अजूनकाही
३१ जुलै १९८०च्या रात्री मोहम्मद रफी नावाचा सूरांचा बादशहा हे जग सोडून गेला.
अनंत पावसकर यांनी त्यांच्या ‘आठवणीतली गाणी’ या पुस्तकात रफींच्या अंत्ययात्रेचं वर्णन केलंय. ते लिहितात- “१ ऑगस्ट रोजी दुपारी १२च्या ठोक्याला जनाजा उचलला गेला. गर्दी न्यू टॉकिजवरून बडी मस्जिदच्या दिशेने निघाली होती. ‘जनाजे नमाज’ पढ़ला जात असताना अचानक पावसाचा जोर वाढला. गर्दीतला प्रत्येक जण रडत होता. जणू निसर्गही आक्रंदत होता. अश्रू पुसायची गरज नव्हती, कारण पाऊसच त्या अश्रूंना संगे घेऊन त्या मार्गावर भावनातिरेकाचा गालिचा अंथरत होता. कबरीवर माती लोटताना गर्दीने जो हंबरडा फोडला होता, त्याचा प्रतिध्वनी आजही आमच्या काळजाचा थरकाप उडवतो.”
“रफी, परग्रहावरून आपले सांगीतिक विश्व समृद्ध करायला आलेला माणूस. परमेश्वराला आवाज (Voice of God.) असेल तर तो रफीसारखा असेल असे म्हटले जायचे. १ ऑगस्ट १९८०, रफीचा जनाजा निघाला, मुसळधार पाऊस होता ते दूरदर्शनवर दाखवत होते आणि मागे गाणे वाजत होते- ‘आज पुरानी राहोंसे कोई मुझे आवाज ना दे…’ ”
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘मोहम्मद रफी’ हे नाव भारतातल्या अनेकांच्या हृदयात कोरलं गेलेलं आहे. व्यावहारिक भाषेत बोलायचं झाल्यास जरूर त्यांच्या निधनाला ४० वर्षे झाली असली तरीही त्यांची विस्मृती कुठल्याही रसिक व्यक्तीला होणार नाही हे निश्चित. ‘मोहम्मद रफी’ हे एक वादळ आहे, एक नाद, एक खूळ आहे. एक असे व्यसन जे एकदा लागलं की, सुटत नाही आणि कोणी सोडवूही शकत नाही.
‘मोहम्मद रफी’ हे नाव कानी पडताच मंदिरातील धीरगंभीर वातावरणाचा भास होतो. हे नाव उच्चारलं की, तर संगीतप्रेमींच्या मनात केवळ पवित्र भावनाच जागृत होते. पांढर्या सूर्यप्रकाशात सात रंग असतात, तसंच एकाच गळ्यातून गायनातले नऊ रस रफीसाहेब गाऊन दाखवू शकत होते. गोड गळा, मखमली आवाज ही ईश्वरदत्त देणगी असली तरीही त्यांची स्वतःची मेहनत आणि कळकळ या गोष्टी ‘दैवी’ नव्हत्या, कष्टानं कमावलेल्या होत्या.
‘रफी’ या जादुभर्या नावासाठी नूरजहानच्या एका गाण्याच्या ओळी आठवतात- ‘तू कौन-सी बदली में मेरे चाँद है आ जा, तारे हैं मेरे जख्मे जिगर इन में समा जा...’
उर्दू, हिंदी वा इतर कुठलीही भाषा असो स्पष्ट असे उच्चार ही रफीसाहेबांची खासीयत होती. शुद्ध हिंदी आणि शुद्ध उर्दूमध्ये तर त्यांची हजारो गाणी आहेत, पण मराठीमध्येही त्यांचे उच्चार एखाद्या सफाईदार मराठी गायकाचे असावेत असेच होते. रेकॉर्डिंग तंत्र अगदी रांगत्या अवस्थेत असतानासुद्धा कुठेही श्वासाचे आवाज येऊ न देता सलग वाद्यवृंदासकट गाणी म्हणण्यात त्यांचा हातखंडा होता.
श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतात रफीसाहेबांनी गायिलेली ही काही मराठी गाणी -
१. अग पोरी, संबाल
२. प्रभू तूं दयाळू
३. हे मना
४. शोधिसी मानवा, राउळीं मंदिरीं
५. सोड ना अबोला
६. प्रकाशांतले तारे तुम्ही
७. प्रभु रे, खेळ तुझा न्यारा,
८. नको भव्य वाडा
९. हा छंद जिवाला लावि पिसें
१०. विरलें गीत कसें?
अचूक गायकी आणि उत्कृष्ट गळा यांचा समसमासंयोग म्हणजे मोहमद रफी. सुधीर फडके यांच्या लग्नात रफीसाहेबांनी मंगलाष्टका म्हटल्या होत्या, ही आठवण फडकेसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलेली आहे.
रफीसाहेबांच्या गायकीला सुफी गायकीची जोड आहे. त्यांनी शिक्षण घेतलं तेच एका सुफी संताकडे. सुफी गायकीमधे खड्या आवाजाला महत्त्व आहे. त्यामुळे जिथं सामान्य गायकांची वरच्या पट्टीतली रेज संपते, तिथं सुफी गायक नियंत्रित गातात. उदाहरणार्थ नुसरत फतेह अली खान या सुफी गायकाची कुठलीही कव्वाली ऐका. रफीसाहेब अगदी वरच्या पट्टीतही सहज गात असत. उदाहरण द्यायचं झाल्यास ‘बैजू बावरा’ या सिनेमातील ‘ओ दुनिया के रखवाले’ हे गाणं. यातील ‘महल उदास और गलियां सूनी, चूप चूप है दिवारे’ यातील अंतऱ्यात ‘मंदिर गिरता फिर बन जाता’ ही ओळ गाताना वरच्या पट्टीत जाऊन समेवर येताना अगदी सहज आवाज लागला आहे. गाण्याच्या शेवटी ‘रखवाले’ हा शब्द म्हणताना एक एक सूर वर जात अगदी शेवटी जो आरोह लावला आहे, ते केवळ अप्रतिम. तिथं आवाज फाटला आहे, असं वाटतच नाही. हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर संगीतकार नौशाद यांनी रफीसाहेबांच्या घशातून रक्त वाहायला लावलं, अशी टीका झाली. पण तसं काही झालं नव्हतं.
स्त्री गायिकांची रेंज मात्र पुरुष गायकांपेक्षा नैसर्गिकरित्या वरच्या पट्टीत असते. या रेंजच्या बाबतीतला लतादीदी आणि रफीसाहेब यांचा एक किस्सा अप्रस्तुत ठरणार नाही.
देव आनंद यांच्या ‘माया’ (१९६१) या चित्रपटातील ‘तसवीर तेरी दिल में’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी ही घटना घडली. लतादीदींना पंचम स्वरापासून या गाण्याची सुरुवात करायची होती. त्याला सलील चौधरींनी मान्यता दिली. रफीसाहेबांची काहीच हरकत नव्हती, कारण ते नेहमीच गीतकार आणि संगीत दिग्दर्शक यांना आपले गुरू मानत. या गाण्याचा अंतरा ‘नयनों का कजरा पिया तेरा गम…’ हे गाताना लतादीदींचा आवाज कर्कश वाटत होता आणि त्याच अंतऱ्यात रफीसाहेबांचा आवाज नियंत्रित वाटत होता. ते ठीक करण्यासाठी गाण्याची सतरा रेकॉर्डिंग झाली, पण लतादीदींचा आवाज नियंत्रित झाला नाही. तेव्हा रफीसाहेब कधी नव्हे ते नाराज झाले. “मी कुणाचं ऐकायचं? संगीतकाराचं की, या महाराणीचं?” असं ते म्हणाले. यावरून वाद झाले.
शेवटी थोड्याशा कर्कश आवाजातच लतादीदींच्या ओळी रेकॉर्ड झाल्या. लताबाईंचं म्हणणं होतं- रफीजींनी आवाज उगीच नियंत्रित ठेवला. लतादीदींना सलील चौधरींनी दुजोरा दिला. त्यानंतर लतादीदींनी रफीसाहेबांसोबत कधीच न गाण्याचा निर्णय घेतला.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
लतादीदी नाहीत, तर रफीला गाणी मिळणार नाहीत असं अनेकांना वाटलं. पण या काळात रफीसाहेबांमुळे आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या दोघींना शेकडो गाणी मिळाली. आशा भोसलेंची लतादीदींच्या सावलीत झाकली गेलेली गायकी या काळात झळाळून उठली. अजून एक गायिका पुढे आली, शारदा.
रफीसाहेब अत्यंत महत्त्वाचे आणि वरच्या दर्जाचे होते, हे नक्कीच. साधारण ६२-६६ काळातली द्वंद्वगीतं बघितली तर हे जाणवतं. शेवटी लतादीदी रफीसाहेबांसोबत ‘ज्वेल थीफ’साठी ‘दिल पुकारे आरे आरे’ हे गाणं गायला तयार झाल्या.
‘एहसान तेरा होगा मुझपर’ (जंगली) आणि ‘अजी रूठकर अब कहा जाईयेगा’ (आरजू) ही दोन गाणी रफीसाहेब आणि लतादीदी यांनी एकत्र गायली आहेत. इथंही रफीसाहेबांच्या पट्टीशी समतोल राखण्यासाठी लतादीदींना खूप वरच्या पट्टीत गावं लागलं. त्याबद्दल त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्याकडे नाराजी दर्शवली होती. ही गाणी ऐकल्यावर लतादीदींचा आवाज कमालीच्या टीपेवर कर्कश लागला आहे, ते जाणवतं. मात्र असं असलं तरी एक गायिका म्हणून लतादीदी अद्भुत आहेत. रफीसाहेब-लतादीदी यांचे आवाज एकमेकांना पूरक होते.
आज, ३१ जुलै. मोहम्मद रफींचा स्मृतीदिन. आवाजाच्या दुनियेतील या बेताज बादशहाच्या गाण्यांनी अनेकांना अक्षरश: वेड लावलं! त्यांच्या अनेक चाहत्यांपैकी मनमाडच्या कांतीलाल येणारे यांची कथा आश्चर्यकारक आहे. ते येवल्याच्या एस.टी. महामंडळात कॅशियर म्हणून नोकरी करत. त्यांच्यासाठी रफीसाहेबांचं गाणं ‘औषध’ ठरलं! एखाद्या आजारातून रुग्णाला बरं होण्यासाठी डॉक्टरांच्या औषधापेक्षाही त्याच्या आवडत्या गायकाचं गाणं आणि त्याचं छायाचित्र परिणामकारक ठरतं, ही गोष्ट नवलाई वाटत असली तरी सत्यघटना आहे.
कांतीलाल लहानपणापासून रफीसाहेबांच्या गाण्यांवर जीवापाड प्रेम करणारे. त्यांना काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. घरच्या ज्येष्ठ पुरुषाला आलेला हा झटका सर्वांना धक्का देणारा होता. त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांच्या उपचाराबरोबरच आपल्यासमोर रफीसाहेबांचं छायाचित्र लावा व त्यांची गाणी ऐकवा, असे येणारे यांनी घरच्यांना सांगितलं. त्यानंतर हळूहळू ते या आजारातून बाहेर पडले. केवळ आजारपणातच नव्हे तर जेव्हा जेव्हा आयुष्यात नैराश्य आलं, त्या त्या वेळी येणारे रफीसाहेबांचं गाणं ऐकत आणि त्यांना चैतन्य मिळत असे असं ते सांगतात. आनंदातही ते रफीसाहेबांचंच गाणं ऐकतात. त्यांनी आपल्या घराची घरभरणी रफीसाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच केली.
सुजाता देव ‘Mohammad Rafi : Golden Voice of the Silver Screen’ या त्यांच्या पुस्तकात रफीसाहेबांच्या शेवटच्या क्षणाबद्दल लिहितात- “झहीर आणि लेस्ली हे दोघेच हॉस्पिटलमध्ये थांबले. झहीर औपचारिकता पूर्ण करत होता, तर लेस्लीला दमट वातावरणात मृतदेहाचे काय होईल, याची चिंता सतावत होती. रात्री दीडच्या पुढे केर्सी लॉर्ड, भूपिंदर सिंग आणि उत्तम सिंग हॉस्पिटलमध्ये पोहोचले. केर्सी लॉर्ड सांगतात- ‘आम्ही पोहोचलो तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाच्या औपचारिक मागण्यांची पूर्तता करता करताना झहीर दमला आणि त्याचा धीर सुटू लागला. रफीसाहेबांचं पार्थिव आम्हाला पाहायचं होतं. हॉस्पिटल प्रशासनानं खाली शवागारात जाण्यास सांगितलं. दुर्दैवानं तिथले एसी बंद होते. वातावरणात दमटपणा असल्यानं मृतदेहाचं विघटन होऊ नये म्हणून तो मृतदेह बर्फाच्या लाद्यांवर ठेवला होता.’ तिथं पोहोचताच भूपिंदर सिंग यांनी अखेरच्या कागदपत्रांची जबाबदारी घेतली. झहीर आणि केर्सी यांनी सकाळी मृतदेह घरी नेण्यासाठी लागणाऱ्या गाडीची व्यवस्था केली. भूपिंदर सिंग सांगतात- ‘त्या क्षणी माझे प्राण देऊन रफीसाहेब जिवंत परत येऊ शकत असते, तरी मी ते दिले असते.’ उत्तम सिंग सांगतात- ‘मृत्यू सर्वांना जणू समपातळीवर आणतो. एका महान हस्तीचा मृतदेह आम्ही पांढऱ्याशुभ्र कापडाच्या तुकड्याने झाकला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे देवळाशेजारच्या दुकानातून फुले आणली आणि रफीसाहेबांच्या पार्थिवावर पसरली. नंतर ते पार्थिव रफी मॅन्शनकडे घेऊन गेलो आणि कुटुंबियांच्या स्वाधीन केलं आणि लक्षात आलं- आमची जबाबदारी संपली होती.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
आयुष्यभर संगीताची आराधना करत असताना सर्व धर्माची गाणी गाणाऱ्या रफीसाहेबांच्या शेवटच्या क्षणी मुस्लीम, हिंदू, ख्रिश्चन, पारशी आणि शीख मित्रांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
‘तेरे आने की आस है दोस्त, शाम फिर क्यों उदास है दोस्त, महकी महकी फिजां ये कहती है
तू कहीं आसपास है दोस्त, तू कहीं आसपास है दोस्त.”
रफीसाहेबांचं हे शेवटचं गाणं…
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
bsatish17@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment