कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संतोष पाठारे
  • कौशिक गांगुली आणि त्यांच्या काही चित्रपटांची पोस्टर्स
  • Sat , 27 February 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र कौशिक गांगुली Kaushik Ganguly

भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा दुसरा लेख...

..................................................................................................................................................................

एखाद्या कलाकृतीमुळे यश मिळालं की, बरेच कलावंत त्याच शैलीतील चित्रपट करण्यात रमून जातात. एका विशिष्ट चाकोरीत अडकून पडल्याने क्षमता असूनही दुसरा कोणताही फॉर्म हाताळून बघण्याचं धाडस करणं त्यांना कठीण जातं. प्रेक्षक आपल्या या वेगळ्या प्रयोगाला स्वीकारतील की, नाही ही भीती त्यांच्या मनात असतेच. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत आर्थिक यशाला असलेलं महत्त्वसुद्धा याला कारणीभूत असते. अनेक उत्तम अभिनेते आणि सर्जनशील दिग्दर्शक या दुष्टचक्रात अडकलेले आहेत.

चित्रपटासारख्या आर्थिकदृष्ट्या बेभरवश्याच्या असलेल्या अशा या विश्वात व्यावसायिक आणि कलात्मक तोल सांभाळून सातत्याने चित्रपट निर्माण करणाऱ्या यशस्वी दिग्दर्शकांमध्ये बंगालच्या कौशिक गांगुली यांचा उल्लेख अग्रक्रमानं करायला हवा. २००३मध्ये ‘उशनातर जानेय’ या टेलीफिल्मच्या दिग्दर्शनापासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कौशिक गांगुली यांनी आजवर २७ चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. १७ वर्षांच्या कालावधीमध्ये २७ चित्रपट हा आकडा अचंबित करणारा आहे. केवळ संख्या म्हणून नाही तर त्यातील आशयवैविध्य, प्रत्येक कलाकृतीची जाणीवपूर्वक केलेली प्रयोगशील हाताळणी आणि त्याला समीक्षक, प्रेक्षकांच्या प्रशंसेबरोबर बहुतांशी चित्रपटांना मिळालेलं आर्थिक यश यामुळे कौशिक गांगुली हे नाव समकालीन भारतीय दिग्दर्शकांमध्ये महत्त्वाचं ठरलं आहे.

‘उशनातर जानेय’चा विषय होता दोन स्त्रियांमधील शारीरिक आकर्षण! कलम ३७७बद्दल भारतीय समाजात मतमतांतरं व्यक्त होत असताना टेलीफिल्मच्या माध्यमातून हा विषय मांडण्याचं आव्हान कौशिक गांगुली यांनी स्वीकारलं. समलैंगिक, तृतीयपंथी लोक यांचा सहानुभूतीनं विचार करून त्यांच्या जगण्यातील व्यामिश्रता आणि इतर समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्या चित्रपटांतून त्यांनी नंतरच्या काळात वेळोवेळी चित्रित केला. या विषयाची मांडणी करताना त्याला ओंगळवाणं आणि प्रचारकी होऊ न देता, अत्यंत संयत चित्रण करणारे कौशिक गांगुलींचे ‘आरेक्ती प्रेमेर गोल्पो’ (जस्ट अनदर लव्ह स्टोरी -२०१०) आणि ‘नगरकीर्तन’ (२०१७) हे एलजीबीटी समुदायाच्या व्यथा-वेदना दाखवणाऱ्या भारतीय चित्रपटांमधील आवर्जून उल्लेख करावे असे चित्रपट आहेत.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

‘आरेक्ती प्रेमेर गोल्पो’ची प्रमुख व्यक्तिरेखा आहे अभिरूप (ऋतुपर्णो घोष) हा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक. चपल भादुरी या ‘जात्रा’ लोकनाट्यप्रकारात स्त्री पार्टी म्हणून आयुष्यभर काम केलेल्या कलावंताच्या आयुष्यावर अभिरूप माहितीपट तयार करत असतो. चपल भादुरीच्या वैयक्तिक आयुष्याचा धांडोळा चित्रपट माध्यमातून घेत असताना, अभिरूपला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील तशाच प्रकारच्या अस्थिरतेला सामोर जावं लागत असतं. चित्रपटक्षेत्रात यश, पैसा, प्रसिद्धी मिळत असतानाच गे असल्यामुळे त्याची बदनामीसुद्धा होत असते. त्याच्या चित्रपटांचं प्रकाशचित्रण करणाऱ्या बासू (इंद्रनील सेनगुप्ता)च्या तो प्रेमात पडलेला असतो. बासूच्या बायकोला त्यांच्या संबंधाचा सुगावा लागल्यानंतर ती चित्रीकरणाच्या सेटवर येते. तिच्या भेटीमुळे या तिघांमधील भावनिक गुंता अधिक वाढतो.

‘आरेक्ती प्रेमेर गोल्पो’चं कथानक तीन पातळ्यांवर आपल्या समोर येतं. अभिरूपचं चपल भादुरीवरील फिल्म करताना बासूमध्ये गुंतत जाणं, चपल भादुरींची तरुणपणी प्रियकराकडून झालेली प्रतारणा आणि अभिरूप त्या घटनांचे चित्रपट माध्यमात करत असलेलं रूपांतर. वेगवेगळ्या काळात घडणाऱ्या या तीन पातळ्याची दृश्यरूपं कौशिक गांगुलींनी पोत, रंग आणि संवाद यांच्या बदलातून समपर्करीत्या दाखवली आहे.

ऋतुपर्णो घोष या बंगाली चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या दिग्दर्शकाने अभिरूपची भूमिका स्वीकारून त्याच्या वैयक्तिक जीवनातील प्रतिमेला पडद्यावर आणण्याचं धाडस ‘आरेक्ती प्रेमेर गोल्पो’मधून केलं होतं. त्याला कौशिक गांगुलींच्या संवेदनशील दिग्दर्शनाची साथ मिळाली. जेंडर आयडेटीटीच्या गोंधळात सापडलेल्या कलावंतांकडे पूर्वग्रहदूषित नजरेनं पाहणारा समाज, त्याच्या लैंगिक कलामुळे प्रसारमाध्यमातून त्यांच्यावर होणारी जीवघेणी टीका, आणि या सर्वांमुळे अभिरूपसारख्या संवेदनशील कलावंताची होणारी घुसमट, याचा लेखाजोखा मांडताना कौशिक गांगुली रसिक प्रेक्षकांचं देणं-घेणं कलावंताच्या कलाकृतीशी असावं की त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी, या कळीच्या प्रश्नालासुद्धा पृष्ठस्थानी आणलं आहे. समाजमान्य नसलेल्या लैंगिक धारणा असलेली माणसं, मग ती अभिरूपसारखी उच्चभ्रू समाजात वावरणारी असोत किंवा चपल भादुरीसारखी हलाखीचं आयुष्य जगणारी, या सर्वांच्या वाट्याला आलेली वेदना एकाच प्रकारची असते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘आरेक्ती प्रेमेर गोल्पो’तील अभिरूप आणि चपल भादुरीप्रमाणेच ‘नगरकिर्तन’मधील परिमल उर्फ पुति (रिद्धी सेन)च्या वाट्याला आलेले भोग त्याला एका अटळ शोकान्तिकेकडे घेऊन जातात. कनिष्ठ वर्गातील मधु आणि पितुची ही प्रेमकथा जगावेगळी आहे. समज आलेल्या वयापासून ज्याच्यावर प्रेम केलं, शरीरसंबंध ठेवले त्या मास्तरांनी सख्ख्या बहिणीशी लग्न केल्याचा धक्का सहन न झाल्याने पुति शहरात निघून येतो. तृतीयपंथी लोकांच्या संगतीत राहून सिग्नलवर भीक मागू लागतो. पुतीची ओळख चायनीज पदार्थांच्या दुकानात काम करणाऱ्या मधु (रित्विक चक्रवर्ती)बरोबर होते. मधु पुतिच्या प्रेमात पडतो. लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून मधुबरोबर लग्न करण्याचं स्वप्न पुति पाहतो. पण तो ज्या समाजात वावरतो, तिथं अशा स्वप्नांची किंमत शून्य असते. तृतीयपंथी असणारी सगळीच माणसं, शरीरविक्रय करत नाहीत, सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांना भावभावना असतात, कोणावर तरी मनापासून प्रेम करण्याचा त्यांना हक्क असतो, याची जाण नसलेला समाज त्यांना सुखानं जगू देत नाही आणि त्यांना येणारं मरणसुद्धा क्लेशकारक असतं, कौशिक गांगुली यांनी हे विदारक सत्य ‘नगरकीर्तन’मधून भेदकपणे समोर आणलं आहे.

बदलत्या काळानुसार विविध स्तरातील मानवी नातेसंबंधात निर्माण होत असलेले पेच कथानकातून कौशिक गांगुली सातत्याने मांडत आहेत. ‘सिनेमावाला’, ‘ज्येष्ठपुत्र’, ‘बिसर्जन’, ‘बिजया’, ‘लॅपटॉप’, ‘दृष्टीकोन’ या चित्रपटांतून कौशिक गांगुली बदलत्या काळाचा वेध किती वेगवेगळ्या अंगानी घेतात याची प्रचीती येत राहते. त्यांच्या कथानकात बंगालमधील कोलकाता शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात राहणारी माणसं, बांगलादेशमधून स्थलांतरित झालेले लोक, त्यांच्या समस्या तसेच परंपरा, संस्कृतीच ओझं वाहणारी, जुन्या काळात रमणारी बुजुर्ग मंडळी आणि आधुनिकीकरणाचे वारं मनसोक्त झेलणारी नवीन पिढी या सगळ्याचं दर्शन घडतं.

‘सिनेमावाला’मध्ये प्रन्बेंदू आणि प्रकाश या बाप-लेकाच्या संघर्षाचं कारण ठरते ते प्रन्बेंदू चालवत असलेलं ‘कमलिनी’ नावाचं जुनाट सिनेमागृह! त्याचा सुवर्णकाळ प्रन्बेंदूने पाहिलेला आहे. प्रकाशने पायरेटेड डीव्हीडी विकण्याचा बेकायदेशीर धंदा करणं आणि प्रोजेक्टरवर जत्रेमध्ये सिनेमे दाखवणं त्याला अजिबात मंजूर नाही. असा गैरकारभार करणारी माणसं  चित्रपट निर्मात्यांचं नुकसान करत असतात असं त्याचं ठाम मत आहे. सिनेमाच्या धंद्यातील नैतिकता सांभाळणाऱ्या प्रन्बेंदूला मुलाच्या रोषाला बळी पडावं लागतं. बाप-लेकातील कौटुंबिक तणावाला सिनेमा व्यवसायाची पार्श्वभूमी देऊन त्याला एक व्यापक परिमाण देण्याचं कौशल्य ‘सिनेमावाला’मध्ये कौशिक गांगुलींनी साधलं आहे.

आधुनिक उपकरणांमुळे सिंगल थिएटरची आजच्या काळातील डबघाईला आलेली स्थिती आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत हा वारसा जपून ठेवण्यासाठी प्रन्बेंदूसारख्या निष्ठावान  थिएटर चालकाने केलेले प्रयत्न, हा विषय सध्या चित्रपटांच्या सांस्कृतिक विश्वात ऐरणीवर आलेला असताना चित्रपटाच्या माध्यमातून त्याची कौशिक गांगुलींनी केलेली सम्यक मांडणी त्यांची  व्यवसायाप्रती असलेली निष्ठा अधोरेखित करते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

‘सिनेमावाला’प्रमाणेच या चित्रपटसृष्टीत नाव कमावलेला एक अभिनेता आणि त्याच्या गावात राहणाऱ्या धाकट्या भावातील संघर्ष दाखवणारा ‘ज्येष्ठपुत्र’ हा चित्रपटसुद्धा सिनेमा व्यवसायात प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्याची त्याच्या कुटुंबांबरोबर विशविशीत झालेली नात्यांची वीण उचकटून दाखवतो. इंद्रजीत (प्रसन्नजीत) हा लोकप्रिय बंगाली अभिनेता वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करायला गावी येतो. तिथेसुद्धा तो आपलं प्रसिद्धीचं वलय मागे ठेवू शकत नाही. वडिलांची आयुष्यभर सेवा करत राहिलेला आणि आपल्या कारकिर्दीत अपयशी ठरलेल्या त्याच्या भावाच्या, पार्थोच्या (रित्विक चक्रवर्ती) मनात इंद्रजीतबद्दल असलेला आकस या वेळी उफाळून बाहेर येतो. वडिलांचं अंतिम क्रियाकर्म मीच करणार यावर पार्थो अडून बसतो. आपण पैसा आणि प्रसिद्धीच्या मोहात कुटुंबाची जबाबदारी घेण्यास कमी पडलो, याची जाणीव इंद्रजीतला होते. दोन भावांमधील असूया – जिव्हाळा, मोठ्याला बाहेरील जगात मिळत असलेली लोकप्रियता व घरातील सदस्यांचं प्रेम यातील तफावत दाखवत असताना, कुटुंबात ज्येष्ठपद कोणाला देण्यात यावं, या अनंत काळापासून चालत आलेल्या तिढ्याची उकल करण्याचा प्रयत्न कौशिक गांगुलींनी ‘ज्येष्ठपुत्र’मध्ये केला  आहे.

‘बिसर्जन’ आणि ‘बिजया’ ही चित्रद्वयी बंगालमध्ये स्थलांतरित होत असणाऱ्या बांगलादेशीयांची व्यथा मांडते. भारत–बांगला देश सीमेवरील एका खेड्यात राहणारी तरुण विधवा पद्मा (जया आशन), तिला आपल्या घरात आश्रय देणारा सहृदय गणेश मंडल (कौशिक गांगुली) आणि दुर्गा विसर्जनाच्या वेळी इच्छामती नदीतून वाहत आलेला नसीर (अबीर चटर्जी) या तीन पात्रांमधील भावनिक गुंतागुंत, दोन देशांमधील ताणलेले राजकीय संबंध व सामान्य माणसांच्या मनात धर्मानं निर्माण केलेली कटुता यांच्या पार्श्वभूमीवर कौशिक गांगुली प्रेम आणि मानवता या दोन शाश्वत मूल्यांचं महत्त्व अधोरेखित करतात.

बंगालमधील कोणताही सर्जनशील कलावंत सत्यजित राय यांच्या प्रभावापासून दूर राहू शकत नाही. चित्रपटक्षेत्रात त्यांचं योगदान मान्य करताना त्यांच्या कलाकृतींचे अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न नवीन पिढीतील दिग्दर्शक सातत्यानं करताना दिसतात. यातील एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणजे कौशिक गांगुलींचा ‘अपूर पांचाली’! राय यांच्या ‘पथेर पांचाली’मधील अपूची भूमिका करणाऱ्या सुबीर बॅनर्जी या बाल कलाकारानं त्यानंतर कोणत्याही चित्रपटात अभिनय केला नाही. आजही जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणारी ही अजरामर व्यक्तिरेखा साकार करणाऱ्या सुबीर बॅनर्जीच्या आयुष्यात ‘पथेर पांचाली’ने कोणता बदल घडवून आणला, याचा वेध घेण्याचा प्रयत्न कौशिक गांगुलींनी ‘अपूर पांचाली’मध्ये केला आहे.

जर्मन सरकारने सुबीर बॅनर्जींचा (अर्धेंदू बनर्जी) सन्मान करण्याचं ठरवल्यानंतर सत्यजित राय इन्स्टिट्यूटमधील आर्को (गौरव चक्रवर्ती) त्यांचा शोध घेऊ लागतो. सुबीरच्या घरी पोहचलेल्या आर्कोला तो ओळखसुद्धा दाखवण्यास नकार देतो. मात्र आर्को जिद्द सोडत नाही. तो हळूहळू सुबीरला आपलंसं करून घेतो. सुबीरचं वास्तवातील आयुष्य आणि अपूच्या आयुष्यातील राय यांनी चित्रित केलेल्या घटना, यातील साम्य त्याच्या लक्षात येऊ लागतं. अखेरीस दोघं जर्मनीला सन्मान सोहळ्यासाठी जाण्यास निघतात. माहितीपट आणि कथात्मपट यांचं मिश्र स्वरूप असलेल्या ‘अपूर पांचाली’मध्ये राय यांच्या अपू-चित्रत्रयीमधील प्रसंग वापरल्यामुळे चित्रपटाची रंगत वाढली आहे. अपूर पांचालीच्या निमित्तानं कौशिक गांगुलींनी यशस्वी बाल कलाकारांना त्यांच्या पुढील आयुष्यात येणारी अस्थिरता, नैराश्य यांचाही मागोवा घेतलाय.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

चित्रपटसृष्टीत वावरणारे कलावंत, एलजीबीटी समुदाय, विस्थापित आणि शोषित वर्गातील लोक, कौशिक गांगुलींच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. चित्रपट माध्यमाचा योग्य वापर करत हे विषय त्यांनी पडद्यावर आणले आहेत. ‘सिनेमावाला’साठी त्यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आयसीएफटी-युनेस्को पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय. या महोत्सवातील भारतीय पनोरमा विभागात सातत्यानं त्यांच्या चित्रपटांची निवड केली गेली आहे. ‘अपूर पांचाली’साठी महोत्सवातील सर्वोत्तम दिग्दर्शक हा पुरस्कारदेखील त्यांना देण्यात आलाय.

महोत्सवात मिळालेली प्रेक्षकांची दाद आणि ‘बिसर्जन’, ‘नगरकीर्तन’ या चित्रपटांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार हे यश त्यांच्यातील कलावंताला सुखावणारं असलं तरीही आपण एका व्यावसायिक चित्रपटसृष्टीचा भाग आहोत, हे भान त्यांनी सुटू दिलेलं नाही. प्रसन्नजीत, रित्विक चक्रवर्ती, परमब्रता चटर्जी यांसारखे बंगालमधील सुपरस्टार त्यांच्या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसतात. शिरसा राय यांच्यासारखा प्रथितयश प्रकाशचित्रणकार त्यांच्या चित्रपटांचं प्रकाशचित्रण करतो.

कौशिक गांगुली केवळ दिग्दर्शनातच रमत नाहीत, तर त्यांच्या योग्यतेची भूमिका असल्यास तीसुद्धा समर्थपणे निभावतात. ‘बिसर्जन’, ‘बिजया’मधील गणेश मंडल, ‘दृष्टीकोन’मधील प्रीतम या त्यांच्या काही लक्षणीय भूमिका आहेत. त्यांची अभिनेत्री पत्नी चुरनी गांगुली, मुलगा उजान गांगुली याचं क्षेत्रात कार्यरत असले तरीही आपण दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटांत त्यांच्या अनुरूप भूमिका असेल तरच त्यांना ती द्यायची याबद्दल ते ठाम असतात.

आधुनिक काळातील माणसांच्या मानसिकतेला आपल्या चित्रपटातून व्यक्त करणारे, कलात्मकतेच्या बरोबरीने व्यावसायिकता जपणारे कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत.

..................................................................................................................................................................

या सदरातील आधीचा लेख : राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक

..................................................................................................................................................................

लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत. 

santosh_pathare1@yahoo.co.in

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......