‘सायना’ : खेळाडू मोठा होतो, पण खेळ बाजूला राहतो, हीच या चरित्रपटाची शोकांतिका आहे!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘सायना’ या सिनेमाची पोस्टर्स
  • Sat , 24 April 2021
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा सायना Saina सायना नेहवाल Saina Nehwal अमोल गुप्ते Amole Gupte परिणीती चोप्रा Parineeti Chopra

चरित्रपट चित्रपट म्हणजे नेमकं काय? एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील ठराविक प्रसंगांवर संदर्भ घेऊन अथवा हयात व्यक्तीबरोबर/नातेवाईक-मित्रांबरोबर संपर्क साधून त्या व्यक्तीविषयी माहिती सांगणं, त्या व्यक्तीचे माहीत असलेले–नसलेले पैलू सांगणं, व्यक्तिचित्र उभं करणं, हा चरित्रपटाचा उद्देश असतो. पण अशा चित्रपटामध्ये किती सत्य दाखवायचं आणि किती नाट्य दाखवायचं हा मोठा प्रश्न पटकथाकार आणि दिग्दर्शकाला आधी सोडवावा लागतो. आपल्याकडच्या अनेक चरित्रपटांमध्ये नाट्य अधिक आणि सत्य कमी असतं.

चरित्रपटाचे अनेक प्रकार असतात. ज्या व्यक्तीचं चरित्र उभं करायचं आहे, तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींशी समक्ष बोलून, कागदपत्रांचे संदर्भ घेतले जातात. संशोधन करावं लागतं, संदर्भ गोळा करून त्यांचा अभ्यास करावा लागतो. चरित्रामध्ये नाट्यमयता वगळून माहितीच दिली जात असेल, तर त्याला माहितीपटाचं स्वरूप येतं. काही वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं, ते व्यक्तिगत मत या स्वरूपात कलाकृतीमध्ये सादर केलं जातं. पुरावे, कागदपत्रं यांचा आधार घ्यावा लागतो, परंतु इतर काही तपशिलांसाठी कल्पनाशक्तीचाही वापर करावा लागतो.

चरित्रपटाद्वारे एखाद्या व्यक्तीकडे तटस्थपणे बघता येतं, टीकात्मकरीत्या बघता येतं, फक्त गुणांचा पोवाडा गाता येतो, गुणदोष तटस्थपणे दाखवले जाऊ शकतात किंवा फक्त दोष दाखवता येतात. ‘Moneyball’, ‘Invictus’, ‘A Beautiful Mind’, ‘Pianist’, ‘Gandhi’, ‘Schindler’s list’ ही काही उत्तम चरित्रपटांची उदाहरणं आहेत. मात्र अलीकडच्या काळात हिंदी-मराठीमध्ये अभ्यास न करता चरित्रपट काढण्याचं पीक आलं आहे, कारण त्याला सुगीचे दिवस आहेत, असा गैरसमज रूढ झाला आहे. ‘दंगल’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘चक दे इंडिया’ हे काही उत्तम हिंदी चरित्रपट आहेत. मात्र ‘तानाजी’सारख्या चित्रपटात इतिहास कमी आणि नाट्य जास्त आहे. ‘शकुंतला देवी’सारख्या चित्रपटामध्ये गणित या विषयाला बगल दिली गेली. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

लेखक-दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी ‘सायना नेहवाल’ या बॅडमिंटनपटूच्या कारकीर्दीवर चरित्रपट तयार केला आणि तो चित्रपटगृहामध्ये २६ मार्च रोजी प्रदर्शित झाला. याच काळात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढला आणि चित्रपटगृहं पुन्हा बंद झाली. आता हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच सामन्यात निवड न होणं, इतरांच्या अपेक्षा नसताना खेळ उंचावला जाणं, स्टेडियममधल्या कोचनं बाहेर जायला सांगणं, नंतर सर्वांची मनं जिंकणं, अशा सरधोपट मार्गानं हा चित्रपट सुरू होतो.

सुरुवातीला सायनाच्या आईनं तिच्यासाठी कसे प्रयत्न केले, ते दिसतं. त्यानंतर थोडा वेळ वडिलांचा तिच्या यशामध्ये कसा वाटा होता, हे दाखवलं जातं. सायना यशाच्या शिखरावर चढत जाते, त्या वेळी चित्रपटाचा आलेख उंचावत जात नाही. आपण प्रेक्षक म्हणून कोणत्याही प्रसंगात गुंतत नाही. कारण सायनाच्या खेळातलं वेगळेपण कुठेच दाखवलेलं नाही.

लेखक अमोल गुप्ते-अमितोष नागपाल यांनी सायनाच्या सहकारी बॅडमिंटन खेळाडूंची नावं सांगितलेली नाहीत, तसंच विविध देशांच्या खेळाडूंची नावंही समजणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. पहिल्या काही वर्षांनंतर सायनानं पुलैला गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतला, त्यांचंही नाव चित्रपटात बदललं आहे.

दिग्दर्शक अमोल गुप्ते असल्यामुळे चित्रपटाबद्दल अपेक्षा उंचावल्या होत्या, परंतु पदरी निराशा येते. ऑलिम्पिक सामन्याला जाण्यापूर्वी तिची मानसिकता काय होती, तिला ब्राँझ मेडल मिळवताना आपण बघतो, परंतु कोणता सामना कसा जिंकला आणि गोल्ड-सिल्व्हर का हुकलं, त्या वेळी तिची मानसिकता काय होती, जिंकणाऱ्या खेळाडूचा खेळ कसा चांगला होता, त्यातून सायना काय शिकली आणि स्वतःच्या खेळात काय बदल केले, जाहिराती स्वीकारण्याबाबत तिच्या पालकांचं काय म्हणणं होतं, यातलं काहीही चित्रपटात दाखवलेलं नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

सायनाचे तिच्या कोचशी नेमके काय मतभेद झाले, हा प्रसंग तपशिलात नाही. तिच्या कोचचं तिच्याबद्दल काय म्हणणं होतं, तो दृष्टीकोन आपल्याला समजत नाही, कारण बाकीच्यांना फारसं महत्त्व नाही. खरं तर हा प्रसंग उभरत्या खेळाडूंसाठी तपशिलात येणं गरजेचं होतं. एक यशस्वी खेळाडू एका टप्प्यावर जेव्हा कोच बदलते, त्या वेळी तिच्या खेळाची पद्धत, मानसिकता बदलते. काही कालावधीनंतर सायना गोपीचंद यांच्याकडे पुन्हा कोचिंगसाठी परत आली, असं एक वाक्य शेवटी दिसतं, परंतु त्यामागची कारणमीमांसा सोयीस्करपणे वगळण्यात आली आहे.

सायना भारतामधील अग्रगण्य खेळाडू होतीच, पण त्याच वेळी तिला पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडूबरोबर खेळावं लागलं, तिथंही जिंकणं-पराभूत होणं हा खेळाचा भाग होता. या सर्व तपशिलात जाण्याची लेखक–दिग्दर्शकाला गरज वाटलेली नाही, कारण ‘भारत की बेटी’ एकच आहे, असं दाखवणं प्रेक्षकांच्या भावनांना हात घालण्यासाठी सोयीचं ठरलं असावं.   

परिणीती चोप्राने सायनाची भूमिका करण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मानव कौल यांनी कोचची भूमिका त्यांच्या इतर भूमिकांप्रमाणे उत्तमरीत्या वठवली आहे. लहान सायनाची भूमिका नईशानं केली आहे, ती बॅडमिंटन खेळाडू असल्याचं जाणवतं. तिची निवड सर्वांत योग्य आहे. मेघना मलिकने सायनाच्या आईची भूमिका फारच लाऊड केली आहे. अमल मलिक यांनी संगीतबद्ध केलेली गाणी स्फूर्तीदायक वाटत नाहीत. चरित्रपटातील काही प्रसंग पार्श्वसंगीतामुळे भावपूर्ण होतात, परंतु यात तो परिणाम साधता आलेला नाही. पियुष शहा यांना सिनेमॅटोग्राफीमध्ये टेनिसचे लाँगशॉट न घेण्याचं बंधन घातल्याचं जाणवतं. त्यामुळे आपण सायनाचा सामना न बघता, सायनाला बघत राहतो आणि खेळ बाजूला राहतो!  

‘मैं सायना नेहवाल, भारत की बेटी’ अशा पद्धतीनं हा चित्रपट सुरू होतो, तेव्हाच संशयाची पाल चुकचुकते. जगज्जेती झाल्यानंतर तिला वार्ताहर परिषदेत पहिला प्रश्न विचारला जातो, तोच अपेक्षाभंग करणारा आहे- ‘आता तुम्हाला कसं वाटतं?’ सायनानं ज्या खेळाडूविरुद्ध सामना जिंकला, त्याचं नावही सांगितलं जात नाही. बॅडमिंटनचा प्रत्येक सामना क्लोजअपमध्ये दाखवला आहे. याचा अर्थ खेळामधील बारकावे दाखवण्याचं टाळलंय. कोणताही सामना आपण त्या खेळातील तपशिलांसह बघत नाही. त्यामुळे चित्रपटात बॅडमिंटन कमी आणि सायना अधिक असा प्रकार झाला आहे. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सायना नेहमी एकाच पद्धतीचा स्मॅश मारताना दिसते. कोच लहान मुलाना बॅडमिंटनबद्दल न सांगता ‘ढल गया दिन’ या गाण्याचा संदर्भ सांगतो, एकेक शटलची किमत सांगतो आणि हा खर्चिक खेळ असल्याचं पहिल्याच भाषणात लहान मुलांना सांगतो, असे काही विचित्र प्रसंग आहेत. 

सायनाच्या खेळाबद्दल आदर आहे, तिचा भारतीयांना अभिमानही आहे, परंतु त्यावर चित्रपट बनवताना बाकीचे सर्वच छोटे दाखवल्याने या चित्रपटाचं मूल्य कमी झालं आहे. सायनाला भारतात कोणीच प्रतिस्पर्धी नव्हता, ती उत्तमच खेळाडू होती, ती कधीच पराभूत झाली नाही, असे गैरसमज या चित्रपटामुळे निर्माण होऊ होतात. त्यामुळे आपल्याला सायनाची मानसिकता समजत नाही, तिचे स्पर्धक समजत नाहीत, बॅडमिंटन खेळामधले बारकावे समजत नाहीत.

पुलैला गोपीचंद यांच्या अकादमीमधून पी. व्ही. सिंधूसारखे अनेक खेळाडू पुढे आले, यशस्वी झाले, हेही सोयीस्कररीत्या वगळलं आहे. चित्रपटातल्या प्रत्येक फ्रेममध्ये सायना दिसेल, याचीच खबरदारी घेतल्यामुळे हा एक फसलेला चरित्रपट ठरतो. खेळाडू मोठा होतो, पण खेळ बाजूला राहतो, हीच या चरित्रपटाची शोकांतिका आहे.

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......