अनुभव सिन्हा : सामान्य माणसाला त्याच्यातील ‘हिरो’पणाची जाणीव करून देणारा आजच्या काळातील महत्त्वाचा दिग्दर्शक  
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संतोष पाठारे 
  • अनुभव सिन्हा आणि त्यांच्या काही सिनेमांची पोस्टर्स
  • Sat , 30 October 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र अनुभव सिन्हा Anubhav Sinha तुम बिन Tum Bin दस Dus रा-वन Ra.One तथास्तु Tathastu मुल्क Mulk आर्टिकल १५ Article 15 थप्पड

भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा दहावा लेख...

..................................................................................................................................................................

वर्षानुवर्षं आपण प्रेमात आकंठ बुडालेले नायक-नायिका, त्यांच्यात होणारे गैरसमज आणि मग होणारी दिलजमाई, देशाची शांतता भंग करू पाहणारे दहशतवादी आणि त्यांच्यापासून जनतेचं संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी, अशा चाकोरीतल्या कथा आणि व्यक्तिरेखा आपण प्रेक्षक म्हणून पडद्यावर पाहत आलो आहोत. पुन्हा पुन्हा त्याच वळणाची कथानकं बघून आपल्याला कंटाळा येण्याऐवजी त्यांची सवय होऊन जाते. आपणही त्या चाकोरीचा भाग बनून जातो.

अशा प्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे दिग्दर्शकसुद्धा मग त्या विशिष्ट शैलीच्या चाकोरीत अडकून जातात. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद, पर्यायानं यशाची नशा, अशा दिग्दर्शकांना एकसुरी बनवून टाकते. आपण एकसुरी झालो आहोत, आपल्यातील सर्जनशीलता संपुष्टात आली आहे, याची वेळीच जाणीव होऊन वेगळ्या दिशेचा मार्ग धुंडाळणारे, त्या मार्गावर जाऊन यशस्वी होणारे आणि आपलं स्थान बनवू शकणारे दिग्दर्शक भारतीय चित्रपटसृष्टीत अपवादानेच दिसतात. अनुभव सिन्हा हे त्यातील एक नाव आहे.

‘तुम बिन’ या संगीतमय प्रेमकथेपासून आपल्या दिग्दर्शकीय करिअरची सुरुवात करून ‘दस’, ‘रा-वन’, ‘तथास्तु’ असे बिग बजेट तद्दन व्यावसायिक चित्रपट देणाऱ्या सिन्हाने गेल्या काही वर्षांत दिग्दर्शित केलेल्या ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘थप्पड’ या चित्रपटांच्या आशयाकडे पाहिल्यास हे सहज लक्षात येईल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

सिन्हाने इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं, मात्र त्या क्षेत्रात काम न करता चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावण्याचं ठरवलं. सुरुवातीच्या दिवसांत दिग्दर्शक पंकज पराशर यांचा सहाय्यक म्हणून त्याने काम केलं. या काळात टीव्ही माध्यमाची भरभराट होत होती. ‘झी’सारखी वाहिनी मनोरंजनाच्या क्षेत्रात उतरली. छोट्या पडद्यावरील रंजक मालिका, रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांना आवडू लागले. सिन्हाने ‘झी’, ‘यु टीव्ही’ या वाहिन्यांमध्ये क्रिएटिव्ह कामाचा अनुभव घेतला आणि तो संपूर्ण तयारीनिशी चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला.

‘तुम बिन’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटात प्रियान्षु चटर्जी, संदाली सिन्हा, हिमांशू मलिक, राकेश बापट असे नवखे कलाकार असले तरीही भूषण कुमार आणि टी सिरीजसारखी तगडी निर्मिती संस्था त्याच्या मागे उभी होती. निखिल-विनय यांनी संगीतबद्ध केलेली आणि अनुराधा पौडवाल, जगजीत सिंग, सोनू निगम यांनी गायलेली गाणी हिट झाली.

हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात महत्त्वाचं असतं ते यश! ‘तुम बिन’च्या यशानं सिन्हाला व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळाली. नायिकेच्या प्रियकराचा नायकाकडून चुकून झालेला अपघाती मृत्यू, आपल्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी नायकानं नायिकेला आणि तिच्या प्रियकराच्या कुटुंबियांना केलेली मदत आणि दरम्यान त्या दोघांमध्ये निर्माण झालेलं प्रेम, अशी सरधोपट कथा असलेला ‘तुम बिन’ यशस्वी झाला. त्याचा फायदा कलाकारांपेक्षा सिन्हाला अधिक मिळाला.

नंतर त्याने रत्नाकर मतकरी यांच्या ‘जावई माझा भला’ या नाटकाच्या कथानकाशी साधर्म्य असणारा ‘आपको पहले भी कभी देखा हैं’ हा ओम पुरीची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट केला. त्याची जेमतेम दखल घेतली गेली. त्यानंतर त्याने ‘दस’ हा बिग बजेट चित्रपट दिग्दर्शित केला. संजय दत्त, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, पंकज कपूर, शिल्पा शेट्टी, झायेद खान, इशा देवल अशी तगडी स्टार कास्ट, परदेशात केलेलं चित्तथरारक चित्रण, गुंतवून ठेवणार कथानक, विशाल शेखरचं धमाकेदार संगीत यामुळे हा चित्रपट लोकप्रिय झाला.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

‘दस’मुळे सिन्हाला व्यावसायिक चित्रपट तयार करण्याची नेमकी नस सापडली. हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक केवळ सर्जनशील असून चालत नाही, त्याला व्यवसायाची गणितं समजून घ्यायला लागतात. मोठ्या कलावंतांचे नखरे सांभाळण्यापासून प्रेक्षकांना अपेक्षित मनोरंजन देऊन त्या चित्रपटामागे लावलेलं करोडो रुपयांचं भांडवल निर्मात्याला नफ्यासहित परत मिळवून देण्याची हमी घ्यावी लागते. यात जर गफलत झाली तर दिग्दर्शकाची सगळी कारकीर्द बरबाद होऊ शकते. हे सगळे ताण घेऊन चित्रपट बनवणं मोठं जोखमीचं काम आहे. ती सिन्हाने उचलली. त्यामुळे आपसूकच त्याच्याकडे मोठ्या बॅनरचे चित्रपट चालून आले.

नितीन मनमोहनने त्याला ‘तथास्तु’चं दिग्दर्शन करायला दिलं. त्याने पुन्हा एकदा संजय दत्तला प्रमुख भूमिकेत घेतलं. मुलाच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमधील रुग्णांना ओलिस ठेवणारा असहाय्य बाप संजय दत्तने रंगवला. ‘तथास्तु’ची पटकथा एका अमेरिकन चित्रपटावर बेतलेली होती, पण त्यात खूप कच्चे दुवे होते. अशा पटकथेची हाताळणी करताना सिन्हाने काही दृश्यं ज्या संवेदनशीलतेनं चित्रित केली, त्यात त्याच्या नंतरच्या चित्रपटांची आशयसूत्रं दडलेली दिसली.

अ‍ॅक्शन थ्रिलर शैलीतील चित्रपट बनवणारा दिग्दर्शक ही सिन्हाची ओळख ठाम करणारा ‘कॅश’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र त्यानंतरच्या ‘रा.वन’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे त्याची संपूर्ण कारकीर्द पणाला लागली. शाहरुख खानची निर्मिती असलेल्या ‘रा.वन’चं बजेट तब्बल दीडशे कोटी रुपयांचं होतं. हॉलिवुडच्या चित्रपटांच्या तोडीचं तंत्र, रोबोटच्या व्यक्तिरेखेभोवती गुंफलेली कथा, यामुळे ‘रा.वन’ प्रदर्शनापूर्वी चर्चेत होता. पण भारतीय प्रेक्षक विज्ञानावर आधारित चित्रपटांना फारसी पसंती देत नाहीत, याचा प्रत्यय ‘रा.वन’च्या निमित्तानं पुन्हा आला. विज्ञानकथेला टिपिकल हिंदी मसाल्याची फोडणी प्रेक्षकांना फारशी रुचली नाही.

‘रा.वन’च्या अपयशानं सिन्हाला त्याच्या कारकिर्दीचा गंभीर विचार करावा लागला. आजवर आपण ज्या पद्धतीचं मनोरंजन प्रेक्षकांना देत आलो, तेच आपलं साध्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर त्याला शोधावं लागलं. मग त्याने त्याच्यावर ज्या शैलीचा शिक्का बसला आहे, तो पुसून वास्तववादी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.

‘गुलाब गँग’ हा चित्रपट त्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल होतं. बुंदेलखंडातील संपतबाईंच्या ‘गुलाबी गँग’ या चळवळीवर आधारित हा चित्रपट होता. माधुरी दीक्षित आणि जुही चावलासारख्या अभिनेत्री प्रमुख भूमिकांमध्ये असूनही ‘गुलाब गँग’चा प्रभाव पडला नाही. मात्र आपली नेहमीची शैली सोडून वास्तववादी कथानक चित्रपटातून मांडण्याचा त्याचा निर्धार अधिक दृढ होत गेला.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

त्यानंतर सिन्हाला खरा सूर गवसला तो ‘मुल्क’मध्ये! आज एखादा उर्दू शब्द कार्यक्रमाच्या शीर्षकात वापरला तर कलाकारांना झुंडशाहीला सामोरं जावं लागत आहे. अशा वातावरणात एका मुस्लीम वकिलाच्या कुटुंबाला आपल्या अस्तित्वासाठी ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्याचं भेदक चित्रण सिन्हाने ‘मुल्क’मध्ये केलं आहे .

मुराद अली (ऋषी कपूर) या वकिलाचा पुतण्या शाहीद (प्रतीक बब्बर) पोलिसांकडून दहशतवादी असल्याच्या संशयावरून मारला जातो. शाहिदच्या कृत्यामध्ये त्याच्या कुटुंबाचा सहभाग असणार, हे गृहीत धरून त्याचे वडील बिलाल (मनोज पहावा) आणि काका मुराद यांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागतं. मुराद अलीचं कुटुंब पाकिस्तानधार्जिणं असल्याचा आरोप ठेवला जातो. मुराद अली आपल्यावरील आरोपांचा प्रतिवाद करण्यासाठी न्यायालयात उभा राहतो. त्याला पाठिंबा देताना त्याची हिंदूधर्मीय वकील सून आरती (तापसी पन्नू)सुद्धा आपलं कसब पणाला लावते. ज्यांची पाळंमुळं भारतात आहेत, अशा मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेण्याच्या वृत्तीवर ‘मुल्क’ बोट ठेवतो. मुराद अलीची वेदना एम. एस. सत्यूच्या ‘गर्म हवा’मधील मिर्झाच्या वेदनेशी जोडली जाते.

दूषित नजरेनं ज्यांच्याकडे पाहिलं जातं असा मुस्लीम समाज, उपेक्षित दलित वर्ग आणि घरात सातत्यानं गृहीत धरली गेलेली गृहिणी, या सर्वांकडे सहनुभूतीनं पाहण्याची सिन्हाची दृष्टी त्याच्या ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘थप्पड’ या तीनही चित्रपटांतून अधोरेखित होते. ‘दस’, ‘रा.वन’सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारा हा तोच दिग्दर्शक आहे, यावर सहजपणे विश्वास बसणं कठीण जातं.

मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वतःचं कौशल्य सिद्ध केल्यानंतर मुख्य प्रवाहात राहून, व्यावसायिक अभिनेते घेऊन आसपास घडत असलेल्या आणि सामान्य माणसाला अस्वस्थ करणाऱ्या विषयांना चित्रपटांतून मांडणं ही सध्याच्या काळात अवघड गोष्ट आहे. ऋषी कपूर आणि मनोज पहावा या दोघांनाही त्यांच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम भूमिका ‘मुल्क’मध्ये सिन्हाने दिल्या. आपल्या चित्रपटांत ऋषी कपूर, आयुष्यमान खुराना, तापसी पन्नू असे लोकप्रिय कलाकार घेऊन वास्तववादी चित्रपट निर्माण करण्याचं अवघड आव्हान त्याने पेललं आहे, हे त्याच्या अलीकडच्या चित्रपटांतून आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादातून दिसून येतं.

‘मुल्क’नंतर ‘आर्टिकल १५’ हा त्याचा धाडसी प्रयत्न होता. अनेक वर्षं परदेशात राहिलेला भारतीय तरुण अयान रंजन आयपीएस होऊन उत्तर प्रदेशातील लालगाव इथं पोलीस ठाण्यात अप्पर वरिष्ठ अधीक्षक या पदावर रुजू होतो. दलित वर्गातील तीन मुली काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या असतात. त्यापैकी दोन मुलींचे झाडाला टांगलेले मृतदेह सापडतात, तिसरी मुलगी अजूनही बेपत्ता असते. या केसचा छडा लावण्यासाठी अयान रंजनने केलेले प्रयत्न हा ‘आर्टिकल १५’च्या कथासूत्राचा प्रमुख भाग आहे. या केसच्या निमित्तानं भ्रष्ट पोलीस यंत्रणा, धर्माच्या नावावर केलं जाणारं राजकारण आणि समाजात खोलवर रुजलेली जातीव्यवस्था त्याला जवळून पाहता येते. त्याच्या आदर्श भारताच्या कल्पना लालगावमधील वास्तव परिस्थितीमध्ये नष्ट होऊन जातात. दलित मुलींच्या वडिलांना न्याय देण्याचा व बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या पदाचा व अधिकाराचा वापर करून अयान रंजन करतो, पण जातीव्यवस्था समूळ नष्ट करणं, हे एकट्यादुकट्याचं काम नाही, याची जाणीव त्याला होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल १५’मध्ये समाजातील उपेक्षितांचे अंतरंग दाखवल्यानंतर सिन्हाने स्त्रीच्या वाट्याला येणारी उपेक्षा ‘थप्पड’मध्ये प्रभावीपणे मांडली. मृणमयी वायकूळ–लागू सोबत लिहिलेल्या पटकथेमध्ये त्याने अमृता (तापसी पन्नू) या प्रमुख व्यक्तिरेखेबरोबरच समाजातील विभिन्न स्तरांतील स्त्रियांना रोजच्या आयुष्यात नवऱ्याकडून येणारे हिंसेचे अनुभव मांडले. ‘थप्पड’मधील अमृता, शिवानी, नेत्रा, सरिता या स्त्रिया प्रातिनिधिक आहेत, घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत. घरात सुरू असलेल्या  पार्टीदरम्यान रागाच्या भारत अमृताचा नवरा तिला थप्पड मारतो आणि एका क्षणात तिचं आयुष्य बदलून जातं. ‘थप्पड’मधील स्त्री व्यक्तिरेखा रूढार्थानं बंडखोर नाहीत, पण त्यांना जेव्हा त्यांचं घरातील स्थान लक्षात येतं, तेव्हा त्या आपल्या अस्तित्वासाठी लढा उभारतात.

सिन्हा आपल्या चित्रपटांतून मुराद अली, आरती, अयान रंजन, अमृता, सरिता, अशा व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून आपल्याला आपल्या आसपासच्या वास्तवाची जाणीव करून देतो. ‘आर्टिकल १५’मधील एका प्रसंगात अयान आपल्या प्रेयसीला विचारतो, ‘तुम्हे हिरो चाहिये?’ त्यावर ती उत्तरते- ‘हिरो नहीं, ऐसे लोग चाहिये, जो हिरो की वेट न करे!’

सामान्य माणसाला त्याच्यातील हिरोपणाची जाणीव करून देणारा अनुभव सिन्हा यासारख्या व्यक्तिरेखांमुळेच आजच्या काळातील महत्त्वाचा दिग्दर्शक ठरतो!

..................................................................................................................................................................

या सदरातील आधीचे लेख

वेत्रीमारन : सामान्यांच्या जगण्याचा हुंकार टिपणारा कल्पक दिग्दर्शक

कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!

राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक

पी. शेषाद्री यांना सिनेमा म्हणजे ‘इंटरटेनमेन्ट, इंटरटेनमेन्ट आणि फक्त इंटरटेनमेन्ट’ हे मान्य नाही, ते म्हणतात- सिनेमा म्हणजे ‘एन्लायटनमेन्ट, एन्लायटनमेन्ट आणि फक्त एन्लायटनमेन्ट’!

नाग अश्विन : कला आणि व्यवसाय यांचा तोल सांभाळणारा दिग्दर्शक

ज्या कलावंतांनी स्वबळावर उत्तर-पूर्व प्रदेशातील सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून दिलंय, त्यात रीमा दासला अग्रक्रम द्यावा लागेल

डॉ. बिजू दामोदरन : समाजातील उपेक्षितांच जगणं तितक्याच भेदकपणे मांडणारा दिग्दर्शक

सुकुमार :  शंभर टक्के मनोरंजनाची हमी देणारा कल्पक आणि यशस्वी दिग्दर्शक

अर्जुन दत्ता : मध्यमवर्गाचे लोभस चित्रण करणारा दिग्दर्शक

..................................................................................................................................................................

लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत. 

santosh_pathare1@yahoo.co.in

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख