सैतान म्हणून स्वत:भोवतीची अनेक युगांची कवचं काढल्यावर ‘लुसिफर’ला स्वतःच्या खऱ्या रूपाची जाणीव होते. आपला, माणसांचा प्रवासही असाच असतो!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सागर कांबळे
  • ‘लुसिफर’ या मालिकेची पोस्टर्स
  • Mon , 05 July 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र लुसिफर LUCIFER लुसिफर मॉर्निंगस्टार Lucifer Morningstar स्वर्ग Heaven सैतान Devil नरक Hell

लुसिफर म्हणजे सैतान.

‘बायबल’मध्ये लुसिफर हे नावही उच्चारायचं नाही, असं सांगितलंय.

‘जुना करारा’मध्ये लुसिफरविषयी फारच थोडी माहिती आहे. तो मुळात देवदूत होता, पण देवाज्ञा मोडल्यामुळे पतन होऊन सैतान बनला. अ‍ॅडम-इव्हनेही देवाज्ञा मोडून ते (बऱ्या-वाईटाचं ज्ञान देणारे) फळ खाल्लं आणि त्यांचं पतन झालं. एक साप त्यांना ते फळ खाण्यासाठी प्रवृत्त करतो. तोच लुसिफर.

ही गोष्ट तशी सर्वपरिचित आहे. प्रत्येक प्रदेशात, संस्कृतीत असणाऱ्या अशा पुराणकथांचा, पौराणिक सामग्रीचा वापर ललित साहित्य, नाटकं, तात्त्विक लिखाण यामध्ये केला जातो. एरिक फ्रॉमसारख्या मानसशास्त्रज्ञानेही आपल्या सामाजिक मानसशास्त्राविषयीच्या लेखनात ख्रिस्ती/ज्यू पुराणातील गोष्टींचा रूपकात्मक वापर केला आहे. ‘नेटफ्लिक्स’वरील ‘लुसिफर’ (२०१६-२१) या मालिकेमध्येही असाच तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या अंगानं लुसिफर म्हणजेच सैतानाच्या गोष्टीचा वापर केला आहे. ही मालिका खूपच ‘इंटरेस्टिंग’ आहे.

या मध्ये जशा माणसाच्या गोष्टी दाखवल्या आहेत, तशाच पौराणिक वा दैवी पात्रांच्याही. त्या समांतर पद्धतीनं चालू राहतात. लुसिफरचे भाऊ-बहीण, ‘बायबल’मधील पात्रं : अ‍ॅडम-इव्हचा मुलगा केन - जो मानवी इतिहासातला खून करणारा पहिला व्यक्ती आहे. त्याने स्वतःच्या भावाचा खून केला... ‘जादुई वास्तववादा’चा आधार घेत मानवी स्वभाव, आसक्ती, इच्छा यांना नाट्यमय पद्धतीनं मांडण्यात आलं आहे.

पौराणिक कथांचा असा वापर फारच प्रभावी असू शकतो. कारण लोकस्मृतींमध्ये या गोष्टी उतरलेल्या असतात. त्यातील पुराणपण काढून त्यांना आजच्या काळाच्या संदर्भात प्रस्तुत करता येऊ शकतं. असे प्रयत्न आपल्याकडे फार झालेले दिसत नाही. आपण पुराणातल्या गोष्टी आहे तशा किंवा भडक करून वाचत राहतो, दृश्यमाध्यमांतून पाहत राहतो. त्याला छेद देणारं एक उदाहरण म्हणजे विलास सारंग यांच्या काही कथा-कादंबऱ्या. त्यांनी पुराणातली मांडणी (आणि त्याचा आपल्या मनाच्या अबोध पातळीवर असणारा प्रभाव) समोर ठेवून ‘रुद्र’ ही कादंबरी लिहिली आहे. ‘ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक’, ‘एकलव्य’ अशा त्यांच्या काही कथाही उदाहरणं म्हणून सांगता येतील.

आपण खूपदा ‘Inner Demons’ असा शब्द वापरतो. आपल्यात अपराधगंड, राग, मत्सर, न्यूनगंड, स्व-सहानुभूती अशा ज्या ज्या नकारात्मक भावना असतात, त्यांना आपण ‘Inner Demons’ म्हणतो. त्याची मानसिक प्रतिकृती आपण सैतानासारखीच केलेली असते. जशी लुसिफर या ‘शापित देवदूता’ (फॉलन एन्जल)ची केली गेली आहे. लाखो वर्षं नरकात राहिलेला हा सैतान काही दिवस सुट्टीसाठी म्हणून पृथ्वीवर येतो. मात्र सुट्टी संपली तरी तो परत जायचं नाव घेत नाही, इतका तो इथं (Los Angeles मध्ये) रमून जातो. जणू काही इतक्या युगांचा त्याचा एकटेपणा पृथ्वीवर आल्यानं कमी झालाय.

लुसिफरचं प्रेमात पडणं, मानवासारख्या भावनांना सामोरं जायला शिकणं, यासाठी त्याला एक थेरपिस्ट मदत करते. तिच्या पात्रातून मानवी स्वभाव, नैराश्य यांबद्दलच्या गोष्टी पुढे येतात.

या मालिकेत सैतानाला जोडून येणारा नरक (Hell) नेमका काय असतो, हे एकदम चपखल दाखवलं आहे. ‘Hell is nothing but being tortured by your own guilt’ (नरक म्हणजे स्वतःच्या अपराधगंडामुळे होणारा छळ). कथानकात जी माणसं नरकात गेली आहेत, त्यांचा छळ हा अशाच अपराधगंडाच्या आधारावर होतो; तो शिल्लक राहिलेली माणसं नरकात जातात, असंही यात दाखवलं आहे. म्हणजे आपणच आपल्या आयुष्यात नरक तयार करत असतो.

लुसिफर पृथ्वीवर जगणं शिकता शिकता पोलीस विभागामध्ये ‘डिटेक्टिव्ह असिस्टंट’ म्हणून ‘मर्डर मिस्ट्रीज’ सोडवायला मदत करतो. ‘King of Hell’ (नरकाचा राजा) म्हणून त्याच्याकडे अद्भुत ताकद असते, ती म्हणजे लोकांच्या ‘तीव्र इच्छा’ काढून घेणं. वेगवेगळ्या खुनांचा तपास करताना खून करणाऱ्या माणसाच्या दाबलेल्या इच्छा, अंधाऱ्या खोलीतील भावना उलगडल्या जातात.

लुसिफरची स्वतःचीही एक कहाणी आहे. तो बापापासून (God) दुरावलेला, प्रेम न मिळालेला ‘शापित देवदूत’ आहे. मानवी दैनंदिन जीवनातील विविध अनुभव घेताना त्याला अनेक साक्षात्कार होत राहतात, जे तो त्याच्या भूतकाळाला लावून पाहतो. हे साक्षात्कार आपल्यालाही लागू होतात. त्यामुळे बऱ्याचदा ‘विरेचना’(catharsis)चा अनुभव येतो.

मेझ/मॅझिकीन ही एक सैतान असते. तिचा जो प्रवास दाखवला आहे, तो सर्वच साध्या माणसांचा किंवा ‘अधोलोक’ असं ज्याला आपण म्हणतो तिथली गुन्हेगार, जुगारी, खुनी माणसं म्हणतो त्यांचा असतो. ती कोणत्या तरी दबावाखाली भरकटलेली असतात. ज्यांचं समाजानं ‘दानवीकरण’ करून टाकलेलं असतं. ही ओळखच त्यांची ‘आयडेंटिटी’ होऊन बसते.

लुसिफरसोबत पृथ्वीवर आलेली मॅझिकीनही माणसांत मिसळून जाते. मैत्री, लहान मुलांविषयीचा जिव्हाळा अनुभवते. ‘प्रेमा’चाही अनुभव घेते. पण आपण ‘सैतान’ आहोत, आपल्याला ‘आत्मा’ (soul) नाही, असे प्रश्न तिला सतावत राहतात. उगाचच आपण माणसासारखं होऊन बसलो, आत्म्याशिवाय आपण कुणाशी खऱ्या अर्थानं नातं तयार करू शकत नाही, अशी तिची समजूत होऊन बसते. मात्र नंतर ती हळूहळू गळून पडते.

आपल्या मनातले ‘Inner Demons’ही असेच असतात. आपणच त्यांची ‘सैतानी’ प्रतिमा करून ठेवलेली असते. त्यांच्याशी शांतपणे संवाद केला की, आपण ग्रो होत राहतो.

लुसिफर, अ‍ॅमॅनेडील आणि बाकी देवदूतांचं अमर्त्यपण आणि मर्त्य माणूस यांच्यातला फरक  वेगवेगळ्या माध्यमांतून दिसत राहतो. कधी माणूस ‘कमकुवत’ वाटतो, तर कधी सुखी, शहाणा प्राणी. माणसाला मृत्यू येतो, आयुष्य मर्यादित आहे म्हणूनच त्याला अर्थ आहे, हे या मालिकेमधून अधोरेखित होत राहतं. मानवाकडे ‘स्वेच्छा’ आहे की, त्याचं आयुष्य आधीच नियतीनं ठरवलेलं आहे, अशा काही सनातन प्रश्नाला भिडण्याचाही प्रयत्न केलेला आहे.

बऱ्याच गोष्टी ‘सेल्फ अ‍ॅक्च्युअलायजेशन’जवळ येऊन थांबतात. जेव्हा लुसिफर क्लोईच्या प्रेमात पडायला सुरुवात होते, तेव्हा त्याचा सैतानी चेहरा गळून पडतो. ‘आपण काहीतरी वाईट गोष्टी केल्या आहेत’ असं जेव्हा अ‍ॅमॅनेडीलला वाटतं, तेव्हा त्याचे दैवी पंख निघून जातात आणि या अपराधगंडामधून बाहेर पडल्यावर पुन्हा येतात.

लुसिफरची काफ्काच्या ‘मॅटामॉर्फिसिस’मधल्या झुरळ बनलेल्या ग्रेगोरसारखीच अवस्था झालेली असते. कुटुंबापासून, स्वर्गापासून दुरावत दुरावत तो स्वतःपासूनही दुरावतो. त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटतो. माणसांशी जोडून घेणं, उत्कट प्रेमाचा अनुभव घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला भेटलेली थेरपिस्ट... यामुळे तो आपल्या सैतानी रूपाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत राहतो.

लुसिफरचं पूर्ण नाव आहे - लुसिफर मॉर्निंगस्टार. प्रकाश घेऊन येणारा. सैतान म्हणून अनेक युगांची कवचं त्याच्याभोवती तयार झालेली असतात, ती काढल्यावर स्वतःच्या या खऱ्या रूपाची त्याला जाणीव होते. आपला, माणसांचा प्रवासही असाच असतो!

..................................................................................................................................................................

लेखक सागर कांबळे पुण्याच्या स. प. महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राचे अध्यापन करतात.

sakamble299@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख