अजूनकाही
‘एक कप च्या’ हा दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा २००९ सालचा चित्रपट. या दिग्दर्शक द्वयांचे चित्रपट त्यातील सामाजिक आणि संवेदनशील विषयामुळे नेहमीच वेगळे वाटतात. मग तो ‘बाधा’सारखा अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारा चित्रपट असो किंवा ‘दहावी फ’सारखा वेगळ्या प्रकारे शिक्षणाचं महत्त्व सांगणारा. ‘एक कप च्या’ हा असाच एक सामाजिक चित्रपट. यात ‘माहिती अधिकार कायद्या’चं महत्त्व, सामान्य माणसाचं अज्ञान आणि सरकारी कारभारामुळे सामान्य माणसाच्या जीवनावर होणारा परिणाम, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.
काशिनाथ हा कणकवली गावात राहणारा एक सामान्य एस.टी. कंडक्टर. वृद्ध आई, बायको आणि तीन मुलं असं त्याचं कुटुंब. घरची परिस्थिती सामान्य असली तरी हे कुटुंब सुखा-समाधानात जगत असतं. पण एक दिवस त्याला वीजबिल येतं. नेहमीचंच आहे म्हणून दिवसभर त्याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. संध्याकाळी काशिनाथ घरी आल्यावर बिल बघतो आणि अस्वस्थ होतो. कारण त्या बिलाचा आकडा असतो- ७३ हजार रुपये. घरात फारशी विजेची उपकरणं नसतात, मिणमिणते दिवे, मोडकातोडका टीव्ही, आणि बिल मात्र ७४ हजार! काशिनाथ बिलाची चौकशी करायची ठरवतो. पण वीजमंडळ कार्यालयात चौकशी करण्यात वेळ जातो, बिलाची तारीख उलटून जाते आणि काशीनाथच्या घरची वीज कापली जाते. मिणमिणत्या उजेडात असणारं कुटुंब अंधारात बुडून जातं. पुढे काशिनाथ वीज परत येण्यासाठी काय प्रयत्न करतो, ती येते का, याची कहाणी म्हणजे हा चित्रपट.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्यं म्हणजे याची कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर घडते. त्यामुळे कथेच्या वेगळ्या वातावरण निर्मितीला यात बरंच महत्त्व आहे. कोकणातील काशिनाथचं छोटंसं घर, खेड्यातील सकाळचं वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळचं कोंबड्याचं आरवणं, गाईच हंबरणं, या साऱ्या गोष्टी आपल्याला काशीनाथच्या घरातील आणि घराभोवतीच्या प्रसन्न वातावरणाची ओळख करून देतात. कोकणी भाषेचा गोडवा आणि तेथील लोकांचा गोड व लाघवी स्वभाव सर्वश्रृत आहे. काशिनाथच्या घरची माणसंही लाघवी आहेत, त्यांना परस्परांबद्दल प्रेम आहे. ती एकमेकांशी कोकणी भाषेत संवाद करतात, तेव्हा प्रेक्षक त्यात रममाण होऊन जातो.
अशा सर्व प्रसन्न वातावरणात जेव्हा वीज कापली जाते आणि अस्वस्थ काशीनाथ वीजमंडळाच्या कार्यालयात चौकशी करण्यासाठी जातो, पण तेथील वातावरण त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असतं. तिथला अंधाधुंद कारभार त्याला अनोळखी असतो. अधिकारी ‘जुनी बिलं घेऊन या मग बघू’ असं वेळकाढूपणाचं उत्तर देतो.
त्या कार्यालयाचं एक समीकरण असतं- काम लवकर करायचं असेल तर ‘एक कप च्या’ द्यायचा, अधिकारी वर्गाशी सलगी करायची आणि लाचलुचपत देऊन काम करवून घ्यायचं. काशिनाथला हे मान्य नसतं. जी वीज मी वापरलीच नाही, त्यासाठी मी पैसे का देऊ, असं त्याचं म्हणणं असतं. एका बाजूला प्रामाणिकपणा आणि दुसऱ्या बाजूला सरकारी कार्यालयातला बेदरकारपणा व अंधाधुंदी, यांतला संघर्ष त्यातून अधोरेखित होत जातो.
एक दिवस सहकाऱ्यांशी बोलत असताना काशिनाथला ‘माहिती अधिकार कायद्या’बाबत समजतं. पण हा कायदा काय आहेस हे त्याला नीट माहीत नसतं. पण कळतं, तेव्हासुद्धा त्याला त्यात पडायचं नसतं. सर्वसामान्य माणूस सरकारी कारभारापासून अलिप्त राहण्याचाच प्रयत्न करतो. सामान्य माणसानं सरकारकडे माहिती मागायची ही कल्पनाच काशिनाथला मान्य नसते. पण एक दिवस दुर्गा खानोलकर (देविका दफ्तरदार) या सामाजिक कार्यकर्तीशी त्याची ओळख होते आणि तो तिच्या मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज करतो. पण बरेच दिवस त्याला प्रतिसादच मिळत नाही. काशीनाथ आणि त्याचं कुटुंब अंधारातच जगत राहतं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
चित्रपटातील प्रसंग केवळ काशिनाथच्या घरची परिस्थिती व्यक्त करत नाहीत, तर ते आपल्याला आपल्या देशातील सरकारी कारभाराची स्थितीगतीही सांगतात. काशिनाथचा थोरला मुलगा चंदन नाटकात हौशी कलाकार म्हणून काम करत असतो. काशिनाथ सरकारी कार्यालयात दाखवण्यासाठी वीजबिलं शोधत असतो, त्या वेळी मुलगा नाटकातील संवाद पाठ करत असतो- ‘आजच्या काळात निर्भीड पत्रकारिता केवळ स्वप्नच राहणार का संपादकसाहेब?’
काशिनाथचा धाकटा मुलगा अबू अभ्यास करत असताना भारताचं संविधान पाठ करत असतो- ‘आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीप्रधान, धर्मनिरपेक्ष राज्य घडवण्याचा प्रयत्न करू. लोकांना सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य देऊ.’ त्याच वेळी सरकारी कार्यालयातील फायली, रेशनच्या रांगा आपल्याला दिसातात.
काशिनाथ जेव्हा वीजमंडळाच्या कार्यालयात जाऊन अर्ज देऊन बाहेर पडत असतो, तेव्हा तिथं एका कोपऱ्यात ‘एक कप च्या’ घेत कुणीतरी ‘सेटिंग’ लावत असतं. त्याच वेळी काशिनाथच्या मागून हातात चहा घेऊन एक पोऱ्या येत असतो. जणू ‘एक कप च्या’ हा तिथला नेहमीचाच प्रघात आहे!
काशिनाथची भूमिका किशोर कदम यांनी केली आहे. या भूमिकेला विविध पैलू आहेत. काशिनाथ प्रामाणिक आहे. सर्वांना सहकार्य करण्याचा त्याचा स्वभाव आहे. आपल्या कुटुंबावर त्याचं प्रेम आहे. परिस्थिती आपण व्यवस्थित हाताळू शकत नाही, याची बोचही आहे. अभिनयाचे हे विविध पदर किशोर कदमांनी चांगल्या प्रकारे व्यक्त केले आहेत
एके दिवशी काशिनाथची आई अंधारात पडते. त्या वेळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पैसे लागणार असतात, तेव्हा लाच देऊन घरी लवकर वीज आणा असा सल्ला चंदन देतो. पण संकट आलं तरी काशिनाथ प्रामाणिकपणा सोडत नाही. उलट मुलालाच रागावतो.
पण लगेच दुसऱ्या प्रसंगात काशीनाथचा धाकटा मुलगा अबू जेव्हा कंदिलात तेल मागण्यासाठी आईकडे येतो, तेव्हा तो अबूच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. कशीबशी त्याच्या अभ्यासाची चौकशी करतो आणि मनातलं सगळं वैफल्य समोरच्या सायकलला लाथ मारून काढतो. मुलाला कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागतोय, याचं शल्य त्याच्या मनाला बोचत राहतं.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
काशिनाथच्या मनात सरकारी यंत्रणेवरचा राग खदखदत असतो. त्याचा अर्ज ज्या अधिकाऱ्याकडे असतो, तो एक दिवस काशीनाथच्या एस.टीतून प्रवास करत असतो. काशीनाथ त्याच्याशी उर्मटपणे बोलतो. एरवी प्रवाशांशी आपलेपणानं वागणाऱ्या काशीनाथचा मूड बिघडलेला असतो. त्यातच मुलीला बरं नाही म्हणून दवाखान्यात चाललेल्या एका जोडप्याचे त्याच्याकडे जास्तीचे पाचशे रुपये येतात. एका गरिबाचे पैसे आपल्याकडे आले, त्याचा शाप लागून आता माझ्या मुलांना त्रास होणार नाही ना, म्हणून काशिनाथ अस्वस्थ होतो.
काशिनाथच्या पत्नीचं रुक्मिणीचं काम केलं आहे आश्विनी गिरी यांनी. रुक्मिणीला अशा परिस्थितीची सवय असते. त्यामुळे नवरा अडचणीत आल्यावरही ती तितकीच समजूतदारपणे वागते. काशिनाथ तिला म्हणतो, ‘लाईट गेल्यानं तुझं फॉल पिकोचं मशीन बंद पडलं. आता काम तुला हातानं कराव लागत.’ तेव्हा रुक्मिणी म्हणते, ‘एवढ्या एवढ्या श्रमानं जर बोटं दुखायला लागली, तर देव म्हणेल तुला बोटच कशाला पाहिजेत?’ हे म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावर खंत नाही, तर नवऱ्याला धीर देणारं स्मित असतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
एक सुंदर सामाजिक चित्रपट असं याचं वर्णन करावं लागेल. केवळ अभिनय आणि दिग्दर्शन इतपतच हा चित्रपट मर्यादित नाही तर ‘माहिती अधिकार कायद्या’बाबत हा चित्रपट आपल्याला माहिती देतो. सर्वसामान्य माणसानं निर्भय राहणं किती गरजेचं आहे, याचीसुद्धा जाणीव करून देतो. हा चित्रपट ‘अमेझॉन प्राईम’वर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अवश्य बघायला हवा.
या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
सतीश कुलकर्णी
satishkulkarni2807@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment