अजूनकाही
मागच्या वर्षी 'पिंक' या चित्रपटानं जे समाजमन ढवळून काढण्याचं काम केलं, ते यावर्षी श्लोक शर्मा या दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट 'हरामखोर' करणार, असं दिसतंय. अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण अशा मथळ्याच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रांतून वाचतच असतो. त्याबद्दल क्षणभर चुकचुकतो आणि पुढे निघून जातो. पण हा सगळा प्रकार कसा होत असेल, यात चूक कोणाची, किती, या सर्व गोष्टींचा दिग्दर्शकाने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी वेध घेतला आहे. तोही हा प्रश्न सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून. म्हणजे त्याच्या अनेक बाजूंचा बारकाईने विचार करून.
वयात येणाऱ्या शाळकरी मुलींच्या बाबतीत लपूनछपून सर्रास होणाऱ्या या प्रकाराला काहीजणी प्रेम समजून फसतात, काही त्या व्यक्तीला धडा शिकवतात आणि काहीजणी सहजपणे तो भूतकाळ विसरून पुढे निघून जातात. मात्र या कथेत कोणीच धुतल्या तांदळाचं नाही. प्रत्येक व्यक्तीतला हरामखोरपणा हा प्रसंगानुरूप कसं डोकं वर काढतो, त्यावर हा चित्रपट भाष्य करतो.
श्याम हा गणिताचा शिक्षक संध्या या नववीत शिकणाऱ्या त्याच्या विद्यार्थिनीकडे आकर्षित होतो. आई नाही आणि वडिलांना वेळ नाही, अशा समस्येत सापडलेली संध्या श्याममध्ये आपल्या दुप्पट वयाचा प्रियकर शोधते. त्याच वेळी कमल या तिच्याच वर्गातल्या मुलालाही तिच्याबद्दल आकर्षण वाटत असतं. मिंटू हा त्याचा मित्र संध्याशी जवळीक साधायला त्याला मदत करतो, पण संध्या आपल्या शिक्षकातच गुंतलेली असते. त्याचं लग्न झालं आहे, हे माहीत असूनही. चित्रपटातील एका संवादातून तिच्या मनातला गोंधळ स्पष्ट होतो. संध्या निरागस वगैरे नक्कीच नाही, पण श्याममध्ये ती वडिलांची प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न करते. श्यामने सगळे करूनसवरून झाल्यावर स्वतःचं लग्न वाचवण्यासाठी पुन्हा भेटण्यास मनाई करण्याचा निर्लज्जपणा दाखवूनही ती त्याला पाठीशी घालते.
कमलच्या दृष्टीने श्याम म्हणजे त्याच्या प्रेमकथेतला व्हिलन. त्यामुळे तो त्याला नामोहरम करण्याचे सगळे प्रयत्न मनापासून करतो. संध्याची सावत्र आई तिची मैत्रीण बनून हे सगळं पाहते. माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे या चित्रपटात अतिशय सुंदर पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कथेत कोणी एक हिरो किंवा व्हिलन नाही. सर्वांच्या स्वभावाला असलेल्या ग्रे शेड्समुळे यातली पात्रं खरी वाटतात. आपल्या आजूबाजूला यातली सगळी माणसं आपण कधी ना कधी तरी पाहिल्याचं चित्रपट पाहताना पदोपदी जाणवत राहतं. कथा, पटकथा, संवाद, संकलन आणि अभिनय सगळंच मस्त जमून आलंय. कॅमेरावर्कही उत्तम आहे. त्यामुळे कथा मनावर अधिक ठसते.
नवाजउद्दीन सिद्दिकीच्या वाट्याला आलेली श्यामची भूमिका हा त्याच्या आधीच उत्तम चाललेल्या करिअरमधला अजून एक टर्निंग पॉइंट म्हणायला हवा. 'सखाराम बाइंडर' पाहताना म्हणे प्रेक्षक नाना पाटेकर यांना जोडे फेकून मारायचे. नवाजउद्दिनने हेच काम या चित्रपटात केलं आहे. त्याने निभावलेल्या पात्राला सडकून शिव्या हासडाव्याशा वाटतात. पायाखाली तुडवावं वाटतं. इतकी त्याने या पात्रात जान ओतली आहे. अश्लील शिव्या द्याव्यात त्या फक्त नवाजउद्दीनने. इतर अभिनेत्यांनी त्याच्याकडून प्रशिक्षण घ्यायला हरकत नाही.
श्वेता त्रिपाठी या मुलीने 'मसान' या चित्रपटातून पदार्पणातच आपण काय चीज आहोत, हे दाखवून दिलं होतं. 'मसान'मध्ये रिचा चड्ढा आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका लक्षात राहिल्या असल्या, तरी त्यांच्याच जोडीने तिनेही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. हा चित्रपट तिला खूप अवॉर्ड्स मिळवून देईल यात शंका नाही, पण तिचं कौतुक करावंसं वाटतं ते यासाठी की, प्रत्यक्षात तिशीत असूनही ती एक शाळकरी मुलगी अक्षरशः जगली आहे.
त्याचबरोबर इरफान खान, मोहम्मद समद आणि शक्तिमानची भूमिका करणारा तिसरा मुलगा, या तिघांनी चित्रपट आपल्या खिशात घातला आहे. इतर सर्व कलाकारांचा अभिनयही तोडीस तोड. या चित्रपटाचा शेवट ज्या विचित्र पद्धतीने केला आहे, ते पाहून अंगावर काटा येतो.
लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment