अजूनकाही
‘गाभ्रीचा पाऊस’ हा चित्रपट १२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याच्याविषयीचा हा लेख...
..................................................................................................................................................................
दिग्दर्शक सतीश मनवर यांचा ‘गाभ्रीचा पाऊस’ हा २००९ सालचा चित्रपट. विदर्भातील एका खेड्यात ही कथा घडते. कृष्णा हा शेतकरी गरिबी, कर्जाचा डोंगर यामुळे हैराण झालेला असतो. एक दिवस त्याचा शेतकरी मित्र भास्कर देशमुख परिस्थितीपुढे हतबल होऊन आत्महत्या करतो. त्यामुळे कृष्णा दु:खी होतो, पण शेतात धान्य पिकवायचं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं या निश्चयानं तो लगेच कामाला सुरुवात करतो. मात्र त्या दिवसापासून त्याची पत्नी अलका आणि वृद्ध आई यांची मानसिकता बदलते. दुष्काळामुळे कृष्णासुद्धा कर्ज फेडू शकत नाही... तोसुद्धा भास्करप्रमाणे आत्महत्या करणार नाही ना, या शंकेनं त्या घेरून जातात. कृष्णाची परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीची धडपड, अलकाची त्याला असणारी साथ आणि त्यातच तिच्या व कृष्णाच्या आईच्या मनात येणारे सैरभैर विचार, हे उत्कटपणे व्यक्त करणारा एक वास्तववादी चित्रपट म्हणजे ‘गाभ्रीचा पाउस’… अर्थात ‘शापित पाऊस’.
मनवर यांनी या चित्रपटातील प्रसंग चित्रित करताना शेतकरी वर्गाची मानसिकता, जगत असताना होत असणारी ससेहोलपट प्रत्येक प्रसंगातून समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला भास्करची प्रेतयात्रा गावातून जात असते. त्यात कृष्णा आणि त्याच्यासोबत त्याचा छोटा मुलगा दिनू सामील असतो. प्रेतावरून उधळलेला एक रुपया दिनू उचलतो. याच प्रसंगात एकीकडे प्रेतयात्रा आणि दुसरीकडे रेल्वे जातात. आधुनिता आणि ग्रामीण भाग यांच्यातील तफावत आपल्याला विचार करायला लावते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
कृष्णा शेतात कापूस पिकवतो, त्यासाठी एका धनिकाकडे पैसे मागायला जातो. त्या वेळी तो धनिक मोबाईलवर खेळत असतो. त्याचा मुलगा मात्र भोवताली पसरलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर खेळत असतो. कृष्णा लाचार होऊन त्याच्याकडे पैसे मागतो. श्रीमंती, गरिबी आणि निरागसता..
गावातील प्रमुखाच्या घरात टीव्ही असतो. सर्व जण त्यावर क्रिकेटचा सामना बघत असतात. कृष्णा तिथंच उभा असतो, पण त्याला कोणत हरतं, कोण जिंकतं यापेक्षा हवामानाचा अंदाज बघण्यात जास्त रस असतो. एकीकडे भारतानं सामना जिंकला म्हणून सर्वजण जल्लोष करतायत, तर दुसरीकडे टीव्हीवर विदर्भातल्या पावसाच्या आगमनाविषयीची बातमी ऐकून कृष्णा चिंतेत पडतो. कारण पावसाचं आगमन उशिरा होणार असतं. जल्लोष आणि चिंता…
चित्रपटातील काही प्रसंग मन हेलावून टाकणारे आहेत. जेव्हा कृष्णा जेवत नाही, तेव्हा अलका उदास होते. त्या रात्री अंधुकशा प्रकाशात त्याची आई नातवंडाला अंगाई गीत गात थोपटत असते, अलका आपल्या निजलेल्या नवऱ्याकडे काळजीनं बघते, आणि त्याच वेळी भास्करची बायको आपलं बाळ मांडीवर घेऊन चिंताग्रस्त बसलेली असते. प्रत्येकीच्या डोळ्यापुढे फक्त काळजी असते.
पाऊस न आल्यानं शेतातलं बियाणं करपून जातं. कृष्णा ते हातात घेतो, त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. पण त्याचा छोटा मुलगा दिनू ते अश्रू पुसतो. इतका वेळ निरागसपणे खेळणारा दिनू एकदम पोक्त वाटू लागतो.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
अलका त्याला नवीन बियाणं आणून देते. पेरणी करण्यासाठी म्हाताऱ्या आईसह सर्व कुटुंब कामाला लागतं. पण पाऊस येतच नाही. शेतकऱ्याची मानसिकता सांगणारं ‘हे माझा माता माय’ हे भावपूर्ण गाणं या प्रसंगी आहे. विठ्ठल उमप आणि भाग्यश्री अभ्यंकर यांचा आवाज, कवी दासू वैद्य यांचे शब्द आणि दत्तप्रसाद रानडे यांचं संगीत. या प्रसंगात कष्टकरी शेतकरी आणि त्यांची नजर आभाळाकडे. ढगात जेव्हा काहीच हालचाल दिसत नाही, तेव्हा मात्र हताश कृष्णा स्वत:शी पुटपुटतो ‘गाभ्रीचा पाऊस’.
चित्रपटातील हृद्य प्रसंग म्हणजे कृष्णाची आत्महत्या. शेवटी प्रयत्न करूनही जेव्हा निसर्ग साथ देत नाही, तेव्हा मात्र कृष्णा आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला मोबदला मिळेल म्हणून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. कृष्णाचं प्रेत अंगणात असतं, तेव्हा कुठल्याही ध्वनीचा आवाज नाही. अलकाचा मूक आक्रोश आणि जमलेल्या लोकांच्या हालचालींचे सूक्ष्म आवाज ऐकू येतात. काही वेळानं त्याची प्रेतयात्रा निघते, तेव्हा मात्र कृष्णाची आई हंबरडा फोडते. दुसऱ्याच्या प्रेतयात्रेत जो एक रुपया उचलायचा, तोच दिनू आता वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे आहे आणि मागे कुणीतरी उधळलेला एक रुपया.
वास्तविक शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय जुनाच आहे. तरीही हा चित्रपट वैशिट्यपूर्ण वाटतो, कारण एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरातील लोकांची मानसिकता काय असू शकेल, हे अचूकपणे दिग्दर्शकानं हेरलं आहे. उदाहरणार्थ, भास्करने आत्महत्या केल्यावर शेतात औषधे मारायचं म्हणून कृष्णा ते शोधतो, तेव्हा अलकाच्या मनात कृष्णा आत्महत्या तर करणार नाही ना, हा विचार येतो. किंवा तो जिथं जिथं जातो, त्या प्रत्येक वेळी आपल्या मुलाला त्याच्याबरोबर पाठवते, कारण तो बरोबर असेल तर त्याच्या मनात वेडेवाकडे विचार येणार नाहीत, असे अलकाला वाटते.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
भास्करची बायको आणि अलका एकमेकींशी बोलत असतात, तेव्हा भास्करला पुरणपोळी आवडायची, पण परिस्थितीमुळे ती देऊ शकली नाही, असं त्याची बायको सांगते. अलकाचीसुद्धा परिस्थिती नसते, पण तरीही ती उधार किराणा आणून त्याला पुरणपोळी करून घालते. एका प्रसंगात कृष्णा शेत नांगरण्यासाठी दिवसभर घराबाहेर असतो, तेव्हा ती भास्करच्या बायकोला भास्करसुद्धा असाच अचानक गायब व्हायचा का, असं विचारते. अलका शेतीची समस्या सोडवण्यासाठी अलका अंगावरचे दागिने नवऱ्याला विकायला सांगते. काहीही करून अलकाला आपल्या नवऱ्याला जपायचा प्रयत्न करते. कारण भास्करच्या मृत्यूमुळे तिचं मन आशंकेनं घेरून गेलेलं असतं.
सोनाली कुलकर्णींनी परिपक्व अभिनय केला आहे. त्यांना साथ दिली आहे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी. आपल्या मुलाची त्यांनाही काळजी आहे, शरीर थकलं आहे, पण तरीही जेव्हा कृष्णा नजरेआड होतो, तेव्हा त्याला शोधायला त्याची आई गावात उन्हातान्हात पायपीट करत असते. पाऊस न पडल्यानं पुन्हा पेरणी कर, असं जेव्हा कृष्णाची आई त्याला समजून सांगते, तेव्हा वर्षानुवर्षांचा शेतीचा अनुभव आणि शेतकऱ्याची हतबलता, असहायता त्यांनी आपल्या अभिनयातून व्यक्त केली आहे.
यातील प्रमुख भूमिका आहे कृष्णाची. ती केली आहे गिरीश कुलकर्णी यांनी. कोणतीही भूमिका सहज करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मग ‘देऊळ’ असो किंवा ‘दंगल’ असो. याही चित्रपटात त्याचा अनुभव आपल्याला येतो. कृष्णाला शेतात पीक कसं उगवायचं याची काळजी असते. परिस्थिती प्रतिकूल असते, पाऊस वारंवार दगा देतो, पण तरीही त्याच्यातील लढाऊ वृत्ती जागृत असतेच. बायकोचे दागिने विकून, बँकेकडून कर्ज घेऊन तो पीक उगवण्याचा प्रयत्न करतो. गावात पाटील नावाचा नकारात्मक शेतकरी असतो. काहीही केलं तरी पाऊस दगा देणार आणि परिस्थितीत सुधारणा होणारच नाही, तर कशाला काय करायचं, असं सांगत तो कृष्णाला वारंवार मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरीही कृष्णा लढतच राहतो. मात्र एका विशिष्ट दडपणाखाली तो राहतो. या साऱ्या गोष्टी गिरीश कुलकर्णी यांनी उत्तम पद्धतीनं साकार केल्या आहेत.
चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन आणि पटकथा यांचा त्रिवेणी संगम झाल्यानं हा चित्रपट निश्चितच बघण्यासारखा आहे. सुन्न करणारा चित्रपट असंच याचं वर्णन करावं लागेल.
..................................................................................................................................................................
सतीश कुलकर्णी
satishkulkarni2807@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment