांमध्ये असलेली belongingnessची भावना, आंतरजातीय\धर्मीय जोडप्यांची मुलं अनुभवू शकत नाहीत. अशा बहुतेक मुलांमध्ये detachment व अलगीकरणाची जाणीव तीव्र असते. त्यातून येणारे मानसिक त्रास वेगळे असतात, हे मी स्वानुभवावरून सांगू शकते.  

ओबामांचं चरित्र वाचताना ही गोष्ट वारंवार जाणवते. ‘तुझ्या आई-वडिलांनी असं असं लग्न केलं म्हणून हे झालं, ते झालं’ वगैरे टोमणे ऐकावे लागतात. त्यामुळे अपराधीपणा, लज्जा या भावना जन्मभर राहतात. त्यांचं ओझं कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. परिपूर्णतेचा अट्टाहास हा त्यापैकीच एक. तो ओबामांमध्ये विशेष करून जाणवतो, कारण चूक झाली तर पाठिंबा द्यायला कोणीच नसायचं. ओबामांवर ‘ते स्वत:च्या भावना दाखवत नाहीत, फार थंड वाटतात’, अशी टीका अनेक वेळा झाली आहे. त्यामुळे त्यांचा राग कसा असेल, यावर एक विनोदी मालिकासुद्धा तयार करण्यात आली आहे.

जनुकीय शुद्धतेचा अट्टाहास करणार्‍या भारतीय लोकांना हे कळायला अवघड जातं, पण भारतात जी काही परकीय आक्रमणं झाली, त्याच्या जनुकीय पाऊलखुणा भारतीय लोकांमध्ये अजूनही आहेत. उत्तरेकडील लोक गोरे, दक्षिणेकडील काळेसावळे आणि प्रत्येक राज्यानुसार चेहर्‍याची ठेवण वेगळी आढळून येते. बर्फाळ प्रदेशातील गोरा रंग व भारतीय गोरा रंग यात फरक असून भारतीय काळा रंग व आफ्रिकन काळा रंग यातदेखील फरक आहे.

गुजरातमधील सिद्दी समुदाय एका आफ्रिकन समूहाचं प्रतिनिधित्व करतो. ज्यांनी भारतात राहूनही स्वत:ची वेगळी ओळख जपली आहे.

काही समुदायांनी आपली जुनी सांस्कृतिक व जनुकीय ओळख ठेवत भारतीयत्व स्वीकारलं, त्यात पारसी समुदायही येतो. सगळ्या दिशांनी भारतीय समुद्र किनाऱ्यांवरून परकीय आक्रमकांनी भारतात प्रवेश केला, अत्याचार केले, धर्मपरिवर्तन केलं. त्यामुळे त्यांची जनुकं काही प्रमाणात का होईना वेगवेगळ्या रूपात भारताच्या जनुकांत मिसळली आहेत. पण भारतीयांच्या गोऱ्या रंगाच्या अति-प्रेमामुळे ही बाब चटकन स्वीकारली जात नाही. सूर्याची पूजा करणाऱ्या देशात गव्हाळ, व सावळ्या रंगाच्या अनेक छटा नैसर्गिक आहेत.

भारतात गेल्या काही वर्षांत जनुकीय शुद्धतेच्या अट्टाहासातून टोकाच्या गोष्टी घडत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक धर्माच्या, जातीच्या व अगदी भारतीय नसलेल्या लोकांचासुद्धा सहभाग होता. यामुळेच भारताचं संविधान सर्वांत महत्त्वाचं आहे, कारण ते या सर्व लोकांच्या बलिदानाचा आदर करतं. सर्व जाती-धर्माच्या लोकांना भारतीयत्वाची ओळख देतं. जनुकीय परंपरा समजून घेण्यासाठी चंगेजखानचं उदाहरण महत्त्वाचं आहे. संशोधकांच्या मते चंगेजखान या राज्यकर्त्याचे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक कोटी साठ लाख वंशज आहेत. म्हणजे या सर्व लोकांचा पूर्वज हा चंगेजखान होता. पहा -

https://bumpreveal.com/blogs/statistics/genghis-khan-dna-descendants

भारतावर शतकानुशतकं जी परकीय आक्रमणं झाली आहेत, त्याच्या पाऊलखुणा इथल्या अनेक लोकांच्या शारीरिक ठेवणीत, त्वचेचा/डोळ्यांचा/केसांच्या रंगात (व पोतात) आढळतात. त्यामुळे जनुकीय शुद्धतेचा अट्टाहास हा अतार्किक असून संविधानाचा स्वीकार हीच भारतीय असण्याची खरी ओळख आहे.

माझ्या ओळखीचे काही भारतीय लोक ओबामांना ‘काळा’ म्हणून हिणवत, अजूनही हिणवतात. ओबामांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून काय केलं? ते नोबल शांतता पुरस्कार मिळण्याच्या लायकीचे आहेत का? असे प्रश्न विचारणाऱ्यांनी एकदा आपलं आडनाव, जात व सामाजिक ओळख सोडून दुसऱ्या शहरात जाऊन दुसऱ्या नावानं काम करून बघावं! पैसा, सत्ता व कौटुंबिक पाठबळ नसलेली एक मिश्रवंशीय वा कृष्णवर्णीय व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होते, हे कौतुकास्पद आहे. त्यावर कळस म्हणजे ओबामांनी जबाबदारीनं आठ वर्षं हे पद भूषवलं. या काळात त्यांचं संपूर्ण कुटुंब ‘रोल मॉडेल’ म्हणता येईल अशा पद्धतीनं वागलं. वंश, धर्म व जात यामुळे ज्यांना प्रत्येक पावलावर स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी झगडावं लागतं, त्यांच्यासाठी ओबामा ‘आदर्श’ आहेत.

आई-वडिलांचं आंतरजातीय लग्न व जात कागदावर नसणं, या गोष्टी सामाजिक ओळखीत कशा महत्त्वाच्या ठरल्या, हे मला गेल्या वर्षभरात उमगलं. त्यात ओबामांचं आयुष्य समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं ठरलं. लिखाणामुळे माझ्यासारख्या सामाजिक ओळख नसलेल्या व्यक्तीला बरेच नवीन मित्रमैत्रिणी मिळाले. बऱ्याच लोकांना मदतदेखील करू शकले, याचं समाधान आहे.

ओबामांच्या निवडणूक कॅम्पेनचा मुख्य हिस्सा असलेली ‘आशा’ ही भावना त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या घटनांमधून ठळकपणे समोर येते. ओबामांचं एकंदरीत आयुष्य अचंबित करणारं, प्रेरणादायी व ‘चमत्कार’ म्हणता येईल असंच आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......