१.
या वर्षी ऐन दिवाळीच्या कालखंडात भारतामध्ये ‘जयभीम’ चित्रपट प्रदर्शित झाला. मूळ तमिळ भाषेमध्ये तयार झालेला हा चित्रपट भारतातील अनेक भाषांमध्ये डब केला गेला. हिंदी भाषेमध्येदेखील डब केला गेला. २ ऑक्टोबर २०२१ रोजी हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रथमतः प्रसारित झाला. त्याबरोबरच हा चित्रपट देशातील विविध चित्रपटगृहांमध्येही झळकला आहे. त्याला प्रचंड मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग लाभतो आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकवर्गामध्ये फार मोठे आकर्षण निर्माण केल्याचे दिसून येते. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येते. त्याबरोबरच त्याविषयी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा-चिकित्सा होत असल्याचे पहावयास मिळतेय.
‘जय भीम’ प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने भारतीय प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड मोठे औत्सुक्य निर्माण केले होते. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाचे ट्रेलर विविध प्रसारमाध्यमांवरून झळकत होते. ‘जय भीम’ हे भारतीय चित्रपटांच्या इतिहासामध्ये कधीही पाहण्यात न आलेले शीर्षक सर्वांचे लक्ष वेधून घेतेय, कुतूहल वाढवतेय. पोस्टरच्या मध्यभागी असलेले ‘JAY BHIM’ हे शीर्षक आणि पोस्टर व्यापून असलेला काळ्या कोर्टातील सवाल-जबाब करण्यास सिद्ध असलेल्या तरुण दाढीधारी वकील, यामुळे उत्सुकता वाढते. अन्य दुसऱ्या पोस्टरमधील लहागग्या, हळकुट्या व काळकुट्या मुलीसोबत कुठल्या तरी प्रतीक्षेत उभी असलेली काळ्या वर्णाची गरोदर स्त्री प्रेक्षकांना अस्वस्थ करून टाकते. या ‘JAY BHIM’ शीर्षकाच्या ‘Y’ वर्णामधील मुठीचा पंजा आवळलेले सावेशी मनगट प्रेक्षकांना आवाहन करणारे आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या शीर्षकावरून काही लोकांच्या कपाळावर आठ्यादेखील पडल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या समाजसमूहामध्ये तर या चित्रपटाबद्दल स्वाभाविक स्वरूपात विशेष आकर्षण निर्माण झाले होते. यातील काही प्रसंगांना वादग्रस्त करण्याचे प्रयत्नदेखील काही लोकांकडून केले गेले. शीर्षकावरही सकारात्मक-नकारात्मक चर्चा-चिकित्सा करण्यात आली. खरे तर या शीर्षकामुळे या चित्रपटाला आधीच भरपूर प्रसिद्धी मिळाली.
‘जय भीम’ हे शीर्षक असलेल्या चित्रपटाला इतके प्रचंड मोठे व्यवसायिक यश मिळेल, अशी अपेक्षा कोणी केली नसेल. मात्र या चित्रपटाने अल्पावधीत व्यावसायिक पातळीवर प्रचंड मोठे यश संपादन केले. काहींनी या व्यावसायिक यशाचा संबंध भावनिक गुंतवणुकीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे ‘जय भीम’ हे नाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकार्याबद्दल भारतातील प्रचंड मोठ्या जनसंख्येच्या मनात असलेला कमालीचा आस्थाभाव, यामुळे या चित्रपटाच्या व्यावसायिक यशामध्ये मोठी भर पडली, ही बाब खरीच आहे.
हा चित्रपट केवळ या व्यावसायिक व आर्थिक यशापुरताच मर्यादित आहे काय? या चित्रपटाची निर्मिती केवळ आर्थिक फायद्यासाठी झाली आहे काय? हा चित्रपट केवळ आर्थिक गणित डोळ्यासमोर ठेवून प्रेक्षकांपुढे आला काय? या चित्रपटाला देण्यात आलेले शीर्षक आंबेडकरी समाजाच्या भावनिक दोहनातून आकारास आलेले आहे काय? इत्यादी प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले गेले आहेत आणि त्यासंबंधात उत्तरे शोधण्याचा प्रयत्नदेखील अभ्यासकांकडून करण्यात आला आहे. पण या चित्रपटाची व्याप्ती केवळ या प्रश्नांपुरती मर्यादित नाही. सूक्ष्मपणे आकलन केल्यास त्याचे वेगळेपण प्रेक्षकांच्या व अभ्यासकांच्या लक्षात येऊ शकते. हा चित्रपट आशयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण स्वरूपाचा आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट मूल्यभानाच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याला मिळत असलेल्या यशापेक्षा त्यातील आशयाचे, त्याच्या आविष्काराचे आणि त्यामागील मूल्यभानाचे मोठेपण हे अधिक महत्त्वाचे मानावे लागते.
या चित्रपटाचे वेगळेपण समजून घेताना या वेगळेपणाचे धरातल समजून घ्यावे लागते. ते म्हणजे भारतीय लोकमानसावर प्रचंड मोठा पगडा असलेली हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवुड म्हणजेच हिंदीमध्ये निर्माण होणारे चित्रपट हे संपूर्ण भारतीय समाजमनावर अधिराज्य गाजवत आलेले आहेत. बॉलिवुड जरी मुंबईमध्ये स्थित असले तरी संपूर्ण भारतावर त्याचे गारुड आहे. या बॉलिवुडच्या पावलावर पाऊल ठेवत प्रादेशिक चित्रपटाच्या धरातलावर तमिळ भाषेमध्ये ‘जय भीम’ नावाचा एक आगळावेगळा चित्रपट निघतो, ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची घटनाकृती मानावी लागते.
भारतीय समाजाला विविध पातळ्यांवर मरगळ आलेल्या या कालखंडात प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट विविध अंगांनी अनन्यसाधारण स्वरूपाचा आहे. या चित्रपटाने एकाच वेळेस अनेक प्रकारच्या बाबींना चित्रपटासारख्या माध्यमातून पहिल्यांदा वाचा फोडण्याचे कार्य केले. एक अत्यंत सुस्पष्ट स्वरूपाची मूल्यदृष्टी अभिव्यक्त केली आहे. ती आवाजी व घोषणाबाज स्वरूपात प्रगट झालेली नाही, हेही लक्षात घेण्याची गरज आहे.
२.
शीर्षक पाहून हा चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांची अशी स्वाभाविक अपेक्षा असते की, यामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांची प्रत्यक्ष चळवळ पहावयास मिळेल. पण असे काही घडत नाही. त्यामुळे कट्टर आंबेडकरी समाजाला या चित्रपटाबद्दल असमाधान वाटण्याची शक्यता आहे. ते व्यक्त करणाऱ्या विविध प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्याही आहेत. यामध्ये उघड स्वरूपाची आंबेडकरी चळवळ आलेली नाही, हे अगदी खरे आहे. त्याचे मुख मात्र आंबेडकरांनी दाखवलेल्या विचारदिशेकडे असल्याचे दिसते. आंबेडकरांनी दाखवलेल्या विचारमार्गाशिवाय येथील समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळू शकत नाही, या मूल्यदृष्टीची मांडणी या स्वरूपात केली आहे. बऱ्याच प्रमाणात ती सूचकपणे व्यक्त झाली आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
हा चित्रपट पाहिल्यानंतर लगोलग प्रेक्षकांच्या पातळीवर एक प्रक्रिया घडते. प्रस्थापित भारतीय समाजाची उंची किती आखूड आहे आणि प्रस्थापित समाजाची खोली किती उथळ आहे, याचीदेखील तीव्रपणे जाणीव होते. सध्याच्या कालखंडामध्ये आपल्या प्रचलित समाजव्यवस्थेला कुरवाळत बसण्याचा आणि त्याचे सतत गुणगान करण्याचा भाग महत्त्वाचा मानला गेला आहे. स्वतःच्या परंपरागत समाजव्यवस्थेला सदानकदा कुरवाळत बसणे आणि स्वतःच स्वतःच्या समाजव्यवस्थेचे गुणगान गात बसणे, या बाबी कशा प्रकारे आत्मघातकी वळणापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत, याचे दर्शन हा चित्रपट घडवतो.
आपल्या समाजव्यवस्थेमध्ये जातवास्तव, वर्गवास्तव, वर्णवास्तव, धर्मवास्तव, लिंगवास्तव यांना सतत दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. या प्रकारच्या समाजवास्तवाकडे आणि त्या सामाजिक वास्तवाच्या रोमारोमात भिणलेल्या भेदाभेदाकडे समाजाचे लक्ष जाऊ नये, याचा भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आटोकाट प्रयत्न करण्यात येतो. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये असणारे अंतर्विरोध लोकांसमोर खुलेपणाने पुढे येऊ नयेत, याचा प्रयास प्रस्थापित विचारव्यवस्थेकडून सातत्याने होत असतो. चित्रपटासारख्या कमालीच्या लोकाभिमुख प्रसारमाध्यमामध्ये तर हे चित्र अगदी स्पष्टपणे पहावयास मिळते. त्या तुलनेमध्ये साहित्याच्या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेतील दुखरे आणि दुर्लक्षित कोपरे लक्षणीय स्वरूपात अभिव्यक्त झाले आहेत. साहित्यविश्वातील दलित साहित्य, आंबेडकरवादी साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य इत्यादि नव्या साहित्यप्रवाहांनी अंतर्विरोधग्रस्त समाजवास्तवाला प्रभावीपणे साकार करून दाखवले.
चित्रपटाच्यासृष्टीमध्ये मात्र या वास्तवाला अद्याप पुरेशा प्रखरपणे वाचा फुटलेली नाही. भेदग्रस्त काही प्रयत्न चित्रपटसृष्टीमध्ये जरूर झाले, पण ते अल्प स्वरूपाचे व अपवादात्मक ठरले. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टिकोनातूनही ते सीमितच राहिले. सद्यस्थितीत तर असे प्रयत्न करण्याचे धाडस भारतीय चित्रपटसृष्टी, विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टी गमावूनच बसली आहे.
अलीकडच्या काळात दक्षिण भारतातील पा रणजितसारखा दिग्दर्शक हे कार्य अत्यंत गंभीरतापूर्वक करत चालले आहेत. त्यांच्या ‘अत्तकाठी’पासून डॉ. आंबेडकरांची विचारदृष्टी विविध प्रतिमांच्या व प्रतीकांच्या रूपातून व्यक्त होत गेल्याचे दिसून येते. मराठीमध्ये नागराज मंजुळे हे काम गंभीरपणे करत आहेत. या नवपरंपरेला पुढे नेण्याचे काम ‘जयभीम’ने प्रभावी स्वरूपात केल्याचे दिसते. मुख्य म्हणजे ज्ञानवेल यांच्या या चित्रपटाने हे काम चित्रपटसृष्टीच्या मध्यप्रवाहात उभे राहून केले आहे. त्यांच्यासोबत तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सूर्या हाही तितक्याच ठामपणे आणि खंबीपणे उभा राहिला, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मध्यप्रवाहातील चित्रपटाच्या परंपरागत चारित्र्याला बाजूला सारत आदिवासी जीवनाचे भेदक दर्शन या चित्रपटातून जबाबदारीने घडवले आहे. तमिळ भाषेमधील मध्यप्रवाही चित्रपट या नात्याने हा चित्रपट पुढे आला आहे. या मध्यप्रवाही चित्रपटाने भारतीय समाजव्यवस्थेतील सर्वांत खालच्या उपेक्षित-वंचित समाजसमूहाला केंद्रस्थानी ठेवत भावाभिव्यक्ती केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीयांच्या आदराचा विषय असला तरी त्यांना अभिवादन करणारा ‘जय भीम’ हा शब्द सर्वांच्या पचनी पडू शकणारा आहे, असे म्हणणे काहीसे कठीणच आहे. भारतीय पातळीवरील दलित-उपेक्षित समाज आणि प्रामुख्याने आंबेडकरी, नवबौद्ध समाज यांच्यामध्ये ‘जय भीम’ हा अभिवादनपर व वंदनपर रुळलेला शब्द असला तरी अन्य समाजसमूहामध्ये आणि त्यातल्या त्यात मध्यप्रवाहातील समाजामध्ये हा शब्द अद्याप अंगवळणी पडला नसल्याचे दिसते. ज्या मराठी समाजामध्ये आंबेडकरांचे संपूर्ण कार्यकर्तृत्व आकारास आले, त्यामध्येदेखील या शीर्षकाची कोणत्याही प्रकारची कलाकृती अथवा साहित्यकृती मध्यप्रवाही घटकांकडून निर्माण झाल्याचे दिसून येत नाही.
‘जय भीम’ हे शीर्षक धारण केलेले असले तरी या चित्रपटामधून ‘जय भीम’चा जयघोष दिसून येत नाही. त्यामुळेच काही आंबेडकरी अभ्यासकांनी या चित्रपटाला ‘आंबेडकरी समाजाचे भावनिक दोहन’ असे म्हटले आहे. असे असले तरी या चित्रपटातील कथानकाचा व कथासूत्राचा प्रभावीपणा प्रेक्षकवर्गाला हलवून टाकणारा ठरला असल्याच्या भावना प्रेक्षकवर्गाकडून सार्वत्रिक स्वरूपात प्रगटल्याचे दिसून येते.
३.
हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. २६-२७ वर्षांपूर्वी तामिळनाडू राज्यामध्ये एक भयावह घटना घडली होती. तामिळनाडू राज्याच्या एका जिल्ह्यामध्ये लहानशा गावात इरुला या भटक्या आदिवासी जमातीचे लोक राहत होते. ही तामिळनाडू प्रदेशातील आदिम स्वरूपाची भटकी जमात. या तिच्यावर ब्रिटिश काळातील कायदे-कानुनानुसार गुन्हेगारी जमातीचा ठपका होता. ही जमात स्वाभाविकपणे अशिक्षित आणि अतिमागास अशी राहिली आहे. लहानसहान जंगलझाडीची कामे करणे आणि किरकोळ स्वरूपाचे कामधंदे करणे, छोटीमोठी मोलमजुरी करणे, यावर या जमातीच्या लोकांचा कसाबसा उदरनिर्वाह होत होता. हे लोक उंदीर-घुशी पकडणे, साप पकडणे आणि हरहुन्नरी स्वरूपाचे काम करणे यामध्ये वाकबदार होते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
१९९३च्या काळात या गावातील सरपंचाच्या घरी दागिन्यांची चोरी होते. त्याचा आळ इरूला जमातीतील राजकन्नू या तरुणावर घेतला जातो आणि त्याला अटक केली जाते. खरे तर त्याने चोरी केलेली नसते. पण पूर्वापार स्वरूपात गुन्हेगारी जमातीचा ठपका असलेल्या राजकन्नूवर सरंपचाकडून व गावकऱ्याकडून हा आरोप पक्का केला जातो. त्याला पोलीस कस्टडीमध्ये डांबले जाते. सोबतच त्याच्या जवळच्या भाऊबंदांनादेखील पकडले जाते. आरोप कबूल करण्यासाठी त्यांना बेदम मारहाण केली जाते. या अमानुष मारहानीत राजकन्नूचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू होतो. तो लपवण्यासाठी राजकन्नू आणि त्याचे भाऊ पोलीस कस्टडीमधून फरार झाल्याची कहानी पोलीस रचतात. राजकन्नूची पत्नी संगिनीला आपल्या पतीचे नेमके काय झाले, हे कळत नाही. ती न्याय मागण्यासाठी वणवण भटकते. शेवटी तिला वकील चंद्रू भेटतात आणि तिची केस कोर्टामध्ये लढवतात.
चंद्रू मानवअधिकाराचे खटले सामाजिक दृष्टीने लढवण्यासाठी चेन्नई परिसरात प्रसिद्ध होते. त्यांनी हा खटला मोठ्या जिकिरीने उभा केला. हेबियस कार्पस म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण या कायद्याच्या अंतर्गत त्यांनी कोर्टामध्ये खटला दाखल केला. तामिळनाडू प्रदेशामध्ये हा खटला खूप गाजला होता. तसेच तो दीर्घकाळ चालला होता. या खटल्याचा निकाल २००६मध्ये लागला.
अशिक्षित, दरिद्री, मागास आणि सर्व दृष्टीने अभावग्रस्त असलेल्या इरुला जमातीतील संगिनी या स्त्रीचा न्यायप्राप्तीकरिता सुरू असलेला लढा चंद्रू यांनी मोठ्या परिश्रमाने लढवला. त्याकरता अनेक वर्षे मेहनत करून योग्य ते पुरावे मिळवले आणि राजकन्नूचे निर्दोषपण आणि पोलिसांचे दमन कोर्टासमोर सिद्ध करून दाखवले.
या चित्रपटाच्या निर्मितीचीदेखील एक कुळकथा आहे. मुळात समाजाभिमुख पत्रकार असलेल्या ज्ञानवेल यांना मानवाधिकाराच्या संबंधात तामिळनाडू राज्यातील माजी न्यायाधीश चंद्रू यांच्यावर डॉक्युमेंटरी तयार करायची होती. त्यासाठी ते त्यांच्याकडे मुलाखतीसाठी गेले. तेव्हा ‘माझ्यावर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी तयार करण्यापेक्षा मी लढवलेल्या राजकन्नू-सिंगिनी या खटल्यावर सिनेमा तयार केला जाणे जास्त श्रेयस्कर ठरेल’ हे चंद्रू यांनी त्यांना समजावून सांगितले. ज्ञानवेल यांना देखील या सत्यघटनेचे महत्त्व पटले. आणि त्यांनी चित्रपट तयार करायचे ठरवले.
या चित्रपटाकरता वकील चंद्रू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी ज्ञानवेल यांनी तमिळ सुपरस्टार सूर्याची निवड केली. ‘सिंघम’फेम सूर्या यांनादेखील या कथानकाचे महत्त्व पटले. त्यांनी आपल्या अभिनयसामर्थ्याला पूर्णपणे पणाला लावत चंद्रूची भूमिका निभावली आहे. सत्यघटनेला कथात्मक रूप देताना जी काही कलात्मकता सांभाळायची असते, ती सांभाळत त्यांनी हा चित्रपट केला असल्याचे दिसते. सत्यकथा आणि सत्यपूरक कल्पित यांचा सुरम्य समन्वय साधत हा चित्रपट साकार झाला.
४.
भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सर्वांत तळपातळीवरील समाज म्हणून दलित समाजाकडे, आदिवासी समाजाकडे व भटक्या समाजाकडे पाहिले जाते. येथील दलित, आदिवासी व भटक्या समाजाला सतत अभावग्रस्त व वंचित राहावे लागले आहे. प्रस्थापित समाजाकडून या समाजाला सतत अपमानाला व यातनांना सहन करावे लागले आहे. दलित समाजघटकातील भटका आदिवासी समाज हा तर अधिकच शोषित व उपेक्षित समाजसमूह ठरला आहे. त्याच्यावरील गुन्हेगारी जमातीचा शिक्का स्वातंत्र्योत्तर काळात पुसला गेला असला तरी त्याच्याकडे पाहण्याची प्रस्थापित समाजाची मानसिकता अद्याप बदलली नसल्याचे दिसून येते.
तामिळनाडू राज्यामध्ये इरूला या भटक्या आदिवासी जमातीतील एका निरपराध असहाय परिवारावर समाजव्यवस्थेकडून व पोलिसी यंत्रणेकडून झालेला अत्याचार, ही घटना कोणत्याही संवेदनशील मनाला हेलावून टाकणारी अशीच आहे. भारतामध्ये सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी राज्यसंस्था निर्माण झाली आहे. तिची मूलाधार असलेली पोलिसी यंत्रणा व न्याययंत्रणा ही भारतातील सर्वात शेवटच्या व्यक्तीस न्याय देण्यासाठी कमकुवत ठरली असल्याचे दिसून येते. येथील दलित, आदिवासी, भटके यांच्या न्याय्य हक्कांचे व अधिकारांचे राज्यसंस्थेने संरक्षण व संवर्धन करण्याची गरज सर्वाधिक असताना हे समाजसमूह येथील व्यवस्थेमध्ये कायम अधिकारविहीन व हक्कविहीन ठरले आहेत.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
सर्वांत शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी राज्यसंस्था अपयशी ठरत असेल कितीही झाले तरी हा देश लोकशाहीवादी देश आहे आणि येथील राज्य लोककल्याणकारी आहे. हा देश भारतीय राज्यघटनेतील समतावादी तत्त्वांवर चालणारा देश आहे. या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीवादी संविधान प्रदान केले आहे. या देशातील प्रस्थापित समाजव्यवस्थेने येथील सर्वांत शेवटच्या स्त्री-पुरुषाला आतापर्यंत समजून घेतले नसेल तरी आंबेडकरांनी त्याला अंतःकरणपूर्वक समजून घेतले आहे. येथील तळपातळीवरील समाजसमूहाला सामाजिक व मानवीय न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे येथील तळपातळीवरील समाजसमूहावर कितीही अन्याय-अत्याचार झाले तरी त्याच्यासाठी आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान व त्यांचे समतावादी तत्त्वज्ञान हे मूलाधार ठरते. या तळपातळीवरील समाजसमूहांसाठी आंबेडकरांचे तत्त्वज्ञान जगण्याचे एकमेव आशास्थान ठरते.
या दृष्टीतून पाहिल्यास समस्त अभावग्रस्तांसाठी आणि सर्व प्रकारच्या न्यायासाठी आसुसलेल्या स्त्रीपुरुषांकरता ‘जय भीम’ हे बिरूद मुक्तिदायी ठरते. त्याच प्रकारे अविरत चालणाऱ्या जीवनसंघर्षामध्ये त्यांच्याकरता ते लढण्याचे नवे बळ देणारे प्रेरणातत्त्व ठरते.
या चित्रपटाच्या प्रारंभबिंदूलाच आपणासमोर तुरुंग उभा राहतो. त्यातील काही कैद्यांच्या सुटकेचा आणि काही कैद्यांच्या पुनश्च तुरुंगात डांबण्याचा प्रसंग येतो. तुरुंगामधून कैदी बाहेर पडत असताना जेलर प्रत्येक कैद्याला ‘कौन से जाती का है?’ असा दरडावणीचा प्रश्न विचारत असतो. उच्च जातीच्या गुन्हेगारांना तो सोडून देतो आणि खालच्या जातींच्या गुन्हेगार कैद्यांना वेगळ्या रांगेमध्ये थांबवून ठेवून त्यांना फटके मारत पुनश्च तुरुंगामध्ये डांबतो. या कैद्यांचा एकच मूलभूत गुन्हा असतो. त्यांनी या देशामध्ये जन्म घेतलेला असतो.
दुसऱ्या प्रसंगांमध्ये शेतमालकाच्या शेतीवर उत्साहाने काम करणाऱ्या इरुला जमातीतील एका गरीब पण निष्ठावान परिवाराचे दर्शन घडते. शेतमालकाच्या शेतीचे नुकसान होऊ नये, या करता उंदीर पकडणारा तरुण राजकन्नू आणि त्याची पत्नी संगिनी शेतबिळातील उंदीर हरहुन्नरीपणे पकडतात. पण हे कष्टाचे आणि हुन्नरीचे काम करत असताना शेतमालकाला त्याची शेती खराब होऊ नये, याची जास्त चिंता असते.
तिसऱ्या प्रसंगामधून राजकन्नू व संगिनी या दांपत्याचे कौटुंबिक सुखस्वप्न पहावयास मिळते. त्यांचे हे क्षणिक सुखस्वप्न धुंवाधार बरसणाऱ्या पावसात विरघळलेल्या भिंतीप्रमाणे कोलमडून पडते. शेतीमातीचे काम करताना निरागसपणे कामधंदा करण्याची राजकन्नू-संगिनी या दाम्पत्याची मनोवृत्ती सहजसुंदर स्वरूपात प्रगट होत जाते.
पुढचा प्रसंग हा गावातील सरपंचाच्या घरातील आहे. सरपंचाची पत्नी दागदागिने घालत असताना तिच्या हातातून सोन्याचा झुमका चुकून खाली पडतो. तो उचलण्यासाठी ती खाली वाकते, तोच पळणारा उंदीर व त्यावर झपाटणारा साप तिच्या दृष्टीस पडतो. ती घाबरून किंचाळते. मग सरपंचाला उंदीर-साप पकडण्यात तरबेज असणाऱ्या राजकन्नूची आठवण होते. सरपंच राजकन्नूला बोलावणे पाठवतो राजकन्नू हातातील काम टाकून येतो. सापाला पकडतो व सरपंचाच्या पत्नीला तिचा झुमका मिळवून देतो. येथेच सरपंचाच्या बंद पडलेल्या गाडीला धक्का देऊन तिला सुरू करण्याचा लहानसा प्रसंग आला आहे. या प्रसंगी सरपंचाने बक्षिसी म्हणून देऊ केलेल पैसे राजकन्नू सरळ मनाने नाकारतो. याच वेळेस सरपंचाची पत्नी राजकन्नूला त्याच्या कनिष्ठपणाची अतिशय विखारी शब्दांत जाणीव करून देते.
या प्रसंगानंतर कथानकाला गती मिळते आणि एकामागून एक प्रसंग साकार होत जातात. सरपंचाच्या घरातील दागिन्यांची पेटी काही दिवसांमध्ये चोरीला जाते. त्याचा संशय राजकन्नूवर घेतला जातो. दरम्यान राजकन्नू रोजीरोटीसाठी दूरच्या गावात वीभट्टीवर कामासाठी गेलेला असतो. पोलीस व गावकरी त्याच्या शोधामध्ये असतात. पोलिसांना राजकन्नू न सापडल्यामुळे ते संगिनी व त्याचे भाऊबंद यांना पकडून नेतात. त्यांच्यावर पोलीस कस्टडीमध्ये अत्याचार होतात. दरम्यान राजकन्नू गावी परत येत असताना गावकरी त्याला पकडतात आणि बेदम मारहाण करत पोलिसांच्या हवाली करतात. पोलीस कस्टडीमध्ये त्याला पोलिसांकडून गुन्हा कबूल करण्यासाठी मरेस्तोवर मारहाण केली जाते. त्याच्या भाऊबंदांनादेखील बेदम मारहाण केली जाते. तो मुकाटपणे मारहाण आणि अमानुष यातना सहन करतो. शेवटी पोलीस कोठडीमध्ये मृत्यूमुखी पडतो.
त्यामुळे पोलीस घाबरतात आणि ते एक वेगळ्याच प्रकारचा कट रचतात. राजकन्नू तसेच त्याचे दोन भाऊ पोलीस कोठडीमधून फरार झाले आहेत, असा बनाव रचतात आणि तशा प्रकारच्या बातम्या सर्वत्र पसरवतात. राजकन्नूच्या पत्नीने त्याला पोलीस कोठडीमध्ये करण्यात आलेली अमानुष मारहाण पाहिलेली असते. अगदी बेशुद्धावस्थेपर्यंत पोहोचलेला आपला पती पोलीस कोठडीमधून फरार होऊ शकत नाही, यावर तिचा विश्वास असतो. पोलिसांकरवी आपल्या पतीचा नक्की घातपात झाला असला पाहिजे, याची तिला खात्री पटते. आपल्या पतीला परत करावे, यासाठी ती पोलिसांना परोपरीने विनंती करते. आपल्या लहानग्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्याच्या चकरा मारत राहते. पण पोलीस तिला ठोकरून देत तिचे धिंडवडे काढतात. शेवटी आपल्या पतीला कशाही प्रकारे शोधून काढण्याचा ती चंग बांधते.
आदिवासीच्या वस्तीमधील अशिक्षित मुलांना शिकवणारी एक समाजसेवी शिक्षिका या कामामध्ये संगिणीला मदत करते. तिच्या सोबतीने संगिनी न्याय मिळवण्यासाठी वकिलांचा शोध घेऊ लागते. अशातच तिला वकील चंद्रू यांचा शोध लागतो. ते तिची आपबिती ऐकतात. त्यांना संगिणीवर झालेल्या अमानुष अन्यायाची खात्री पटते. हा खटला कोणत्याही पातळीवर जाऊन लढवायचा याचा ते मनोमन निश्चय करतात. ते ‘हेबियस कार्पस’च्या अंतर्गत खटला दाखल करतात. राजकन्नू आणि संगिनीची बाजू ते विविध प्रकारच्या पुराव्यांसह मांडतात. त्यातून पोलीस अधिकाऱ्यांकरवी राजकन्नूचा खून झालेला आहे, हे त्यांना कळते.
संगिनीला जेव्हा हे कळते, तेव्हा तिला विलक्षण हादरा बसतो. चंद्रू हे या प्रकरणाची चौकशी एका निष्पक्ष अधिकाऱ्याकरवी करण्यात यावी, असा कोर्टासमोर आग्रह धरतात. कोर्ट त्यांची मागणी मान्य करतो. पेरूमलस्वामी या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकरवी ही चौकशी केली जाते. या पोलीस अधिकाऱ्याला राजकन्नूवर अन्याय झाला आहे हे कळते. तो चंद्रू यांना या खटल्याचा निकाल लावण्यासाठी सकारात्मक स्वरूपात साथ देतो. राजकन्नूचा खून पोलिसांनीच केलेला आहे, हे कळून चुकले असते. पण पोलीस खात्याची अब्रू जाऊ नये म्हणून सरकारी वकील व उच्चपदस्थ पोलीस अधिकारी या खटल्यात गुंतलेल्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पोलीस खात्याची व न्याय संस्थेची प्रतिष्ठा कायम रहावी, म्हणून या खटल्यामध्ये पोलिसांची बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये राज्याचे ऍडव्होकेट जनरल उतरतात.
एक निराधार, असहाय, अशिक्षित, दरिद्री, फाटकी, अबला महिला पोलीस यंत्रणा, न्यायसंस्था आणि समाजव्यवस्था यांच्या विरोधात लढा देत आहे, ही बाब कोणालाच सहन होत नाही. कोणत्याही प्रकारे संगिनीला चूप बसवायचे आणि तिला पराभूत करायचे, याचा सर्व जण चंग बांधतात. पोलिसांकडून आणि वकिलांकडून तिला फार मोठ्या रकमेची लाच देऊ केली जाते. चंद्रूलादेखील लाच देऊ केली जाते. पण ते या आमिषाला बळी पडत नाहीत. चंद्रू सर्व शक्तीनिशी आणि युक्तीनिशी खटला लढवतात. विद्यार्थिदशेपासून सामाजिक व आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सक्रिय असलेले चंद्रू लढवैय्या भूमिकेतून कोर्टामध्ये युक्तिवाद करतात.
दुसऱ्या बाजूने ते आर्थिक व सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्येदेखील कार्य करत असतात. या खटल्याच्या तपासाचे कार्य करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी पेरुमलस्वामी यांच्या आंतरिक न्यायभावनेला ते आवाहन करतात आणि कोर्टाच्या समतोल न्यायबुद्धीलादेखील आवाहन करतात. पेरुमलस्वामी यांच्यावर या खटल्याच्या संबधात पोलिसांच्या बाजूने साक्ष देण्याचा व पोलिसांना निर्दोष म्हणून सिद्ध करण्याचा मोठा दबाब असतो. पण ते सत्याची बाजू घेऊन कोर्टामध्ये संगिनीच्या बाजूने साक्ष देतात.
या खटल्यामध्ये चंद्रू आणि संगिनी यांच्या विरोधात राज्यसंस्थेच्या सर्व उपसंस्था आपल्या सर्व प्रकारच्या सामर्थ्यानिशी एकवटतात. प्रचलित समाजव्यवस्था आणि तिच्या सर्व उपसंस्थादेखील त्यांच्या विरोधात एकत्रित आलेल्या असतात. अशा प्रतिकूल पर्यावरणामध्ये चंद्रू आणि लहानग्या लेकीसोबतची गर्भवती संगिनी यांच्यासोबत असते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वांना एकसमान न्यायाची हमी देणारे ‘भारतीय संविधान’. त्यातील लोकशाहीवादी तत्त्वांच्या आधारे चंद्रू आणि संगिनी कोर्टामध्ये प्राणपणाने लढतात. शेवटी मानवी प्रतिष्ठेच्या आणि मानवी अधिकाराच्या या लढ्यात त्यांना यश येते. गुन्हेगार पोलिसांना कडक शिक्षा होते. संगिनीला नुकसानभरपाई गावाच्या मध्यभागी घर बांधून देण्याचे फर्मान कोर्टाकडून दिले जाते.
या चित्रपटातील शेवटच्या प्रसंगामध्ये संगिनीची लहानशी मुलगी चंद्रू यांच्या निवासस्थानी त्यांच्या समोरच हळूहळू मान ताठ करून वृत्तपत्र वाचण्याचा प्रयत्न करू पाहत असल्याचा एक प्रसंग आहे. अन्यायग्रस्त राजकन्नू आणि सिंगिनी यांच्या लहानग्या मुलीच्या भवितव्याला आंबेडकरांच्या समतामूलक संविधानामुळे आणि त्यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारमार्गाने आकार मिळू शकणार आहे, या तत्त्वाचे आशावादी सूचन करत हा चित्रपट संपतो..
राजकन्नू आणि संगिनी यांना न्याय देण्यासाठी लढा देणारे चंद्रू लढावू वृत्तीचे असून त्यांना मार्क्सवादी विचारांनी बळ दिल्याचे प्रतीत होते. दक्षिण भारतामध्ये समाजसुधारणांचा प्रखर पुरस्कार करणारे पेरियर रामस्वामी नायकर यांचीही प्रेरणा त्यांची जडणघडण करण्याकरता विशेष मोलाची ठरल्याचे दिसते. तुलनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी त्यांना लाभल्याचे दिसत नाही. पण डॉ. आंबेडकरांच्या संविधानिक कार्यकर्तृत्वाची आणि त्यातील न्यायनिष्ठ समतावादी विचारदृष्टीची प्रेरणा त्यांना मानसिक पातळीवर लाभते, असे दिसते. त्यांच्या कार्यालयातील कार्ल मार्क्स, पेरियर रामस्वामी नायकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हेच सूचित करतात. त्याच्या बागेमध्ये असणारी बुद्धमूर्ती त्याची मानसिक अभिरूची स्पष्ट करते.
५.
या चित्रपटात महापुरुषांच्या प्रभावक्षेत्राचे संसूचन करणारा एक प्रसंग आलेला आहे. गांधी आणि नेहरू यांचे माहात्म्य स्पष्ट करणारा असा हा प्रसंग आहे. एका शाळेतील कार्यक्रमात विद्यार्थी हे गांधीजी आणि नेहरूजी यांच्या भूमिका साकार करताना दिसतात. या प्रसंगी ‘येथे गांधी, नेहरूंच्या प्रतिमा आहेत. पण येथे डॉ. आंबेडकर का नाहीत?’ असा एक सहज सवाल चंद्रू यांच्या मुखी आलेला आहे. भारतीय पातळीवर महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारधारेला विसाव्या शतकात केंद्रवर्ती स्थान प्राप्त झाले होते, हे सर्वविदित आहे. आर्थिक दृष्टीतून समाजविषयक व राज्यविषयक वर्गसिद्धांत मांडणाऱ्या कार्ल मार्क्स यांची मार्क्सवादी विचारधारा ही तर विसाव्या शतकाच्या काळात भारतीय आणि जागतिक पातळीवर अतिमहत्त्वाची विचारधारा ठरली होती. दक्षिण भारतातील प्रागतिक समाजसुधारणांच्या बाबतीत पेरियर रामस्वामी नायकर यांचे कार्य विसाव्या शतकाच्या मध्यकाळात अजोड स्वरूपाचे ठरले होते. या चित्रपटामध्ये वैचारिक नेतृत्व करणाऱ्या चंद्रू यांना या सर्व महापुरुषांचे आणि त्यांच्या विचारधारांचे सामर्थ्य माहीत आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सर्वसामान्य आणि अभावग्रस्त लोकांना न्याय देण्याच्या निमित्ताने चंद्रू यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी आणि त्यातील समतातत्त्वाशी स्वाभाविकपणे संबंध येतो. यामधून त्यांना आंबेडकरांचे माहात्म्य विशेषत्वाने जाणवते. सिंगिनी ही तर अशा अतिमागास, अशिक्षित, उपेक्षित समाजसमूहातील आहे की, तिला मार्क्सवादी विचारदृष्टी काय, गांधीवादी विचारदृष्टी काय किंवा आंबेडकरवादी विचारदृष्टी काय, यांचा बोध होणे शक्य नाही. आणि आपण तशी अपेक्षा करणेदेखील योग्य नाही. तिच्यासाठी चंद्रू प्राणपणाने लढा देत आहे, एवढेच तिला माहीत आहे. चंद्रू हेच या चित्रपटामध्ये वैचारिक आणि मूल्यात्मक नेतृत्व आहे. त्यांना पूरक असणारी मूल्यात्मकता सिंगिनी, तिला न्यायभावनेने मदत करणारी शिक्षिका, खटल्याची निष्पक्ष चौकशी करणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी पेरुमलस्वामी यांच्या व्यक्तिरेखांमधूनदेखील साकार होते.
भारतीय समाजामध्ये व्यक्तीच्या आणि समाजसमूहांच्या सामाजिक व न्यायिक प्रतिष्ठेकरता लढले जाणारे विविधांगी विचारांचे लढे अंतिमतः आंबेडकरांच्या विचारमार्गानेच परिपूर्ण होऊ शकतात, हा विधायक मूल्यसंदेश या चित्रपटाने भारतीय समाजापुढे ठेवला आहे. हा मूल्यसंदेश आजच्या आणि उद्याच्या भारताकरता आशादायक अभ्युदयमार्ग ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान, त्यांचे लोकशाहीवादी तत्त्वज्ञान आणि त्यांचे एकंदर विचारभान देशातील सर्व लोकांच्या मुक्तीचा सर्वाधिक कालसुसंगत असा वारसा ठरतो, याचे कलात्मक पातळीवरील आविष्करण हा चित्रपट करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या आजच्या कालखंडात आंबेडकरांचा संविधानिक आणि वैचारिक वारसा हा नित्यनूतन ठरतो, याचे भान हा चित्रपट भारतीय समाजाला गंभीरतापूर्वक देतो. हे या चित्रपटाचे अत्यंत महत्त्वाचे, असे यश होय.
हेही पहा\वाचा
या सिनेमाचं ‘जय भीम’ हे शीर्षक अनेक क्रांतिकारक विचारांचं सिन्थेसिस म्हणून वापरलं आहे!
‘जय भीम’चा घोष न करताही ‘जय भीम’ म्हणता येतं, जो सिनेमाचा नायक सूर्यानं सगळ्या व्यवस्थेला केला आहे
‘जय श्रीराम’ची जागा घेण्यासाठी ‘जय भीम’ आला आहे…
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. शैलेंद्र लेंडे नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या ‘डॉ. आंबेडकर विचारधारा विभागा’चे विभागप्रमुख आहेत.
shailendra.rtmnu@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment