'आस' : सेन्स्युअस आणि रोमँटिक गाणं!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
सिद्धार्थ म्हात्रे
  • ‘आस’ हे गाणं लाँच करताना शंकर महादेवन यांच्यासह आशुतोष, सावनी आणि इतर
  • Sat , 18 February 2017
  • सतार ते रॉक आस Aas शंकर महादेवन Shankar Mahadevan सावनी रवींद्र Savaniee Ravindra आशुतोष जावडेकर Ashutosh Javadekar

संगीत ही प्रवाही घटना आहे. जगभर सतत त्यात नवीन बदल होत असतात. कधी जुन्या -नव्याचा संगम तर कधी एकदम नवीन असे संगीताचे प्रयोग जगभरचे संगीतकार करत असतात. मराठीतही असे प्रयोग होत आहेत आणि ही गोष्ट नक्कीच आशादायक आहे. असे प्रयोग करणाऱ्यांमध्ये संगीत अभ्यासक डॉ. आशुतोष जावडेकर यांचा उल्लेख करावा लागेल. परवाच त्यांच्या 'आस' या नव्या गाण्याचं सुप्रसिद्ध संगीतकार, गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते 9x zakkas या चॅनलवर ऑनलाईन लाँचिंग झालं.

डॉ. आशुतोष संगीत अभ्यासक, समीक्षक, लेखक, गायक-संगीतकार म्हणून ओळखले जातात. ‘लयपश्चिमा’ या नावाचा जगभरच्या सांगीतिक घडामोडींचा वेध घेणारा कार्यक्रम ते स्वतः सादर करत असतात. ज्याचे प्रयोग महाराष्ट्रात आणि आता भारतभरही होत आहेत. 

'आस' हे त्यांचं प्रदर्शित झालेलं दुसरं गाणं. याआधी 'वीण' हे यु-ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रदर्शित केलं गेलं होतं. हाही एक नवीनच प्रयोग होता. त्याचप्रमाणे 'आस'साठीसुद्धा त्यांनी असा एक नवा प्रयोग केला आहे. दोन दिवसांत ‘आस’ला २६,००० पेक्षा जास्त व्हियूज मिळून ते सोशल मीडियावर शेअर होत आहे. 9x zakkas मुळे ते झपाट्यानं पसरत आहे. 

9x zakkas चं सुंदर आणि प्रशस्त ऑफिस. बहुतेक सगळीकडे माझ्याच वयाचा यंग क्राउड हातात कॉफीचे मग घेऊन कामात दंग होता. वातावरण एकदम झक्कास वाटलं! दुसरीकडे लाँचिंगची तयारी आणि फेसबुक लाईव्हचं सेटअप सुरू होतं. हे सगळं प्रत्यक्ष पाहताना मजा येत होती. थोड्याच वेळात अगदी सहज एंट्री करत शंकर महादेवन पोचले. इतका मोठा गायक व संगीतकार मी पहिल्यांदाच जवळून पाहत होतो. आल्या आल्या त्यांनी सगळ्यांना हाय केलं. डॉ. आशुतोष यांनी कोणत्या भाषेतून बोलूयात असे विचारताच अगदी पटकन म्हणाले, ‘मराठीतून!’ त्यांच्या या उत्तराने मराठी रसिकांना ते का जवळचे वाटतात याचा उलगडा झाला. नंतर पूर्ण कार्यक्रमभर ते छान मराठीतून बोलले. ऑनलाईन लाँचिंग झाल्यानंतर ते गाण्याविषयी आणि एकंदरीतच संगीताबद्दल बोलले. कोणताही अभिनिवेश न आणता ते ज्या सहजतेनं बोलत होते, त्याने त्यांनी आमची मनं जिंकून घेतली. हे सगळं अनुभवताना ‘फीलिंग लकी’ वाटत होतं. 

शंकर महादेवन यांच्या हस्ते 'आस'चं लाँचिंग व्हावं हे अगदी उचित होतं.  कारण तेसुद्धा संगीतात नवनवीन प्रयोग करत असतात. ते म्हणाले, "आशुतोष माझ्यासारखेच आहेत. नवीन काहीतरी केल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत .”  असेच प्रयोग इतरही प्रादेशिक संगीतात व्हावे असंही त्यांनी सांगितलं.

ते ‘आस’विषयी म्हणाले, "हे द्वैभाषिक गाणं खूप छान एकमेकांत गुफलंय... या गाण्यात शास्त्रीय संगीताचा वापर सुंदर प्रकारे केला आहे. त्यामुळे एकाच गाण्यात अनेक संगीत प्रकार तुम्हाला ऐकायला मिळतात.” मराठी संगीतप्रेमींचा कल आजही चांगलं ऐकण्याकडे असतो. त्यांनी अशा प्रकारची गाणी ऐकून नव्या प्रयोगाचं स्वागत केलं पाहिजे असंही ते म्हणाले. 

 'आस' द्वैभाषिक गाणं (Bilingual Song) आहे. त्यातील काही कडवी मराठीत, तर काही इंग्रजीमध्ये आहेत. डॉ. आशुतोष यांनी स्वतः हे गाणं लिहिलं असून त्याचं संगीत संयोजन, गायन, अभिनय अशा भूमिका ही त्यांनीच केल्या आहेत. यातील इंगजी भाग त्यांनी स्वत: गायला असून मराठीतील कडवी सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रने गायली आहेत. याशिवाय, गाण्याच्या काही टप्प्यात इलेक्ट्रॉनिक सरोदचा वापर करून शास्त्रीय संगीताचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी पॉप संगीताचे एलिमेंट्स वापरण्यात आले आहेत. अशा प्रकारे या गाण्यात अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. माझ्या मते मराठीत तरी हा पहिलाच प्रयोग असावा. गीतलेखनाचा भागसुद्धा तितकाच ताकतीनं आशुतोष यांनी लिहिला आहे. इंग्रजी आणि मराठी कडव्यामध्ये सुंदर अशा शब्दांची गुंफण यात पाहायला मिळते. सारंग कुलकर्णी यांनी सरोदवादन खूप छान केलं आहे. त्याचा गाण्यात एक वेगळा प्रभाव पडला आहे. 

'आस' हे एक सेन्स्युअस आणि रोमँटिक गाणं आहे. त्यात भर पडली आहे ती रत्नागिरीतील लोकेशन्सची. कोकणातला समुद्र, बोट यानं आणखीनच रोमँटिक व्हायला होतं. व्हिडीओचं श्रेय उत्कृष्ट दिग्दर्शन आणि एडिटिंग करणाऱ्या विनिता अनगळ यांचं आहे. शिवाय सावनी आणि आशुतोष यांचा सहज सुंदर अभिनय! गाणं या दोघांनीच गायलंय आणि त्याला पूरक असा अभिनयही केला आहे. असे प्रयोग करणं हीच आशुतोषची खासीयत आहे.

काही गोष्टींची दखल संगीतप्रेमींनी आणि मुख्यत्वे संगीतक्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्यांनी घ्यावीच अशी आहे -

१) तुम्ही गाणं लिहिताय, ते कंपोज करताय तर मग तुम्ही अभिनय का नाही करू शकत? तुम्ही ते यशस्वीपणे करू शकता हे या गाण्यानं दाखवून दिलंय. 

२) फक्त आणि फक्त एकाच प्रकारे संगीत देऊन चालत नाही. तुम्ही प्रयोगशील असलं पाहिजे. कारण संगीत प्रवाही आहे. हे डॉ.आशुतोष यांनी आपल्या दोन्ही गाण्यांतून दाखवून दिलं आहे. 

३) Market Norms तोडणं ही सोप्पी गोष्ट नव्हे. आपल्या इथं ते करणं तर नाहीच नाही. डॉ. आशुतोषनी अत्यंत ताकतीनं नवं निर्माण करून या गोष्टी केल्या आहेत.

मला असं वाटतं की, धांगडधिंगा गाणं ही जशी संगीतात गरज असते, त्याचप्रमाणे काहीतरी शांत करणारं, खोल उतरून अनुभव देणारं गाणं निर्माण होणं हीसुद्धा संगीताची गरज असते. दोन्हींचं आपापलं महत्त्व आहे. 'वीण' असेल किंवा आताचं 'आस' असेल या दोन्ही गाण्यांनी अशी अनुभूती रसिकांना दिली आहे. गाण्यावरील कमेंट्स पाहिल्या तर आपल्याला हे लक्षात येईल, "आम्हाला बऱ्याच दिवसांनी अर्थपूर्ण असं मराठी गाणं शांतपणानं ऐकावंस वाटलं" किंवा “एकदा ऐकलं मग दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा ते गुणगुणावंसं वाटलं.” सोशल मीडियावरील या कमेंट्स प्रातिनिधिक आहेत. शिवाय सोशल मीडिया हे आज खूप मोठं व्यासपीठ बनलं असून एका क्षणात तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोचता. अशा नवीन प्रयोगांसाठी मराठी रसिकांना तयार करण्याचं काम 'आस'नं केलंय असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही! 

mhatresiddharth78@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......