बॉक्सरच्या जीवनावर आधारित ‘तुफान’ बऱ्याच बाबतींत फसलेला आहे
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘तुफान’, ‘मिलियन डॉलर बेबी’, ‘साउथपॉ’, ‘आय अ‍ॅम अली’, ‘सिंड्रेला मॅन’ आणि ‘मुक्काबाज’ या चित्रपटांची पोस्टर्स
  • Wed , 21 July 2021
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा तुफान Toofaan फरहान अख्तर Farhan Akhtar मिलियन डॉलर बेबी Million Dollar Baby साउथपॉ Southpaw आय अ‍ॅम अली I Am Ali सिंड्रेला मॅन Cinderella Man मुक्काबाज Mukkabaaz

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांचा ‘भाग मिल्खा भाग’ हा मिल्खासिंगच्या जीवनावर आधारित चित्रपट उल्लेखनीय होता. याच कलाकारांनी मिळून बॉक्सरच्या जीवनावर आधारित केलेला आणि नुकताच अमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला ‘तुफान’ मात्र बऱ्याच बाबतींत फसलेला आहे. ‘बॉक्सिंग’ या विषयावर आलेल्या इतर चित्रपटांशी या चित्रपटाची तुलना केल्यावर ‘नक्की काय बिघडले?’ याचा थोडक्यात उहापोह करणे समयोचित होईल.

एका वस्तीत राहणारा अज्जूभाई गुंडगिरी करत असतो, परंतु तो उत्तम बॉक्सर असतो. त्यामुळे त्याच्या कौशल्याचा उपयोग एक भला माणूस करतो आणि बॉक्सिंग शिकण्यासाठी नाना प्रभू यांच्याशी त्याची गाठ घालून देतो. प्रखर हिंदुत्ववादी असलेले नाना मुस्लीम समाजातील गुंडाला बॉक्सिंग शिकवण्यासाठी तयार होत नाहीत, परंतु कालांतराने त्याचे कौशल्य बघून नाना तयार होतात. बॉक्सिंग शिकता शिकता एका डॉक्टरवर प्रेम, त्याला ‘लव्ह जिहाद’चा थोडासा तडका, प्रेक्षकांना या बॉक्सरबद्दल आपुलकी वाटावी, यासाठी अनाथाश्रमाला भेट देणे, वगैरे टिपिकल हिंदी चित्रपटाचा मसाला, असे करता करता ‘चार आण्याची कोंबडी बारा आण्या’च्या मसाल्यात गायब होते आणि अधूनमधून डोकावत राहते.

कोचचा हिंदुत्ववाद दाखवताना कातडी बचाऊ धोरण अंगीकारून त्याच्या तोंडी ‘जय हनुमान’ ही घोषणा दिली आहे. अंजुम राजबली, विजय मौर्य यांनी कथेची पटकथा करताना बॉक्सरच्या कथेला अनेक फाटे फोडले आणि सिनेमा तिथेच फसला. एक-दोन उत्तम इंग्रजी चित्रपटांवरून हिंदी चित्रपट काढायचा, पण त्याचे भारतीयीकरण करताना त्यामध्ये बरेच इतर विषय तथाकथित हिशेबीपणाने घुसडल्यानंतर चित्रपट मूळ उद्देशापासून भरकटतो.

पहिल्या चाळीस मिनिटांत पकड घेणारा चित्रपट नंतर कसा बांधीव राहत नाही, याचे प्रत्यंतर घेण्यासाठी हा चित्रपट बघावा. नानांचे हिंदुत्व, बाला यांचा समंजसपणा, एका डॉक्टरची प्रेमकथा, ‘लव्ह जिहाद’, जफरभाईची दहशत असे बरेच विषय दाखवून मध्येच सोडून दिले आहेत. त्यामुळे हे सगळे विषय योजण्याचे प्रयोजन समजत नाही.   

फरहान अख्तरने ‘अजीज अली’ या बॉक्सरची शरीरयष्टी कमावण्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. ही भूमिका फरहानच्या यापूर्वीच्या भूमिकेपेक्षा वेगळीही आहे आणि त्याचे भान राखून वजन कमी-जास्त करणे, दंगलच्या आमीर खानइतके कष्ट घेऊन नसले, तरीही जमून आले आहे. परेश रावल यांनी बॉक्सरचा हिंदुत्ववादी कोच ‘नैसर्गिक’रीत्या उभा केला आहे. मोहन आगाशे यांनी साकारलेला बाला उत्तम आहे, परंतु त्यांच्या समन्वयकाच्या भूमिकेमधील व्यक्तिमत्त्व ठोसपणे पुढे येत नाही, कारण त्यांची भूमिका कदाचित कापली असावी. मृणाल ठाकूरला अभिनय सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे. शंकर एहसान लॉय यांच्या संगीताचा प्रभाव पडत नाही. त्यांची जादू कशी काय ओसरली? अगदी अलीकडे त्यांनी ‘राजी’पर्यंत उत्तम संगीत दिले होते, परंतु या चित्रपटामधील कोणतेही गाणे लक्षात राहत नाही. खरे तर गाणी घुसडल्यासारखी वाटतात.

‘बॉक्सर’ या विषयावरील अनेक उत्तमोत्तम चित्रपट आहेत. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मुक्काबाज’ या चित्रपटात उत्तर प्रदेशातील एका गावात राहणाऱ्या श्रावणचा बॉक्सर बनण्याचा झगडा फार उत्तमरीत्या दाखवला आहे. अशा खेळाडूंना घरातील विरोध सहन करताना उपजीविकेसाठी सरकारी नोकरी करावी लागते, त्या वेळी तेथील वरिष्ठ पदाधिकारी अशा खेळाडूंना कशी वागणूक देतात, तो अपमान गिळून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करताना कुठल्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो, दुसऱ्या जातीतील ‘सुवर्णा’ या युवतीबरोबर प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्या बॉक्सरचे आयुष्य कसे बदलते, याचे चित्रण अनुराग कश्यप यांनी फिल्मीपणा टाळून केले आहे. विनीतकुमार सिंगच्या अभिनयामुळे हा चित्रपट अधिक दर्जेदार झाला आहे. 

‘साउथपॉ’ या चित्रपटात एक बॉक्सिंग चॅम्पियन पत्नीच्या निधनानंतर उद्ध्वस्त होतो. त्यानंतर त्याची मुलगी बॉक्सर वडलांनी पुन्हा यशस्वी व्हावं, म्हणून प्रयत्न करते. ‘अँटोनी फुकवा’ दिग्दर्शित चित्रपटात ‘जेक गॅलेनहाल’ याने उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटाचे काही अंश आपल्याला ‘तुफान’मध्ये दिसतात, परंतु ‘साउथपॉ’ चित्रपटाचा फोकस कुठे बदलला आहे, असे कधीही जाणवत नाही. ‘साउथपॉ’मधील कोणताही प्रसंग चिकटवलेला वाटत नाही. एका बॉक्सरचे आयुष्य आणि करिअर कसे उद्ध्वस्त होते, हे ‘साउथपॉ’मध्ये दिसते, परंतु ते बघताना आपल्याला नायकाचे गुण आणि दोष दिसतात. नायकाची मुलगीच त्याला स्वतःच्या दोषांवर मात करून करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करते. अशा चित्रपटांवरून हिंदी चित्रपट करताना नायकाचे दोष न दाखवता त्याला सर्वगुणसंपन्न दाखवण्यामुळे चित्रपटातले नाट्य  निघून जाते. 

‘क्लिंट इस्टवूड’ दिग्दर्शित ‘मिलियन डॉलर बेबी’ (२००४) हा चित्रपट बॉक्सिंगवर आधारित चित्रपटांत सर्वोत्तम आहे. एक मुलगी बॉक्सिंग शिकण्याचा आग्रह धरते आणि बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यानंतर कोच त्या मुलीला शिकवायला तयार होतो. मेरी बॉक्सिंग शिकते आणि कोचची सर्वोत्तम विद्यार्थी बनते, अनेक स्पर्धा जिंकते, पण एका प्रसंगी तिची मान मोडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भयावह अवस्थेत तिला झोपून राहावे लागते. तिची अशी शारीरिक आणि मानसिक अवस्था कोचला बघवत नाही.

त्या वर्षीचे ऑस्कर या चित्रपटाने गाजवले. उत्तम अभिनेत्री (हिलरी स्वँक), उत्तम सहायक अभिनेता (मोर्गन फ्रीमन), सर्वोत्तम दिग्दर्शक (क्लिंट इस्टवूड), सर्वोत्तम चित्रपट असे चार पुरस्कार ‘मिलियन डॉलर बेबी’ने पटकावले. क्लिंट इस्टवूड यांनी पाश्चात्य चित्रपटांतील आपल्या प्रतिमेच्या प्रेमात न पडता दिग्दर्शक या नात्याने अनेक विषयांवरील वैविध्यपूर्ण दिग्दर्शित केले. स्वतः दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ‘मुख्य कथा मॅगी या बॉक्सर नायिकेची आहे’ याचे पूर्ण भान राखून, कॅमेरा स्वतःवर न ठेवता, स्वतःच्या भूमिकेची लांबी आवश्यक तेवढीच ठेवणे हे कौतुकास्पद आहे. 

रॉन हॉवर्ड दिग्दर्शित ‘सिंड्रेला मॅन’ हा चित्रपट उत्तम सादरीकरण आणि रसेल क्रोचा अभिनय यांसाठी बघण्यासारखा आहे. आयरिश बॉक्सर जेम्स ब्रेडॉकच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात चित्रित केलेले गरिबीतून वर येण्यासाठीचे एका बॉक्सरचे प्रयत्न वास्तवाच्या जवळ जाणारे आहेत. एका बॉक्सरच्या आर्थिक स्थैर्याचा आणि या खेळामधील कौशल्याचा सामना समतोल राखून दाखवला आहे. हा चित्रपट तिकीटबारीच्या परिमाणावर यशस्वी गणला गेला नसला, तरी दर्जेदार चित्रपटांत स्थान मिळवून आहे.  

सिल्वेस्टर स्टॅलीनने साकारलेल्या ‘रॉकी’ (भाग १, १९७६  ते ४ १९८५) या चित्रपट मालिकेमधील पहिला भाग उत्तम आहे. बॉक्सर मोहम्मद अलीच्या जीवनावर आधारित ‘आय अ‍ॅम अली’ हा चित्रपट विल्स स्मिथच्या अभिनयासाठी उल्लेखनीय आहे. मोहम्मद अलीच्या जीवनातील काही वादळेही या चित्रपटात दिसतात. बॉक्सिंगवरील ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटात ‘रेजिंग बुल’चा नंबर वरचा लागतो. रोबर्ट द निरोचा अभिनय, मार्टिन स्कोर्सेसीचे उत्तम दिग्दर्शन, अफलातून कॅमेरा, अर्थपूर्ण प्रकाशयोजना अशा बऱ्याच कारणांसाठी हा चित्रपट बघायला हवा. 

डँझेल वाशिंग्टन अभिनित ‘द हुरिकेन’, मोहम्मद अलीचा जीवनपट ‘आय अ‍ॅम अली’, ‘क्रिड’ असे अनेक चित्रपट बॉक्सिंगवर किंवा बॉक्सरच्या आयुष्यावर / आयुष्यातील काही प्रसंगांवर आधारित आहेत. अशा अनेक चित्रपटांत लेखक-दिग्दर्शक यांनी विषयाशी प्रामाणिक राहून ‘आपल्याला नेमके काय दाखवायचे आहे’ याचे भान राखले आहे. त्यामुळे ‘चित्रपट बघायला आपण कुठून सुरुवात केली आणि आता आपण काय बघत आहोत?’ असे प्रश्न पडत नाहीत. 

OTTच्या जमान्यात प्रेक्षकांकडे भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत. लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना घरबसल्या इतर भाषेमधील विविध विषयांवरील चित्रपटांचे अवलोकन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता जेव्हा थिएटर्स सुरू होतील, तेव्हा प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे ओढून घेण्याची तंत्रे बदलावी लागतील, याचे भान सर्वच निर्माता-दिग्दर्शकांनी ठेवायला हवे.    

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......