ज्या कलावंतांनी स्वबळावर उत्तर-पूर्व प्रदेशातील सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून दिलंय, त्यात रीमा दासला अग्रक्रम द्यावा लागेल
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संतोष पाठारे 
  • प्रथा, बुलबुल कॅन सिंग, आंतरदृष्टी, व्हिलेज रॉकस्टार्स या सिनेमांची पोस्टर्स आणि रीमा दास
  • Sat , 26 June 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र रीमा दास Rima Das प्रथा Pratha बुलबुल कॅन सिंग Bulbul Can Sing आंतरदृष्टी Antardrishti व्हिलेज रॉकस्टार्स Village Rockstars

भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा सहावा लेख...

..................................................................................................................................................................

उत्तर-पूर्व प्रदेशातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्किम ही राज्यं पश्चिम बंगालच्या लगत असली तरीही तिथल्यासारखा चित्रपट-संस्कृतीचा प्रसार या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणवर होऊ शकलेला नाही. आसाममध्ये पहिला चित्रपट १९३५मध्ये निर्माण  होऊनसुद्धा तिथल्या राजकीय अस्थिरतेचा परिणाम चित्रपटनिर्मितीवर थेटपणे झालेला दिसून येतो. सांस्कृतिक संवर्धनाबाबतची सरकारी अनास्था आणि चित्रपटासारख्या खर्चिक कलेला मिळालेलं अपुरं आर्थिक पाठबळ, यांमुळे या राज्यातील चित्रपटनिर्मितीला फारशी चालना मिळू शकलेली नाही. भूपेन हजारिका, जानू बरुआ, सीमा बिस्वास यांसारखे अव्वल दर्जाचे कलावंत देणाऱ्या या भूमीत खरं तर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुयोग्य अशी निसर्गरम्य ठिकाणं आहेत. पण त्यांचाही उपयोग प्रादेशिक किंवा हिंदी चित्रपटसृष्टीनं करून घेतलेला नाही.

अशा या प्रतिकूल वातावरणात ज्या कलावंतांनी स्वबळावर उत्तर-पूर्व प्रदेशातील सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून दिलंय, त्या समकालीन कलावंतांमध्ये रीमा दासला अग्रक्रम द्यावा लागेल.

वडील शिक्षक असल्यामुळे रीमाच्या घरात अभ्यासाचं वातावरण होतं. पण सिनेमाला त्यांच्या घरात थारा नव्हता. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे अभिनयाची आवड निर्माण झालेली रीमा नाटकांत काम करण्याच्या ओढीनं मुंबईत आली, इथल्या काही नाटकप्रेमी ग्रूपमध्ये सहभागी झाली. तिने प्रेमचंदलिखित ‘गोदान’ या नाटकामध्ये भूमिका केली. मात्र सदोष हिंदी उच्चार आणि स्थिर होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, यामुळे तिला लवकरच मुंबईला रामराम ठोकावा लागला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मात्र मुंबईच्या वास्तव्यात जागतिक चित्रपट पाहून या कलेबद्दल निर्माण झालेलं आकर्षण तिला स्वस्थ बसू देईना. मग तिने चित्रपट पाहून, पुस्तकं वाचून निर्मितीचं तंत्र शिकायला सुरुवात केली. यातूनच तिच्या पहिल्या ‘प्रथा’ या लघुपटाची निर्मिती झाली. त्याला मिळालेला प्रतिसाद तिचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला.

लघुपटानंतर पुढची पायरी होती पूर्ण लांबीचा चित्रपट! त्यासाठी लागणारं भांडवल, तंत्रज्ञाची टीम यांची वानवा होतीच. मग तिने यातील बऱ्याच तांत्रिक बाबी स्वतःच हाताळायचं ठरवलं. तिचा उत्साह पाहून अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या बिष्णू खरघोरिया या बुजुर्ग अभिनेत्यानं तिच्या चित्रपटात काम करण्याचं मान्य केलं.

आणि मग ‘आंतरदृष्टी’ अर्थात ‘ए मॅन विथ द बायानॉक्युलर’ या रीमाच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची निर्मिती झाली. मुंबईतील ‘मामी’ महोत्सवात हा चित्रपट ‘इंडिया स्टोरी’ विभागात दाखवण्यात आला. रीमाला एक संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून या चित्रपटानं ओळख मिळवून दिली.

‘ए मॅन विथ द बायानॉक्युलर’ ही गोष्ट आहे आसाममधील ग्रामीण भागात भूगोल शिकवणाऱ्या चौधरी (बिष्णू खरघोरिया) या शिक्षकाची. ते निवृत्तीचं निवांत आयुष्य जगत असतात. तरुणपणी जगभर फिरण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चौधरींना सोबत असते ती त्यांच्या सायकलीची. तिच्यावरून त्यांनी बरीच मुशाफिरी केलेली असते. त्यांच्या या शांत जीवनात तरंग उठतात, ते त्यांच्या तरुण मुलानं भेट  दिलेल्या दुर्बिणीनं. त्यातून ते जगाकडे नवीन दृष्टीनं पाहू लागतात. त्यांचा दृष्टीकोन बदलवून टाकण्यास ही दुर्बीण कारणीभूत ठरते.

बिष्णू खरघोरिया यांचा संयत अभिनय आणि चित्रपटभर रीमानं टिपलेली शांतता, यामुळे हा चित्रपट वेगळाच परिणाम साधतो. एखादा प्रसंग उठावदार करण्यासाठी पार्श्वसंगीताऐवजी रीमा शांततेचा वापर करते. त्या प्रसंगातील वातावरणाचे ध्वनी वापरून चित्रपटाचं वास्तववादी रूप अधिक ठळक होत जातं.

रीमानं या तंत्राचा वापर ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ आणि ‘बुलबुल कॅन सिंग’ या पुढील दोन चित्रपटांमध्ये अधिक प्रभावीपणे केलेला दिसून येतो.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘व्हिलेज रॉकस्टार्स’चं पहिलं प्रदर्शन टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालं. त्यानंतर ‘मामी’ महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठ मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आणि भारतातर्फे ऑस्करसाठी केली गेलेली निवड, यामुळे ‘व्हिलेज रॉकस्टार्स’बद्दल सामान्य प्रेक्षकांचं कुतूहल वाढीला लागलं. ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ हा पहिलाच आसामी चित्रपट, ज्याला भारताकडून ऑस्करसाठी नामांकन मिळालं. ज्याप्रमाणे सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’वर भारतातील ग्रामीण भागातील दारिद्रय दाखवणारा चित्रपट म्हणून टीका झाली होती, तशाच प्रकारची टीका ‘व्हिलेज रॉकस्टार’वर काही समीक्षकांनी केली. तो ऑस्करसाठी निवडला गेला, याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

मात्र ‘व्हिलेज रॉकस्टार्स’मुळे भारतीय प्रेक्षकांचं लक्ष आसामी चित्रपटसृष्टीकडे वेधलं गेलं. नववास्तववादी शैलीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून त्याची नोंद झाली. ‘माझ्या आसपास जे घडत असतं, माझ्या राज्यातील लोक ज्या पद्धतीचं जीवन जगतात, तेच मी माझ्या चित्रपटात दाखवते’ असं रीमा सांगते.

तिच्या चित्रपटात नाट्यमयता नाही. चित्रपट म्हणजे ‘लार्जर दन लाईफ मनोरंजन’ अशी समजूत असणाऱ्या प्रेक्षकांसाठी रीमाचे चित्रपट नाहीत. तिच्या व्यक्तिरेखा आसाममधील ग्रामीण भागात  जगण्याचा संघर्ष करणाऱ्या, त्यांच्या  वाट्याला आलेल्या आयुष्यात छोटी छोटी स्वप्नं पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या आहेत. त्या कधी यशस्वी होतात, कधी अपयशी, पण  त्यांच्यातली विजिगीषु वृत्ती कायम राहते.

‘व्हिलेज रॉकस्टार्स’मधील धुनू (वनिता दास) ही शाळेत शिकणारी एक अल्लड मुलगी. मुलींपेक्षा सवंगडी मुलांमध्ये धुनू अधिक रमते. तिची विधवा आई (बसंती दास) कष्ट करून आपल्या दोन मुलांचं पालनपोषण करत असते. शाळेत जाताना रस्त्यात दंगा करणं, बकरी चरायला नेणं, सरसर झाडावर चढून सुपाऱ्या काढणं, पावसात मनसोक्त भिजणं, असले उद्योग धुनू करत असते. आई धुनूला वेळोवेळी कष्टाची जाणीव करून देत असते. तिला पोहायला शिकवते, कारण त्यांच्या गावाला दर पावसात पुराचा धोका असतो. याच पुरात धुनूचे वडील कधी काळी वाहून गेलेले असतात.

धुनू एकेदिवशी बाजाराच्या गावी तरुणांचं बँडपथक पाहते. आपल्याकडेही त्यांच्यासारखी एक गिटार असावी, असं तिला वाटतं. ती आपल्या सवंगड्यांबरोबर एक लुटुपुटुचं बँडपथक सुरू करते. सुरुवातीला ती थर्माकोलची गिटार तयार करते, नंतर मात्र खरीखुरी गिटार खरेदी करण्याचं ती ठरवते. धुनूचं गिटार घेऊन रॉकस्टार होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येतं का, याचं उत्तर देणारा ‘व्हिलेज रॉकस्टार’ धुनू आणि तिच्या आईच्या रोजच्या कष्टमय जीवनाचं चित्रण करता करता ग्रामीण भागातील लोकांच्या जगण्याचं सहज-सुलभ दर्शन घडवतो.

शाळेत जाण्यासाठी धुनू आणि तिच्या मित्रांना करावी लागणारी पायपीट, पुराचं पाणी घरात शिरल्यानंतर तिच्या कुटुंबानं त्या संकटाशी केलेला सामना आणि तिला मासिक पाळी आल्यानंतर आईनं साजरा केलेला सोहळा, अशा रोजच्या आयुष्याचं चित्रण करत हा चित्रपट आपलं वास्तव स्वरूप कायम ठेवतो.

रीमाने हीच शैली ‘बुलबुल कॅन सिंग’ या आपल्या पुढच्या चित्रपटातही वापरली आहे.

छायगाव तालुक्यातील कलारदिया गावात राहणाऱ्या बुलबुल (अर्नाली दास), बोनी (बनिता ठकुरिया) आणि सुमु (मनोरंजन दास) या तीन पौगंडावस्थेतील मुलांच्या आयुष्याची ही गोष्ट. मूल वयात येताना त्याला होणाऱ्या लैंगिक जाणिवा आणि समाजाचा त्याकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टीकोन याचा वेध रीमाने या चित्रपटात घेतलाय. ‘व्हिलेज रॉकस्टार्स’मध्ये धुनू आणि तिच्या मित्रांच्या बालपणाचं निरागस चित्रण केल्यानंतर ‘बुलबुल कॅन सिंग’मध्ये तिने सजाण बुलबुलला तिच्या मित्रांबद्दल वाटणारं शारीरिक आकर्षण आणि त्यातून निर्माण झालेला तिढा संयतपणे मांडला आहे.

बुलबुल ही कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातली मुलगी. ती आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सुमु आणि बोनी समोर व्यक्त करते. सुमुला त्याचे मित्र त्याच्या बायकीपणाबद्दल सतत छेडत असतात. यामुळेच तो बुलबुल आणि बोनी यांच्या संगतीत अधिक रमतो. एके दिवशी बुलबुल आणि बोनी आपल्या बॉयफ्रेंड्सबरोबर शाळा बुडवून जंगलात फिरायला जातात. सोबतीस आलेल्या सुमुला त्या कोणी येत तर नाही ना, याकडे लक्ष ठेवायला सांगतात. दुर्दैवानं तिथं त्या पकडल्या जातात. स्थानिक लोकांकडून त्यांना मारहाण केली जाते आणि नको ते उद्योग केल्याबद्दल शाळेत त्यांची तक्रार केली जाते. शाळेची मुख्याध्यापक त्यांना शाळेतून काढून टाकते. या नाहक झालेल्या बदनामीमुळे तणावग्रस्त बोनी आत्महत्या करते. बुलबुलच्या भविष्यावरसुद्धाप्रश्नचिन्ह उभं राहतं.

बुलबुल आणि तिच्या मित्रांना लोकांनी मारहाण करून त्यांची मानहानी करणं आणि बोनीची आत्महत्या या दोन घटना व्यतिरिक्त या चित्रपटात नाट्यमय प्रसंग नाही. रीमा दास ‘व्हिलेज रॉकस्टार्स’प्रमाणे या चित्रपटातसुद्धा अत्यंत नैसर्गिकरित्या बुलबुलच्या जीवनशैलीचं चित्रण करते. ग्रामीण भागात मुलामुलींच्या लैंगिक भावनांची होणारी कुचंबणा, समाजाच्या  बुरसटलेल्या पारंपरिक विचारसरणीमुळे अबोध मुलीचं उदध्वस्त झालेलं भावविश्व चित्रित करताना ती क्षोभनाट्याचा वापर  टाळते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

बुलबुलच्या शाळेत तिच्यावर लट्टू होणारा तरुण शिक्षक, इतर विद्यार्थ्यांच्या मनावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून बुलबुल आणि बोनीला शाळेतून काढून टाकणारे शाळेचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक, जंगलात चार मुलामुलींना एकत्र पाहून संस्कृतीरक्षणाचा आव आणत त्यांना मारहाण करणारे गावकरी, बुलबुलच्या हातून विपरीत घडलं म्हणून हताश होणारी तिची आई, ही सगळी माणसं आपल्या आसपासची, नेहमीच्या परिचयाची वाटतात.

नाट्यमय घटनांपेक्षा व्यक्तिरेखांच्या मानसिकतेचं प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन केलेलं चित्रण, माहितीपट सदृश पटकथेची रचना, चित्रीकरणासाठी नैसर्गिक प्रकाश योजनेचा व ध्वनीचा उपयोग आणि कोणतीही स्टार व्हल्यू नसलेले नवखे कलाकार ही नववास्तववादी चित्रपटाची सगळी वैशिष्ट्यं रीमाच्या दोन्ही चित्रपटांमध्ये पूर्णपणे उतरलेली दिसतात.

उत्तर-पूर्वेतील प्रदेशात आजवर निर्माण झालेल्या चित्रपटांची परंपरा रीमा दास समर्थपणे पुढे नेताना दिसत आहे. अपुरं आर्थिक पाठबळ आणि मर्यादित साधनसामग्री यांचा वापर करून तिथल्या समाजाचं अस्सल चित्रण करणाऱ्या मंजू बोहरा, उत्पल भोरपुजारी या आजच्या दिग्दर्शकाच्या बरोबरीनं तिने आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तिची यापुढील वाटचाल आशादायक असेल यात शंका नाही!

..................................................................................................................................................................

या सदरातील आधीचे लेख

वेत्रीमारन : सामान्यांच्या जगण्याचा हुंकार टिपणारा कल्पक दिग्दर्शक

कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!

राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक

पी. शेषाद्री यांना सिनेमा म्हणजे ‘इंटरटेनमेन्ट, इंटरटेनमेन्ट आणि फक्त इंटरटेनमेन्ट’ हे मान्य नाही, ते म्हणतात- सिनेमा म्हणजे ‘एन्लायटनमेन्ट, एन्लायटनमेन्ट आणि फक्त एन्लायटनमेन्ट’!

नाग अश्विन : कला आणि व्यवसाय यांचा तोल सांभाळणारा दिग्दर्शक

..................................................................................................................................................................

लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत. 

santosh_pathare1@yahoo.co.in

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख