‘दृश्यम’, त्याचे रिमेक आणि ‘दृश्यम २’ : हाय काय आन नाय काय?
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर
  • ‘दृश्यम २’ आणि या सिनेमाच्या मल्याळम, हिंदी, कन्नड आवृत्त्यांमध्ये काम करणारे कलाकार
  • Wed , 24 February 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र दृश्यम Drishyam दृश्यम २ Drishyam 2 मोहनलाल Mohanlal जितु जोसेफ Jeethu Joseph

‘दृश्यम’ हा निशिकांत कामत दिग्दर्शित हिंदी चित्रपट मूळ मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. या थ्रिलर चित्रपटात तब्बूने अभिनय उत्तम केला होता आणि चित्रपटाचे टेकिंग अप्रतिम होते. अर्थात याचे सर्व श्रेय मूळ मल्याळम चित्रपटाचा दिग्दर्शक जितु जोसेफ यांना जाते. या चित्रपटाचे एकूण चार भाषेत रिमेक झाले. आता ‘दृश्यम २’ हा मूळ मल्याळम चित्रपटाचा सिक्वेल – दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. तो कसा आहे याचे विश्लेषण करण्यापूर्वी  पहिल्या भागाच्या चित्रपटाबद्दल समजून घेणे समयोचित ठरेल.

२०१३ साली रिलीज झालेल्या ‘दृश्यम’ या मल्याळम भाषेतील चित्रपटाची संकल्पना जितु जोसेफ यांनी  ‘The Devotion of Suspect X’  या जपानी कादंबरीवरून सुचली असावी. या कादंबरीवर जपानमध्ये ‘Suspect X’ चित्रपट रिलीज झालेला होता. जपानी कादंबरी/चित्रपटाच्या संकल्पनेवरून चित्रपट करताना जोसेफ यांनी बरेच बदल केले, केरळ मधल्या छोट्या गावाची पार्श्वभूमी उत्तमरीत्या निर्माण केली. त्यांनी नायकाची भूमिका मोहनलाल यांना दिली. राजू बोनागानी यांनी पटकथा लिहिली. गावामध्ये राहणाऱ्या एका केबल टीव्ही ऑपरेटरचा उद्योग करणाऱ्या जॉर्ज कुट्टी याचे कुटुंब म्हणजे पत्नी, शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन कन्या – अंजू आणि अनु. एकदा कॉलेजच्या ट्रीपमध्ये एक युवक, वरुण मुलींची छायाचित्रं काढता काढता अंजूचे कपडे बदलतानाची छायाचित्रं चोरून काढतो आणि त्यानंतर अंजूला ब्लॅकमेल करून रात्री तिच्याच घरच्या मागच्या बाजूला बोलावतो. अंजू आणि तिची आई दोघी त्या प्रसंगाला तोंड देतात. त्याच वेळी अंजू स्वसंरक्षणार्थ जवळ पडलेल्या लोखंडी सळीचा प्रहार करते, त्यात वरुण मरतो.

सकाळी जॉर्ज घरी येतो, त्या वेळी त्याला सगळे समजते. त्यातून कुटुंबाला वाचवण्यासाठी तो एक प्लॅन करतो. केबल टीव्ही उद्योगामध्ये असल्यामुळे त्याचा बराच वेळ चित्रपट बघण्यात जात असतो. अनेक चित्रपटांमधून त्याला वेगवेगळ्या क्लृप्त्या सुचत जातात आणि तो नियोजनपूर्वक प्रेताची वासलात लावतो.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

वरुण पोलीस इन्स्पेक्टर गीताचा मुलगा असल्यामुळे तपासाची सूत्रं जोरात फिरतात, परंतु जॉर्ज असे प्रसंग तयार करतो, त्यामुळे पोलिसांना जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबीयांना सोडून द्यावं लागतं. त्यालाच ‘दृश्यम’ म्हणजे ‘उभा केलेला आभास’ असं म्हणतात. तो आभास काय आहे, जॉर्ज नियोजन कसं करतो, हे सर्व चित्रपटात बघण्यासारखं आहे. 

मोहनलाल भारतामधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. नैसर्गिक अभिनय शैलीनं त्यांनी आपल्या ३५० चित्रपटांत वैविध्य दाखवलं आहे. ‘दृश्यम’मध्ये मोहनलाल अभिनय ‘दाखवत’ नाहीत. नायकाचा विचार मोहनलाल कमीत कमी संवादामध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. चित्रपट बघण्याची सवय असलेला आणि प्रत्येक प्रश्नांवर बघितलेल्या चित्रपटांच्या प्रसंगांमधून उपाय शोधण्याची सवय असलेला नायक आपण बघतो, तेव्हा आपल्याला मोहनलालमधील अभिनेता कुठेही ‘दिसत’ नाही, तो अभिनय असं वाटत नाही, हे या महान कलाकाराचं कौशल्य आहे.  

मीना, अंशीबा, एस्थर, आशा सरथ अशा सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. जोसेफ यांनी मल्याळम प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवून चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे कथा नाटकी पद्धतीनं आपल्या समोर न येता एकेक धागे उलगडत जातात. एका छोट्या गावातील सर्वसाधारण कुटुंबाला एक खून पचवणं कसं कठीण जातं आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी काहीही करू पाहणाऱ्या नायकाचा मानसिक संघर्ष आपण बघतो. ४४ दिवसांत शूट केलेला मल्याळम भाषेतला हा चित्रपट उत्पन्नाचे नवे विक्रम करणारा ठरला, या चित्रपटाला आणि मोहनलाल यांना अनेक पुरस्कार मिळाले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

जोसेफ यांना या चित्रपटाचा तमिळ भाषेमध्ये रिमेक करावा असं वाटलं. त्यांनी तमिळमधील लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांना भेटून तशी इच्छा व्यक्त केली. रजनीकांत यांनी मूळ चित्रपट बघितल्यावर जोसेफ यांना सांगितलं की, या चित्रपटात पोलीस नायकाला लाथेनं मारतात आणि तो मार खातो असा प्रसंग आहे आणि दुसरा प्रसंग क्लायमॅक्स, ज्यामध्ये नायकाच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. चाहत्यांना हे आवडणार नाही, या कारणास्तव त्यांनी ‘दृश्यम’ चित्रपट करण्यास नकार दिला.

त्यानंतर जोसेफ कमल हसन यांना भेटले. त्यांनी मल्याळम चित्रपट बघितल्यावर तमिळ चित्रपटात काम करण्यास होकार दिला, पण सांगितलं की, या चित्रपटात मोहनलाल यांनी इतका उत्कृष्ट अभिनय केला आहे की, याच्या तमिळ आवृत्तीमध्ये मी वेगळं काय करू शकतो, यावर विचार करायला वेळ द्यावा लागेल. त्यानंतर कमल हसन यांनी तमीळ संस्कृतीचा विचार करून तामिळनाडूमधील छोट्या गावातील सर्वसाधारण माणूस ज्या पद्धतीनं गप्पिष्ट असतो, तसा जॉर्ज साकारला.

याचप्रमाणे भाषा कोसा कोसावर बदलते, याचा विचार करून कमल हसन यांनी तामिळनाडूमधल्या तिरुननवेली इथं बोलल्या जाणाऱ्या तमिळ भाषेचा अभ्यास करण्यासाठी लेखक सुगा यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. क्लायमॅक्सबद्दल वेगळा विचार करून आतापर्यंत दबलेल्या भावना वेगळ्या पद्धतीनं व्यक्त करण्याचा अनोखा प्रयत्न केला, जो तमिळ संस्कृतीशी निगडीत आहे. जे मनोगत मोहनलाल संयमितरीत्या मनावर ताबा ठेवून व्यक्त करतो, परंतु योग्य त्या ठिकाणी मौन बाळगतो, तोच प्रसंग साकारताना कमल हसन यांनी ‘emotional outburst’ होईल आणि तमिळ माणूस कसा व्यक्त होईल, याचा विचार करून साकारला.

क्लायमॅक्सला कमल हसन का रडला, याचं उत्तर तमिलनाडूच्या संस्कृतीमध्ये आहे. केरळमध्ये ज्या पद्धतीने कथा सांगितली जाते, तितक्या संयमितरीत्या तामिळ चित्रपटात सांगितली जात नाही. त्यामुळे तमिळ मनुष्याचा संयमाचा बांध का फुटला, हे समजून घ्यायला हवं. चित्रपटात शिवाजी गणेशनचा अभिनय बघून कमल हसनच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याबद्दल भारावून बोलताना ‘पापनासम’च्या नायकाला आपण बघतो, तो संदर्भही लक्षात घ्यायला हवा. 

..................................................................................................................................................................

हेही पाहा - संवेदनशीलतेचे अपार करुणेत रूपांतर करण्याचे सामर्थ्य फार कमी लेखकांमध्ये आढळते. अशा मोजक्या आणि श्रेष्ठ लेखकांत भास्कर चंदनशिव यांची गणना आपल्याला करावी लागते!

..................................................................................................................................................................

रजनीकांत आणि कमल हसन यांच्या कृतीमधून एकाच चित्रपटाकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन लक्षात येतात. लोकांना काय आवडेल, काय आवडणार नाही याचा विचार करणारे अभिनेते, गायक, संगीतकार, दिग्दर्शकांच्या प्रयोगशील वृत्तीला मर्यादा असतात. त्याऐवजी आपण यामध्ये वेगळं काय करू शकतो, याचा विचार करून कमल हसन यांनी केलेले प्रयोग यशस्वी झाले आणि रसिकांना वेगळं काही अनुभवता आलं. 

अजूनही ‘दृश्यम’मधला मोहनलाल ग्रेट की ‘पापनासम’मधला कमल हसन अशा चर्चा दोन्ही राज्यांमधील चित्रपट रसिकांमध्ये घडत आहेत. दोन्ही चित्रपट त्या राज्यांच्या संस्कृतीचा विचार करून तयार केले आहेत. प्रत्येक राज्याची गोष्ट ऐकण्याची, वाचण्याची, बघण्याची पद्धत वेगळी असते. तमिळ लोक एकाच व्यक्तीच्या ग्रे शेड्स बघण्यापेक्षा काळे-पांढरे, नायक-खलनायक असे स्पष्ट स्वरूपात बघतात. कोणी कुणाला खाल्ला अशा पद्धतीनं चित्रपट बघणं गैर आहे.

कमल हसन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, “मी असं ऐकलं की, या चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीसाठी मोहनलाल यांनी माझं नाव सुचवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या चित्रपटात अभिनय करताना मी महान अभिनेता मोहनलाल यांच्या पावलांचा मागोवा घेतला, एवढेढंच. फक्त तसं करताना मी माझ्या पद्धतीनं अभिनय केला आहे.”    

याच कालावधीमध्ये मूळ मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचं ठरलं आणि त्याचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं. ‘शोले’च्या भाषेत सांगायचं तर “एक गलती की ठाकूर साहब, अजय देवगण को ये रोल दे दिया”. त्याने मोहनलाल यांच्या अभिनयाचा आदर्श ठेवून तसं काही करण्याचा प्रयत्नही केल्याचं दिसत नाही. कमल हसनसारखा ग्रामीण भाषा, वेगळं काही करणं, तसा विचार करण्याची अपेक्षा अजय देवगणकडून नाहीच. बघितलेल्या चित्रपटांवरून प्रासंगिक तोडगा काढणं हे मोहनलाल यांनी साकारलेल्या पात्रामध्ये दिसतं, तमिळ चित्रपटात सीम कार्डबद्दलची कल्पना नायकाला ‘वेन्सडे’ या चित्रपटावरून सुचल्याचं आपल्याला दिसतं, तसं हिंदी चित्रपटात दाखवण्यात निशिकांत कामत – अजय देवगण कमी पडले. हिंदी चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे तब्बूचा अभिनय. कमालीचे गहिरे रंग तब्बूने या चित्रपटात दाखवले आहेत. 

याच चित्रपटाचा तेलुगु रिमेक सुप्रिया यांनी दिग्दर्शित केला आणि व्यंकटेश, मीना, नादिया यांनी त्यात भूमिका केल्या. कन्नड रिमेक ‘दृश्य’ पी. वासू यांनी दिग्दर्शित केला आणि त्यात व्ही. रामचंद्रन, नाव्या नायर, आशा सरथ यांनी भूमिका केल्या. क्लायमॅक्ससाठी मोहनलाल, कमल हसन, व्यंकटेश आणि व्ही. रामचंद्रन यांनी वेगवेगळा विचार केला आहे, कुटुंबाला वाचवण्यासाठी जे काही करावं लागलं ते केलं, त्याचं पापक्षालन कसं करता येईल, याची खंत अजय देवगण व्यतिरिक्त इतरांनी वेगळा विचार करून व्यक्त केल्याचं जाणवतं. निशिकांत कामत यांनी हिंदी चित्रपट करताना थ्रिलर एवढाच विचार केला आणि एका सर्वसामान्य कुटुंबियांच्या मानसिकतेचा विचार करण्याला बगल दिल्याचं जाणवतं. इन्स्पेक्टर गीताच्या नवऱ्याचं पात्र साकारताना रजत कपूरने अनंत महादेवन (तमिळ), सिद्दिक (मल्याळम) यांच्या  तुलनेत उत्तम अभिनय केला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

दिग्दर्शक जोसेफ आता ‘दृश्यम’ चित्रपटाचा मल्याळम सिक्वेल ‘दृश्यम २’ घेऊन आले आहेत. अमेझॉन प्राईमवर नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटात नायक जॉर्ज कुट्टी प्रेताची विल्हेवाट लावताना एक गुन्हेगार बघतो आणि सहा वर्षांच्या तुरुंगवासामधून बाहेर पडल्यावर पोलिसांच्या पुढील तपासामध्ये त्यांना मदत करतो. पहिला भाग बघितलेल्या प्रेक्षकांनाच सिक्वेलचा संदर्भ लागू शकतो, परंतु हे गृहीत धरल्यानंतरही पहिला तासभर चित्रपटामध्ये वातावरणनिर्मिती आणि पात्रपरिचयामध्ये अधिक वेळ घालवला आहे. शेवटच्या ४५ मिनिटांत जेवढं काही चित्रपटात घडतं, ते गुंगवून टाकणारं आहे. परंतु हाच भाग थोडा विस्तारानं अधिक वेळात दाखवला असता तर अधिक परिणामकारक ठरलं असतं. तसेच वास्तव घटना आणि प्रत्येक व्यक्तीनं त्याचा आपापल्या समजुतीप्रमाणे लावलेला अर्थ, त्याचे संदर्भ त्यांच्या बोलण्यामधून न येता ‘रशोमान’, ‘Vantage Point’, ‘तलवार’ चित्रपटांप्रमाणे प्रेक्षकांना दिसले असते, तर ‘दृश्यम’च्या विभ्रमाची अनुभूती घेता आली असती. 

मोहनलालच्या नैसर्गिक अभिनयासाठी ‘दृश्यम २’ बघण्यासारखा आहे. आपल्याला कायिक अभिनयाची आणि आवाजी अभिनयाची सवय झालेली असल्यामुळे नैसर्गिक अभिनय पचवणं, तोच चित्रपट दुसऱ्या वेळेस बघितल्यावर शक्य होतं. एक खून पचवणं सर्वसाधारण कुटुंबाला किती कठीण जाऊ शकतं, याचा मनोवेध दुसऱ्या भागात उत्तमरीत्या घेतला आहे. छोटी अनु आता मोठी झाली आहे. तिचे (एस्थर) तिच्या आईबरोबर (मीना) होणारे मतभेद दोघींनी चांगले वठवले आहेत. दुसऱ्या भागामध्ये पात्रांची गर्दी झाल्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ होऊ शकतो. कदाचित प्रेक्षक हाच चित्रपट दुसऱ्या वेळेस बघतील असं दिग्दर्शकानं गृहीत धरलं असावं. ते अमेझॉन प्राईमवर शक्यही आहे. नायक जॉर्जच्या कुटुंबीयांनी पहिल्या भागात जो खून केला, त्याचं कारण काय होतं, स्वतःच्या संरक्षणासाठी जे मिळेल ते शस्त्र हातात घेतलं तर त्याला हत्या कसं म्हणता येईल, असे काही मुद्दे दुसऱ्या भागामध्ये येत नाहीत, ज्याची चर्चा न्यायालयात होऊ शकली असती असं वाटतं. 

मल्याळम ‘दृश्यम’च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये त्या कुटुंबियांच्या मानसिकतेचा विचार खोलात जाऊन केला आहे, ज्यामुळे हे चित्रपट वरच्या दर्जाचे ठरतात हे खरं.    

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......