अजूनकाही
जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दी वर्षाची नुकतीच म्हणजे २ मे २०२१ रोजी सांगता झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या सिनेमांतील संगीताचा आढावा घेणारा हा एक विशेष लेख…
..................................................................................................................................................................
सत्यजित राय यांचा कोणताही चित्रपट अनेक अंगांनी पाहावा लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे दिग्दर्शन आणि प्रत्यक्ष सर्जन अशा दोन्ही बाजूंनी सत्यजित राय चित्रपटाच्या अनेक अंगांना आकळतात. त्यांच्या चित्रपटातील संगीताचेही तसेच आहे. पहिले सहा चित्रपट वगळता उरलेल्या चित्रपटांनी त्यांनी स्वतःच संगीत दिले. त्या दृष्टीने तीन गोष्टींचा विचार व्हायला हवा –
१) राय आणि चित्रपट संगीत
२) राय यांच्या चित्रपटांसाठी इतरांनी दिलेले संगीत आणि
३) प्रत्यक्ष राय यांनी रचलेले संगीत.
हे तिन्ही विषय एकाच साखळीतले; परंतु आपापल्या विचाराचा प्रांत स्पष्टपणे दाखवून देणारे. उदाहरणार्थ, पहिल्यात राय यांना संगीत आणि चित्रपट यांचा परस्परसंबंध काय वाटे आणि का? हिंदी चित्रपटसंगीताविषयी त्यांची मते काय होती आणि का? वगैरे प्रश्नांची उकल व्हावी. दुसऱ्यात पं.रविशंकर, उस्ताद विलायत खान आणि उस्ताद अली अकबर खान यांनी राय यांच्या चित्रपटांसाठी दिलेल्या संगीताचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि कारणमीमांसा अपेक्षित असेल. आपल्या निश्चित गरजा, निर्णायक मते, स्वतःच्या सांगीतिक कौशल्याविषयीचा व क्षमतेविषयीचा विश्वास, त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या कामगिरीविषयी ठोस असमाधान, यांमुळे राय यांनी स्वतः जे संगीत दिले त्यामागील भूमिका, याचा तिसऱ्यात विचार करता येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आरंभीच एक बाब ध्यानात येते की, सहा चित्रपटांना संगीत देण्यासाठी राय यांनी पाचारण केले ते सगळे ‘तंतकार’ होते. दोन सतारिये, तर एक सरोदिये! तिघेही स्वनामधन्य असे आघाडीचे संगीतकार होते. तिघांचेही कोलकात्याशी जवळचे नाते होते. याशिवाय अत्यंत महत्वाचा मुद्दा असा की, भारतीय वाद्यसंगीताचे नवे अध्याय लिहिणारे म्हणून तिघांचीही सकारण ख्याती होती. अर्थात या तिघांमध्ये म्हणण्यासारखा पूर्वानुभव फक्त पं. रविशंकर यांनाच होता. हा सारा तपशील अर्थपूर्ण आहे. कारण त्यातून राय यांच्या संगीतसंविदेचे रूप कोणत्या शक्ती ठरवत होत्या, हे कळून येते.
संगीतकार म्हणून आपापला चाहतावर्ग असलेल्या कलाकारांकडे राय यांना वळायचे होते; पण हिंदी चित्रपटातले लोकप्रिय संगीत त्यांना पसंत नव्हते. त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंठसंगीताच्या अंगाने, वळणाने संगीताकडे पाहणारे आणि त्याप्रमाणे रचना करणारेदेखील त्यांना नको होते! अर्थात कंठसंगीताच्या पकडीतून सुटणारी संगीत प्रतिभा हवी, म्हणून वाद्यसंगीत अशी अ-करणात्मक भूमिका नव्हती. नव्या स्वनरंगांची झळाळी प्राप्त झालेली वाद्ये आणि अशा वाद्यांच्या अंगांनी सिद्ध होणारी संगीतरूपे यांनाच त्यांची कलाजाणीव अधिक झुकते माप देत असे.
याचे सर्वांत महत्वाचे कारण असे की, राय यांच्या समग्र कलादृष्टीत सहाय्यक आणि मुख्य (उदाहरणार्थ संगीत आणि चित्रपट) माध्यमांच्या नात्याविषयीच्या विचारांत सुरुवातीला दोहोंमधील कल्पनासाम्याला किंवा संवादाला जास्त महत्त्व होते. घटकांच्या विरोधसंबंधांच्या परिणामकारकतेची, त्यांच्या अंतिम कलापूर्णतेची जाणीव जशी विकसित होत गेली, तसतसे इष्ट संगीत कुठले या प्रश्नांना राय यांनी निराळी उत्तरे दिली. संगीताची परिभाषा वापरायची झाल्यास, कलाघटकांच्या परस्परसंबंधांच्या कलापूर्णतेत लयतत्त्वाचे कार्य घडते, तेव्हा ‘सम’, ‘विषम’ आणि ‘असम’ अशा लयी निर्माण होतात (तीन लयी नव्हे). यापैकी आपल्याला कोणती लय हवी, हे ठरवणे कलाकाराचे स्वातंत्र्य असते. कुठल्याही एकाच सिद्धान्तास चिकटून राहिल्याने कलात्म यशाची हमी मिळत नाही.
भारतीय वास्तवाचे राय यांना अभिप्रेत असलेले चित्रण सूक्ष्म, आंतरिक सत्याला सामोरे जाणारे आणि म्हणूनच भावभावनांच्या फुलोऱ्यापेक्षा भावनिक संदिग्धता आणि अंतर राखण्यावर भर देणारे आहे. या संदर्भात ध्यानात घेण्यासारखी बाब अशी की, वाद्ये आणि वाद्यध्वनी मानवी आवाजापेक्षा कमी निश्चितार्थी असतात. शिवाय भावनिरपेक्ष उपयोगास किंवा वावरालादेखील वाद्ये आणि वाद्यध्वनी उत्तेजन देतात. त्याचा एक ठाशीव परिणाम असा की, वाद्यसंगीताची वळणे अधिक संस्कृतीनिरपेक्ष असूनही सौंदर्यपूर्ण किंवा कलादृष्ट्या जास्त समाधानकारक ठरू शकतात.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
राय यांना भारतीय संस्कृतीचा अर्थ लावायचा होता, पण त्यासाठी रूढ वा रुळलेली वाट नको होती. भारतीय संगीत पद्धत तरफदारी करते. त्यांना हे नकोसे वाटले आणि कंठसंगीतातून आविष्कृत वर्तुळांची तरफदारी करते. त्यांना हे नकोसे वाटले. नव्या ध्वनीची आकर्षक वळणे रेखून आपली चित्रसांगीतिक ओळख पटवण्याचा त्यांनी ध्यास घेतला, हेच खरे त्यांच्या संगीताचे मूलतत्त्व म्हणता येईल.
या संदर्भात आणखी एक विधान असे करता येऊ शकेल की, सतार, सरोद, बासरी, शहनाई इत्यादी वाद्यांना विसाव्या शतकात आपापली ओळख नव्याने झाली. वादनसंचात स्वतंत्र स्थान, विकसित होत जाणारी वादनभाषा, वादनप्रकारांची नवी व्यवस्था, वाद्यांच्या बनावटीतले तऱ्हेतऱ्हेचे लक्षणीय बदल आणि वादनतंत्राने केलेली प्रगती, या सर्वांमुळे भारतीय वाद्यांची आधुनिक वाटचाल याच शतकात सुरू झाली. आता हाच मुद्दा आपल्या चर्चेत आणण्याच्या दृष्टीने विचार केल्यास, महत्त्वाचा आणि संकलित परिणाम असा की, बऱ्याच वाद्यांच्या स्वनरंगांना अपूर्व झळाळी प्राप्त झाली. सतार, सरोद यांसारख्या निखळ भारतीय वाद्यांनी स्वदेशात नवे कान आणि परदेशांत अपरिचित संस्कृती काबीज केल्या. वाद्यांची तौलनिक संस्कृतीनिरपेक्षता आणि स्वनरंगांचे परिमाणकारक आणि सार्वत्रिक पोहोचणे जुन्या संगीतकारापासून - उदाहरणार्थ केशवराव भोळ्यांपासून ते आजच्या सत्यजिय राय - सगळ्यांना भावले. याचसाठी राय यांनी आपल्या पहिल्या काही चित्रपटांसाठी तंतकारांना पाचारण केले, हा योगायोग नव्हे!
त्यांना असलेले स्वनरंगांचे आकर्षण आणि त्यांनी वाद्यसंगीताला दिलेले झुकते माप, या दोन्ही गोष्टी त्यांच्या सांगीतिक संगोपनात आढळतात. आपला पाश्चिमात्य वाद्यसंगीताचा ओढा त्यांनी तपशिलाने लिहून ठेवला आहे. त्यांना भावणाऱ्या पाश्चिमात्य संगीतातील वाद्यसंगीताचे प्राबल्य ठळकपणे जाणवते. त्यात पुन्हा निरनिराळ्या वाद्यांचे आपले स्वनरंग ठळकपणे समोर आणणारे सिम्फनी संगीत त्यांना सतत ऐकावेसे वाटत असे. पुढे ते स्वतः संगीतरचना करण्यासाठी पियानोचा आधार घेत असत. आपल्या संगीत जडणघडणीत भारतीय संगीताचा वाटा किती, हे त्यांनी फार कमी वेळा स्पष्टपणे नोंदवले आहे. वास्तविक त्यांच्या चित्रपटीय परिवारात भारतीय संगीताला भरपूर वाव होता. थोडक्यात, वातावरणातील कोणत्या स्पंदांना प्रतिसाद द्यावा हे कृतिशील ग्राहक ठरवत असतो. राय यांनी वाद्यसंगीत वगैरे बाबतीत आपले वजन अ-भारतीय पारड्यात टाकले होते.
या पार्श्वभूमीवर ‘पथेर पांचाली’मधील पंडित रविशंकररचित संगीताच्या काही जागा उल्लेखनीय वाटतात.
१) श्रेयनामावली वगैरे - याशिवाय ‘अप्पू ट्रिलॉजी’मध्ये गुंजणारे थीम संगीत. यात लोक आणि कला संगीताची मिश्रणे आहेत. तसेच पखवाज, बासरी, सतार यांची धून.
२) तळे, त्यातील फुले इत्यादी. गौड सारंग, मांड असे सुघटित राग, तसेच रूपक तालाकृतीचा मुक्त वापर.
३) मेघगर्जना, दुर्गाचे व्रत. वाद्ये - पखवाज, स्वरमंडल, सतार (देस रागाची धून)
४) दुर्गाचा मृत्यू - वाद्ये - पखवाज, सतारीवर मारवा रंगाचे आलाप.
५) हरिहर सहकुटूंब गाव सोडतो - वाद्ये - सतार आणि बासरी.
उल्लेखित तपशिलांनी सजणारे संगीत मुख्यत्वेकरून साम्यसंबंधावर अवलंबून असणारे आहे. जी भावस्थिती चित्रपटातील प्रसंगांतून व्यक्त होत असते, तिलाच गडद करणे, दृश्यांच्या गतिमानतेवर पाऊल टाकून संगीतरचना करणे, कान आकर्षून घेणाऱ्या स्वनरंगांच्या (वाद्यांच्या) वापरात सातत्य ठेवणे आणि एकंदरीने संगीत म्हणून मान्यता पावणारी रचना समोर ठेवणे, वगैरे एकूणच संगीताची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
चित्रपटाशी संगीत कसे एकजीव झाले वगैरे साचेबद्ध वर्णने करावीशी वाटतात. कारण साम्यासंबंधी संगीताचा सरसकट वावर आणि संयोग कलाकृतीत - म्हणजे अनेक कलांशी एक आविष्कार - सिद्ध केला असता काय घडत असते, याचा वैचारिक गोंधळ होय. वैचारिक अंगाला कलानिर्मितीत स्थान नाही, असे सुदैवाने राय यांचे मत नव्हते. याच कारणाने चित्रपटात संगीताने काय कार्य करावे आणि तसे (च) का, या प्रश्नांविषयी त्यांची स्वतःची भूमिका विकसित होत गेली.
ही भूमिका चूक की बरोबर, कशीही असो, ती त्यांची स्वतःची होती, हे निश्चित. ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाच्या संगीतातून दिसणारी त्यांची भूमिका चित्रसंगीताला मान्यता देणारी असली तरी त्यांच्या एकंदर दृष्टिकोनाशी विसंगत होती का, अशी शंका येते. आपण स्वतः आपल्या चित्रपटांचे संगीत का करू लागलो? वगैरे प्रश्नांना त्यांनी दिलेली भाषिक उत्तरे आणि सर्जनशील, निर्मितीशील प्रत्यक्ष क्रिया यांचे नाते साधे नसावे, असे वाटते. त्या दृष्टीने एक वेधक निष्कर्ष हाती लागतो - त्यांचा भारतीय चित्रपटांच्या सर्वांगीण आणि सखोल विचारात भरीव सहभाग असेल.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा :
‘गणशत्रू’ : माणसाच्या आशावादी दृष्टीकोनाची, त्याच्या जिद्दीची गोष्ट सांगणारा सिनेमा - जयंत राळेरासकर
साहित्य, सिनेमा आणि सत्यजित राय - जयंत राळेरासकर
..................................................................................................................................................................
लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
govilkaranil@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment