अजूनकाही
'बैल मेलाय' हे काही वर्षांपूर्वी आलेल्या प्रशांत दळवी लिखित 'चाहूल' या नाटकाची आठवण करून देणारं एक नवं कोरं नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय. युगंधर देशपांडे यांनी लेखन आणि ललित प्रभाकर यांनी त्याच दिग्दर्शन केलं आहे. 'चाहूल'पेक्षा हे नाटक खरं तर पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा ज्या वादळाची नुकतीच चाहूल लागायला सुरुवात झाली होती, ते इथं प्रत्यक्ष घरात शिरून नासधूस करतं!
किशोर आणि संजीवनी हे एक मध्यमवर्गीय जोडपं. दोघेही इंजीनिअर. संजीवनी पंढरपूरची आणि किशोर कोल्हापूरचा. मुंबईत भाड्याच्या घरात राहणारे. मॉडर्न होण्याची स्वप्नं पाहणारे. रविवारच्या एका आळसावलेल्या संध्याकाळी हे दोघे मॉलमध्ये शॉपिंगला जाण्याचा बेत करतात. तितक्यात एक भविष्यवेत्ता त्यांच्या दारात येतो. कोण असेल दारावर, या भीतीनं विविध शक्याशक्यतांचा विचार करून झाल्यावर बऱ्याच वेळानं संजीवनी दार उघडून त्याला आत घेते. आपल्याजवळचा खोका उघडून तो त्यातल्या एकेक चीजवस्तू बाहेर काढत, या दोघांना त्यांचं भविष्य सांगू लागतो. काही प्रिय, पण बऱ्याचशा अप्रिय घटना आपल्या आयुष्यात घडणार आहेत, हे कळल्यावर वैतागून किशोर त्याचा खून करतो. या फॅंटसीला चिकटून येणाऱ्या कडवट वास्तवाचा वेध घेणारं हे नाटक.
विकास पाटील, जयेश जोशी आणि आरती वडगबाळकर
छोट्या गावांतून शहरात येऊन पडलेल्या युवक-युवतींचं मॉडर्न होण्याचं वेड, पण त्या मॉडर्निटीला सोबत करणाऱ्या दुःखांचं आव्हान पेलण्याची मात्र मानसिक तयारी नाही, असा विचित्र तिढा या नाटकात सुंदररीत्या रंगवला आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना आपण काय गमावतोय, याचंही भान सुटलेल्या आजच्या पिढीसमोर आरसा धरण्याचं काम हे नाटक उत्तमरीत्या करतं. स्वतः ऑफिसमधल्या तरुणीशी लगट करू इच्छिणाऱ्या किशोरला भविष्यात आपल्या बायकोचं अफेअर असणार आहे, हे सत्य पचवता येत नाही. तिसरीही मुलगीच होणार असली तरी ते चालवून घेणारी संजीवनी ती लेस्बियन असेल, हे कळल्यावर मात्र कोसळते. दोघांनाही भविष्यात अपार सुख लाभणार आहे, पण त्यांचं नातं मात्र यांत्रिक होत जाईल, हे कळल्यावर दोघेही सावध होतात. अमेरिकेतल्या बायकोशी व्हॉटसअप, फेसबुकवर किशोर प्रणयाराधन करत आहे, हे दृश्य तर लाजवाब.
भविष्यवेत्ता जेव्हा जादूचा खोका उघडतो, तेव्हा तो पँडोरा बॉक्सच उघडत असल्यासारखं वाटतं. भौतिक सुखांच्या रूपाने एकामागोमाग एक सगळी दुःखंच त्यातून बाहेर पडत असल्याचं आपल्याला जाणवतं. सुख ओरबाडून घेत बरंच काही मिळवू इच्छिणारी, पण प्रत्यक्षात काहीच करू न शकणारी किशोर-संजीवनीसारखी असंख्य जोडपी आपल्या आजूबाजूला दिसतात, आणि त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय, याचा धोका हे नाटक नेमकं जाणवून देतं.
विकास पाटील, जयेश जोशी आणि आरती वडगबाळकर
खोका उघडण्याच्या प्रसंगातली फॅंटसीचा आभास निर्माण करणारी प्रकाशयोजना आणि त्याला साजेसं संगीत दाद देण्याजोगं. आरती वडगबाळकर, जयेश जोशी आणि विकास पाटील यांचा अभिनय उत्तम. नेपथ्य नेमकं आणि साजेसं. युगंधर देशपांडे यांच्या लेखनात आणि ललित प्रभाकर यांच्या नेटक्या दिग्दर्शनातच या नाटकाच्या यशाचं रहस्य दडलेलं आहे. थोडक्यात, लोकमान्य टिळक येणारेत किंवा शिवाजी महाराज अवतरलेत, तरी त्यांची पर्वा न करता डेली सोपच्या रुटीनमध्ये अडकलेल्या आजच्या आत्ममग्न पिढीचं हे नाटक आहे!
लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment