सॅम्यूएल बेकेटच्या शैलीमध्ये एकाच वेळी कल्पित गूढाच्या पलीकडची वास्तवाची जाणीव आणि माणसाच्या आयुष्याचा फोलपणा दाखवण्याचे कसब आहे!
कला-संस्कृती - नाटकबिटक
 अपर्णा महाजन
  • सॅम्यूएल बेकेट यांच्या ‘एण्ड गेम’ या नाटकाची दोन पोस्टर्स
  • Mon , 28 June 2021
  • कला-संस्कृती नाटकबिटक सॅम्यूएल बेकेट Samuel Beckett वेटिंग फॉर गोडो Waiting for Godot Endgame एण्ड गेम

साल १९८०. एम.ए. (इंग्लिश)ला असताना सॅम्यूएल बेकेटचे एक नाटक अभ्यासाला होते. डॉ. सिन्हा आम्हाला ‘नाटक’ हा विषय शिकवत होते. एके दिवशी विभागातल्या फिरत्या सूचना फलकावर ‘बालगंधर्व रंगमंदिरा’त सॅम्युएल बेकेटची नाटके लागली आहेत आणि ती नसिरुद्दीन शहा सादर करणार आहेत. आपल्या विभागातील सर्वांनी जायचे आहे, अशा आशयाची सूचना लागली होती. नेहमीचे तास नाहीत, त्याऐवजी आम्ही बेकेटची नाटके बघायला जाणार, या कल्पनेने विलक्षण मोहरून गेलो.

पहिलेच नाटक होते- ‘वेटिंग फॉर गोडो’. हे दोन अंकी नाटक. खरे तर एकाच अंकाची पुनरावृत्ती वाटावी, असे. फक्त पहिल्या नाटकातले तीन पाने असलेले झाड दुसऱ्या अंकात निष्पर्ण होते, एवढाच काय तो फरक. त्यातील वरकरणी वाटणारी अर्थहीनता, एका पातळीवरचा सारखेपणा, टिंबा-टिंबाची भाषा, मौन, अर्धवट तोडलेली वाक्ये, शब्दांची-वाक्यांची पुनरुक्ती, या सगळ्यांमधून जाणवले ते शब्दांच्या पोकळ्यात दडलेले अर्थगर्भ संदर्भ. नंतर सगळी नाटके बघून झाल्यावर आम्हा सर्वांच्या मनाची अवस्था नाटक बघायला जाण्यापूर्वी असलेल्या उतावळेपणापेक्षा खूपच वेगळी होती.

मग बेकेट वाचायचा छंदच लागला. कोडे सुटावे आणि आनंद व्हावा, तसे त्या नाटकातले न दिसणारे अर्थ सापडले की वाटे. अशा नाटकांपैकी एक ‘एंड गेम’.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

महायुद्धानंतर बदललेल्या भवतालात माणूस खचून, नैराश्याने पोखरला गेला होता. त्या मानसिकतेचे नाट्यीकरण बेकेटने या नाटकातून सादर केले आहे. यात घडणाऱ्या घटनांचा कालावधी आहे फक्त एक दिवसाचा. (पण त्यातून मानसिकदृष्ट्या बाहेर पडायला लागणारा कालावधी मोजणे कठीणच.) त्यातील प्रत्येक पात्र, संभाषण, कृती, कृतिशून्यता ही माणसाच्या आयुष्यातला अर्थ (की निरर्थकता?) समजावून सांगते. किरकोळ साहित्यानिशी उभारलेला हा सेट. आपल्या सभोवतालच्या माणसांपेक्षा वेगळी भासणारी पात्रे ‘बिचाऱ्या’ वाटाव्या अशा जन्म-मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या माणसाच्या आयुष्याची प्रतीके आहेत. दिसणारी, न दिसणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या आयुष्यात महत्त्वाची आहे, असे वाटायला लावणारी आणि त्यावर विचार करायला भाग पाडणारी.

या नाटकात फक्त चार पात्रे आहेत. प्रत्येकाला आयुष्यातल्या वेगवेगळ्या सापळ्यातून बाहेर पडायचे  आहे. विविध साखळ्यांनी अडकून राहिलेली ही पात्रे एका गाफील क्षणी आपणच आहोत असे वाटू लागते. किती वेगवेगळ्या साखळ्या! मालक-नोकर, मुलगा-वडील नाते, एखाद्या कचराकुंडीत असावेत असे राहिलेले नवरा-बायको आणि त्यांच्यातली लैंगिकता, पुनरुत्पादन. आयुष्य नावाच्या काल्पनिक जगाला बांधून घेतलेले प्रत्येकाचे स्वतंत्र आयुष्य आणि तरी एकमेकांना सोडू न शकणारे वास्तव. असहाय्य अस्वस्थेत अजूनही आशेचा किरण शोधणारा माणूस. मानवी मनाच्या आत चाललेली खळबळ या नाटकात दिसते. हे नाटक आहे की, सत्याचा तुकडा?

आल्बेर कामू या फ्रेंच लेखक आणि तत्त्ववेत्त्याने लिहिलेल्या ‘सिसिफसची दंतकथा’ (myth of Sisyphus) या निबंधातून मानवी आयुष्य हे हेतूहीन, अर्थहीन आणि निरर्थक आहे, या विचाराची ओळख झाली. याच संकल्पनेतून ‘थिएटर ऑफ अब्सर्ड’ जन्माला आले. या नाटकाची मांडणी इतर पारंपरिक नाटकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यात अनेक प्रतिमा, प्रतीके आणि त्यांच्यातले वरकरणी दिसणारे अतार्किक अर्थ हे विशेष आहेत.

उदाहरणार्थ, ‘वेटिंग फोर गोडो’ हे नाटक बघून झाल्यावर जर प्रेक्षकाला विचारले, ‘कसे होते नाटक?’ तर त्यावर हमखास उत्तर येईल, ‘त्यात काहीही घडत नाही. कोणीही येत नाही आणि कोणीही जात नाही.’ मग या नाटकात खिळवून ठेवणारे असे काय आहे? गोडो म्हणजे कोण? ते दोन वाटसरू गोडोची वाट का बघतायत? हा कोणी देवसदृश आहे का? गोडो नामक कोणीतरी येऊन आपलं नशीब बदलेल म्हणून कृतिशून्यतेने वेळ घालवणारे, पाय-अंग सुजेपर्यंत एका जागी बसून राहणारे, वैतागलेले, निराश झालेले, आळशी, विचारहीन माणसांचे प्रतिनिधित्व करणारे हे वाटसरू. हे वाट बघणे न संपणारे आहे.

‘एंड गेम’ हे नाटकही असेच मानवी जीवनाचे वैफल्य दाखवणारे आहे. याची सुरुवात आणि शेवट एका विशिष्ट पद्धतीने जोडलेले आहेत. आयुष्य जणू बुद्धीबळाचा पट आहे. यातलं हॅम नावाचं पात्रं म्हणतं – ‘आता माझी खेळी!’ शेवटही असाच. यामध्ये जे घडते, त्यातून या ‘आता माझी खेळी!’ या वरकरणी एकच वाटणाऱ्या, सारख्या दिसणाऱ्या वाक्यातला फरक लक्षात येतो, हे नाटककाराचे वैशिष्ट्य. नाटकाची सुरुवात होते- ‘संपले, ते सारे संपलेय, जवळजवळ संपलेय!’ या शब्दांनी. याला येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा संदर्भ आहे. इथूनच अधाहृत अर्थ जाणवायला सुरुवात होते. या नाटकात ‘संपलंय’ हा शब्द अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी आलेला दिसतो. त्याचे संदर्भ वेगवेगळे, पण सूत्र एकच आहे.  

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या नाटकात फक्त चार पात्रे आहेत- हॅम, क्लोव्ह, नॅग आणि नेल. हॅम घराचा मालक. तो चाकाच्या खुर्चीवर बसलेला आणि आंधळा. क्लोव, त्याचा इमानदार एकमेव सेवक. त्याला बसता येत नाही म्हणून सतत उभा. मालक सतत काही ना काही मागतोय आणि विनातक्रार क्लोव त्याला तो मागेल ते देतोय. न कंटाळता, न कुरकुर करता. इतर दोघे, म्हणजे हॅमचे आई-वडील. त्यांना चक्क वरून पांढरी चादर टाकलेल्या कचराकुंडीमध्ये ठेवले आहे. तिथून ते बाहेर पडू शकत नाहीत. असे हे चौघेजण एका खोलीत राहात आहेत. त्या खोलीला वाजवीपेक्षा उंच अशा दोन भिंती आहेत. उंचावर एक खिडकी आहे. तिथून पाहायला शिडी लागते आणि त्यावर चढू शकणारा एकटा क्लोवच असतो. त्या खिडकीतून एका लांब दुर्बिणीतून तो बाहेरचे जग बघतो आणि जे दिसते आहे, जे काहीच आशादायक दिसत नाही, हे तो हॅमला सांगतो. हॅम ही विषण्ण करणारी हकिकत ऐकतो, पण त्याच्या भौतिक विश्वातून त्याचे मन बाहेर पडत नाही. त्याच्या गरजा वाढतच राहतात. त्या पुऱ्या होत नाहीयत; मग त्याचा राग तो क्लोववर काढतो.

नाटक जसेजसे पुढे सरकते, तसे आपल्याला समजते की, यातली पात्रे जणू एका जागी खिळून गेली आहेत. प्रत्येकाला काही करायचे आहे, पण ते करण्यास ते जणू असमर्थ आहेत. जणू प्रत्येकाचे आयुष्य एक अंधारकोठडी बनून राहिलीय आणि सगळे त्यातून बाहेर पडण्याची धडपड करत आहेत, पण शेवटी ते आहेत तिथेच राहतात. काही घडत नाही, काही पुढे सरकत नाही. क्लोव बाहेर बघून त्या सगळ्यांना बाहेरच्या जगाची दिसेल, तेवढी माहिती देतो, पण कुणालाच बाहेरचे जग दिसत नाही. कानावर पडलेल्या माहितीला खरे समजण्यापलीकडे त्यांना दुसरा पर्याय नाही.

अशाही परिस्थितीमध्ये प्रत्येकाला कसली ना कसली अपेक्षा आहे, काहीतरी पाहिजे आहे. क्लोवला स्थिरता आणि शांतता पाहिजे, पण ती पूर्णपणे संपलेली आहे. मृत्यूपेक्षा भयानक अशी ही अवस्था आहे. त्याचे घड्याळ कोणतीच वेळ दाखवत नाही. त्यात शून्य आकडा आहे, पण म्हणून काळ थांबला आहे का? मुळीच नाही, तो तर अव्याहत पुढे चालला आहे. न कळतपणे सगळ्यांना कळून चुकले आहे  की, मृत्यु हेच या सगळ्याचे उत्तर आहे. सगळे त्या मृत्यूला घाबरतही आहेत आणि त्याची वाटही पाहत आहेत. जणू एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखे त्यांचे आयुष्य सुरू आहे. नाटकातली पात्रे आणि बुद्धिबळाचा खेळ यातले विलक्षण साधर्म्य बघताना आपण आपल्या आयुष्याकडे बघायला लागतो आणि चाकोरीबाहेरच्या जगाच्या वेगळ्या आयामाची जाणीव होते.

हॅम जणू त्यांचा राजा. विश्वाचा संहार झालेला असताना त्याच्याकडे असलेल्या भौतिक सामर्थ्यामुळे उरलेला शेवटचा मानव. त्यालाही जाणीव आहे की, त्याच्या खेळी चुकत आहेत आणि त्या सुधारण्याच्या पलीकडे गेल्या आहेत. तो काहीच करू शकत नाही. तो जे अटळ आहे ते पुढे ढकलण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात आहे. पण त्याला कळून चुकले आहे की, ते ‘अटळ’ जवळ येऊ लागले आहे आणि परिस्थिती त्याच्या हाताबाहेर चालली आहे. जणू काही तो त्याचा शेवटचा खेळ आहे- ‘एंड गेम’.

सगळ्यांची पूर्ण वाक्यात बोलण्याची इच्छा नष्ट झालीय. बोलण्यासारखे शिल्लकच काय आहे? त्यामुळे त्यांच्या मोडक्या संवादातून जाणवते की, आजुबाजूला जग म्हणून काहीच शिल्लक राहिलेले नाही. सगळे संपले आहे आणि जे शिल्लक आहे, ते संपत चालले आहे. पैशाच्या जोरावर हॅमकडे निदान वाळलेला ब्रेड का होईना, पण अजून आहे चघळायला. औषधाच्या गोळ्या संपत आल्या आहेत आणि आता त्या मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे. पण अजूनही ते चौघे तग धरून आहेत. असे ‘असणे’ त्यांना खरेच  पाहिजे का? याला आयुष्य म्हणावे का?

एकदाचा आयुष्य नामक खेळ संपवावा, मरणाने आपल्याला जवळ घ्यावे आणि हे भयावह आयुष्य संपावे, अशी हॅम मनापासून प्रार्थना करत आहे. पण इथेही त्याचे वाट बघणे सुरूच राहते, ‘वेटिंग फॉर गोडो’मधल्याप्रमाणे. कोणी येत नाही की जात नाही. काहीही घडत नाही. खेळ सुरूच राहतो. क्लोवलासुद्धा इथून बाहेर पडायचे आहे. त्याला एकट्याला बाहेरचा रस्ता दिसतोय, पण तो यांना सोडू शकत नाही. आई-वडील तर कोंडलेल्या अवस्थेत बंदिस्त आहेत. त्यांच्यावरची चादर काढून टाकली की, त्यांना वाटते सकाळ झाली, चादर पांघरली की वाटते रात्र. यापलीकडे त्यांना आयुष्य नाही. तरीदेखील शेजारीशेजारी असलेल्या त्या बंदिस्त कुंडीतून त्यांच्यातलं लैंगिक आकर्षण अजून जागृत आहे. घरातले अन्न संपत आले आहे. वाळलेल्या ब्रेडचा तुकडा किंवा वाळलेले गाजर त्यांना चघळायला क्लोव देतो आणि खायला मिळाले या समाधानात ते चघळत बसतात. कुणालाच एकमेकांबरोबर राहायची इच्छा नाही. सगळे एकमेकांना कंटाळले आहेत. या निराश आयुष्याला वैतागले आहेत, पण यातून त्यांची सुटका नाही. आपल्याही मनात प्रश्न घोंघावत राहतो, का नाही सोडू शकत ते एकमेकांना? कुठल्या अनामिक साखळीने त्यांना इतके घट्ट बांधून ठेवलेय? हे मानवी जीवनाचे वास्तव, भयावह चित्र अर्थात माणसाच्या आयुष्याचा पट…

माणसाने बाऊ करून ठेवलेल्या धर्म या संकल्पनेलासुद्धा बेकेटने एक प्रतीक म्हणून वापरले आहे. धर्मावर असलेला आंधळा विश्वास. या आंधळेपणाचे आपण सवयीने गुलाम झालेलो आहोत. विचार करण्याची क्षमता नाहीशी होत चाललीय. या अशा नापीक काळात ते प्रार्थना करतात. ती करून झाल्यावर त्यांना त्यातला फोलपणाही जाणवतो. ईश्वर नाही याची जाणीव होते, खात्री पटते, पण दुसऱ्या दिवशी सवयीप्रमाणे त्यांचे प्रार्थना करणे चालूच राहते. काळाच्या बंधनात अडकलेले हे बिचारे जीव एक दिवस ठरवतात- नाहीच करायची प्रार्थना! हॅम तर परमेश्वराला शिव्या देतो, ‘बास्टर्ड’ म्हणतो. पण जर प्रार्थना नाही केली, तर आहे ते आयुष्य त्यांना पोकळ वाटू लागते. या वेळेचे काय करायचे सुचेनासे होते, चुकल्यासारखे वाटू लागते आणि मग ते पुन्हा प्रार्थनेकडे वळतात. कोणी कुणाचे सांत्वन करू शकत नाही. ही माणसाची माणूसपणापासून दूर जाण्याची भावना कवटीच्या प्रतीकातून ठसठशीतपणे व्यक्त होते. समीप असलेला मृत्यू, त्याच्याबद्दल वाटणारे आकर्षण आणि भय, जीवन नीरस करून टाकतो. कोणाशी संवाद करावासा वाटत नाही. केलाच तर तो ‘एका शब्दांत उत्तरे द्या’ धर्तीवर. संवादाची धुगधुगी वाटेनाशी झाली आहे. या एकाक्षरातून दार्शनिक आणि गर्भित अर्थातून शेवट, संपणे या अर्थाच्या विविध छटा विस्मयकारकपणे जाणवतात.

माणसाच्या आयुष्यातल्या अनेक नातेसंबंधांची दुर्दशा होऊ नये म्हणून केलेला आणि तरी फसलेला प्रयत्न हे भयावहपणे समोर येते. या नाटकामध्ये वडील-मुलगा या नात्यातले अपयश विविध पातळ्यांवर दिसते. हॅम-नॅग, हॅम-क्लोव आणि माणूस-देव. सगळे वडीलधारी आपल्या पुत्रवत व्यक्तीकडे, त्याच्या सुखदु:खांकडे काणाडोळा करतात. मुलाच्या भूमिकेतला हॅम, क्लोव आणि माणूस वडिलांवर सूड उगवायचा म्हणून त्यांचा छळ आरंभतो, पण परत सगळे एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात!

हॅम-क्लोव यांचा एक संवाद आहे-

हॅम : कशाला राहतोस रे तू माझ्याबरोबर?       

क्लोव : तू कशाला ठेवतोस मला?

हॅम : मला दुसरे  कोणी नाहीय, क्लोव. दुसरे ठिकाण पण नाहीय.

यातला एक आंधळा, दुसरा बहिरा. कदाचित एकच पण दुभंगलेले व्यक्तिमत्त्व. जी माणसांची दशा, तीच भवतालाची. रुक्ष, रखरखीत जमीन, सर्वत्र दुष्काळाचे साम्राज्य, समुद्राच्या लाटाही स्थिरावलेल्या, म्हणायला लाटा, पण प्रत्यक्षात त्या जणू नाहीतच, आणि प्रकाश बुडून गेलेला. मनात, बाहेर सगळीकडे अंध:कार. हॅमजवळच्या वेदनाशामक गोळ्या संपल्या आहेत. मनुका, बेदाण्या यांसारख्या गोड चवीच्या गोष्टी संपल्या आहेत. त्याच्याकडे पैसे आहेत, पण या गोष्टी विकत मिळण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. त्यांना जगायचे आहे का, हे ठरवणेसुद्धा त्यांच्या हातात नाही. या अशा जगात, अशा रीतीने जिवंत राहावेच लागणार… मृत्यू येईपर्यंत... नाईलाजाने… एवढेच ‘अटळ’ आहे!

अशी विषण्ण करणारी परिस्थिती बेकेट नाटकातून उभी करतो आणि अगदी शेवटी पुन्हा मनातली विझायला टेकलेली ज्योत आशेने फडफडते. क्लोव दुर्बिणीतून बघून सांगतो- ‘त्या टेकडीच्या पलीकडे कदाचित हिरवळ असावी.’

या नाटकातले प्रत्येक प्रतीक अमूर्त आणि गुंतागुंतीचे आहे. एकदा ते पारंपरिक वाटते, पण असे वाटेपर्यंत ती पारंपरिक वीण उसवली जाते. वास्तव आणि प्रतीकात्मक या दोन बिंदूंमध्ये लंबक दोलायमान होत राहतो. दिसणाऱ्या प्रतीकांच्या, अमूर्ताच्या किंवा कल्पित गूढाच्या पलीकडची वास्तवाची जाणीव आणि त्याचबरोबर माणसाच्या आयुष्याचा फोलपणा एकाच वेळी दाखवण्याचे कसब बेकेटच्या शैलीमध्ये आहे. नाटकाचे नावच पहा- ‘एंड गेम’. वाचता क्षणी बुद्धिबळाची आठवण होते.

ज्याला चालता येत नाही, समोरचे दिसत नाही, असा हॅम या खेळातला राजा. क्लोव एक प्यादे आणि हॅमचे आई-वडील कडेचे दोन हत्ती. कोणाच्याच खेळीत कोणतीच निश्चिती आढळत नाही. लोवली नावाचा एक समीक्षक आपल्या समीक्षणात लिहितो- ‘‘या नाटकातला प्रत्येक जण काही ना काही मुद्दा मांडतो. त्या पाठीमागचा हेतू सांगतो पण तो सांगताना, मांडतानाच ही पात्रे कोलमडून पडतात. या खेळात जिंकत कोणीच नाही. मग ‘विनिंग पॉइंट’, ‘जिंकण्याचा क्षण’ कोणता? नाहीच. कोणताच नाही. अशा तऱ्हेने, या नावापासून स्पष्टपणे, ठळकपणे जाणवते ती माणसाच्या आयुष्याच्या अनिश्चिततेची ग्वाही. जगण्याची, स्वप्न साकार करण्याची, स्वप्न बघण्याची, आशेची, निराशेची, आकांक्षेची अनिश्चितता.”

कदाचित बेकेटला असे सांगायचे असेल की, मानवी जीवन हा न संपणारा, दिशाहीन अभिनय आहे. आपण गृहीत धरून चालतो की, आपल्याला काही अडचणी नाहीत. असतील त्या मोकळेपणाने न बोलण्याकडेच आणि आपले सगळे आयुष्य कसे छान आहे, असे दाखवण्याचा सगळ्यांचा कल. कारण त्या तसे नसण्याच्या सत्याला भिडणे सोपी गोष्ट नसतेच. मनातूनच हादरून गेल्यामुळे त्यापासून होता होईल तेवढे पलायन करणे, एवढेच शक्य वाटू लागते. हा पलायनवाद या नाटकातल्या खेळातून आणि त्यांच्या मूर्खासारख्या वाटणाऱ्या प्रतिसाद-प्रतिक्रियांतून व्यक्त होतो. जसजशी ही पात्रे मोकळी होण्याचा, सुटायचा प्रयत्न करताना दिसतात, तितकी ती पाशात अडकतात.

हॅम मन रमवण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या तीन पायांच्या कुत्र्याच्या खेळण्याशी खेळतो. क्लोव उंच शिडीबरोबर करामती करतो. लांब दुर्बीण त्याला थोडा वेळ वेगळ्या जगात घेऊन जाते. पण हे सारे आनंद  क्षणकालच टिकणारे. पुन्हा आहेच ते निरर्थक, खिन्न जग. याच कारणाने, सत्याला भिडू शकत नसल्याने हॅमचे आई-वडील स्वप्नरंजनात रमलेले. त्या पांघरूण घातलेल्या कोठडीतून जुन्या गोष्टी आठवत, भूतकाळातल्या अवशेषांवर एकमेकांशी ते बोलत राहतात... असा हा भयावह ‘खेळ’ सुरू आहे सगळ्यांचा, मनाविरुद्ध.

ही माणसे नकोत, हे आयुष्य नको, इथून पळून जावे, असे अतीव तीव्रतेने मनात येते, पण ते करण्याची धमक सगळे गमावून बसलेत. कसा असणार आहे या खेळाचा शेवट? अशा रुक्ष, मेलेल्या भवतालातून शेवटच्या दिवशी क्लोव सांगतो- ‘मला एक लहान बाळ रांगत येताना दिसते आहे.’ कदाचित हे बाळ जगाची पुन्हा निर्मिती करेल? कोण आहे ते बाळ? कुठून आले? क्लोव खरे सांगतो आहे का? याला तार्किकदृष्ट्या एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे- न संपलेली आशा!

वैफल्यग्रस्त क्लोव हॅमला विचारतो- ‘इथे राहण्यासारखं काय आहे मला?’ त्यावर तो शांतपणे एकाक्षरी उत्तर देतो- ‘संभाषण’. हॅमचे आई-वडील भुकेने तडफडून मरतात. हॅम आणि क्लोव एकमेकांपासून दूर जायचे ठरवतात; जणू हॅम त्याला मुक्त करतो आणि बुद्धिबळाचा खेळ संपतो, ‘एंड गेम’. हॅम म्हणतो- ‘आता माझी खेळी!’ सुरुवातीला आणि शेवटी हेच वाक्य.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सगळा विस्कटलेला खेळ. बुद्धिबळातले सगळे सैन्य, प्यादी, घोडे, हत्ती मरून गेलेत. पैशाने सर्वांत श्रीमंत असलेला हा राजा तडफडतोय या पराजयातून वाचण्यासाठी. बुद्धिबळातल्या राजाला एकच घर इकडे-तिकडे जाण्याची मुभा असते. हॅमची हालचाल अशीच मर्यादित आहे, त्याच्या चाकांच्या खुर्चीपुरती. त्याचे जिवंत असणे, पाहणे, हे त्याचा मृत्यू बघण्यासारखेच आहे. मृत्यूकडे जाणारी गती फार क्लेशदायक आहे. ज्या खिन्नतेने नाटकाची सुरुवात झाली, ती अवस्था आणि कुटुंबातले मृत्यू, नात्यांची ताटातूट अशी हळूहळू वाढत चाललेली भयावहता, त्याची झळही सहजरीत्या पेलवत नाही.

ही सारी मानवी आयुष्याची अल्पाकृती वाटते. क्लोव खिडकीतून पाहत जग शून्यवत झाले आहे आणि सगळीकडे मृत्यू पसरला आहे, असे सांगतो, हे ऐकणे, वाचणे मानवी यातनेचा कहर वाटतो. हा खेळ त्या पात्रांपुरता, त्या नाटकापुरता मर्यादित नाही. जगातल्या प्रत्येकाला तो लागू आहे. नाटकातल्या साऱ्या खेळी आपल्या आयुष्याच्या घटनांचे प्रतिनिधित्व करतात.  

आंधळा असल्यामुळे हॅमला वाटते आहे की, क्लोव घर सोडून गेलाय. पण आपल्याला दिसते की, क्लोव न बोलता दारात उभा आहे. कुठेही न जाता. हे बंधन कुठले? प्रेमाचे, कर्तव्याचे  की असहाय्यतेचे?

नाटक चालू राहतेय जणू पहिल्यासारखेच, आणि मानवी आयुष्यही…

..................................................................................................................................................................

अपर्णा महाजन

aparnavm@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख