भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा तिसरा लेख...
..................................................................................................................................................................
२०१९चे सिनेमांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. त्यात अपेक्षेप्रमाणे ‘असुरन’साठी धनुष या तमिळ अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मनोज वाजपेयीसह विभागून मिळाला. धनुषला राष्ट्रीय पातळीवर अभिनयासाठी मिळालेला हा दुसरा पुरस्कार. याआधी २०११मध्ये आलेल्या ‘अडुकालम’ या सिनेमातील करप्पूच्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला होता.
‘असुरन’ आणि ‘अडुकालम’ या दोन्ही सिनेमांचा दिग्दर्शक वेत्रीमारन आहे, हा केवळ योगायोग नाही. दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्या परस्परांवर असलेल्या विश्वासातून, सख्यातून अनेक चांगल्या कलाकृती निर्माण होतात, हा इतिहास आहे. सत्यजित राय आणि सौमित्र चटर्जी, अकिरा कुरोसावा आणि तोशिरो मिफुने या दिग्दर्शक-अभिनेता या जोडगोळीनी दिलेले सिनेमे कायम लक्षात राहणारे आहेत. अभिनेत्याचं कौशल्य लक्षात घेऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा भूमिका या दिग्दर्शकांनी निर्माण केल्या. या अभिनेत्यांनीसुद्धा दिग्दर्शकांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
अनेक वेळा त्या अभिनेत्याच्या कारकिर्दीचा विचार त्या विशिष्ट दिग्दर्शकाला वगळून करताच येत नाही. अलीकडच्या काळातील वेत्रीमारन आणि धनुष ही अशीच एक जोडी. या दोघांनीही तमिळ सिनेसृष्टीत या शतकाच्या सुरुवातीला प्रवेश केला. दोघांच्या घरातील वातावरण त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणार होतं. वेत्रीमारनची आई मेगाला चित्रावेल या तमिळमधील नामवंत कादंबरीकार. धनुषचे वडील कस्तुरी राजा चित्रपट दिग्दर्शक! धनुषने आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘थुल्लुवाद्हो इल्माई’ या सिनेमाने केली असली तरीही त्याला अभिनेता म्हणून यशस्वी केलं, ते वेत्रीमारनने दिग्दर्शित केलेल्या ‘पोल्लाधवन’ (२००७) या सिनेमानं.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘पोल्लाधवन’ हा वेत्रीमारनने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. त्याआधी त्याने बालू महेंद्र यांच्याकडे दिग्दर्शनाचे धडे घेतले होते. प्रकाशचित्रणकार आणि दिग्दर्शक म्हणून बालू महेंद्र याचं नाव दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये आदरानं घेतलं जातं. दक्षिणेबाहेरच्या प्रेक्षकांना कमल हसन आणि श्रीदेवी यांनी भूमिका केलेल्या ‘सदमा’ या सिनेमामुळे बालू महेंद्र यांचा परिचय झाला! आपल्या गुरूकडे दिग्दर्शनाचे धडे घेतल्यानंतर स्वतंत्रपणे सिनेमा दिग्दर्शित करताना वेत्रीमारनने मात्र वेगळी वाट निवडली, याचा प्रत्यय त्याचा पहिलाच सिनेमा पाहताना येतो.
याबद्दल बोलताना वेत्रीमारन म्हणतो, “बालू महेंद्रसरांनी मला सिनेमा कसा निर्माण करायचा ते शिकवलं, पण कोणत्या पद्धतीचा सिनेमा करायचा हे माझं मीच ठरवलं. दिग्दर्शकाने नेमकं काय करायचं, कुठवर जाऊन पोहचायचं हा त्याचा निर्णय असतो, तो त्यानेच घ्यायला हवा. माझ्या अवतीभवती मी जे पाहतो, त्या निरीक्षणांतून माझा सिनेमा तयार होतो. मी सामान्य माणसांसाठी सिनेमा बनवतो. त्यात मी स्वतःचं प्रतिबिंब पाहतो. प्रेक्षकांना काही सांगत असल्याचा, उपदेश देत असल्याचा आव मी आणत नाही. माझ्या कथांमध्ये मी अवहेलना, अपराधीपणा, न्यूनगंड आणि जगण्याची असोशी या मानवी भावनांना महत्त्व दिलं आहे. त्यात सूड भावनेला थारा नाही.”
‘पोल्लाधवन’ हा इटालियन नववास्तववादी शैलीतील ‘बायसिकल थीफ’ची आवृत्ती आहे, असा काहींनी दावा केलाय. मात्र आपल्या सिनेमाची ‘बायसिकल थीफ’सारख्या क्लासिक सिनेमाबरोबर तुलना करणं योग्य नाही, असं त्याने नम्रपणे सांगितलं. कथानायकाची बाईक चोरीला गेल्यानंतर तिचा घेतलेला शोध हा समान धागा या दोन्ही सिनेमांत असला तरीही ‘पोल्लाधवन’चं कथानक, त्याची हाताळणी आणि त्यातून दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला आशय हा पूर्णपणे वेगळा आहे, हे तो सिनेमा पाहताना लक्षात येतं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या सिनेमापासून वेत्रीमारन कथा निवेदनाची जी शैली निर्माण केली, ती त्याच्या नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘उर इरावू’मध्येसुद्धा कायम आहे. वेत्रीमारनच्या कथनशैलीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तो कथा सांगताना सरळ रेषेत कधीच सांगत नाही. वर्तमान आणि भूतकाळाच्या हिंदोळ्यावर त्याची कथा झुलत राहते. त्याच्या सिनेमातील पात्रं सामान्य, दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राहणारी, छोटी छोटी स्वप्नं उराशी बाळगणारी. आयुष्यात फार उदात्त मूल्यं न बाळगता आपले रागलोभ सांभाळत जगणारी. परिस्थितीशी दोन हात करताना कधी आक्रमक होणारी, तर कधी हतबलतेनं निराश होणारी!
‘पोल्लाधवन’मधील प्रभू (धनुष) हा मध्यमवर्गीय मुलगा. मित्रांबरोबर कॅरम खेळणं, आवडलेल्या मुलीला पटवण्याचे प्रयत्न करणं, अशा उद्योगात दंग असलेला. वडील त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करतात. त्याला आवश्यक असणारी पल्सर बाईक घेऊन देतात, पण त्याची ही बाईक चोरीला जाते आणि हरवलेल्या बाईकचा शोध घेता घेता प्रभू एका वेगळ्याच संकटात सापडतो. सरळमार्गी आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात अचानकपणे उभं राहणारं संकट आणि त्यामुळे केवळ त्या एका व्यक्तीचीच नव्हे तर त्याच्या कुटुंबाची, मित्रपरिवाराची झालेली वाताहत हे वेत्रीमारनच्या सर्वच सिनेमांचं आशयसूत्र आहे.
ही वाताहत दाखवताना तो वास्तववादी चित्रणाचा अवलंब करतो. त्याने सिनेमाच्या सुरुवातीच्या दृश्यापासून दाखवलेली हिंसा, रक्तपात यांचं थेट चित्रण अनेकदा अंगावर शहारं आणतं. हिंसा सूचकपणे दाखवण्यापेक्षा ती थेट दाखवून प्रेक्षकांना त्या घटनेचा प्रत्यक्ष भेदक अनुभव देण्याची त्याची शैली हिंदीतील अनुराग कश्यपशी मिळतीजुळती आहे. वास्तववादाचा हा उघडावाघडा आविष्कार सर्वच प्रेक्षकांना पचनी पडणारा नाही, पण दक्षिणेत निर्माण होत असलेल्या भडक सिनेमांच्या भाऊगर्दीत सत्य घटनांचा आणि अस्सल व्यक्तिरेखांचा विचारपूर्वक आलेख मांडणारे वेत्रीमारनचे हिंसाचाराचे चित्रण करणारे सिनेमे आपलं वेगळेपण टिकवून ठेवतात, ही वस्तुस्थिती आहे.
‘पोल्लाधवन’नंतर आलेल्या ‘अडुकालम’ने केवळ व्यावसायिक यशच मिळवलं नाही, तर २०११चं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा, नृत्य दिग्दर्शक, संकलन आणि विशेष अभिनेता असे तब्बल सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. एकाच सिनेमासाठी सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, ही लक्षणीय बाब आहे.
‘अडुकालम’मधून वेत्रीमारनच्या दिग्दर्शकीय शैलीवर शिक्कामोर्तब झालं. मदुराईमधील कोंबड्यांच्या झुंजीची स्पर्धा आयोजित करणाऱ्या लोकांची ही गोष्ट. पेत्तईकारन (जयबालन) हा परंपरेनं आलेला कोंबड्यांची झुंज लावण्याचा व्यवसाय करणारा वयोवृद्ध माणूस! करुप्पू (धनुष) आणि दुराई (किशोर) हे त्याचे या व्यवसायातील पट्टशिष्य. पेत्तईकारनची स्पर्धा असते रत्ना स्वामी (नरेन) या पोलीस अधिकाऱ्याबरोबर. कोंबड्यांची झुंज लावणं हा रत्नस्वामीचासुद्धा परंपरागत व्यवसाय असतो. आपल्या मुलाच्या कोंबड्यांनी प्रत्येक झुंज जिंकलीच पाहिजे, हा त्याच्या वृद्ध आईचा आग्रह! पेत्तईकारन आणि रत्नास्वामी यांच्या संघर्षात करुप्पू आणि दुराई यांची आयुष्यं पणाला लागतात.
स्पर्धेत बक्षिस जिंकून त्यामधून स्वतःचा व्यवसाय करण्याचं करुप्पूचं स्वप्न भंग पावतं. या धक्क्यानं त्याच्या आईचं निधन होतं आणि दुराईला आपल्या कोंबड्यांना करुप्पुने विष घालून मारल्याचा संशय आल्यानं त्या दोघांमध्ये वितुष्ट येतं. या सगळ्याला कारणीभूत ठरतात पेत्तईकारनच्या व्यवसायाबद्दल असलेल्या पारंपरिक धारणा. जुनी पिढी व नवीन पिढी यांचा पारंपरिक व्यवसायाकडे पाहण्याचा भिन्न दृष्टीकोन आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष ‘अडुकालम’मध्ये अधोरेखित करताना त्यातील फोलपणासुद्धा दिग्दर्शक दाखवतो.
आपल्या शिष्यांवर प्रेम करणाऱ्या पेत्तईकारनने शेवटी घेतलेली आततायी भूमिका समजून घेताना त्या पिढीची मानसिकता समजून घेणं गरजेचं होऊन बसतं. या पिढीला आपल्या आत्मसन्मानाला धक्का लागणं अजिबात सहन होत नाही आणि तो टिकवून ठेवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. करुप्पुला पेत्तईकारनच्या कारस्थानाचा सुगावा लागूनही तो त्याबद्दल चकार शब्द न काढता गावातून आपल्या प्रेयसीबरोबर निघून जातो, हा ‘अडुकालम’चा शेवट वेत्रीमारनच्या सिनेमाविषयक धारणांना पुष्टी देणारा आहे.
‘अडुकालम’मधील पेत्तईकारनसारखीच मानसिकता नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘पावा कधैगल’ या चार कथांचा समावेश असलेल्या सिनेमातील ‘उर इरावू’ या वेत्रीमारनने दिग्दर्शित केलेल्या लघुपटातील नायिकेच्या वडिलांची, जानकीरामन (प्रकाश राज)ची आहे. आपल्या मुलीने, सुमतीने (साईपल्लवी) हरी (हरीकृष्णन) या कनिष्ठ जातीतातील मुलाशी पळून जाऊन लग्न केलं, याचा प्रचंड राग जानकीरामनच्या मनात आहे. तो गरोदर सुमतीला भेटायला शहरात येतो. तिचा सुखी संसार पाहतो. तिला डोहाळे जेवणासाठी गावी आग्रहानं बोलावतो आणि कार्यक्रमाच्या आदल्या रात्री तिला विष देऊन ठार मारतो.
आपण नागराज मंजुळेच्या ‘सैराट’मध्ये पाहिलेल्या ‘ऑनर किलिंग’चा एक वेगळा पैलू वेत्रीमारन ‘उर इरावू’मध्ये आपल्याला दाखवतो. जानकीरामनसारखा मुलीवर जीवापाड प्रेम करणारा माणूस या निर्णयाला येऊन पोहचण्याची कारणं दिग्दर्शक शोधताना दिसतो. मुलीवर असलेल्या प्रेमापेक्षा तिने पळून गेल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची समाजाकडून झालेली अवहेलना त्याला डाचत राहते. वर वर शांत दिसणाऱ्या जानकीरामनच्या मनात साचलेला राग सुमतीची हत्या करण्यास त्याला प्रवृत्त करतो. प्रकाश राज या अभिनेत्याने जानकीरामनच्या मानसिकतेचे विविधांगी पैलू आपल्या अभिनयातून जिवंत केले आहेत. गावातील भावकीच्या दबावाला बळी पडणारा जानकीरामन आणि हरीशी लग्न करून सुखवस्तू आयुष्य जगणारी सुमती, या व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून शहर आणि गावातील जीवनशैलीतील विरोधाभास मांडत ‘ऑनर किलिंग’चा विषय वेत्रीमारन गडद करतो.
वेत्रीमारन आपल्या सिनेमात उभा करत असलेला अवकाश नेहमी वैशिष्ट्यपूर्ण असतो. झोपडपट्टी, कनिष्ठ वर्ग रहात असलेल्या वस्त्या, पोलीस स्थानक ही स्थळं त्यांच्या चित्रपटाचा एक भाग म्हणून ठळकपणे पडद्यावर येतात. या ठिकाणी राहणारी माणसं, त्यांची रोजगाराची साधनं, त्यांचे दैनदिन व्यवहार, लग्न आणि सण समारंभ यांपासून या वस्त्यामधील गुन्हेगारीकडे वळणारे तरुण, त्यांचे आपापसातील हेवेदावे या सगळ्याचं चित्रण वेत्रीमारन तटस्थपणे करतो.
‘वडा चेन्नई’ या आपल्या महत्त्वाकांक्षी सिनेमामध्ये त्याने वस्तीमधील टोळीयुद्धाची भीषणता दाखवली आहे. अन्बू (धनुष) हा ‘पोल्लाधवन’मधील प्रभूप्रमाणेच कॅरमच्या खेळात रमणारा मस्तमौला तरुण. गुना आणि सेन्थिल या ड्रगचे स्मगलिंग करणाऱ्या गुंडांच्या कचाट्यात तो सापडतो आणि त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. तुरुंगामधील कैद्यांचं टोळीयुद्ध, तिथं पोलिसांच्या सहकार्यानं चालणारे गैरप्रकार याचं तपशीलवार चित्रण करणाऱ्या ‘वडा चेन्नई’मध्ये गुना, सेन्थिल, अन्बू या व्यक्तिरेखांच्या विविध काळातील कौटुंबिक आयुष्यापासून त्यांच्या गुन्हेगारी कारवायांपर्यंतचा वेध घेतो.
या सिनेमातील घटनांचा वेग आपली दमछाक करणारा आहे. वेलराज यांनी केलेलं चित्रण आणि जी.बी. वेंकटेश व आर. रामर याचं संकलन चित्रपटाचा वेग कायम ठेवण्यात यशस्वी झालयं.
तुरुंगात गुन्हेगारानी उभी केलेली समांतर व्यवस्था हे ‘वडा चेन्नई’चं आशयसूत्र मांडणारा वेत्रीमारन ‘विसरनाई’ या सिनेमात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये दडलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं भीषण वास्तव आपल्यासमोर उभं करतो. ‘विसरनाई’ एम. चंद्रकुमार यांनी लिहिलेल्या ‘लॉक अप’ या कादंबरीवर आधारित आहे आणि धनुषने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
आंध्र प्रदेशातील गुंतूरमध्ये रोजगार मिळवण्यासाठी आलेल्या चार तमिळ मजुरांना चोरी केल्याच्या आरोपावरून अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर पाशवी अत्याचार केले जातात. या चार जणांना एक पोलीस अधिकारी कस्टडीमधून सोडवून नेतो, पण त्याचे हेतू मात्र काही वेगळेच असतात. पोलीस अधिकारांच्या आपापसातील शीतयुद्धात सामान्य कैद्यांची कसी ससेहोलपट होते, हे दाखवणाऱ्या ‘विसरनाई’ ला २०१५चा सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आणि त्याचे नामांकन ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आलं.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वर्गाला आपलं निरपराधीत्व सिद्ध करण्याची संधीही आपली न्यायव्यवस्था देत नाही, याचं विदारक चित्रण ‘विसरनाई’मध्ये केल्यानंतर ‘असुरन’मध्ये वेत्रीमारनने दलित आणि धनिक सवर्ण यांच्यामधील संघर्ष मांडला. किल्वेनमनी इथं साठच्या दशकात झालेल्या दलित हत्याकांडाच्या सत्यघटनेचा आधार घेऊन वेत्रीमारनने ‘असुरन’चं कथानक रचलं आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सिवासामी (धनुष) या दलित माणसांच्या तीन एकर शेतजमिनीवर डोळा असणाऱ्या नरसिंह या धनिकाच्या हत्येच्या घटनेपासून ‘असुरन’ची सुरुवात होते. ही हत्या सिवासामीच्या धाकट्या मुलाच्या, चिदंबरमच्या हातून झालेली असते. या घटनेमागे असलेल्या कारणांची उकल असुरनच्या पूर्वार्धात होते. सिवासामीने त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची धडपड यशस्वी होते का, या प्रश्नाचं उत्तर देणारा उत्तरार्ध उत्कंठावर्धक पण सुन्न करणारं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही एका ग्रामीण भागात दलितांना देण्यात येणारी वागणूक, त्या विरोधात बंड करणाऱ्याची झालेल्या निर्घृण हत्या आणि हतबल न्यायव्यवस्था याचं चित्रण करताना वेत्रीमारन एका आशावादी शेवटाकडे कथानक घेऊन येतो.
धनुषने केलेली सिवासामीची भूमिका त्याच्या काराकीर्दीतील महत्त्वाची भूमिका आहे. विश्वनाथन या जमीनदाराकडे काम करणारा होतकरू कार्यकर्ता, आपल्या वाग्दत वधूवर अन्याय झाल्यानंतर संतापलेला तरुण आणि नरसिंहाच्या गुंडांनी तरुण मुलाची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांना धडा शिकवणारा प्रौढ बाप, या सर्व छटा धनुषने आपल्या देहबोलीतून समर्थपणे दाखवल्या आहेत.
वेत्रीमारनने त्याच्यावर अभिनेता म्हणून टाकलेला विश्वास किती सार्थ आहे, याचा प्रत्यय धनुषचा अभिनय पाहताना येते. वेत्रीमारनच्या सिनेमात धनुषचा सहभाग कधी अभिनेता, तर कधी निर्माता म्हणून सतत असतोच. ‘वडा चेन्नई’च्या पुढील भागाची तयारी वेत्रीमारन करत आहे. या भागात तो आपल्या सगळ्या वैशिष्ट्यांच्या बरोबरीने नावीन्यपूर्ण कथानक मांडेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
..................................................................................................................................................................
या सदरातील आधीचे लेख
कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!
राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक
..................................................................................................................................................................
लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत.
santosh_pathare1@yahoo.co.in
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment