भारतीय सिनेमाच्या इतिहासात १९४८ साली प्रदर्शित झालेला ‘चंद्रलेखा’ हा सिनेमा एक मैलाचा दगड आहे. मद्रासच्या सुप्रसिद्ध जेमिनी स्टुडिओमध्ये बनलेल्या या नृत्यप्रधान सिनेमाने इतिहास घडवला! या स्टुडिओचे कर्तेधर्ते एस. एस. वासन यांनी या त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. एका ऐतिहासिक कथेवर आधारित असलेल्या या सिनेमामध्ये त्या वेळची सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री टी. आर. राजकुमारी हिची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाच्या निर्मितीला जवळपास पाच वर्षे लागली आणि तोपर्यंतचा हा सर्वाधिक खर्चिक सिनेमा बनला. विशेष म्हणजे काही बदल करून वासन यांनी हा सिनेमा हिंदीमध्येसुद्धा बनवला आणि त्याच वर्षी काही महिन्यानंतर तो प्रदर्शित झाला.
या सिनेमाच्या अनेक आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण होते नगारा नृत्य. जवळपास चारशे नर्तकांचा समावेश असलेल्या या गाण्यामध्ये कथकली, भरतनाट्यम आणि श्रीलंकेमधील कांद्यान नृत्य शैलींची नृत्ये होती. तामिळ भाषेतील हा सिनेमा जरी दक्षिण भारतामध्ये फारसा यशस्वी ठरला नाही, तरी हिंदी भाषेतील आवृत्तीने देशभर प्रचंड व्यवसाय केला. या सिनेमाद्वारे दाक्षिणात्य चित्रपटांना प्रथमच सिनेमा उद्योगाचे दरवाजे उघडले आणि त्याचबरोबर मद्रास फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी सिनेमा बनण्यास प्रारंभ झाला.
अशा अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या सिनेमाच्या निर्मितीमध्ये एका मराठी कलावंताचा प्रमुख वाटा होता, हे सांगितले तर अनेकांना आश्चर्य वाटेल. या चित्रपटाची श्रेयनामावली कितीही काळजीपूर्वक पाहिली तरीही प्रेक्षकांच्या ते लक्षात येणार नाही. या चित्रपटाचे रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) होते एस. सहदेवराव. हे अगदीच दाक्षिणात्य नाव आहे. परंतु दाक्षिणात्य सिनेमासृष्टीमध्ये सुरुवातीच्या कालावधीपासून ते जवळपास २५ वर्षे आपल्या हस्तकौशल्याची कमाल दाखवणाऱ्या या कलाकाराचे खरे नाव आहे- सहदेवराव तपकिरे!
..................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka
..................................................................................................................................................................
१९०९मध्ये नाशिक येथे जन्मलेल्या सहदेवराव यांनी भारतीय सिनेमाउद्योगाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या फिल्म कंपनीत वयाच्या आठव्या वर्षी प्रवेश केला. त्यांच्या ‘कालियामर्दन’ सिनेमासाठी कृष्णाच्या सवंगड्यांसाठी काही मुले हवी होती. त्यासाठी फाळके यांनी एक जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती. ती वाचून सहदेवराव यांच्या वडिलांनी त्यांच्या दोन मुलांना फाळके यांच्या स्टुडिओत पाठवले. त्यांचे वडील आर्य समाजाचे कार्यकर्ते आणि सुधारक विचारांचे होते. लहान सहदेवला बघता क्षणीच तो फाळके यांना आवडला आणि महिना दहा रुपये पगारावर त्यांचे सिनेमाजीवन सुरू झाले. तिथे त्यांना सिनेमाशी संबंधित बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. फाळके यांच्या सिनेमा कंपनीत शेवटपर्यंत राहिलेले सहदेवराव कदाचित एकमेव कलावंत होते. फाळक्यांनी त्यांना अगदी स्वतःच्या मुलासारखे मानले होते. त्यामुळे सहदेवराव बहुतेक वेळ फाळके यांच्या घरीच असत. लौकिकार्थाने त्यांचे शिक्षण झाले नसले तरी सिनेमाउद्योगाच्या बारीकसारीक गोष्टी सहदेवरावांना शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर फाळके यांच्या नाटकातही त्यांनी काम केले.
पुढे मुंबईमध्ये सहदेवराव हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये स्थिरावले. त्यांचे हिंदी चांगले असल्यामुळे त्यांना त्या काळात बऱ्याच भूमिका मिळाल्या. ‘राणा प्रताप’ या नाटकामध्ये त्यांनी त्या वेळच्या प्रसिद्ध अभिनेत्री गोहरबाई यांच्याबरोबरही काम केले. या वेळेस त्यांचा सर्वप्रथम रंगभूषा या कलेशी परिचय झाला. दरम्यान फाळके आणि त्यांचे भागीदार यांच्यात मतभेद झाल्याने दादासाहेब बाहेर पडले. त्यांनी पुन्हा नाशिक येथे आपली कंपनी सुरू केली आणि सहदेवरावांना बोलावून घेतले. फावल्या वेळेत सहदेवरावांनी रंगभूषा शिकायला सुरुवात केली. आपण सिनेमाक्षेत्रात हिरो वगैरे काही होणार नाही, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी आपणहून ही कला शिकायला सुरुवात केली.
सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांनी काढलेली चित्रे जमवून त्यातील व्यक्तिरेखा कशा रंगवल्या आहेत, याचा बारकाईने अभ्यास सुरू केला. यासाठी त्यांना दादासाहेब फाळके यांनी मार्गदर्शन तर केलेच, पण प्रोत्साहनही दिले. त्यामुळे सहदेवराव यांनी रंगभूषेमध्ये बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले. याचा उपयोग त्यांना मुंबईमध्ये सिनेमांत कामे मिळवण्यासाठी झाला. तो प्रसंग खूप गमतीशीर आहे.
डॉ. जेकिल आणि हाईड या संकल्पनेवर आधारित एक पौराणिक सिनेमा बनवण्याचे काम चालले होते. त्यामधील नायक दिवसा सुंदर होतो आणि रात्री त्याचे रूप खूप भयंकर होते. अशा पात्रासाठी रंगभूषा करण्याचे आव्हान सहदेवराव यांनी स्वीकारले. एके दिवशी ही रंगभूषा करून नायक स्टुडिओमधून खाली येताना रात्र झाली होती. एका माणूस त्यांना या भेसूर रूपात पाहून अगदी भेदरून गेला आणि भीतीने बेशुद्ध पडला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अशा तऱ्हेने सहदेवराव रंगभूषाकार म्हणून सिनेमाजगतात स्थिरावले. त्या वेळी त्यांना महिना ६५ रुपये पगार मिळत होता. दरम्यान मामा साने आणि आप्पासाहेब पटवर्धन अशा काही लोकांनी ‘गोदावरी सिनेस्टोन’ म्हणून नाशिकमध्ये सिनेमा कंपनी सुरू केली. त्यांच्या ‘सती सुलोचना’ या सिनेमासाठी म्हणून खास करून सहदेवराव यांना बोलावण्यात आले. त्यामध्ये बाबुराव पाटील यांनी रामाची, तर वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांनी लक्ष्मणाची भूमिका केली. शिरवाडकर पुढे कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध झाले आणि भारतीय साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ सन्मान त्यांना मिळाला. तरुण वयात शिरवाडकर यांनी ही भूमिका केली होती. दरम्यान सहदेवरावांनी पुण्यामध्ये बनत असलेल्या काही तेलुगु आणि कन्नड सिनेमांसाठी रंगभूषाकार म्हणून काम केले. त्या वेळी बाबुराव दातार हे एक आघाडीचे नट होते आणि शिवाजीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनासुद्धा रंगभूषेचे ज्ञान होते. अभिनय आणि रंगभूषा या दोन्ही गोष्टी त्यांना जमेनात म्हणून दातारांनी सहदेवरावांना मदतीस घेतले.
याच वेळेस, म्हणजे १९४०च्या सुमारास सहदेवरावांचा तेलगु दिग्दर्शक पी. पुलैया आणि जर्मनीहून चित्रपटकलेचे शिक्षण घेऊन परत आलेले रामनाथ शेखर यांच्याशी परिचय झाला. तिकडे मद्रासमध्ये वासन यांनी जेमिनी स्टुडिओ सुरू केला होता. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे कलावंतांची वानवा भासत होती. रामनाथ शेखर यांनी सहदेवरावांचे काम जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या शिफारसीवरून वासन यांनी सहदेवराव यांना जेमिनी स्टुडिओमध्ये काम करण्यासाठी आमंत्रित केले. त्यासाठी पावणे तीनशे रुपयांची भली मोठी ऑफर दिली. त्या वेळी मुंबईमध्ये सहदेवरावांना ६५ रुपये मिळत होते. त्यामुळे प्रथम यावर विश्वास बसणेच कठीण होते. परंतु एका ओळखीच्या सहकलाकाराकडून रीतसर पत्रच वासन यांनी पाठवले होते. त्या वेळी सहदेवरावांचे लग्न होऊन त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. त्यामुळे कुटुंब सोडून मुंबईहून दूरवर मद्रासला जाणे, हा एक मोठा धाडसी निर्णय होता. अशा वेळी त्यांच्या पत्नीने निक्षून सांगितले की, जायचे तर सर्वांनी, जेणेकरून काळजी करायचे कारणच राहणार नाही. ही गोष्ट १९४३ची.
एका अनोळखी प्रांतात जिथली भाषा अवगत नाही, तिथे नोकरीसाठी जाणे, तेही सिनेमासारख्या बिनभरवशाच्या धंद्यात ही खरोखरच मोठी गोष्ट होती. पण ऑफर चांगली आणि मोठी होती. त्यामुळे सहदेवरावांनी अखेर सहकुटुंब मद्रासला जायचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर पाहतात तर काय, सर्व मद्रास शहर युद्धाच्या सावटाखाली होते. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ब्लॅक आऊटमुळे सर्वत्र शुकशुकाट असायचा. अशा भीतीग्रस्त वातावरणात सहदेवराव जेमिनी स्टुडिओचे मालक वासन यांना भेटले. या पहिल्या भेटीतच त्यांनी कामाच्या कराराची मागणी केली. कारण जर करार केला, तर निदान काही कालावधीकरता तरी कामाची शाश्वती होईल हा विचार होता. युद्धाच्या वातावरणात मुंबईतील आपली स्थिर नोकरी सोडून सहदेवराव गेले होते. अशा वेळी केवळ एक-दोन सिनेमांत काम करवून घेऊन बोळवण केली असती तर सहदेवरावांवर दोन्हीकडील कामांना पारखे व्हायची वेळ आली असती.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
त्यात गंमत अशी की, सहदेवरावांना ना इंग्रजी येत होते आणि वासन यांना ना हिंदी समजत होते! तरीसुद्धा किमान दोन वर्षांच्या लेखीकराराच्या आपल्या मागणीवर सहदेवराव ठाम राहिले. वासनही काही कच्या गुरुचे चेले नव्हते. त्यांनी मोठ्या आपुलकीने सहदेवरावांना शब्द दिला की, जोपर्यंत जेमिनी स्टुडिओ मद्रासमध्ये आहे, तोपर्यंत ते कामावर राहतील. सहदेवरावांनी दिलदारपणे वासन यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला… आणि अशा तऱ्हेने एका मराठी कलावंताचे दाक्षिणात्य सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण झाले.
हा अनोखा प्रवास २५हून अधिक वर्षे यशस्वीरित्या चालू राहिला. मात्र सुरुवातीलाच असा एक प्रसंग घडला, जो कलावंताच्या मनस्वीपणाचा, चांगुलपणाचा आणि दिलदार वृत्तीचा प्रत्यय देणारा होता. पहिल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला सहदेवरावांना ऑफिसमध्ये बोलावले गेले आणि त्यांच्या हातात एक पाकीट देण्यात आले. त्यामध्ये तीन महिन्याच्या बोनसची रक्कम होती. परंतु सहदेवराव यांनी एका सच्च्या कलाकाराच्या भावनेतून ते स्वीकारायचे नाकारले. त्यांचे म्हणणे रास्त होते. एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांना बोनसचा अधिकारच नव्हता. आणि वरतून समजा ते पैसे खर्च झाले आणि नंतर चुकून परत मागितले तर काय करायचे! म्हणून त्यांनी ते पाकीट परत केले. ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार वासन यांच्या कानावर घातला. खरं तर इतर काही कलाकारांबरोबर सहदेवराव यांचे नाव चुकीने जोडले गेले होते. परंतु हा स्टुडिओच्या इज्जतीचा प्रश्न होता. वासन यांच्या मते दिलेले पैसे परत काढून घेतल्यास तो कलाकाराचा अपमान होईल. त्यामुळे त्यांच्या सूचनेवरून सहदेवरावांना पुन्हा बोलावले गेले आणि ती रक्कम त्यांना दिली गेली!
सुरुवातीला जेमिनी स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या काही सिनेमांचे त्यांनी रंगभूषेच्या दृष्टिकोनातून निरीक्षण केले आणि त्यांना पहिला तामिळ सिनेमा मिळाला. त्याची नायिका होती प्रसिद्ध अभिनेत्री रेखाची आई, पुष्पवल्ली. १९४४मध्ये आलेल्या या ऐतिहासिक सिनेमाचे नाव होते ‘दासी अपरांजी’. तो हिट झाला. त्यानंतर जेमिनी स्टुडिओने बनवलेल्या अनेक तामिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू सिनेमामध्ये सहदेवरावांनी अनेक पात्रांची रंगभूषा केली.
जेव्हा जेमिनी स्टुडिओचा ‘चंद्रलेखा’ मुंबई प्रांतात प्रदर्शित झाला आणि तुफान लोकप्रिय झाला, त्या वेळी मराठमोळ्या सहदेवरावांची आणि त्यांच्या कला-कौशल्याची ओळख इथल्या सिनेमाजगतामधल्यांना झाली. त्यानंतरचा सहदेवरावांनी केलेला आणखी एक उल्लेखनीय सिनेमा म्हणजे १९५३ मध्ये आलेला तामिळ संतपट ‘अव्वयार’. आपल्याकडील संत जनाबाईसारखी कथा असलेला हा सिनेमाही खूप लोकप्रिय झाला. त्या वेळच्या सुप्रसिद्ध गायक-अभिनेत्री के. बी. सुंदरामबल यांची त्यामध्ये प्रमुख भूमिका होती. जेमिनी स्टुडिओने हिंदीमध्ये चित्रपट बनवायला सुरुवात केल्यानंतर ‘दो दुल्हे’, ‘संसार’, ‘मि संपत’, ‘मंगला’, ‘निशाण’, ‘घुंघट’, ‘डुबती नैय्या’, ‘घराना’, इत्यादी अनेक चित्रपटांसाठी सहदेवरावांनी काम केले. हिंदीमध्ये ‘सहदेवराव तपकिरे’ असे त्यांचे नाव सिनेमाच्या श्रेय नामावलीमध्ये झळकले.
जगद्विख्यात नर्तक उदय शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कल्पना’ या सिनेमाची रंगभूषा सहदेवरावांनीच केली आहे. वेगवेगळ्या नृत्य प्रकारांचा समावेश असलेल्या या सिनेमाच्या श्रेय नामावलीत त्यांचे नाव ‘एन. सहदेवराव’ असे दाखवले गेले. विविध भारतीय नृत्यशैलींचा अभिजात मिलाप सिनेमाच्या पडद्यावर दाखवणाऱ्या या कृष्णधवल सिनेमासाठी रंगभूषा करण्याचे आव्हान सहदेवरावांनी अतिशय कौशल्याने पार पाडले. दिलीप कुमार आणि देव आनंद यांनी अभिनय केलेल्या एकमेव अशा ‘इन्सानिय’त १९५५ सालच्या सिनेमासाठी मुख्य रंगभूषाकार म्हणून सहदेवरावांचे नाव होते. त्यांचे मदतनीस चार लोक होते.
..................................................................................................................................................................
हेही पहा : ‘बेगुनाह’ने गुन्हा नक्कीच केला होता, पण त्याची शिक्षा अजूनही चालूच ठेवायची?
..................................................................................................................................................................
जेमिनीच्या हिंदी सिनेमांच्या यशामुळे स्टुडिओची ख्याती देशभर पसरली. त्याचा परिणाम म्हणून स्टुडिओचे मालक आणि कामगारांमध्ये तंटा सुरू झाला. वाढीव पगार आणि बोनसची मागणी कामगार युनियनकडून झाली. त्या सगळ्यात सहदेवराव एकटेच महाराष्ट्रीयन होते. पण त्यांनी युनियनमध्ये सहभागी होऊन संप करण्यास नकार दिला. त्यांच्या मते वासन यांनी जवळपास २५ वर्षे काहीही कमी पडू दिले नव्हते. परप्रांतीय असूनसुद्धा त्यांच्याविषयी कुठलाही भेदभाव केला नाही, उलट त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली. त्यामुळे इतर जणांबरोबर वासन यांच्याविरुद्ध न्यायालयात जाण्यास सहदेवरावांनी नकार दिला. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्रातून काही फिल्म स्टुडिओचे जुने रेकॉर्ड मागवण्यात आले आणि जेमिनीच्या रेकॉर्डबरोबर त्याची तुलना करण्यात आली. जवळपास २० वर्षांत फक्त एकदाच, तेही गांधीजींच्या हत्येच्या दिवशी कंपनीचा वेळेवर पगार झाला नाही. त्यामुळे या खटल्याचा निकाल वासन यांच्या बाजूने लागला. परंतु या सर्व प्रकारामुळे वासन यांना खूप मनस्ताप झाला आणि त्यांनी स्टुडिओमध्ये चित्रपटनिर्मिती बंद करण्याचा कटू निर्णय घेतला.
यानंतर वैजयंतीमाला, सरोजा देवी इत्यादी अनेक कलावंतांच्या आग्रहामुळे अजून पाच वर्षे सहदेवरावांनी मद्रासमध्ये काम केले. तोपर्यंत त्यांचे कुटुंब नाशिकला स्थिरस्थावर झाले होते. आयुष्याची उमेदीची वर्षे परप्रांतात काढल्यानंतर १९६९मध्ये सर्वांनी त्यांना परत येण्याचा आग्रह केला. त्या वेळी सहदेवरावांकडे पाच सिनेमांचे काम होते. ते सर्व त्यांनी एका रात्रीत आपल्या सहकाऱ्यांना वाटून दिले. त्यांच्या हाताखाली तोपर्यंत दहा-बारा असिस्टंट काम करत होते.
काळाचा महिमा असा होता की, मद्रासचा शेवटचा निरोप घेण्याच्या एक दिवस आधी वासन यांचे निधन झाले. आयुष्याच्या सर्व महत्त्वाच्या प्रसंगांत सहदेवरावांना वासन यांनी केवळ आधारच दिला नाही, तर सन्मानाने वागवले होते. तोच आधारवड निघून गेल्यानंतर सहदेवरावांचा मद्रास सोडण्याचा निर्धार अजून पक्का झाला. त्या वेळी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला, त्याला मद्रास सिनेमाजगतातले बहुतेक सर्व प्रमुख कलावंत हजर होते.
१९५० आणि १९६०च्या दशकात एक मराठी कलावंत दक्षिण भारतातील एका प्रमुख चित्रपट स्टुडिओत आपला जम बसवतो ही एक अपूर्व गोष्ट होती. केवळ जम बसवून थांबत नाही, तर आपल्या कौशल्यामुळे उणीपुरी २५ वर्षे काम करून यशस्वी होतो. कोणतेही अधिकृत शिक्षण घेतले नसतानाही सहदेवरावांची आपल्या कलेवर हुकूमत होती. वैजयंतीमालासारखी आघाडीची तारका त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडून रंगभूषा करून घेण्यास तयार नसायची.
ज्या वेळी लता मंगेशकर जेमिनी स्टुडिओमध्ये सर्वप्रथम गाण्यासाठी मद्रासला गेल्या, तेव्हा वासन यांनी त्यांची सर्व व्यवस्था पाहण्यास सहदेवरावांनाच सांगितले. वासन यांनी लतादीदींना आश्वस्त केले की, एक मराठी माणूस त्यांची काळजी घेईल. त्याचबरोबर वासन यांनी सहदेवरावांना बजावले की, लतादीदींची अशा प्रकारे देखभाल करा की, जेणेकरून जेमिनी स्टुडिओची इज्जत राहील!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
असा हा मनस्वी कलावंत आपल्या मायभूमीत १९७०मध्ये परत आला. त्यानंतर त्यांनी आनंदाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. दादासाहेब फाळके यांच्याबरोबर काम केलेले त्यांचे काही सहकारी नाशिकमध्ये होते. या जुन्या कलावंतांना सरकारतर्फे मानधन मिळत होते. त्यांनी सहदेवरावांनाही अर्ज करण्यास सांगितले. मात्र मानी सहदेवरावांनी तसे करण्यास नकार दिला. त्यांच्या मते सरकारने आपणहून कलावंतांची कदर करायची असते. अर्ज-विनंत्या करून मदत मिळवणे त्यांना मंजूर नव्हते.
दादासाहेब फाळके यांच्या छत्रछायेखाली तयार झालेल्या या मराठी कलावंताने आपला झेंडा दक्षिणेत फडकावला. रंगभूषाकार सिनेमानिर्मितीतला एक महत्त्वाचा घटक असतो. भारतामध्ये सिनेमाउद्योग सुरू झाल्यानंतर रंगभूषा ही स्वतंत्र कला नव्हती. तिचे तंत्र विकसित झाले नव्हते. अशा वेळी स्वतःहून रस घेऊन सहदेवराव या कलेतील तंत्रे शिकले. रंगभूषाकार म्हणून त्यांनी आपले प्रभुत्व सिद्ध केले.
मूकपटांपासून आपली कारकीर्द सुरू केलेल्या सहदेवरावांनी सिनेमासृष्टीत झालेली अनेक स्थित्यंतरे पाहिली. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील काही मानाच्या सिनेमांची रंगभूषा सहदेवराव तपकिरे यांची आहे. फाळके ते वासन असा मोठा प्रवास केलेला हा मराठी कलावंत ११२ वर्षानंतर विस्मृतीत गेला असला तरी या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत त्यांचे स्थान अबाधित आहे… आणि राहील!
..................................................................................................................................................................
लेखक प्रकाश मगदूम ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे’चे (National Film Archive of India, Pune) संचालक आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची व्यक्तिगत आहेत.
prakashmagdum@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment