सुमन कल्याणपूर : न फुललेलं लोकप्रियतेचं ‘सुमन’!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
आफताब परभनवी
  • सुमन कल्याणपूर यांचं एक दुर्मीळ छायाचित्र
  • Wed , 08 February 2017
  • हिंदी सिनेमा Bollywood सुमन कल्याणपूर Suman Kalyanpur लता मंगेशकर Lata Mangeshkar खय्याम Khayyam साहिर लुधियानवी Sahir Ludhianvi

सुमन कल्याणपूर यांच्या वयाला ८० वर्षं (जन्म २८ जानेवारी १९३७) पूर्ण झाली. म्हणजे हे त्यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचं वर्ष. म्हणजेच त्यांनी आजवर एक हजार चंद्र पाहिले (हजार पोर्णिमा अनुभवल्या!). त्यांच्या हिंदी गाण्यांची संख्या जवळपास तेवढीच आहे (अधिकृत आकडा ८४०). पण त्यांच्याबाबतीत सतत अन्याय घडला. हिंदीत त्यांच्या आवाजाची जातकुळी ओळखून त्याप्रमाणे संगीत रचणारे संगीतकार त्यांना लाभले नाहीत. तशी त्यांना फारशी गाणी मिळाली नाहीत. जी गाणी मिळाली, ती लता मंगेशकर यांना पर्याय म्हणून मिळाली. काही काळ लता रफीसोबत गात नव्हत्या, त्या काळात सूमन यांना गाणी मिळाली.

मराठी भावगीतांची आवड असणाऱ्या रसिकांच्या हे लगेच लक्षात येईल. एक गोड साधेपणा हीच सुमन यांची ताकद. अवघड ताना, पलटे, हरकती, टिपेचा आवाज, आवाजातील मादकता हे सगळं टाळून संथ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं त्यांचं गाणं आहे. ज्या संगीतकारांनी हे हेरलं त्यांनी हा आवाज त्याप्रमाणे वापरला आणि संस्मरणीय अशी मराठी भावगीतं रसिकांच्या पदरात पडली. पण असं हिंदीत फारसं घडलं नाही.  

हिंदीत १९५४ ते १९८८ इतकी मोठी कारकीर्द सूमन यांच्या वाट्याला आली. यात त्यांच्या आवाजाचा योग्य वापर केलेलं ठळक उदाहरण म्हणजे खय्याम यांचे दोन चित्रपट- ‘शगुन’ (१९६४) आणि ‘मुहोब्बत इसको कहते है’ (१९६५).

खय्याम यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हिंदी चित्रपटातील सर्वच ठळक आवाज वापरले, पण कुणालाही कुणाची छाया म्हणून वा बदली कलाकार म्हणून वापरलं नाही. ‘शगुन’मधील सर्वांत गाजलेलं गाणं हे त्यांची गायिका पत्नी जगजीत कौर यांच्या आवाजात आहे (तुम अपने रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो). सुमन यांच्या वाट्याला यात तीन गाणी आली आहेत. 

जिंदगी जुल्म सही जब्र सही गम ही सही
दिल की फरियाद सही, रूह का मौसम सही

असे एका गाण्याचे साहिरचे शब्द आहेत. ‘हमने हर हाल मे जिने की कसम खायी है’ असं म्हणत ज्या शांततेत सुमन यांचा आवाज पुढे जात राहतो, त्यात कुठलाही उरबडवा आक्रोश नाही. कुठलीही तक्रार नाही. शब्दांना साजेसं असं संगीत आणि त्यावर तितकाच शोभणारा मध्य सप्तकातील सुमन यांचा आवाज. हे गाणं आशा किंवा लतासाठी बांधलेलं असून त्या मिळाल्या नाहीत, म्हणून सुमन यांचा वापर केला असं आढळत नाही. जे पुढे शंकर जयकिशन यांच्या बाबतीत सतत घडत गेलं.

दुसरं अगदी उलट उदाहरण ओ.पी.नय्यर यांचं आहे. ‘आरपार’मध्ये ‘मुहोब्बत कर लो जी भरलो, अरे किसने रोका है’ या गाण्यात सुमन यांच्या आवाजात दोन ओळी आहेत. पण त्यांचं नाव ‘कोरस’मध्ये टाकलं गेलं. नंतर नय्यर यांनी त्यांचा आवाज कधीच वापरला नाही. याबाबतच्या दंतकथा बाजूला ठेवल्या तरी लक्षात येतं की, मुळात नय्यर यांच्या संगीतात लतासाठी जागाच नव्हती. परिणामी लताची छाया भासणाऱ्या सुमन यांच्यासाठी तरी कुठून असणार! शिवाय त्यांना सुमन यांचा भावगीताला शोभणारा आवाज वापरावा अशी गरज वाटली नसावी. 

‘शगुन’मधलं त्यांचं दुसरं गाणं रफी सोबतचं आहे -

पर्बतों के पेडों पर, शाम का बसेरा है
सुरमई उजाला है चंपई अंधेरा है

आता यातील ‘सुरमई उजाला’ आणि ‘चंपई अंधेरा’ हे शब्द कानावर पडले की, गुलज़ार यांच्या चाहत्यांना काहीतरी ओळखीचं वाटेल. कारण गुलज़ार अशी शब्दरचना नेहमी करतात. पण ही ताकद साहिरची आहे. कदाचित गुलज़ार यांनी साहिर यांच्यापासून प्रेरणा घेतली असावी. वहिदा आणि कमलजीत यांनी अतिशय संयतपणे हे गाणं पडद्यावर साकार केलं आहे. ‘भीगे भीगे झोकों में, खुशबुओं का डेरा है’ असे शब्द परिणामकारक ठरायला एक शांत लयच पाहिजे.

तिसरं गाणं आहे -
बुझा दिये है खुद अपने हाथों,
मुहोब्बतों के दिये जला के

एक संयत असं दु:ख यातून साहिर यांनी मांडलं आहे. खय्याम यांनी सुमन यांच्या आवाजाची जातकुळी नेमकी हेरून ही गाणी रचली आहेत. पडद्यावर गीता, आशा, लता यांच्या शब्दांना न्याय देणारा अभिनय वहिदाने केला आहे. पण इथं सुमन यांच्या शांत आवाजासाठीही तसाच संयत अभिनय पडद्यावर दिसतो, तेव्हा गाण्याची परिणामकारकता जास्त जाणवते. 

कभी मिलेगे जो रास्ते मे तो मु फिरा कर पलट पडेंगे
कही सुनेंगे जो नाम तेरा, तो चुप रहेंगे नजर झुका के 

इतक्या साध्या ओळी साहिरने लिहिल्या आहेत. पण त्यांचा साधेपणाच इतका परिणामकारक वाटतो की, तार सप्तकात जाणारा आवाज जो परिणाम साधणार नाही, तो परिणाम या साधेपणातून साधला जातो. साधेपणा हीच मोठी ताकद सुमन यांच्या आवाजाची होती (त्यांनी आता गाणं सोडलं आहे म्हणून ‘होती’ हा शब्द वापरला.) 

‘मुहोब्बत इसको कहते है’ (१९६५) हा शशी कपूर-नंदा यांचा चित्रपट. यात मजरूहची गाणी आहेत. यातील पहिलं गाणं  आहे -

जो हमपे गुजरती है, तन्हा किसे समझाये,
तूमभी तो नही मिलते, जाये तो किधर जाये

असं सोप्या भाषेत दु:ख मांडणारं आहे. मजरूह व शैलेंद्र हे दोन गीतकार अतिशय साध्या सोप्या शब्दांतून प्रभावी गीतरचना करून दाखवतात. 

आजा की मोहब्बत की मिटने को है तस्विरे
पहरे है निगाहों पे, और पावों मे जंजीरे, 
बस मे ही नही वरना, हम उडके चले आये

या शब्दांमध्ये दु:खाचा कुठेच आक्रोश नाही. आशा आणि गीताच्या आवाजातील लाडिकपणा सुमन यांच्या आवाजात आढळत नाही. पण स्वाभाविक गोडवा आणि त्यातली मर्यादित मस्ती खय्याम यांनी पुढच्या गाण्यात वापरली आहे. 

ठहरीये होश मे आ जू तो चले जाईगे गा
आपको दिल मे बिठा लू तो चले जाईये गा


या रफीच्या बोलानंतर ‘उं हू’ असा लाडिक झटका सुमनच्या आवाजात येतो. या गाण्यात रफीही अतिशय साधेपणाने गायले आहेत. रफीचं वैशिष्ट्य म्हणजे लता, आशा आणि गीतासोबतचा जो आवाज आहे, तो ते इथं काढत नाहीत. इथं मस्तीही अगदी मर्यादितच करायची अशी शिस्त त्यांनी आपल्याच आवाजाला घातलेली जाणवते. 

याच चित्रपटातील तिसरं गाणं हे मुजरा आहे. हेलन आणि जयश्री गडकरवर हे गाणं चित्रित केलं गेलं आहे. ठुमरीच्या मुजऱ्याच्या शैलीत मुबारक गायल्या आहेत, तर सुमन यांनी बैठकीच्या लावणीच्या थाटात मर्यादित मादकता दाखवत आपला आवाज लावला आहे. हा सूक्ष्म फरक खय्याम यांनी चांगलाच दाखवला आहे. हेच गाणं आशाबाईंनी गायलं असतं तर ते जास्त मादकतेकडे झुकलं असतं.  

सुमन यांची तीन गाणी बिनाका टॉपच्या गाण्यात पोचली. त्यातलं पहिलं गाणं आहे १९६२ च्या ‘बात एक रात की’मधील. हेमंत कुमार यांच्या सोबतच्या या गाण्याला बीनाकात स्थान मिळालं. 

ना तूम हमे जाने, 
ना हम तूम्हे जाने, 
मगर लगता है कुछ ऐसा 
मेरा हमदम मिल गया

इथंही मोठं श्रेय संगीतकार एस.डी.बर्मन यांना द्यावं लागेल. त्यांनी ही रचना खास सुमन यांच्यासाठीच बांधली. हेमंत कुमारच्या धीरगंभीर आवाजासोबत उठून दिसणारा सुमन यांचा गोडसर साधा आवाज नेमका परिणाम साधतो.

दुसरं गाणं आहे शंकर जयकिशन यांच्या ‘दिल एक मंदिर है’ (१९६३) मधील. गाण्याचे शब्दही हेच आहेत, पण गाणं ऐकताना सतत जाणवत राहतं की, कुठेतरी लताच गात आहे. कारण शंकर जयकिशनला लतासाठीच चाली बांधायची सवय होती. परिणामी ते इतर स्त्री गायिकांसाठी तेवढ्या चांगल्या चाली बांधू शकले नाहीत. सोबत रफीचा आवाज आहे. 

तिसरं गाणं सोनिक ओमीच्या ‘दिल ने फिर याद किया’ (१९६६) मधील आहे. हेही परत चित्रपटाचं शीर्षक गीत आहे. मुकेश-रफीसोबतचं.

क्या बताये तूम्हे हम शम्मा की किस्मत क्या है,
गम मे जलने के सिवा और मुहोब्बत क्या है,
ये वो गुलशन है के जिसमे न बहार आयी है
असे शब्द सुमन गातात. 

सुमन यांना एकदाही फिल्मफेअर अवार्ड लाभलं नाही. त्यांचं एकही गाणं कधी लोकप्रियतेच्या शिखरावर होतं असं नाही. एखाद्या गाण्यानं किंवा मोजक्याच गाण्यानं मोठी लोकप्रियता मिळवून गायब होणारे क्षणिक का होईना त्या सुखाचा आनंद घेतात. पण सुमन यांच्यासारख्यांची नियती वेगळीच राहिली. त्यांना ना कधी प्रचंड लोकप्रियता लाभली, ना कधी या क्षेत्रातून कायमचं हद्दपार व्हावं लागलं. ज्या गाण्यांना लोकप्रियता लाभली, त्यातही परत ‘लताची छाया’ ही टोचणी होती. 

खय्याम यांच्यासारख्या संगीतकारांनी त्यांच्याकडून अजून काही गाणी गाऊन घेतली असती, तर कदाचित रसिकांच्या पदरात चांगलं माप पडलं असतं!
(या लेखासाठी हिंदी गाण्याच्या सुवर्ण पर्वातील म्हणजेच १९४९ ते १९६६ पुरताच विचार केला आहे.)

editor@aksharnama.com

Post Comment

ADITYA KORDE

Wed , 08 February 2017

त्यांच्या मराठी गानुयांची थोडी माहिती द्यायला हवी होती. फार सुंदर आहेत त्यांनी गायलेली मराठी गाणी https://www.youtube.com/watch?v=4CwVRJ6iJUA&list=PLLxTIt1xT81b126wk2noBDs-0I0vgYZEL https://www.youtube.com/watch?v=sUDghQ3h5Ns&list=PLLxTIt1xT81b126wk2noBDs-0I0vgYZEL&index=2 https://www.youtube.com/watch?v=UQFod3eyaYk&list=PLLxTIt1xT81b126wk2noBDs-0I0vgYZEL&index=9 आणि व्यक्तिश: माझे अत्यंत आवडते... https://www.youtube.com/watch?v=aX2xeEEXSNw&index=14&list=PLLxTIt1xT81b126wk2noBDs-0I0vgYZEL


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......