टायगर वूड्स व मोहम्मद ऊल्ड सिलाही या दोन पुरुषांनी आपल्या भावना कशा पद्धतीनं हाताळल्या?
कला-संस्कृती - चलत्-चित्र
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • मध्यभागी वरच्या बाजूला मोहम्मद ऊल्ड सिलाही, डावीकडे त्याच्यावरील सिनेमाचं पोस्टर, तर खालच्या बाजूला टायगर वूड्स आणि उजवीकडे त्याच्यावरील लघुपटाचं पोस्टर
  • Mon , 21 June 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र टायगर वूड्स Tiger Woods मोहम्मद ऊल्ड सिलाही Mohamedou Ould Slahi टायगर Tiger द मॉरिटानियन The Mauritanian

“The world of humanity has two wings—one is women and the other men. Not until both wings are equally developed can the bird fly. Should one wing remain weak, flight is impossible.”

- Bahai

गेल्या आठवड्यात टायगर वूड्स (Tiger Woods) आणि मोहम्मद ऊल्ड सिलाही (Mohamedou Ould Slahi) या दोन व्यक्तींच्या आयुष्यावरील एक लघुपट (‘Tiger’) व एक सिनेमा (‘The Mauritanian’) बघण्याचा योग आला. एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या या दोघांच्या कलाकृतींमध्ये मात्र काही साम्यं आहेत. दोन्हीत मुख्य पात्र पुरुष असून दोघंही अत्यंत कठीण आयुष्य जगताना बघायला मिळतात. या दोघांची कथा अमेरिकेत घडते. पहिल्या कथेत यशाच्या शिखरावर राहूनही सगळी सुखं हाताशी असताना चुका करणं, त्याचे कठोर परिणाम भोगणं आणि दुसर्‍या कथेत काहीही दोष नसताना केवळ व्यवस्थेचा बळी होऊन आयुष्यातील १६ मोलाची वर्षं ग्वांटानामो (Guantanamo) या भयानक कारागृहात घालवणं, शेवटी तिथून सहीसलामत त्यातून बाहेर पडणं, असे दोन टोकाचे अनुभव बघायला मिळतात.

या दोन्ही कलाकृती पाहताना आपल्या आजूबाजूला असणारे पुरुष भावना कशा व्यक्त करतात, असा प्रश्न मनात आला. नैसर्गिकदृष्ट्‍या पुरुष-स्त्री यांच्या मेंदूतील भावनिक रचनेत काहीच फरक नाही. म्हणजे ज्या भावना स्त्रिया अनुभवतात, त्याच पुरुषही अनुभवतात. मात्र लहानपणापासून पुरुषाला भावना दाबायला शिकवलं जातं. त्यामुळे त्या दबलेल्या भावना वेगवेगळं रूप धारण करतात. उदा. भीती ही फार मूलभूत भावना आहे, पण मी पुरुष आहे मला भीती वाटत नाही असं जगाला दाखवताना ‘मी कुठे कमी पडत नाही’ याची काळजी घेताना पुरुषाची दमछाक होते. भावना जाणवणं-अनुभवणं, तिला नाव देणं व ती बोलून दाखवणं ही ‘भावनिक साक्षरते’ची सुरुवात आहे.

टायगर वूड्स हा गोल्फमधला जगातील सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक खेळाडू. तिथवर येताना त्याने  शारीरिक व मानसिक पातळीवर काय भोगलं असेल, हे त्याचं त्यालाच माहीत. असं म्हणतात की, आपले आई-वडील आपल्या मेंदूचा ‘प्रोग्राम’ लिहितात. ही बाब वूड्सच्या बाबतीत प्रकर्षानं जाणवतं. त्याला असलेली व्यसनं त्याचीच साक्ष देतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आफ्रिकन वडील व चिनी आई यांचं एकुलतं एक अपत्य असलेल्या टायगरला त्याच्या वडिलांनी लहानपणापासून अत्यंत कठोर शिस्तीत वाढवलं. त्यासाठी त्याचा आनंद हिरावून घेतला गेला. भावना उपयोगी नसतात, केवळ विजय हे लक्ष्य मानून Hyper-focused टायगर त्या भावनांना (त्याच्या भाषेत) compartmentalize करायला शिकला. म्हणजे एका प्रकारे आजूबाजूच्या जगापासून अलिप्त राहून केवळ खेळातील विजय व प्रगती याशिवाय दुसरं काही त्याच्या आयुष्यात नव्हतं.

जसजसं यश मिळत गेलं, तसतशा टायगरच्या दबलेल्या भावना वेगळं रूप धारण करू लागल्या. सेक्सचा उपयोग या दबलेल्या भावनांना समजू घेण्यासाठी होऊ लागला. टायगर ज्या स्थानावर होता, तिथं स्त्रियांनी त्याला ‘नाही’ म्हणणं शक्य नव्हतं. त्यामुळे हॉटेल वेट्रेसपासून क्लब मॅनेजरपर्यंत अनेक महिलांसोबत त्याने काही वेळा किंवा अनेक वेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले. लास वेगासमध्ये जाऊन तिथलं नाईट लाईफ अनुभवलं.

एकाच वेळी तो अनेक वेगवेगळी आयुष्यं जगत होता. विशेष म्हणजे यातील केवळ एका स्त्रीसोबत त्याचं मन जुळलं असं म्हणता येईल, पण तिलासुद्धा त्याने मोठी रक्कम देऊन संबंध तोडले. म्हणजे या शरीरसंबंधांत कुठेही भावनेचा ओलावा नव्हता. लग्नाआधी सुरू झालेलं हे सत्र जेव्हा त्याच्या बायकोला माहीत झालं, तेव्हा तिनं त्याला घटस्फोट दिला.

हे सगळं जाहीर झाल्यावर टायगरने आपली प्रतिमा चांगली व्हावी, यासाठी भरपूर पैसे खर्च केले. पण व्हायचं तेच झालं. या सर्व गोष्टींचा परिणाम त्याच्या खेळावर झाला. लघुपट बघताना टायगरच्या काही विशिष्ट सवयी बघायला मिळतात. उदा. American Navy Seal सोबत मिलिटरी प्रशिक्षण घेणं. त्यात त्याने स्वत:ला अनेक वेळा जखमी करून घेतलं. त्याचासुद्धा त्याला गोल्फ खेळताना त्रास झाला.

सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे एकदा नशेच्या अंमलाखाली गाडी चालवताना टायगरला पोलिसांनी पकडलं. तो प्रसंग बघताना त्याची प्रचंड दया येते. त्याला झोपेचा त्रास आहे. त्यासाठी तो गोळ्या घ्यायचा. पेनकिलर्स व झोपेच्या गोळीच्या अंमलाखाली एका ठिकाणी तो थांबला. तशा अवस्थेत त्याला पोलिसांनी पकडलं. अर्थात तिथून जेल व सुधारणागृहात त्याला जावं लागलं.

या सर्व गोष्टी घडत असताना टायगर एकटा पडला. काही लोक त्याच्यापासून दूर गेले, तर काहींना त्याने स्वत:हून दूर केलं. मात्र या सर्व प्रकारातून तो हळूहळू बाहेर आला. पुन्हा त्याने सामने जिंकायला सुरुवात केली. त्याची मानसिक व शारीरिक प्रकृती सुधारली. सगळ्यात मोठा बदल म्हणजे एक वेगळा टायगर लोकांना पाहायला मिळाला. तो त्याच्या प्रतिस्पर्ध्याशीसुद्धा गोल्फ कोर्टवर हसून बोलू लागला. त्याला लोकांमुळे जे मिळालं, त्यासाठी कृतज्ञता दाखवू लागला. आयुष्य फक्त लक्ष्य मिळवण्यासाठी नसून त्याचे अनेक पैलू आहेत, हे समजून आयुष्य जगायला लागला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

याउलट मोहम्मद ऊल्ड सिलाही. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या या माणसानं कुठलाही गुन्हा केलेला नसताना त्याला अमेरिका १६ वर्षं ग्वांटानामो (Guantanamo)च्या तुरुंगात डांबते. ७० दिवस विविध प्रकारचे अत्याचार करून त्याला झोपू दिलं जात नाही. कर्कश्य संगीत वाजवणं, मेंदूला भ्रमात पडेल अशी औषध देणं आणि शेवटी त्याच्याकडून सरकारला हवा तसा कबुलीजबाब लिहून घेणं... त्याला न्यायालयात उभंही राहू दिलं जात नाही.

या सगळ्या भयंकर परिस्थितीत मानवी अधिकाराच्या बाजूनं लढणारी एक स्त्री वकील त्याची केस घेते. मोहम्मदविरुद्ध लढणारा सरकारी वकीलसुद्धा जेव्हा त्याच्याकडून कबुलीजबाब लिहून घेतल्याची सरकारी कागदपत्रं वाचतो, तेव्हा केस लढायला नकार देतो. अशा परिस्थितीत एकटं राहून स्वतःचा तोल ढळू न देणं, हा चमत्कार आहे.

तुरुंगात असताना इंग्रजी भाषा शिकणं, तिथल्या लोकांशी प्रेमानं व सौहार्दानं वागणं हे सोपं काम नाही. इतर कैद्यांत मिसळायची परवानगी नसताना तो भिंतीपलीकडच्या, चेहराही न दिसणाऱ्या एका कैद्याशी मैत्री करतो, मात्र तो कैदी तुरुंगातील त्रासाला कंटाळून आत्महत्या करतो. हे सर्व पाहताना आपल्या अंगावर शहारे येतात.

जर्मनीमध्ये इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेल्या मोहम्मदनं काही काळ अल-कायदामध्ये प्रशिक्षण घेतलेलं असतं. त्या वेळेस अमेरिका अल-कायदाला पाठिंबा देत असते. मात्र ९/११नंतर राजकीय गणितं बदलतात, तेव्हा अमेरिकेला सर्व मुस्लीम अतिरेकी वाटायला लागतात. आणि मग मोहम्मदचं नशीब फिरतं. त्याचा कशातही हात नसताना ३ वर्षं रोज १८ तास चौकशी, दिवसाचा उजेडसुद्धा न दिसणं अशा त्रासाचा त्याला सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही मोहम्मद त्याचा विवेक टिकवून ठेवतो. निर्दोष ठरल्यावरसुद्धा अमेरिकन सरकार त्याला आणखी ७ वर्षं त्याच कारागृहात ठेवतं. एवढं होऊनही छळ केलेल्या लोकांना तो मोठ्या मनानं माफ करतो.

या दोन्ही पुरुषांनी आपल्या भावना कशा पद्धतीनं हाताळल्या असतील? सगळं असूनही टायगर वूडसच्या भावना त्याला कळत नव्हत्या. म्हणजे त्याच्यासाठी सगळंच, अगदी शरीरसंबंधसुद्धा कोरडी प्रक्रिया होती. याउलट मोहम्मद ऊल्ड सिलाहीचा काही दोष नसताना आयुष्याची मोलाची वर्षं कारागृहात घालवणं, परंतु तरीही सुडाची भावना मनात येऊ न देता माफ करत नवीन आयुष्य सुरू करणं, हे भावनिकदृष्ट्या परिपक्वतेचं लक्षण दिसतं. दोघांचं वयही जवळपास सारखंच आहे.

अशी पुरुष मंडळी आपल्यात आहेत, ज्यांना भावना नीट हाताळणं जमत नाही, कारण त्यांना ते शिकवलंच गेलेलं नसतं. सतत ‘पुरुष’ असल्याच्या ओझ्याखाली दबलेली मंडळी भावनांना घाबरतात आणि बहुतेक वेळी कठीण भावनांपासून पळवाट शोधतात. तेच अनेक वेळा व्यसन असतं.

लहान मुलामुलींना बहुतेक सगळ्याच संस्कृतीमध्ये भावना हाताळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या जातात. काळा व पांढरा हा भेद करत (यिन यान) शिकवल्यानं मुलं ‘रेमंड’च्या जाहिरातीतील ‘The Complete Man’ बनण्याच्या नादात स्वत:ची भावनिक वाढच होऊ देत नाहीत. ते कधी ‘अल्फा मेल’ बनतात, हे त्यांच्यासुद्धा लक्षात येत नाही.

मी पुरुष आहे त्यामुळे मला भावना नाहीत, मला तार्किक बुद्धी आहे.

मी प्रत्येक वेळी शारीरिक व मानसिकरित्या मजबूत दिसायला हवं.

मला हिंसा व आक्रमकता शोभून दिसते.

स्त्रिया हळव्या असतात. त्यांना मी आधार द्यायला हवा.

शारीरिकसंबंध हेसुद्धा पुरुषत्वाचे पुरावे आहेत.

मी रडत नाही.

संशोधनानुसार पुरुष दु:ख, असुरक्षितता या स्त्री-सुलभ भावनांना अनुक्रमे राग व गर्व यांमध्ये परावर्तित करतात. कधी पुरुषांच्या भावना या शारीरिक तक्रारींचं रूप घेतात, तर कधी तीव्र व कठीण भावना दारूच्या ग्लासात किंवा सिगरेटच्या झुरक्यात दाबण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा पुरुष भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना गंभीरपणे घेतलं जात नाही किंवा त्यांची खिल्ली उडवली जाते.

करोनाकाळात बहुतेकांच्या या भावना बाहेर आल्या आहेत. त्यामुळे पुरुषांना काय करावं हे कळत नाही. एरवी पुरुष व मुलांचा खेळाच्या मैदानावर आरडाओरड, ओरडणं व किंचाळणं यातून समाजमान्य भावनिक निचरा मिळतो. तो करोनाकाळात बंद झाला. स्त्रिया बोलून किंवा लिहून व्यक्त होतात. जे पुरुष हे करतात ते बायकी असतात, असा सर्वमान्य समज असल्यानं पुरुषांना भावनांचा निचरा कसा करावा, हे कळत नाही.

सध्या गाजत असलेल्या ‘The Family Man’ या मालिकेत मनोज वाजपेयीने साकारलेलं मुख्य पात्र बायकोसोबत जेव्हा समुपदेशकाकडे जातं, तेव्हा त्याला त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल प्रश्न विचारले जातात. त्या वेळी वाजपेयी चिडून, शिव्या देऊन निघून जातो. हा प्रसंग बहुतेक स्त्रिया त्यांच्या नवरा किंवा पार्टनरच्या वागण्याशी जोडून पाहू शकतात. कारण स्त्रियांना या पुरुषांना सतत सांभाळून घ्यावं लागतं. अनेक वेळा आपल्याला काय होतंय, हेच पुरुषांना कळत नाही. त्यांच्या मनातील हा भावनिक गोंधळ व्यसन, घरगुती हिंसा, भ्रष्टाचार आणि कधी कधी त्यांच्या मनातील अलिप्तपणासाठी कारणीभूत ठरतो.

पुरुष पाषाण हृदयी आणि स्त्रिया मृदू स्वभावाच्या असतात, पुरुषांना व स्त्रियांना वेगवेगळे रंग शोभून दिसतात, अशा चौकटी आखणारे हे विसरतात की, हातात शस्त्र घेणाऱ्या पुरुषांमध्येही हळवेपणा असतो. अश्रू ढाळणाऱ्या स्त्रिया शस्त्रही व्यवस्थित चालवू शकतात. निसर्गानं स्त्रियांत पुरुष संप्रेरकं व पुरुषांत स्त्री संप्रेरकं दिली आहेत. त्यामुळे कोणीही पूर्ण पुरुष वा पूर्ण स्त्री नाही.

‘वज्राहून कठीण’ वागताना पुरुष ‘मेणाहून मऊ’ म्हणजे अति-हळवे कधी होतात, हे त्यांचं त्यांना कळत नाही. ‘अमेरिकन सायकोलोजिकल असोसिएशन’मध्ये प्रकाशित झालेलं एक संशोधन सांगतं की, जैव विविधता (Biodiversity) पर्यावरणासाठी पोषक आहे, त्याप्रमाणे ‘भावनिक विविधता’ (Emodiversity) गरजेची असते. त्यामुळे मेंदूला वेगवेगळ्या सकारात्मक व नकारात्मक भावना अनुभवण्याचा फायदा होतो. भावनिक परिसंस्था (Emotional ecosystem) चांगली राहण्यासाठी वेळोवेळी अशा भावना अनुभवणं गरजेचं आहे. त्यामुळे औदासी‍न्याचा धोका कमी होतो आणि डॉक्टरकडे जाण्याची कमी गरज भासते.

शारीरिक व मानसिक ऊर्जा योग्य राहावी, यासाठी भावना समजून घेणं आवश्यक आहे. भावनिक गोंधळ नीट न हाताळल्यामुळे शारीरिक ऊर्जा कमी होते, तसंच त्याचा झोपेवर परिणाम होऊन दिवसाचं चक्र बिघडतं. कारण झोप शरीराला व मेंदूला आवश्यक ती विश्रांती देण्याचं काम करते.

पारंपरिक पद्धतीनं वाढलेल्या पुरुषांना शक्यतो भावना दाबायला शिकवलं जातं. पुढे या दाबलेल्या भावना अनेक विचित्र प्रकारचं रूप घेऊन पुरुषांना त्रास देतात. अशा कठीण भावनांना बहुतेक वेळा शारीरिकसंबंध, दारू, अंमली पदार्थ व अनेक वेळा कामात गुंग होऊन थोपवलं जातं. मात्र याचा त्या भावनांना योग्य वळण द्यायला अजिबात उपयोग होत नाही. टायगर वूड्सच्या बाबतीत हेच झालं. या प्रकारच्या भावनिक सुन्नतेमध्ये त्रास कमी न होता वाढतो. दारू किंवा शरीरसंबंध वाईट नाहीत, फक्त त्याचा भावनिक आंदोलन हाताळण्यासाठी उपयोग झाला, तर ते त्रासदायक ठरतात. याउलट मोहम्मदनं कठीण भावना योग्यरित्या हाताळण्यानं तो शांत चित्तानं त्याचं नवीन आयुष्य जगत आहे.

‘मर्दानीपणा’ची वेगवेगळी रूपं सिनेमा, जाहिराती, सोशल मीडिया, खेळ व राजकारण यांतून आपल्यावर आदळतात. आता तर स्त्रियासुद्धा हळवेपणा सोडून दारू व सिगरेटमध्ये भावना जिरवताना दिसतात. त्याला अनेक वेळा ‘फेमिनिझम’चं गोंडस नाव दिलं जातं. त्यामुळे पूर्वी पुरुषांमध्ये आढळणारं हृदयरोगाचं प्रमाण आता स्त्रियांमध्येसुद्धा वाढलं आहे. म्हणजे ज्या चुका पुरुष करायचे, त्या आता स्त्रियासुद्धा करतात.

‘मर्दानीपणा’ हे ‘मार्केटिंग गिमिक’ आहे. त्यामुळे करोडो रुपयांचा नफा होतो. परिणामी पुरुषांनी हळवं व भावनिकरीत्या साक्षर होणं अनेक उद्योगांना परवडणारं नाही.

अशा प्रकारचं वागणं पुरुषांनाच त्रासदायक होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक पुरुष मंडळी याविषयी बोलू लागली आहेत, ही एका अर्थानं चांगलीच गोष्ट आहे. रडण्यामुळे वा भावना योग्यपणे व्यक्त केल्यानं टेस्टोस्टेरॉन कमी होत नाही. याउलट ताण, चिंता, व्यसन व औदासीन्यामुळे मात्र पुरुषाच्या शरीरावर विविध प्रकारचे वाईट परिणाम होतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गेल्या काही वर्षांत पुरुषांमध्ये वाढलेलं आत्महत्येचं, हृदयरोगाचं आणि इतर मानसिक आजारांचं प्रमाण हे कुठेतरी काहीतरी चुकतंय याचंच दर्शक आहे.

पुरुषांची भावनांची दडपशाही त्यांना व त्यांच्या आजूबाजूच्या सर्वांनाच खूप त्रासदायक ठरत आहे. नवीन पिढीतील पुरुष (वय वर्षं ३०च्या आत असलेले) काही प्रमाणात त्यांच्या भावना समजून घेऊन वागण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता तर विद्यापीठांनीसुद्धा ‘भावनिक साक्षरता’ शैक्षणिक अभ्यासक्रमात घेतली आहे, परंतु घरातून हे शिक्षण मिळणं गरजेचं आहे.

‘The Mauritanian’ हा सिनेमा संपताना मोहम्मदचं एक वाक्य लक्षात राहतं. तो म्हणतो –‘शांतता’ (peace) आणि ‘क्षमा’ (forgiveness) यांच्यासाठी अरबी भाषेत एकच शब्द आहे!’

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख