टीव्ही मालिकांमधील जात आणि परंपरावाद
कला-संस्कृती - टीव्ही मालिका
आकार पटेल
  • वेगवेगळ्या मालिकांमधील दृश्ये
  • Sat , 22 October 2016
  • आकार पटेल अजित वायकर Aakar Patel Ajit Waykar टीव्ही मालिका TV Soaps

‘स्टार प्लस’ या भारताच्या सर्वांत मोठ्या मनोरंजनप्रधान वाहिनीवर रात्री ९ वाजता ‘दिया और बाती’ ही मालिका झळकते. वाहिनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ही मालिका म्हणजे, “आयपीएस अधिकारी बनण्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा करणाऱ्या संध्याच्या धडपडीची कहाणी आहे. आक्रसलेल्या आयुष्याला मुक्त करण्यासाठी मध्यमवर्गीय मूल्यांच्या चौकटी तोडण्याचं ती स्वप्न पाहते. ही गोष्ट स्वतःच्या आयुष्याला आकार देणाऱ्या सूरजचीही आहे. तो त्याच्या घराजवळ एक प्रसिद्ध मिठाईचं दुकान चालवतो.”

या मालिकेत राठी आणि कोठारी असे दोन मुख्य परिवार आहेत. राठी हे माहेश्वरी बनिया ( बिर्ला घराणंदेखील याच समाजाचं) आहेत. कोठारीसुद्धा त्याच समाजाचे.

‘स्टार प्लस’वरच रात्री साडेनऊ वाजता दाखवण्यात येणारी ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ पाच वर्षांपासून सुरू आहे. वाहिनीच्या म्हणण्यानुसार ही अक्षरा या मुलीबद्दलची एक सुंदर आणि हृदयाला साद घालणारी कथा आहे. भारतातल्या लाखो मुलींप्रमाणे तिलाही आपलं लग्न पालक आणि कुटुंबीयांच्या मर्जीनं होईल, याबद्दल कल्पना नाही. इतर तरुण मुलींप्रमाणंच तीसुद्धा चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटपटू यांची स्वप्नं पाहतच मोठी झाली आहे, परंतु लग्नापूर्वी प्रेमात पडणं तिच्यासाठी स्वप्नच बनून राहतं. या मालिकेतील दोन मुख्य परिवार माहेश्वरी आणि सिंघानिया आहेत. दोन्हीही आडनावं बनिया समाजाचंच प्रतिनिधीत्व करतात.

रात्री १० वाजता दाखवण्यात येणाऱ्या ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेचं कथानक गुप्ता आणि कुमार परिवाराभोवती फिरतं. कुमार आडनावावरून विशिष्ट जातीचा बोध होत नसला, तरी गुप्ता मात्र बनिया आहेत.

रात्री १०-३० वाजता ‘एक वीर की अरदास- वीरा’ ही मालिका झळकते. त्यात दोन मुख्य परिवारांची आडनावं सिंग अशी आहेत. ही उत्तर भारतीय आडनावं लढाऊ जातींशी संबंध दर्शवतात.

रात्री ११ वाजता दाखवण्यात येणाऱ्या ‘यै है मोहब्बतें’ मालिकेतील आडनावं भल्ला, अरोरा आणि खुराणा अशी आहेत. ती पंजाबी अरोरा आणि खत्री समाजातील व्यापार-उदीम करणारी मंडळी आहेत.

रात्री ११-३० वाजता प्रदर्शित होणाऱ्या ‘एक हसीना थी’ मालिकेत मुख्य कुटुंब गोएंका आडनावाचं आहे. ते अग्रवाल समाजातील बनिया आडनाव आहे.

‘झी टीव्ही’वर रात्री साडेआठ वाजता झळकणाऱ्या ‘दो दिल बंधे एक दोरी से’ या मालिकेतील नायिका शिवानी राणा हिचं जयपूरमध्ये पालनपोषण झालं आहे. ती राजघराण्याशी संबंध सांगणाऱ्या अतिश्रीमंत कुटुंबाशी संबंधित आहे. राणा ही पदवी मेवाडच्या शिसोदिया राजपूत (जसं की राणा प्रताप) नेत्यांना देण्यात येते.

रात्री ९ वाजता याच वाहिनीवर ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत अरोरा, मेहरा व खन्ना ही कुटुंबं दाखवण्यात येतात. ही तिन्ही कुटुंबं पंजाबी व्यापारी समाजाशी संबंधित आहेत.

रात्री ९-३० वाजता ‘कुबूल है’ या मालिकेत खान आणि कुरेशी या मुस्लीम आडनावांभोवती कथानक गुंफलेलं आहे. दोन्ही आडनावं विशिष्ट जातीकडे निर्देश करत नसली, तरी कुरेशी ही प्रेषित मोहंमद पैगंबर यांची जमात आहे. तसंच उत्तर भारतीयांमध्ये कसाई समाजात हे नाव प्रचलित आहे.

रात्री १० वाजता ‘और प्यार हो गया’ या मालिकेत बनिया समाजाचं खंडेलवाल कुटुंब दाखवण्यात आलं आहे.

मारवाडच्या प्रभावशाली राजपूत समाजाच्या राठोड कुटुंबाभोवती फिरणारी ‘डोली अरमानों की’ ही रात्री १०-३० वाजता दाखवण्यात येते.

१०-४५ वाजता दाखवण्यात येणाऱ्या ‘एक मुठ्ठी आसमान’मध्ये सिंघानिया (बनिया) आणि जाधव ही मुख्य कुटुंबं आहेत. जाधव हे महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारं आडनाव असलं, तरी मुख्यतः मराठ्यांमध्ये ते अधिक प्रचलित आहे.

रात्री ११-१५ला झळकणाऱ्या ‘पवित्र रिश्ता’मध्ये किर्लोस्कर (ब्राम्हण) आणि देशमुख (मराठा) ही मुख्य कुटुंबं आहेत.

‘कलर्स’ ही तिसरी मोठी वाहिनी आहे.

रात्री ८-३० वाजता या वाहिनीवर दिसणाऱ्या ‘मधुबाला- एक इश्क एक जुनून’ या मालिकेत शर्मा (ब्राम्हण) कुटुंबासमवेत कुंद्रा आडनावाचा नायकदेखील आहे. कुंद्रा कोण आहेत, याची मला कल्पना नाही. तसंच भारतीय मानववंशशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या ‘पीपल ऑफ इंडिया’च्या माझ्याकडील खंडात या आडनावाचा उल्लेख नाही.

रात्री ९ वाजता येणाऱ्या ‘बेइंतहा’ मालिकेत अब्दुल्ला हे मुस्लीम कुटुंब मुख्य भूमिकेत दाखवलं आहे.

रात्री साडेनऊ वाजताच्या ‘रंगरसिया’मध्ये मेहरा (पंजाबी खत्री) आणि राणावत (राजपूत) कुटुंबं आहेत.

‘मेरी आशिकी तुमसे हीं’ या रात्री १०च्या मालिकेत पारेख (गुजराती बनिया) व वाघेला (गुजराती राजपूत) कुटुंबं आहेत.

‘उतरन’ या १०-३० वाजता येणाऱ्या मालिकेत चॅटर्जी (ब्राम्हण) आणि राठोड, बुंदेला या लढाऊ जमातींशी संबंध राखणाऱ्या कुटुंबांचा समावेश आहे.

रात्री ११च्या ‘शास्त्री सिस्टर्स’ या मालिकांमध्ये शास्त्री आणि पांडे ( दोन्हीही ब्राम्हण) आडनावं आहेत. तसंच खत्री समुदायातील सरीन कुटुंबाचीही यात महत्त्वाची भूमिका आहे.

‘लाईफ ओके’ वाहिनीवरील रात्री ८-३०च्या मालिकेत ‘इक बूँद इश्क’ मालिकेत शेखावत (राजपूत) कुटुंब आहे, तर रात्री ९-३०च्या ‘तुम्हारी पाखी’मध्येदेखील राठोड (राजपूत) आहेत.

‘सोनी टीव्ही’वर रात्री आठ वाजता दाखवण्यात येणाऱ्या ‘अदालत’मध्ये नायक असणारा वकील पाठक (ब्राम्हण) आडनावाचा आहे.

रात्री ८-३० वाजता ‘एक नयी पहचान’मध्ये मोदी (बनिया) कुटुंब आहे. ही मालिका संपल्यानंतर तिची जागा ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका घेणार असून तिच्यातील नायक गोयल (बनिया) आहे.

रात्री ९-३० वाजता येणाऱ्या ‘हम हैं ना’मध्ये मिश्रा आणि मुखोपाध्याय (दोन्हीही ब्राम्हण) कुटुंबं आहेत.

रात्री १०-३० वाजता झळकणाऱ्या ‘हमसफर’ या नव्या मालिकेत पठानिया व चौधरी हे मुस्लीम कुटुंब आहे.

प्रश्न असा आहे- बव्हंशी मालिकांची आडनावं ढोबळमानानं सारखी का आहेत? ती एकतर बनिया, पंजाबी व्यापारी किंवा राजपूत समुदायाशी का नातं सांगतात? भारताच्या लोकसंख्येत त्यांचं प्रमाण दोन टक्क्यांहून अधिक नाही.

काही जाती या इतर जातींपेक्षा अधिक आकर्षक आहेत, असा समज असणारे राष्ट्र आपण आहोत का? तर उत्तर ‘हो’ असंच आहे. प्रत्यक्ष व्यवहारात असं होत असल्याचं तथाकथित निम्नजातीयदेखील मान्य करतील. हा गांभीर्यपूर्वक अभ्यासण्याचादेखील विषय आहे.

समाजशास्त्रज्ञ एम. एन. श्रीनिवास या प्रक्रियेला ‘संस्कृतायझेशन’ असं म्हणतात. वरच्या जातींचे रीतीरिवाज खालच्यांनी अंगीकारणं म्हणजे ‘संस्कृतायझेशन’.

मग प्रश्न असा उपस्थित होतो – इतर जातींना आपण हलक्या दर्जाचे समजतो का? तर याही प्रश्नाचं उत्तर माझ्या लेखी ‘होय’ असंच आहे.

सुरतमध्ये लहानाचा मोठा होत असताना मी ‘दुबळा’, ‘धेड’, ‘भंगी’ यासारख्या शिव्या शिकलो. या शिव्या नसून मैला उपसणाऱ्या आणि इतर खालच्या जमातींची संबोधनं असल्याचं मला फारच उशिरा समजलं. ‘दुबळा’ ही शिवी गलिच्छ माणसासाठी वापरली जायची. ‘पीपल ऑफ इंडिया’च्या बाविसाव्या खंडातील दुसऱ्या प्रकरणात आर. ई. इथोव्हन यांनी आपल्या ‘द ट्राईब्ज अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे’ या ग्रंथात वापरलेली उद्धरणं दिलेली आहेत. त्यात असं म्हटलं आहे की- “दुबळा म्हणजे नावाप्रमाणेच अशक्त व्यक्ती. कष्टमय काम आणि दारूची आसक्ती यामुळे ते लवकर वृद्ध होतात. याच खंडात धेड समाजातील व्यक्तींविषयीही वर्णन आहे. ते मांसाहारी असतात. विशेषतः नरसिंह देवतेच्या पूजेच्या वेळेस ते मद्यसेवन करतात. किमान दहा वर्षांपासून त्यांना धूम्रपानाचं व्यसन असतं.” 

मद्यपान आणि मांसाहार या दोन्हीही गोष्टींनी त्यांना गुजराती समाजाच्या नजरेत लांच्छनास्पद बनवलं होतं. पण लहानपणी या गोष्टी माझ्या आकलनाच्या आवाक्यापलीकडे होत्या. अशा प्रतिमेमुळे गुजरातमधील लोक दुबळा समाजाच्या कुटुंबाविषयीच्या मालिका पाहण्यास उत्सुक असतील, अशी सुतरामही शक्यता नाही.

सत्य हेच आहे की, मालिकांमधील पात्रं ज्या शांतचित्तता, खानदानी वृत्ती आणि परंपरावाद या गुणधर्मांच्या पाठीमागे धावतात, ते गुणधर्म भारतीय व्यक्तीला वैयक्तिक कष्ट अथवा प्रगतीतून नव्हे; तर जन्म आणि कुटुंबानं मिळतात, ही बाब आपण मान्य करून टाकली आहे!

म्हणून तर आपण ते दाखवण्यासाठी सरळधोपटरीत्या ‘अच्छे घर का’ (चांगल्या घरातला) हा वाक्प्रचार वापरतो! 

 अनुवाद – अजित वायकर

(‘मिंट’च्या ‘लाउंज’ या शनिवारच्या अंकात २७ सप्टेंबर २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद.)

लेखक अॅम्नेस्टी इंटरनॅशल, इंडिया या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारी संचालक व स्तंभलेखक आहेत.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......