अजूनकाही
लेखक-दिग्दर्शक द्वयी भूषण कोरगावकर आणि सावित्री मेधातूल यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या 'काली बिल्ली प्रॉडक्शन्स'ची 'अंतर्नाद' ही नवी निर्मिती आहे. 'संगीत बारी' ही त्यांची पहिलीवहिली निर्मिती. कुणाल विजयकर यांच्या कला स्टुडिओमध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी होणारा 'बैठक' हा त्यांचा नवीन उपक्रम. प्रत्येक महिन्यात एका वेगळ्या विषयावर चर्चा, वाचन, सादरीकरण आणि प्रेक्षकांशी हितगूज असं 'बैठक'चं स्वरूप असतं.
'काली बिल्ली' प्रॉडक्शन्सचा 'अंतर्नाद' हा कथा-कविता-गाण्यांचा कार्यक्रम नुकताच पहिला. या कार्यक्रमाला इतर कलाप्रकारांप्रमाणे कुठल्याही चौकटीत बसवणं अन्यायकारक ठरेल. कारण असंख्य वादकांच्या एका सुरेल वाद्यवृंदासारखा हा अनुभव आहे. एखाद्या सुंदर कोलाजसारखा. म्हणूनच तो शब्दांत पकडणं कठीण. तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. युगंधर देशपांडे, अमरीश चंदन, भूषण कोरगावकर, मनीषा कोरडे आणि सायली खरे या पाच कलाकारांनी ज्या नजाकतीनं ही कलाकृती सादर केली आहे. मराठीत जे काही थोडके प्रयोग होत आहेत, जे प्रेक्षकांना अंतर्मनात डोकावायला भाग पाडतील असे - त्यातील हा एक उल्लेखनीय आणि दाद देण्याजोगा प्रयोग आहे, असं म्हणावं लागेल.
'अंतर्नाद'ची मूळ संकल्पना युगंधर देशपांडे यांची असून भूषण कोरगावकर यांच्या साहाय्यानं या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. लेखक, कलाकार स्वतःच्या रचना स्वतः सादर करतात आणि त्यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधतात. यातील कथा, कविता या वेगवेगळ्या प्रयोगांच्या वेळी वेगवेगळ्या असू शकतात आणि मराठीसोबत इतर भाषांमधूनही काही कलाकृतींचं सादरीकरण केलं जातं. लघुकथा, परिच्छेद, व्यक्तिचित्रण, कविता, गाणी या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असलेला हा बहुरंगी कार्यक्रम ९० मिनिटांचा असून त्याला मध्यंतर नाही.
युगंधर देशपांडे हे मूळचे पंढरपूरचे तरुण लेखक. गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत वास्तव्य. त्यांनी लिहिलेल्या 'अगदीच शून्य!' आणि 'बैल मेलाय' या नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर चालू आहेत आणि एका तिसऱ्या संहितेवर ते सध्या काम करत आहेत.
युगंधरच्या विनोदी, मिश्कील कथांमध्ये एक टवटवीतपणा आहे, जो आजच्या पिढीला नक्की भावेल. आयुष्यात रूढार्थानं काहीच न मिळवू शकलेल्या अतिसामान्य, म्हणजे एक्सट्राऑर्डिनरी नव्हे बरं का, सामान्यांहून सामान्य माणसांची, कलाकारांची गोष्ट ते 'उगाच आर्टिस्ट', 'गणूची गोष्ट' या कथांमधून सांगतात. 'अॅबसॉल्युट' या फॅंटसीच्या वळणावर जाणाऱ्या कथेमध्ये एक ब्लॅक ह्युमर आहे. उंदीर झालेला माणूस, एक कलाकार तरुणी आणि माणूस झालेला उंदीर या तीन पात्रांच्या या कथेतून प्रेमातली गुंतागुंत रेखाटण्याचा उत्तम प्रयत्न त्यांनी केला आहे. 'राव' हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील राजकारणापासून इतर विविध गोष्टींमधील ताणतणावावर केलेलं भाष्य आहे. आजचं यांत्रिक जगणं आणि त्यातील चढाओढ युगंधरच्या कथांमधून नेमकी व्यक्त होते.
जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून अप्लाइड आर्ट्सची पदवी घेतलेल्या अमरीश चंदन यांनी जाहिरात क्षेत्रातून करिअरची सुरुवात केली. अॅड एजन्सीजमध्ये काम करणारे अमरीश गेल्या तीन वर्षांपासून लघुकथा लेखन करत आहेत. आपल्या लघुत्तम कथांमधून ते मोजक्या शब्दांत बरंच काही सांगून जातात. अमरीशच्या काही मिश्कील, काही गंभीर कथा ऐकताना मन अलवार भूतकाळात गेलं. 'आईची आन' आणि 'सहवास' या गंध या एकाच संकल्पनेभोवती गुंफलेल्या दोन कथा. ‘आईची आन' ही खट्याळ लघुकथा ऐकताना गंमत आली, तर ‘सहवास' या कथेच्या धक्कादायक शेवटानं सर्वांग शहारलं. 'मोरया' ही कथा ऐकून शाळेतल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या रा. रं. बोराडे, अण्णा भाऊ साठे, भास्कर चंदनशिव यांच्या कथांची आठवण झाली. अमरीशच्या कथा एखाद्या जातिवंत हिऱ्यासारख्या लखलखतात, उठून दिसतात. माणसातलं माणूसपण शोधण्याचा एक अत्यंत उत्कट, प्रामाणिक प्रयत्न करतात.
भूषण कोरगावकर व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत. पारंपरिक लावणी कलाकारांचे आयुष्य चितारणाऱ्या त्यांच्या 'संगीत बारी'वर आधारित कार्यक्रमाला समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्याही पसंतीची पावती मिळालेली आहे.
भूषण कोरगावकरची 'ही कुणी छेडिली तार' ही कथा ऐकताना एखादा चित्रपटच पाहत आहोत की काय, असा भास होत होता. पुरुषाचं अनावृत्त शरीर कधीही न पाहिलेली एक युवती, जेव्हा अचानकपणे नकळत त्या अनुभवाला सामोरी जाते, तेव्हा तिच्या मनात उठणाऱ्या विभ्रमांचं सुरेख चित्रण भूषणनं या कथेत केलं आहे. 'संगीत बारी'मधला उतारा ऐकताना कधी हसून हसून पुरेवाट होत होती, तर कधी डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या. 'बाजार' या लघुकथेतून लग्नाच्या बाजारात अजूनही न खपलेल्या एका तरुणीचं भावविश्व भूषणने रंगवलं आहे. त्यातही हे सर्व भूषणच्या ओघवत्या निवेदनशैलीत ऐकणे म्हणजे 'आयसिंग ऑन द केक'...
मनीषा मूळची नागपूरची. पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स. तत्त्वज्ञान, मराठी आणि इंग्रजी साहित्यात सुवर्णपदक प्राप्त. गेल्या अठरा वर्षांपासून मुंबईत वास्तव्य. एका मराठी मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मनीषा पुढे पटकथा आणि संवादलेखनाकडे वळली. 'भूलभुलैया', 'बिल्लू', 'मालामाल वीकली', 'ढोल' अशा चित्रपटांसाठी तिने पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. विपुल शाह, जब्बार पटेल, प्रियदर्शन अशा नामांकित दिग्दर्शकांबरोबर तिने काम केलं आहे. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं', 'शटर' या मराठी चित्रपटांसाठीसुद्धा तिने लेखन केलं आहे.
मनीषाच्या कविता आणि सायलीच्या गाण्यांशिवाय हा कार्यक्रम अपूर्णच म्हणायला हरकत नाही. मनीषाच्या आजच्या काळातल्या कविता बदलत्या मानवी संवेदना तरलपणे टिपतात.
झेलत राहावं
चांदीसारखं शुभ्र ऊन
मुळांसारखं आत्ममग्न होऊन
नि:संग अवकाशात
उगवू द्यावी
निळ्या रंगाच्या
गाण्याची कळी...
अशा नेमक्या शब्दांतून निसर्गातील प्रतिमा वापरून मनीषाने अतिशय अलवारपणे प्रेम आणि इतर मानवी भावभावनांचा वेध घेतला आहे. तर कधी...
गप्पांच्या ओघात
चारचौघांच्या सहवासात
उगवलेले एकांताचे फुगे
दाबावेत
पेनच्या निपेखाली
अलवारपणे...
असं म्हणत सर्जनाच्या प्रक्रियेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सायली खरे हे अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि गायन अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करणारं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. सायली पुण्याची. सध्या मुंबईत वास्तव्य. मराठी आणि हिंदीत गीतरचना आणि संगीत. 'पिया बेहेरुपिया' या शेक्सपिअरच्या नाटकांवर आधारित हिंदी नाटकात तिने अभिनय केला आहे. एका नव्या संहितेवर ती सध्या काम करते आहे.
'चम चम चांदणी' या सायलीच्या गणेशवंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हाच हे काहीतरी भन्नाट, रिफ्रेशिंग आहे हे जाणवलं. 'कितीबी चरफडा' या 'वासुदेव वाणी'च्या मराठी आणि बिहारी फ्युजननं तर बहार आणली. 'गुरुबाणी' या गाण्याला पंजाबी टच होता, तर 'A Midsummer Night's Dream'मधल्या एका पात्राची मन:स्थिती वर्णन करणाऱ्या एका गाण्यात राजस्थानी रंग भरले होते. गिटार वाजवत स्वतः गात सायलीने ही गाणी सादर केली तेव्हा ही मैफल संपूच नये असं वाटत होतं.
लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment