भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा चौथा लेख...
..................................................................................................................................................................
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं दु:खद निधन झालं. मराठीतील समांतर चित्रपटांचा प्रवाह वाहत ठेवण्यात सुमित्रा भावे-सुनील सुखथनकर या दिग्दर्शक द्वयीचा मोलाचा वाटा आहे. सत्तरच्या दशकात हिंदीत सुरू झालेली समांतर चित्रपटांची चळवळ तत्कालीन संवेदनशील दिग्दर्शकामुळे प्रादेशिक चित्रपटसृष्टीमध्ये रुजली, वाढली. या दिग्दर्शकांनी हिंदीच्या वाटेला न जाता आपल्या भाषेत चित्रपट निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला. सुमारे पंधरा वर्षं या चळवळीने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम दिग्दर्शक आणि त्यांनी निर्माण केलेले दर्जेदार चित्रपट दिले. रंगीत टीव्ही आणि केबलचं जाळं आल्यानंतर या प्रवाहाला थोडी खीळ बसली. या विपरित परिस्थितीत चित्रपट कलेवरील निष्ठेनं आणि या माध्यमाची क्षमता लक्षात घेऊन ज्यांनी सातत्यानं वास्तववादी चित्रपट निर्माण केले, त्यात सुमित्रा भावेंचं नाव अग्रक्रमानं घ्यायला हवं. आपल्या सामजिक जाणीवेला आणि संशोधनाला चित्रपटासारख्या सशक्त माध्यमातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी अखेरपर्यंत केला. आपल्या शेजारच्या राज्यात, कर्नाटकात गिरीश कासारवल्ली, शंकर नाग, पट्टीराभी रेड्डी या चित्रकर्त्यांनीसुद्धा कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये समांतर चित्रपटांची निर्मिती केली आहे. या दिग्दर्शकांचा वारसा समर्थपणे चालवणारे या दशकातील दिग्दर्शक म्हणजे पी. शेषाद्री!
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील बहुतांश कलावंत सिनेमा म्हणजे ‘इंटरटेनमेन्ट, इंटरटेनमेन्ट आणि फक्त इंटरटेनमेन्ट’ या तत्त्वाचा पुरस्कार करणारे असले, तरीही पी. शेषाद्री यांना हे तत्त्व मान्य नाही. ते म्हणतात, ‘‘माझ्या दृष्टीनं सिनेमा म्हणजे ‘एन्लायटनमेन्ट, एन्लायटनमेन्ट आणि फक्त एन्लायटनमेन्ट’! ज्या समाजात मी राहतो, त्या समाजाचं मी देणं लागतो. या समाजात राहणाऱ्या सामान्य माणसाचं जगणं, त्याच्या आशा आकांक्षा, दु:ख–वेदना आणि त्याच अवघ जगणं माझ्या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न करतो. माणसाला जगण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरीही अखेरीस त्याच्यातील विजिगीषू वृत्ती मला नेहमी चकीत करत आलेली आहे. सर्वसामान्य माणसांच्या या कथा मांडण्यासाठी सिनेमा सारखं दुसर प्रभावी माध्यम नाही.’’
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पी. शेषाद्रींनी २००१ पासून आजवर निर्माण केलेले चित्रपट पाहताना त्यांच्या या विधानाची प्रचिती येते. कर्नाटकमधील दांडीनशिवरा जिल्ह्यातील तुमकुर या ग्रामीण तालुक्यात पी. शेषाद्री यांचा जन्म झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे शिक्षण घेऊन वडिलांप्रमाणे शिक्षक होण्याचं स्वप्न त्यांनी लहानपणी पाहिलं होतं. त्या काळात ग्रामीण भागात सिनेमा या माध्यमाचा फारसा परिचयदेखील नव्हता. कन्नडमधील समृद्ध साहित्य मात्र त्यांनी आवडीनं वाचलं होतं. महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर आपण नक्की कोणत क्षेत्र निवडावं, याबद्दल त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. ते चक्क बेंगळूरूला बहिणीकडे पळून गेले.
साहित्य आणि लिखाणाची आवड असल्यामुळे ‘नवकर्नाटक प्रकाशना’त त्यांनी नोकरी धरली. इथूनच त्यांचं कलाक्षेत्रातील वर्तुळ विस्तारलं. रेखाचित्रण, लेखन करता करता ते पटकथा लेखनाकडे वळले. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या ‘अकस्मिका’ या चित्रपटाच्या पटकथा लेखनात त्यांना सहभाग घेता आला. या चित्रपटानं त्यांना त्यांच्या चित्रपटक्षेत्रातील दिशा स्पष्ट करून दिली. कन्नड भाषेतील प्रसिद्ध दिग्दर्शक भरणा यांच्याकडे त्यांनी चार वर्षं सहाय्यक म्हणून काम केलं. आणि त्यानंतर स्वतंत्रपणे दिग्दर्शनाकडे ते वळले. त्याच्या पहिल्याच चित्रपटानं, ‘मुन्नुडी’नं अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आणि सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.
पत्रकारितेचा पिंड असणाऱ्या पी. शेषाद्री यांनी चित्रपटातील मनोरंजनाच्या मूल्यांपेक्षा त्यातील प्रखर सामाजिक जाणीवेला दिलेलं प्राधान्य, घटनांची वास्तववादी मांडणी, प्रेक्षकांच्या विचारशक्तीला आव्हान देणारे शेवट (ओपन एन्ड) ही त्यांच्या दिग्दर्शनातील वैशिष्ट्यं ‘मुन्नुडी’मध्ये दिसतात. ‘आणि ते सुखानं नांदू लागले’ अशा पद्धतीचा शेवट त्यांच्या कोणत्याच चित्रपटात दिसत नाही. आपल्या पात्रांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे, ती परिस्थिती ते अनेक बारकाव्यानिशी प्रेक्षकांसमोर मांडतात. त्या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटकांना घटनांमधून अधोरेखित करतात. आणि एका विशिष्ट टप्प्यावर कथानक आणून सोडतात. कोणताही ठोस उपाय किवा उत्तर न सुचवता प्रेक्षकांना त्याबद्दल विचार करायला लावतात.
पी. शेषाद्रीचा सिनेमा पाहून झाल्यावर आपण त्या परिस्थितीत असतो तर काय केलं असतं, हा विचार करणं प्रेक्षकांना भाग पडतं. त्यांचा सिनेमा चिंतनाचा आणि चर्चेचा होऊन जातो, हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘मुन्नुडी’ ही गोष्ट आहे समुद्र किनाऱ्यावरील एका खेड्यात राहणाऱ्या रुखीया (तारा) या मुस्लीम स्त्रीची! गावातील हसनाब्बा (एच . जी. दत्तात्रय) हा दलाल रुखीयाचा विवाह एका अरबाबरोबर लावून देतो. रुखीयाकडून काही काळ शरीरसुख घेऊन हा अरब परागंदा होतो. रुखीया या अरबाची वर्षानुवर्षं वाट पाहत राहते. तिची मुलगी उन्निसा (छाया सिंग) १६ वर्षाची होते. तिचं लग्न गावातील एखाद्या होतकरू मुलाबरोबर लावून द्यावं, अशी रुखीयाची इच्छा असते. पण तिचा पूर्व इतिहास पाहता या लग्नासाठी कोणीही तयार होत नाही. आपल्या मुलीच्या नशिबी आपल्यासारखेच भोग येणार का, या विचारानं रुखीया अस्वस्थ होते.
‘मुन्नुडी’ ही केवळ रुखीयाची गोष्ट राहत नाही. घरच्या गरिबीमुळे श्रीमंत अरबांना विकल्या जाणाऱ्या लाचार मुली, इस्लाममधील विवाहविषयक कायद्यांचा आधार घेऊन त्यांची होणारी फसवणूक, या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत पी. शेषाद्री सामाजातील एका असहाय्य घटकाची वेदना ‘मुन्नुडी’मधून मांडतात.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीची होणारी घुसमट त्यांच्या अगदी अलीकडच्या ‘मुक्काज्जी कान्सूगलू’ या चित्रपटातून अत्यंत भेदकपणे व्यक्त झाली आहे. के. शिवराम कारंथ यांच्या लोकप्रिय कादंबरीवर ‘मुक्काज्जी कान्सूगलू’चं कथानक आधारलेलं आहे. लहानपणी आलेलं वैधव्य, परंपरेनं आलेल्या अनिष्ट रूढीमुळे करावं लागलेलं केशवपन, या अनुभवातून तावून सुलाखून निघालेली मुक्काज्जी (बी. जयश्री) आसपासच्या स्त्रियांकडे सहानुभूतीनं पाहू शकते. स्त्रीच्या कामेच्छा, तिच्या संसाराकडून असलेल्या छोट्या-छोट्या अपेक्षा घरातील पुरुष समजून घेत नाहीत, स्त्रीला दोषी ठरवून तिला शिक्षेस पात्र ठरवतात, या अन्यायाबद्दल मुक्काज्जी मोकळेपणानं बोलते. पारंपरिक घरात वाढलेली ही स्त्री पुरोगामी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवू पाहते. बी. सरोजा या बुजुर्ग नाट्यकर्मीची शीर्षक भूमिका हे ‘मुक्काज्जी कान्सूगलू’चं प्रमुख आकर्षण आहे.
सामाजिक विषय हाताळत असताना पी. शेषाद्री आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाला, निसर्गाला आणि परिसंस्थेला आपल्या व्यक्तिरेखांएवढंच महत्त्व देतात. त्यांना मिळालेल्या आठ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी दोन पुरस्कार ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट’ या विभागात मिळालेले आहेत. के. शिवराम कारंथ यांच्या कादंबरीवर आधारित ‘बेत्ताडा जीवा’ (द मॅन ऑफ हिल) हा त्यांचा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातील एका देशभक्त तरुणाची कथा सांगतो, पण या कथेला असलेली जंगलाची पार्श्वभूमी अधिक महत्त्वाची ठरते. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेला शिवरामू (सुचेंद्र प्रसाद) वाट चुकून सुब्रमण्य जंगलाच्या परिसरात येतो. गोपालय्या (एच. जी. दत्तात्रय) आणि शंकरम्मा (रामेश्वरी वर्मा) हे वृद्ध दाम्पत्य त्याला आपल्या घरी आसरा देतात. या दाम्पत्याचा मुलगा परागंदा झालेला असतो. काही दिवसांच्या वास्तव्यात शिवरामूला जंगलात राहणाऱ्या लोकांची जीवनशैली, त्यांची संस्कृती, परंपरा आणि विचारसरणी यांचं मनोज्ञ दर्शन होतं. गोपालय्या यांचा मुलगा आपलाच सहकारी असल्याचं त्याच्या लक्षात येतं. त्यांच्या मुलाचा शोध घेण्याचं आश्वासन घेऊन तो तिथून परततो, तेव्हा त्याच्याबरोबर एका समृद्ध संस्कृतीची शिदोरी असते. जंगलात राहणाऱ्या माणसांची दिनचर्या, त्यांचे राग-लोभ, हिंस्त्र जनावरांच्या हल्ल्यामुळे होणारी त्यांची हानी आणि तरीही निसर्गावर असलेलं त्याचं प्रेम, या सगळ्याच मनोहारी चित्रण करणारा बेत्ताडा जीवा हा एक विलोभनीय चित्रपट आहे.
पी. शेषाद्रींचा सर्वोत्कृष्ट पर्यावरणावरील चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा ‘विधाय’ (Farewell) हा दुसरा चित्रपट! तो इच्छामरणाच्या मुद्द्याला अधोरेखित करतो. अपघातामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या वासुकीला (सुचेंद्र प्रसाद) इच्छामरण हवं असतं. त्याची बायको मीरा (लक्ष्मी गोपालस्वामी) मनावर दगड ठेवून त्याची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेते. यामुळे तिची मुलं, सासू एवढंच नव्हे तर तिने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची माहिती मिळताच मीडियासुद्धा तिला खलनायिका ठरवून मोकळा होतो. वासुकीला खरोखर इच्छामरण मिळतं का, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत येताना पी. शेषाद्री आयुष्यात अचानकपणे उद्भवणारे नैतिक पेच ‘विधाय’मधून उपस्थित करतात. निसर्ग आणि मानव यांच्यामधील असलेलं अनादी कालपासून असलेल नातं, आधुनिक काळातील या नात्याचं स्वरूप याचाही ते वेध घेतात.
केवळ निसर्ग आणि माणसातीलच नव्हे तर माणसामाणसांतील परस्पर नातेसंबंधांतील व्यामिश्रतासुद्धा पी.शेषाद्री आपल्या चित्रपटातून मांडताना दिसतात. ‘विमुक्ती’ या त्यांच्या चित्रपटात चित्रकार पित्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माधवीच्या व्यक्तिरेखेतून ते स्त्रीचं एक अनोखं रूप समोर आणतात. माधवीचा तिच्या वडिलांप्रती असलेला ‘पझेसिव्हनेस’ तिच्या वैवाहिक जीवनात वादळ उठवतो. आपल्या आवडत्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमाची मर्यादा ओलांडली तर त्या व्यक्तीचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होतं, याचा प्रत्यय ‘विमुक्ती’मधून येतो.
माणसांच्या भिन्न प्रवृतीमधील द्वंद्व अधोरेखित करणारा पी. शेषाद्रीचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘अतिथी’! शहरात बॉम्बस्फोट करून आल्यानंतर जखमी झालेल्या एका दहशतवाद्याला (प्रकाश राज) त्याचे साथीदार गावातील एका डॉक्टरच्या (एच.जी. दत्तात्रय) घरी घेऊन येतात. डॉक्टरने त्याच्यावर योग्य उपाय करावेत म्हणून ते डॉक्टरच्या बायकोला ओलीस ठेवतात. डॉक्टरच्या सहवासात या दहशतवाद्याचं मनपरिवर्तन झालं का? हा प्रश्न चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शक अनुत्तरीत ठेवला आहे. पण त्याचं उत्तर मिळण्याच्या अनेक जागा त्यानं चित्रपटात पेरलेल्या आहेत.
आसपास घडणाऱ्या घटनांकडे, राजकीय परिवर्तनाकडे पी.शेषाद्री किती सूक्ष्मपणे पाहतात आणि चित्रपट माध्यमांत त्याची मांडणी संवेदनशीलपणे करतात, याचा प्रत्यय देणारे त्यांचे दोन महत्त्वाचे चित्रपट म्हणजे ‘भारत स्टोअर्स’ आणि ‘डिसेंबर वन’!
या शतकाच्या सुरुवातीला भारतात दोन गोष्टींनी आपलं समाजजीवन ढवळून काढलं. एक म्हणजे जागतिकीकरण आणि दुसरा एड्स! जागतिकीकरणाचा एक आयाम होता थेट परदेशी गुंतवणूक. या गुंतवणुकीमुळे मोठे मोठे मॉल उभे राहिले, मात्र किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर भिकेची पाळी आली. देशातील सहा कोटी दुकानदारांना आपली दुकानं बंद करावी लागली. अशाच दुकानदारांपैकी ‘भारत स्टोअर्स’चा कथानायक, एक सज्जन माणूस म्हणजे गोविंद शेट्टी (एच. जी. दत्तात्रय). बेंगळूरूमधील भर रस्त्यावर असलेल्या दुकानात गिऱ्हाईकं येईनाशी झाल्यावर गोविंद शेट्टीना टाळं लावावं लागतं. वडिलांनी घेतलेलं कर्ज परत देण्यासाठी अमेरिकेहून आलेली भारती (सुधारानी) गोविंद शेट्टीचा शोध घेते आणि तिला दयनीय अवस्थेतील गोविंद शेट्टी वृद्धाश्रमात भेटतात. अखेरीस अत्यवस्थ असलेल्या गोविंद शेट्टींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी अम्बुलस ट्राफिक जॅममध्ये अडकते. आपल्या अर्थव्यवस्थेनं सामान्य माणसाची केलेली गोची दाखवणारा, हा शेवट अंगावर येतो.
गोविंद शेट्टीप्रमाणेच सचोटीनं आयुष्य जगणारं कुटुंब आहे महादेवाप्पाचं! एका खेडेगावात पिठाच्या गिरणीवर काम करणारा महादेवाप्पा (संतोष उप्पिना) आपली बायको देवक्का (निवेदिता), आई (शांताबाई जोशी) आणि ज्योती व किरण या मुलांबरोबर समाधानानं राहत असतो. देवक्का शहरात जाऊन हॉटेल्सना भाकऱ्या पुरवत असते. एक दिवस डेप्युटी कमिशनर (शशिकुमार) महादेवाप्पाच्या घरी येऊन राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या घरी एक दिवस मुक्कामाला येणार आहेत, अशी बातमी देतात. या बातमीनं महादेवाप्पाचं जीवन बदलून जातं. गावातल्या सगळ्या लोकांचा या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.
ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला मुख्यमंत्री त्यांच्या घरी येतात, त्यांच्याबरोबर जेवतात, राहतात आणि दुसऱ्या दिवशी निघून जातात. पेपर आणि टीव्हीवर जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागील कारण जाहीर होतं, तेव्हा मात्र महादेवाप्पा आणि देवक्काच आयुष्य ढवळून निघतं. संधिसाधू राजकारणी नेते आणि असंवेदनशील सरकारी यंत्रणा आपल्या स्वार्थासाठी एका गरीब रुग्णाचा कसा गैरफायदा घेतात, याचं भेदक दर्शन ‘डिसेंबर वन’मध्ये आपल्याला पहायला मिळतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पी.शेषाद्री आपल्या चित्रपटात अशा अनेक संवेदनशील कथांना आपल्या चित्रपटांतून मांडत आलेले आहेत. त्यात अभिनिवेश नाहीत तर एक सच्चेपणा दिसून येतो. त्यांच्या चित्रपटांत काम करणारे कलावंतसुद्धा याचं तळमळीनं काम करताना दिसतात. यात उल्लेख करायलाच हवा, तो एच. जी. दत्तात्रय या ज्येष्ठ कलावंताचा! आर्मीमधून निवृत्त झाल्यानंतर एच.जी. दत्तात्रय यांनी नाटक, चित्रपटात भूमिका करणं सुरू केलं. पी. शेषाद्रीच्या ‘मुन्नुडी’पासून ‘बेत्ताडा जीवा’, ‘भारत स्टोअर्स’, ‘अथिती’, ‘विधाय’, ‘डिसेम्बर वन’पर्यंतच्या सर्वच भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या आहेत.
चित्रपटसृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा देऊ पाहणारे, त्यातील कलामूल्य कमी दर्जाचे ठरवत असल्याची खंत व्यक्त करणारे पी.शेषाद्री आजही सामाजिक जाणीवेचा वसा घेऊन चित्रपट निर्माण करत आहेत. त्यांच्या चित्रपटांत तथाकथित मनोरंजन नाही, मोठी स्टार कास्ट नाही म्हणून ओटीटी माध्यमावर हे चित्रपट उपलब्ध होऊ शकत नाहीत. चांगल्या चित्रपटांची ओढ असणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली तर कदाचित हे चित्र बदलू शकेल. आपण त्या दिवसाची वाट पाहू या.
(हा लेख लिहिण्यासाठी पी.शेषाद्री यांनी त्यांचे सर्व चित्रपट उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार.)
..................................................................................................................................................................
या सदरातील आधीचे लेख
वेत्रीमारन : सामान्यांच्या जगण्याचा हुंकार टिपणारा कल्पक दिग्दर्शक
कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!
राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक
..................................................................................................................................................................
लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत.
santosh_pathare1@yahoo.co.in
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment