अजूनकाही
ऐन दिवाळीत ‘ॲमेझॉन प्राईम’वर दक्षिणेतील सुपरस्टार सूर्याची मुख्य भूमिका असलेला आणि टी.जे. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘जय भीम’ हा चित्रपट पाहायला मिळाला. तो पाहून जी अस्वस्थता येते, जो सुन्नपणा आपण अनुभवतो, तो त्या चित्रपटातील कथानकाशी निगडित आहे.
दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये एका जिल्ह्यातील आदिवासी समूहातल्या तिघांना चोरीच्या कथित आरोपाखाली पोलीस अटक करतात. त्यानंतर त्यांना कबुलीसाठी पोलीस कोठडीत प्रचंड मारहाण केली जाते, त्यांचा छळ केला जातो. त्यात राजाकन्नू हा आदिवासी मरण पावतो. आणि नंतर त्याच्या मृत्यूचा आणि बेपत्ता होण्याचा शोध घेणारी त्याची गरोदर पत्नी चंद्रू या मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या वकिलाच्या सहाय्याने न्यायालयात जाते. पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणा पूर्णपणे हे प्रकरण दडपून टाकण्याच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नात असताना मद्रास उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू होते. आणि मानवी हक्कांसाठी झटणारा वकील चंद्रूचा सत्यासाठीचा शोध घेणारा लढा सुरू होतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अंगावर शहारे आणणारी एक विलक्षण अशी मानवी हक्कांची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक टी.जे. ज्ञानवेल यांनी सादर केली आहे. या चित्रपटाच्या आरंभी एक नोंद आपल्याला वाचायला मिळते. त्यातून १९९५ साली तीन आदिवासी तरुणांवर जो अन्याय होतो, त्या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे, असे लक्षात येते. या चित्रपटातील राजाकन्नूची बायको हीदेखील पोलिसांचा छळ सहन करत, त्यांच्या अत्याचाराला तोंड देत आपली आपली केस लढवणाऱ्या वकील चंद्रूच्या मागे ठामपणे उभी राहते. पोलीस कोठडीत किती भीषण पद्धतीने मागास आणि आदिवासी जातींच्या लोकांना गुन्हेगार समजून छळले जाते, त्यांच्यावर अत्याचार केला जातो, याची भीषण कहाणी हा चित्रपट आपल्यासमोर मांडतो.
दुसऱ्या बाजूला ज्या तमिळनाडूमध्ये हे प्रकरण झाले, तेथील पोलिसांचा लौकिक फारसा चांगला नाही, हीदेखील वस्तुस्थिती आपल्याला विसरता येणार नाही. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात तुतिकोरीन पोलिसांनी ठरलेल्या वेळेत दुकान बंद केले नाही म्हणून एका मोबाईल शॉपीच्या बाप-लेकांना पकडून पोलीस चौकीत एवढे बेदम मारले की, त्यातच त्यांचा मृत्यू झाला! हे सर्व प्रकरण न्यायालयमध्ये गेल्यावर पोलिसांची परत दडपादडपी सुरू होतीच!
एकूणच ज्या राज्यात पेरियार रामस्वामी यांच्यासारखे बंडखोर क्रांतिकारक, समाजसुधारक निर्माण झाले, त्याच राज्यात मागास आणि आदिवासी वर्गावर कायद्याचा खरा-खोटा अर्थ लावून पोलीस अत्याचार करत आहेत. त्याबद्दल ठाम आणि कठोरपणे प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे.
अलीकडे दक्षिणेतील असे काही चित्रपट निर्माण होत आहेत की, ज्यातून मुख्यत: जात विषमता आणि त्याच्याखाली असलेला अन्याय, अत्याचार याचे अत्यंत ज्वालाग्राही असे चित्रण आपल्याला पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी ‘असुरण’ आणि नंतर ‘कर्णन’ हे दोन चित्रपटही याच विषयावर होते. त्याच मालिकेतला ‘जय भीम’ हा चित्रपट आहे, असे म्हटले पाहिजे.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
या चित्रपटातील उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर राजाकन्नू आणि त्याच्या बायकोला न्याय मिळतो, हे जरी खरे असले, तरी त्याला किती उशीर होतो हेदेखील आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. पोलीस राजाकन्नूचा मृत्यू अपघाताने झाला आहे, असे दाखवण्याच्या आणि तसे खोटे पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात असतात. त्याच वेळी राजाबरोबर पोलीस कोठडीत असलेले दोन्ही आदिवासी तरुण न्यायालयासमोर पोलिसांनीच त्याला कसे मारले, याची तपशीलवार माहिती देतात. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्याचा आदेश उच्च न्यायालय देते.
चंद्रू वकिलाची भूमिका करणाऱ्या सूर्याने फार प्रभावी काम केले आहे. संपूर्ण घटनाक्रमात तो या पीडित, आदिवासी कुटुंबाला आणि त्या सर्व तरुणांना धीर देऊन न्यायालयासमोर सत्य तेच सांगा, असा सल्ला देत असतो. पोलीस कोठडीतील अत्याचाराचे एवढे परखड आणि कठोर असे चित्रण या पूर्वी फार कमी चित्रपटांत पहायला मिळाले आहे. अशा घटनांचे मेलोड्रॅमॅटिक चित्रण हिंदी चित्रपटात अनेकदा पाहायला मिळते. पण या अत्याचाराची परिसीमा किती आहे, हे दाखवताना दिग्दर्शकाने चित्रपटातील दृश्ये विलक्षण जिवंत केली आहेत. ती पाहताना अंगावर काटा येतो, आपण भीतीने शहारून जातो. या आदिवासी बांधवांचा, राजकन्नूच्या बायकोचा आक्रोश अक्षरश: काळीज फाडून जातो!
काही वर्षांपूर्वी मराठीमध्ये नागराज मंजुळे यांनी ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटाच्या माध्यमांतून जाती विषमतेला वाचा फोडली होती. ही चोरी करणारी जमात आहे, अशा समजुतीने आदिवासी आणि भटक्या समाजातील अनेक जाती-जमातींना पोलीस केवळ संशयाने पकडून घेऊन जातात आणि त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करतात. याकडे फार प्रभावीपणे आणि कठोरपणे लक्ष वेधणारा हा चित्रपट आहे.
आजकाल मराठी किंवा हिंदीमध्ये या स्वरूपाचे चित्रपट फारसे निर्माण होत नाहीत. समकालीन समाजकारण आणि राजकारण यावर भाष्य करणारे आणि त्यातील विषमतेला तितक्याच तीव्रतेने, टोकदारपणे अधोरेखित करणारे चित्रपट फारसे निर्माण होत नाहीत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘जय भीम’मध्ये चंद्रू वकिलाच्या कार्यालयात भिंतीवर तीन छायाचित्रं दिसतात- मार्क्स, आंबेडकर आणि पेरियार. या तिघांच्या प्रतिमांतूनही जाती विषमतेविरुद्ध लढण्याचा संदेश थेटपणे आपल्या हृदयाला भिडतो.
या चित्रपटाने कोणी जातीच्या नावाखाली अन्याय-अत्याचार करत असेल, तर तो सहन करायचा नाही, भारतीय राज्यघटनेच्या आधारे न्यायालयात दाद मागायची, हा मोठा संदेश या देशातील दुबळ्या, वंचित आणि पीडित समाजांना दिला आहे.
‘जय भीम’ हा तुमचा आवाज आहे, तुमचा उच्चार आहे, हा विश्वास हा चित्रपट आपल्या मनात आणि दलित, पीडित वर्गाच्या अंतकरणात निर्माण करण्याचे काम करतो.
एकही गाणे नसताना, एकही रंजक दृश्य नसताना, कठोर सामाजिक वास्तवाच्या आधारावर या चित्रपटाची कथा पुढे सरकते. लोकांनाही ती आवडतेय, त्यामुळे त्यांनाही सत्य हवे आहे, वस्तुनिष्ठता हवी आहे, असाच त्याचा अर्थ होतो, असे मला वाटते.
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा
या सिनेमाचं ‘जय भीम’ हे शीर्षक अनेक क्रांतिकारक विचारांचं सिन्थेसिस म्हणून वापरलं आहे!
‘जय भीम’चा घोष न करताही ‘जय भीम’ म्हणता येतं, जो सिनेमाचा नायक सूर्यानं सगळ्या व्यवस्थेला केला आहे
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
लेखक अरुण खोरे हे ज्येष्ठ संपादक असून सध्या ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ या मासिकाचे संपादक आहेत.
arunkhore@hotmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment