‘सर’ : ही गोष्ट एका हळुवार नात्याची आहे… ‘सर’वरून ‘अश्विन’पर्यंत जाणाऱ्या रत्नाच्या प्रवासाची आहे!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रिया सामंत
  • ‘सर’ या सिनेमाचे पोस्टर
  • Tue , 12 January 2021
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा सर SIR रोहेना गेरा Rohena Gera तिलोत्तमा शोम Tillotama Shome विवेक गोम्बर Vivek Gomber गीतांजली कुलकर्णी Geetanjali Kulkarni

‘मेड इन मॅनहॅटन’, ‘रोमा’, ‘द मेड’ अशा अनेक सिनेमांमधून घरकाम करणाऱ्या महिलांची गोष्ट दाखवली गेलीय. काहीशी तशीच कहाणी रोहेना गेरा यांच्या ‘सर’ या सिनेमातही पाहायला मिळते. मुळात २०१८च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा भारतात मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात काही ठराविक थिएटर्समध्ये पाहता आला. तो आता ९ जानेवारीपासून ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध झालाय.

सिनेमाच्या पोस्टरवर भिंतीच्या अलीकडे आणि पलीकडे असणारे ते दोघं दिसतात. त्यातून त्यांच्यातल्या नात्याच्या बंधाची झलक पाहायला मिळते. या सिनेमाची कथा काही फार ‘आउट ऑफ बॉक्स’ वाटावी अशी नाही, पण तो सरस ठरतो त्यात काम करणाऱ्या कलाकारांच्या अभिनयामुळे.

सिनेमाची सुरुवात रत्ना (तिलोत्तमा शोम) या मोलकरणीपासून होते. ती अश्विन (विवेक गोम्बर) याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत असते. तो तिला सुट्टीवरून मध्येच बोलावतो. त्यामुळे रत्ना तिच्या घरातून बॅग भरून मुंबईला यायला निघते. ती त्याच घरात ‘सर्व्हंट रूम’मध्ये राहत असते. पहिल्या पाच मिनिटांत आपल्याला कळतं की, घरमालक असलेल्या अश्विनचं लग्न मोडलंय आणि तो परत येतोय म्हणून त्याने मोलकरीण रत्ना आणि ड्रायव्हर राजू यांना परत बोलावलंय.

अश्विन उच्चभ्रू आहे, पण तो टिपिकल आणि श्रीमंतीचा माज करणारा नाही. रत्ना मोलकरीण असली तरी एक अंतर राखून त्याची काळजी करणारी स्त्री आहे. स्वतः शाकाहारी असली तरी त्याच्यासाठी ती मटण आणून करते.

नंतर अश्विनचे आई-वडील येतात. त्यांच्या आणि इतरांच्या बोलण्यातून कळतं की, जिच्याबरोबर अश्विन ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असतो आणि त्यांचं लग्न होणार असतं त्या मुलीने त्याला ‘चिट’ केलं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

रत्नाला फॅशन डिझायनिंग करायचं असतं. तिची मैत्रीण लक्ष्मी (गीतांजली कुलकर्णी) तिला त्यासाठी मदत करत असते. लग्न मोडल्याने अश्विन त्याची चिडचिड उघडपणे दाखवत नसला तरी रत्नाला ते कळत असतं आणि एका योग्य वेळी ती त्याला स्वतःच्या आयुष्याबद्दल थोडक्यात सांगून ‘मूव्ह ऑन’ करणं कसं सोपं असू शकतं, हे सांगण्याचा प्रयत्न करते.

रत्नाला फॅशन डिझायनर व्हायचं असलं तरी घराची जबाबदारी सांभाळताना, मुंबईत नोकरी करताना तिला आत्मविश्वास मिळतो. ‘जिने में क्या जाता है’ हे गाणं रत्नाची परिस्थिती, तिचा स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास व्यक्त करतं. तर दुसऱ्या बाजूला भावाच्या मृत्यूमुळे न्यू यॉर्कमधलं आपलं लेखक बनण्याचं स्वप्न अर्धवट सोडून अश्विन भारतात आलेला असतो.

परिस्थिती काहीही असली, सामाजिक स्तर काहीही असला तरीही तिच्या डोळ्यात तिची स्वप्नं कायम असतात. हे बघून अश्विनसुद्धा तिला मदत करायला लागतो. मात्र त्यांच्यात आर्थिक, सामाजिक दरी असते आणि त्याची त्या दोघांनाही जाणीव असते. पण तरीही त्यांच्यात एक व्यक्त-अव्यक्त असं नातं तयार होतं.

रत्ना तिच्या बहिणीच्या शिक्षणासाठी पैसे साठवत असते. बहिणीला मात्र लग्न करून मुंबईत येण्याची ओढ असते. त्यातून दिग्दर्शकाने गावात राहणाऱ्यांना मोठ्या शहरांमधल्या झगमगाटाचं असलेलं आकर्षण दाखवलं आहे. रत्नाबरोबर काम करणाऱ्या लक्ष्मीचं व्यक्तिगत आयुष्य थोडंफार त्याच्यासारखंच असलं तरी तिचे कामाच्या ठिकाणचे अनुभव वेगळे असतात. नवरा गेलेल्या बाईकडे पाहिल्या जाणाऱ्या दृष्टिकोनाविषयी छोट्या-छोट्या घटनांमधून नेमकं भाष्य केलं आहे.

.................................................................................................................................................................

विसंगती व सुसंगती समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक - वासंती दामले

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/4299/Madhyamvarg---ubha-adva-tirpa

.................................................................................................................................................................

दुसऱ्या बाजूला अश्विनचे उच्चभ्रू सोसायटीतले मित्र-मैत्रिणी आहेत. त्यांच्या आधुनिक विचारांमध्ये आर्थिक, सामाजिक स्तरातल्या दरीचं, त्यांच्या ‘स्टेटस’चं महत्त्व आहे. घरमालक असलेला एक सिंगल बॅचलर आणि त्याच्या घरी विधवा असलेली मोलकरीण यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उठवणारे आजूबाजूचे लोक आहेत.

रत्ना बहिणीच्या लग्नासाठी गावी गेल्यावर तिच्या असण्याची सवय झालेला अश्विन तिच्या खोलीत जाऊन त्यात तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तिथेच त्याला त्याच्या एकटेपणाची जाणीव होते आणि तो तिला फोन करतो. रत्नाला त्याचं हे असं फोन करणं वेगळं वाटतं. व्यक्तिगत आयुष्यात एकटे असलेले ते दोघे, त्यांच्यातल्या त्या भावनिक बंधामुळे एका मोहाच्या क्षणी जवळ येतात, पण तरीही त्यानंतर एक अवघडलेपण येतं.

इथं दिग्दर्शकाला ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेता आली असती, पण ती घेतलेली नाही. परिणामी त्यांचे मार्ग वेगवेगळे होतात. त्यात दोघांना आलेलं रितेपण असतं. पण ते मात्र त्यांना आपापल्या वैयक्तिक स्वप्नांच्या जवळ घेऊन जातं.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची कामं उत्तम आहेत. तिलोत्तमा शोम आणि विवेक गोम्बर हे सध्याच्या भारतीय सिनेमात उत्तम काम करणाऱ्या कलाकारांमध्ये का गणले जातात हे यातल्या त्यांच्या अभिनयावरून कळतं. तिलोत्तमाने रत्नाचं पात्र अगदी अप्रतिम रंगवलंय. विवेकही अगदी संयतपणे वेळोवेळी व्यक्त होतो.

गीतांजली कुलकर्णीही लक्ष्मीच्या भूमिकेत ठसा उमटवून जातात. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं पात्र या सिनेमात आहे. ती म्हणजे अश्विनच्या घराची गच्ची. तिथली संभाषणं पात्रांचं, त्यांच्या विचारांचं, आयुष्याचं आणि शहराचं प्रतिबिंब दाखवते. कथानक, दिग्दर्शन, गुणी कलाकार, त्याला लाभलेलं साजेसं पार्श्वसंगीत, यामुळे हा सिनेमा एक ‘ट्रीट’ आहे.

ही गोष्ट अश्विन-रत्ना यांच्या हळुवार नात्याची आहे… शहरात राहणाऱ्या आणि एकट्या असणाऱ्या पण स्वप्नं पाहणाऱ्यांची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘सर’वरून ‘अश्विन’पर्यंत जाणाऱ्या रत्नाच्या प्रवासाची आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका श्रिया सामंत कला, साहित्य, सिनेमा, नाटक, इतिहास आणि संस्कृती यांच्या अभ्यासक, आस्वादक आहेत. त्याचबरोबर त्या भाषांतरकार आणि अनुवादक म्हणूनही काम करतात.

shriyasamant30@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 13 January 2021

उत्सुकता वाढवणारं छान परीक्षण.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख