अजूनकाही
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीची ही एक जुनी आठवण...
..................................................................................................................................................................
ही जवळपास ३५ वर्षांपूर्वीची घटना आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टने १९८६ साली आम्हां भारतीय पत्रकारांसाठी बल्गेरियात पत्रकारितेचा कोर्स आयोजित केला होता. १९८०च्या दशकात अमेरिका आणि रशियामध्ये चालू असलेल्या शीतयुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टतर्फे रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपियन ब्लॉकमध्ये म्हणजे पूर्व जर्मनी, पोलंड, इटली वगैरे व्हर्साय करारात सामिल असलेल्या देशांत भारतीय पत्रकारांसाठी असे अभ्यासक्रम दौरा आयोजित करत असे. त्या वर्षी बल्गेरियाने भारतीय प्रतिनिधींसाठी पत्रकारिता अभ्यासक्रम आयोजित केला होता आणि गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचा सरचिटणीस म्हणून मीही या अभ्यासक्रम दौऱ्यात सहभागी झालो होतो.
दररोज संध्याकाळी सात वाजता रात्रीचे जेवण झाल्यानंतर जवळच्या रेस्त्रामध्ये वाईन किंवा व्होडका पित संगीताचा आणि नृत्याचा अनुभव आम्ही घेतू असू. त्या वेळी तेथे पारंपरिक बल्गेरियन पोशाखातील गायक-वादकांचा चमू अंधुक प्रकाशात आपली कला सादर करत असे. त्या गार्डन रेस्त्रामधील काही ग्राहक मध्येच आपले टेबल सोडून मध्यभागी असलेल्या डान्स फ्लोरवर नृत्यात सामील होण्यासाठी जात असत.
बल्गेरियात महिनाभरापेक्षा जास्त काळ घालवल्यामुळे आता डान्स फ्लोरवर चाललेल्या नृत्यामध्ये सामील होण्याइतकी आम्हा भारतीयांचीदेखील भीड चेपली होती. डान्स फ्लोरवर अनोळखी लोकांसह नाचगाण्यात सहभागी होण्यास तिथल्या तरुण मुली आणि स्त्रियांची काहीच हरकत नसायची, हे आता अनुभवाने आम्हाला समजले होते! मात्र सभ्यतेने वागायचे, अशी किमान अपेक्षा असायची.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
तर त्या दिवशी व्होडका (बल्गेरियन उच्चार ‘बोदका’) पीत असताना तेथील भिंतीवरील एका छायाचित्रावर माझी नजर गेली आणि क्षणभर मी चमकलो. भिंतीवरचे ते कृष्णधवल छायाचित्र अगदी परिचित होते. पण त्या छायाचित्राबद्दल खात्री करण्यासाठी मला माझ्या भारतीय मित्रांचे लक्ष वेधून घ्यावे लागले. सुरुवातीला काहींनी अविश्वास व्यक्त केला, मात्र काही क्षणांतच त्या छायाचित्राबद्दल आम्हा कुणालाही शंका राहिली नाही. ते छायाचित्र हिंदी चित्रपट अभिनेता राज कपूर यांचे होते, यात कसलाच वाद नव्हता.
बल्गेरियात राज कपूरचे छायाचित्र कसे काय, याचे आम्हाला आश्चर्य वाटत होते!
आमच्यातील काही पत्रकार त्यांची उत्सुकता दाबू शकले नाहीत. त्यांनी रिसेप्शन काऊंटरकडे धाव घेतली. तेथील लोकांना इंग्रजी समजत नव्हते, परंतु हावभाव आणि काही शब्दांच्या मदतीने आम्हाला कळले की, राज कपूर बल्गेरियातही खूप लोकप्रिय आहेत!
मात्र आमच्या आश्चर्याची मालिका अजून संपायची नव्हती. आम्हा भारतीय पत्रकारांच्या त्या छायाचित्राबाबतच्या सुरुवातीच्या कुजबुजीचे उच्च स्वरातील संवादात रूपांतर झाले होते. तोपर्यंत तिथल्या वाद्यचमूने आपले एक गाणे संपवून आमच्याकडे पाहत दुसरे गाणे सुरू केले. आपली छडी वरखाली करत कॉयर मास्टर आपल्या वाद्यचमूला मार्गदर्शन करत असला तरी त्याचे पूर्ण लक्ष आमच्याकडेच होते. कारण आता वाजवले जाणारे गीत होते – ‘मेरा जूता है जपानी...’
वाद्यचमूतल्या एकाने राज कपूरच्या ‘त्या’ खास शैलीत पदन्यास करत नाचणे सुरू केले, तेव्हा तर त्या रेस्त्रामधील लोकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. मग आम्हाला समजले की, राज कपूरचे हिंदी चित्रपट आणि ‘आवारा हूं...’ सारखी त्यांची गाणी रशिया आणि पूर्व युरोपियन देशांमध्येही लोकप्रिय आहेत.
रेस्त्रामध्ये आम्ही इतरांशी बोललो, तेव्हा आम्हाला कळले की, राज कपूर हे फक्त बल्गेरियातच नव्हे तर सोव्हिएत रशिया आणि रशियाचा प्रभाव असणाऱ्या पूर्व युरोपियन राष्ट्रांमध्येही एक घरगुती नाव आहे.
या दौऱ्यादरम्यान मला कळाले की, सोव्हिएत रशियामध्ये दोन भारतीय सर्वांत लोकप्रिय होते. त्यापैकी पहिली म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसरी, अभिनेता राज कपूर. आमच्या मॉस्कोच्या दौऱ्यात एका महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चौकात इंदिरा गांधींचा पूर्ण-आकाराचा पुतळा मी बसमधून पाहिला होता.
याशिवाय बल्गेरियात आणखी एक भारतीय नाव लोकप्रिय होते. ती तिसरी व्यक्ती म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते कवी रवीन्द्रनाथ टागोर. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवीन्द्रबाबू टागोर बल्गेरियात आले होते. त्यांच्या कवितांचे बल्गेरियन भाषेत अनुवाद झाले आहेत.
एके दिवशी आम्ही बल्गेरियातील एका शहरातील कापड कारखान्यास भेट दिली. तिथून परतताना तिथला एक मध्यमवयीन कर्मचारी आमच्याकडे लिफ्टपाशी आला. डोक्यावरची आपली हॅट त्याने हातात घेतली आणि राज कपूर यांच्या खास शैलीत पदण्यास करत तो ‘आवारा हूं, आवारा हूं....’ या गाण्याची धून गाऊ लागला!
आम्ही आवाक् झालो. राज कपूर यांच्या देशातले लोक म्हणून आमच्याशी हस्तांदोलन करून तो राज कपूरचा चाहता आपल्या कामाकडे वळला.
(काही वर्षांपूर्वी युरोप दौऱ्यात पॅरिसमधील एका सुपरमार्केटमध्ये एका तरुण कॅशियरशी मी बोलत होतो. माझ्या मुलीने त्या संभाषणाच्या ओघात सांगितले की, आम्ही भारतीय पर्यटक आहोत. तेव्हा त्या पोरगेल्या कॅशियरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती – ‘शाहरुख खान्स इंडिया!’ त्याचे ते उद्गार आमच्यासाठी सुखद आश्चर्य होते. त्या तरुणाला फारसे इंग्रजी येत नव्हते, परंतु तरीही संभाषण करण्यात आम्ही यशस्वी झालो. तो म्हणाला की, ‘एसआरकेचा चाहता आहे, शाहरुखचे हिंदी चित्रपट, नाचगाणे आणि संगीत मला आवडते.’ फ्रेंच भाषेतील सब-टायटल्स वाचली नाही तरी त्याला शाहरुखच्या चित्रपटाची कथा समजत होती. हृतिक रोशन, आमिर खान आणि इतर भारतीय कलाकारांचे हिंदी चित्रपटही त्याला आवडतात असेही त्याने सांगितले.
भारतीय चित्रपट अभिनेत्यांनी आपल्या राष्ट्रीय, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा पार केल्या आहेत. किंग खान आणि हिंदी चित्रपट कलावंतांच्या नव्या पिढीने राज कपूरचा ‘भारताचा सांस्कृतिक राजदूत’ होण्याचा वारसा खरोखरच चालू ठेवला आहे.)
बल्गेरियातला पत्रकारिता अभ्यासक्रम कोर्स संपल्यानंतर सोफिया येथून मॉस्कोमार्गे आम्ही भारतात परतत होतो. हवाई प्रवासात ताश्कंदला काही काळ थांबलो. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ताश्कंद या शहरात अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या शहरात पाऊल ठेवताक्षणी कुणाही भारतीयाला शास्त्रींची आठवण येतेच. पहाटे आमचे विमान नवी दिल्लीत पोहोचले. नव्यानेच बांधण्यात आलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नुकतेच झाले होते. परंतु त्या काळात प्रवाशांना विमानापासून चेक-इन काउंटरपर्यंतचे लांब पल्ल्याचे अंतर पार करण्यासाठी हल्लीच्या सरकत्या पट्ट्यासारखे कोणतेही साधन नव्हते. आम्ही सहकारी त्या बंद कॉरिडॉरमधून चेक-इन काउंटरकडे चालत जात होतो, तेव्हा अचानक माझी नजर एका वयस्कर सह-प्रवाशावर पडली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
जास्त वजनाच्या सूटकेस विमानाच्या कार्गो विभागात पाठवता येत नसल्याने माझ्या अंगावर आणि हातात जड, उबदार कपडे व इतर सामान होते. त्या गोऱ्यापान, लालबुंद चेहऱ्याच्या स्थूल वृद्ध प्रवाशाकडे मात्र बिलकूल सामान नव्हते. थोड्या वेळाने जवळून जात त्या वृद्ध प्रवाशाला मागे टाकले, तेव्हा ते थोडे थकल्यासारखे दिसले. त्या कॉरिडारमध्ये रांगेत असलेल्या रंगीबेरंगी बकेट सीटस होत्या, त्यापैकी एका खुर्चीत ते मटकन बसले. थकल्यामुळे त्याचा अतिशय गोरा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता.
मी अचानक थबकलो.
ते राज कपूर होते. सोव्हिएत रशिया किंवा इतर पूर्व युरोपियन देशांचा दौरा करून ते मॉस्कोमार्गे विमानाने आमच्याबरोबरच प्रवास करत दिल्लीला परतत होते.
या महान चित्रपट अभिनेत्यापासून काही फूट अंतरावरच मी उभा होतो. काय करायला हवे होते, तेही परदेशात या कलावंताची लोकप्रियता अनुभवल्यावर? मला आजही असे वाटते की, भारतीय चित्रपटसृष्टीच्या या महान कलावंताबरोबर मी किमान हस्तांदोलन करायला हवे होते. रशिया आणि बल्गेरियात त्यांच्यामुळे आम्हा भारतीयांना अभिमानाची वागणूक मिळाल्याबद्दल त्यांच्याविषयीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती. पण यापैकी मी काहीही करू शकलो नाही. त्याचे कारण म्हणजे स्वत:चा लाजाळूपणा आणि सेलिब्रिटी व्यक्तीच्या खासगीपणाचा भंग करून त्यांना त्रास न देण्याची इच्छा.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
त्यामुळे काहीही न बोलता इतर सहकाऱ्यांबरोबर घाईघाईने विमानतळाच्या काउंटरकडे चालत गेलो. थोड्या वेळाने न राहवून मागे वळून पहिले, तेव्हा थोडीशी विश्रांती घेऊन राज कपूर यांनी चालणे सुरू केले होते.
या घटनेनंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८८च्या जूनमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठेचा असलेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांना जाहीर झाला. (हिंदी सिनेसृष्टीतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान चित्रपट कलावंताला त्याच्या अखेरच्या काळातच का देतात, हे कोडे मला आजही उलगडलेले नाही.) त्या पुरस्कार सोहळ्यात दम्याचा त्रास असलेले राज कपूर कोसळून खाली पडले. त्यानंतर काही दिवसांनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज इतक्या वर्षांनंतरही बल्गेरियातील त्या गार्डन रेस्त्रामध्ये भिंतीवर लावलेले राज कपूर यांचे ते कृष्ण-धवल छायाचित्र आणि त्या परदेशी लोकांनी गायलेले ‘आवारा हूं... आवारा हूं’चे सूर अजूनही माझ्या मनात ताजे आहेत.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment