‘सारपट्टा परंबराई’ : १९७०चे दशक जागवणारा एक अफलातून बॉक्सिंग ड्रामा!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
नानासाहेब गव्हाणे
  • ‘सारपट्टा परांबराई’ या चित्रपटाची पोस्टर्स
  • Tue , 27 July 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र सारपट्टा परांबराई Sarpatta Parambarai पा रंजित Pa. Ranjith काला Kaala कबाली Kabali

‘कबाली’, ‘काला’ या चित्रपटांनंतर सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट दिग्दर्शक व निर्माता पा रंजित यांचा ‘सारपट्टा परांबराई’ हा चित्रपट म्हणजे एका व्यक्तीच्या सन्मानाची लढाई असणारे महाकाव्यसदृश्य, मुष्टियुद्धाने भरलेले महानाट्य आहे. उत्पीडन, जातिभेद आणि दडपशाही या विषयांवर चित्रपट बनवण्यासाठी पा रंजित प्रामुख्याने ओळखले जातात. या चित्रपटात मात्र त्यांनी सामान्य माणसाच्या आत्मसन्मानाची लढाई मोठ्या पडद्यावर चितारली आहे. या मुष्टियुद्ध नाट्यात आपल्याला उत्तर चेन्नईमधील दोन लोकप्रिय मुष्टियुद्ध कुळांचा संघर्ष पाहायला मिळतो.

पा रंजित यांचा ‘सारपट्टा परंबराई’ हा चित्रपट त्यांच्या अगोदरच्या चित्रपटांच्याही पुढे जात, उत्पीडन आणि जातिभेद या बाबींवर उघडपणे चर्चा करत नाही. प्रतिमेच्या जाळ्यात अडकून न राहता हा चित्रपट अत्यंत साध्या सरळ शैलीत दोन लोकप्रिय कुळांमधील संघर्ष अत्यंत रोचक आणि मनोवेधक रीतीने आपल्यासमोर मुष्टियुद्ध नाट्य उभे करतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

सारपट्टा आणि इडियप्पन! १९७०च्या दशकात उत्तर मद्रासमध्ये ज्या कुळांनी आपले अधिराज्य गाजवले होते, त्या दोन कुळांची संघर्षगाथा यात पाहायला मिळते. त्याचबरोबर समानता आणि सन्मानाच्या परिप्रेक्ष्यात एका सामान्य कामगार व्यक्तीच्या लढ्याची ही महत्त्वपूर्ण कहाणी आहे.

कबिलनच्या भूमिकेत आर्या हा अभिनेता आहे. त्याची ही भूमिका त्याच्या सर्वोत्तम कामांपैकी एक गणली जाईल, यात शंका नाही. कबिलनची भूमिका त्याने अत्यंत समरसून, सशक्त अभिनयाने आणि समर्थपणे पार पाडली आहे. मूलभूत संधी, उचित मान-सन्मान आणि योग्य मान्यता नाकारल्या गेलेल्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून कबिलन आपल्यासमोर उभा राहतो. या समूहावर लादली गेलेली ही व्यवस्था बदलण्यासाठी त्याला संघर्ष करायचा असतो, लढायचे असते.

ही प्रामुख्याने दोन मुष्टियुद्ध गटांमधील संघर्षाची कहाणी असली, तरी पिढ्या दर पिढ्या त्यांच्यातील बदलत गेलेल्या हाडवैराच्या रूपांचे चित्रण पाहायला मिळते. कथानक उलगडण्याचा एक परिचित मार्ग म्हणून जसे क्रीडा हे नाट्य आपणासमोर येते, तसेच गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या उत्पीडित समुदायाबद्दल काही अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे पा रंजित मनोरंजक पद्धतीने आपल्यासमोर मांडतात.

कबिलन (आर्या) हा मुष्टियुद्ध सामने पाहतच लहानाचा मोठा होतो. त्याला या खेळाबद्दल तीव्र आकर्षण आहे आणि या खेळाची मनस्वी आवडही. स्थानिक मुष्टियुद्ध चॅम्पियन रंगनला (पशुपती) तो आपला आदर्श मानत असतो. कबिलन स्वतःला सिद्ध करण्याची संधी शोधण्यासाठी तळमळत असतो. कारण सतत दुर्लक्षित केलेल्या समुदयातून तो आलेला असतो. त्यामुळे त्याने स्वप्ने बांधून ठेवलेली असतात.

ही कहाणी कथनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच मुद्द्यांची चर्चा करत राहते. हा असा एकमेव दुर्मीळ चित्रपट ठरावा, जो प्रेक्षकांना सुसह्य, सुलभ व्हावा म्हणून केवळ पूर्णत: आपल्या नायकावर अवलंबून राहत नाही. चित्रपट सुरू होऊन ५०व्या मिनिटापर्यंत कबिलन (आर्या)ला नायक म्हणून उंची व न्याय देणाऱ्या दृश्याचा लाभ मिळत नाही, हे केवळ अचंबित करणारं आहे. कारण ५०व्या मिनिटापर्यंत चित्रपट नायकाला बाजूला सारत अन्य प्रमुख व्यक्तिरेखांवर आपलं लक्ष केंद्रित करतो. त्यात रंगन (पशुपती) ते वेंबली (जॉन कोकेन) आणि डान्सिंग रोज (शब्बीर कल्लारक्कल) ते केविन (जॉन विजय) यांच्या व्यक्तिरेखा आणि भूमिका आपल्यावर सशक्त अभिनयाची छाप सोडण्यात यशस्वी होतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

महिलांच्या वाट्यालासुद्धा मुख्य भाग येतात आणि त्यांचा तीव्र असा परिणाम कथानकात जाणवतो. कबिलनच्या (आर्या) आईच्या रूपात येणारी अनुपमा कुमार ही सतत त्याच्या मुष्टियुद्धाबद्दलच्या पॅशनला कडाडून विरोध करत असते. तसेच त्याच्या पत्नीच्या भूमिकेत असणारी दुशरा विजयन ही कुटुंबाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे असमाधानी व नाराज असते. संचना नटराजन हे या चित्रपटाचे सर्वांत मोठे उत्प्रेरक घटक आहेत. नेहमी मूर्ख भूमिकांमध्ये व्यर्थ ठरलेला जॉन विजय केविनच्या रूपात कबिलनला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या आणि एका वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत आपली छाप पाडताना पाहायला मिळतो.

कबिलन व त्याच्यातील काही दृश्यं ही या चित्रपटातले सर्वोत्कृष्ट क्षण आहेत. डान्सिंग रोजच्या भूमिकेत व्यक्तिरेखेला नकारात्मक छटा असूनही काही एक नैतिक मूल्यांबद्दल भान असणारं, नैतिकता पाळणारं मनोरंजक पात्र शब्बीर कल्लारक्कल या अभिनेत्याने अप्रतिमपणे वठवलं आहे. जरी तो इडीयप्पन गटाकडून सन्मानासाठी लढत असला, तरी पारदर्शक लढ्यावर विश्वास ठेवणारा आहे.

१९७०च्या दशकातील मद्रास आणि तो काळ प्रत्यक्ष उभा करणं, त्याचबरोबर भूतकाळातील घडलेल्या घटनांचे सूक्ष्म तपशील – उदा. इंदिरा गांधी यांनी केलेली आणीबाणीची घोषणा व त्यांचे परिणाम यांमुळे हा चित्रपट एक जबरदस्त आणि शानदार नाट्यानुभूती देण्यात यशस्वी ठरला आहे. व्यावसायिकतेच्या कसोट्यांशी मेळ खात नसली तरी यातील मुष्टियुद्धाची दृश्येदेखील विशेष उल्लेखनीय आणि परिणामकारक ठरली आहेत. ज्या थरारक पद्धतीने चित्रपटात ही दृश्ये उभी राहतात, त्यामुळे ती आपल्याला शेवटपर्यंत गुंतवून ठेवत तल्लीन व्हायला भाग पाडतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मुष्टियुद्धाची ही कहाणी अत्यंत रंजक आहे. ती कुठेही नीरस वा कंटाळवाणी होत नाही. शिवाय ती जातिभेद आणि त्याच्याशी निगडित राजकारणावर उघडपणे भाष्य न करता संयतपणे आपली बाजू, आपलं म्हणणं ती अधोरेखित करत प्रेक्षकांसमोर जाते.

‘सारपट्टा परंबराई’ हा या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा दावेदार आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे पा रंजितला स्वतःला सूर पुन्हा गवसल्याचं सुचिन्ह आणि निदर्शक म्हणूनही हा चित्रपट अधोरेखित केला जाईल, लक्षात ठेवला जाईल. उत्तर मद्रासच्या पार्श्वभूमीवर घडणारी, मुष्टियुद्ध संस्कृतीच्या विरुद्ध एका सामान्य, पण दुर्लक्षित व्यक्तीच्या विजयाची ही अफलातून अशी उत्साहवर्धक कहाणी क्रीडा नाट्याहूनही काही अधिक आपल्याला सांगू पाहते. पा रंजितने या चित्रपटवर दोन वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवणे ही एक धमाकेदार अनुभूतीच ठरेल, यात शंका नाही.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

पा रंजित  : ‘आंबेडकरवादा’ला सिनेमात आणणारा कलाकार

‘काला करिकालन’ : सैंया काला रे

लाइट्स, कॅमेरा आणि जातवास्तव : स्वातंत्र्यानंतर ३८ वर्षांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्थान मिळालं!

..................................................................................................................................................................

लेखक नानासाहेब गव्हाणे प्रादेशिक आणि जागतिक सिनेमाचे अभ्यासक आहेत

gavhanenanasahebcritics@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Rahul Hande

Tue , 27 July 2021

मुष्टियोद्धाच्या माध्यमातून व्यवस्थेच्या मुष्टीत हजारो वर्ष पिचलेल्या वर्गातील संघर्षशील व्यक्तिमत्वाचा व्यवस्थेवर केलेला विजय मुष्टी प्रहार अधोरेखित करणाऱ्या चित्रपटाचे तेवढेच दमदार परीक्षण.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख