अजूनकाही
‘वंडर’ ही कथा आहे ऑगस्ट उर्फ ‘ऑगी’ या मुलाची, ज्याचा चेहरा इतर मुलांपेक्षा फार वेगळा आहे. त्यामुळे त्याला आजपर्यंत शाळेत न पाठवता ‘होम स्कूलिंग’ पद्धतीप्रमाणे घरातच शिकवले गेले. परंतु आता त्याच्या पालकांनी धाडस करून त्याला पाचवीमध्ये शाळेत पाठवण्याचे ठरवल्यानंतर त्या मुलाला आणि एकूणच त्याच्या कुटुंबियांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, याचे चित्रण म्हणजे हा सिनेमा.
पालक-शिक्षक-मुले आणि समाजात वावरणाऱ्या आपण सर्वांनीच बघायला हवा, असा हा सिनेमा आहे. अर्थात यातला ज्युलिया रॉबर्टसचा अभिनय बघणं ही दुसरी जमेची बाजू आहेच. २०१७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला आहे.
आर. जे. पलासीयो यांची ‘वंडर’ ही सत्यघटनेवर आधारित कादंबरी ऑगी या वेगळ्या चेहऱ्याच्या मुलाबद्दल आहे. ऑगीचे कुटुंबीय म्हणजे त्याची आई इसाबेल, वडील नेट आणि बहीण व्हिया यांचं जग त्याच्या अवतीभोवती जाणते-अजाणतेपणाने फिरत असतं आणि बाहेरचं जग कोणाचीही हुशारी/वर्तन न बघता चेहरा बघून पारख करत असल्यामुळे कुटुंबियांच्या जगात अनेक प्रश्न निर्माण होतात.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
..................................................................................................................................................................
चौथीपर्यंत होम स्कूलिंग केल्यानंतर ऑगीला पाचवीपासून शाळेत पाठवण्याचा निर्णय त्याची आई घेते. तो शाळेत गेल्यानंतर त्याला मित्रांच्या शेरेबाजीचा सामना करावा लागतो. त्याचे एका मित्राबरोबर चांगले संबंध जुळतात, परंतु एक दिवस तो मित्रही इतर मुलांच्या सांगण्यावरून अशा शेरेबाजीमध्ये सहभागी होतो. शाळेतला शिक्षक वर्ग ऑगीच्या भन्नाट कल्पक बुद्धीचं कौतुक करत असला तरीही तो वर्गातल्या निखळ मैत्रीला पारखा होतो.
ही परिस्थिती ऑगीचे आई-वडील, शाळेतले विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर पालक कशी हाताळतात, हे पाहण्यासारखं आहे. यातल्या अनेक मनोवेधक प्रसंगांतून पटकथाकार स्टीव्हन श्बोस्की, स्टीव्ह कोनरॅड, जॅक थॉर्न यांनी मुलांचं, पालकांचं भावविश्व यांचं संतुलन राखलं जाईल, याची काळजी घेतली आहे.
शेवट मात्र लोकप्रिय करण्याकडे कल दिसून आला. अशा कथेचा/चित्रपटाचा शेवट गोड करण्यावरून ‘तारे जमीन पर’ चित्रपटाच्या दिग्दर्शक अमोल गुप्ते आणि आमीर खान यांच्यात मत-मतांतरं झाल्याचं आपल्याला माहीत आहेच.
दिग्दर्शक स्टीव्हन श्बोस्की यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय तरलरीत्या केलं आहे. मुख्य म्हणजे दया, करुणा यांचं अवडंबर माजवत, प्रेक्षकांना रडायला लावून सिनेमा गाजवण्याचं तंत्र अवलंबलं नाही हे विशेष. ऑगीच्या घरातील सर्वांचंच लक्ष त्याच्या सर्वांगीण वाढीवर असल्यामुळे त्याच्या बहिणीला मिळणारी दुय्यम वागणूक हा सहसा दुर्लक्षिला जाणारा प्रश्नही संयतपणे मांडला आहे. शाळेत गेली पाच वर्षं शिकणाऱ्या मुलांसाठी ‘वर्गात विशेष काही बघण्यासारखं’ नसतं, परंतु इतकी वर्षं ‘होम स्कूलिंग’ करणाऱ्या ऑगीला सगळ्याचंच कौतुक असतं, असे प्रसंग सिनेमॅटोग्राफर डॉन बर्गेस यांनी विलक्षण तरलतेनं पण सहजगत्या दाखवले आहेत.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
ज्युलिया रॉबर्टसने अप्रतिम अभिनय केला आहे, हे वाक्य द्विरुक्ती साधणारं आहे. ती डोळ्यातून बोलते, तिचा चेहरा बोलतो, हे आपण यापूर्वी तिच्या अनेक चित्रपटांत पाहिलं आहे. उदाहरणार्थ ‘एरीन ब्रोकीवीच’ या चित्रपटात ज्युलिया कार चालवत असताना तिचा मित्र तिला सांगतो की, ‘तू कामात व्यग्र असताना तुझा मुलगा चालायला शिकला, तो क्षण बघायचा तुझा राहून गेला.’ त्यावेळचा तिचा अभिनय चित्रपट संपला तरी पाठ सोडत नाही.
तसंच ‘वंडर’मध्ये अनेक प्रसंगांत ज्युलिया काय विचार करत असेल, हे आपल्याला तिच्या चेहऱ्यावरून समजतं. मुलीच्या शाळेतील नाटकाच्या शेवटी किंवा ऑगीच्या शाळेच्या बक्षीस समारंभात ‘आई’ ज्युलियाचा ‘दुःखाचे अश्रू आहेत की समाधानाचे’ अशी संभ्रमावस्था दाखवणारा अभिनय बघणं हा एक हृद्य अनुभव आहे.
ओवेन विल्सन याने वडिलांची भूमिका चपखलपणे केली आहे. ऑगीची भूमिका करणारा जेकॉब ट्रेम्ब्ले, त्याच्या भोवती कथा फिरत असल्यामुळे आणि त्याच्या नैसर्गिक शैलीत संवादफेकीमुळे लक्षात राहतो. त्याच्या ‘दुर्लक्षित’ बहिणीचं काम करणारी इझाबेला व्हीडोविक आपल्या मनाचा ठाव घेते. शाळेतील मुलांचा अभिनय नैसर्गिक झाला आहे, हे विशेष, अन्यथा अशा चित्रपटांत लहान मुलं पोपटपंची करताना दिसतात किंवा वयाला न शोभणारी वाक्यं फेकत असतात. दिग्दर्शक स्टीव्हन श्बोस्की यांनी हे टाळलं आहे.
ज्युलिया रॉबर्टस आहे, या कारणास्तव तिच्यासाठी कोणतेही प्रसंग चित्रित झालेले नाहीत. आपल्याकडील चित्रपट आणि परदेशातील चित्रपट यातला हा मुख्य फरक असल्याचं पुनश्च प्रत्ययास आलं. आपल्याकडे कोणत्याही स्टारची निवड केल्यानंतर चित्रपटाची पटकथा आणि उद्देश बाजूला ठेवून त्या स्टारच्या अवतीभोवती काही प्रसंग लिहिता लिहिता पूर्ण चित्रपटाचा ढाचा बदलून तो चित्रपट बदलून टाकण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. ‘बदला’, ‘नटसम्राट’, ‘नच बलिये’, ‘जज्बा’, ‘मॉम’ अशा चित्रपटांत स्टार पूर्णवेळ दिसेल, याची खबरदारी घेतली गेली आहे. त्यामुळे पटकथा गौण ठरते आणि चित्रपट फसतो. अर्थात आपल्या स्टार इमेजमुळे स्वतःसाठी प्रसंग लिहून न घेणारी ज्युलिया रॉबर्टस आपल्याकडे नाही.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : ‘लुडो’ : हा सिनेमा पॉपकॉर्न खाता खाता, घरबसल्या टाईमपास म्हणून बघण्यासारखा नाही!
..................................................................................................................................................................
‘वंडर’ ही एका कुटुंबाची कथा आहे याचं भान दिग्दर्शकाने राखलं आहे. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हेही या सिनेमांतून पुन्हा अधोरेखित होतं. त्यामुळेच ऑस्करमधील शेवटचा पुरस्कार नायकाला नव्हे तर दिग्दर्शकाला आणि सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो.
आपण कसे आहोत, यापेक्षा कसे दिसतो, याची चेहऱ्यावरून पारख करण्याचे संस्कार आपणा सर्वांवर लहानपणापासूनच होतात. काळा-गोरा हा भेद पालक-शिक्षक आणि समाज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दाखवत दाखवत मुलांना वाढवतात. दृश्य माध्यमांत खलनायक काळा किंवा विद्रूप दाखवला जातो. जाहिरातींच्या माध्यमातून सुंदर दिसण्याचे संस्कार होत असतात. काही कळण्यापूर्वीच मुलांना पावडर-क्रीम लावण्याची सवय करून दिली जाते. सुंदर दिसणाऱ्या मुला-मुलींना वर्गाचा सेक्रेटरी केलं जातं, प्रतिनिधी म्हणून नेमलं जातं. असेच विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षकांचे लाडके असतात. मुलं कशी दिसतात यावरूनच त्यांच्याशी मैत्री करावी की, करू नये याचे सल्ले पालकांकडून मिळतात.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
रडणं हे मुलींचं लक्षण आहे, बाहुल्या-भातुक्ल्या मुलींच्या आणि गाड्याचे-सुपरमॅनचे खेळ मुलांचे असे भेदभाव करता करता मुलं मोठी होतात. सुंदर दिसणारा कलाकार चांगला अभिनय करतो, असा पूर्वग्रह मनात ठेवून आपण चित्रपट बघतो आणि ओम पुरीला दाद देण्यास उशीर करतो. चित्रपटात विद्रूप दिसणारी भूमिका असेल तर गोऱ्या कलाकाराला काळा रंग लावून भूमिका करण्यास सांगितलं जातं, परंतु तसं दिसणाऱ्या अभिनेत्रीची निवड अभिनय कलागुणांच्या जोरावर केली जात नाही.
आजूबाजूचं वास्तव असं असताना ‘वंडर’मध्ये ऑगीला शाळेत पाठवून ‘रिस्क’ घेणारे त्याचे आई आणि वडील कौतुकास पात्र ठरतात. शिवाय शाळेचे शिक्षक आणि विशेषतः भेदभाव करणाऱ्या पालकांना खडसावणारे मुख्याध्यापकही दुर्मीळ असल्याचं जाणवतं. अशा सर्वसमावेशक शाळा आपल्याकडे निर्माण झाल्या तर समाज या नात्यानं आपण थोडेफार प्रगत आणि संस्कारी होऊ शकू.
..................................................................................................................................................................
लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.
suhass.kirloskar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment