अजूनकाही
कौटुंबिक, मनोरंजक, डोक्याला ताण न देता दोन घटका करमणूक करणाऱ्या नाटकांच्या गर्दीत सध्या एका वेगळ्या विषयावरील नाटकानं नुकतेच शंभर प्रयोग पूर्ण केले. 'कोड मंत्र' हे त्या नाटकाचं नाव. मूळ गुजराती नाटकाचं मराठीत रूपांतर करण्याचं शिवधनुष्य मुक्ता बर्वे या गुणी अभिनेत्रीनं ज्या ताकदीने पेललं आहे, त्यासाठी दाद द्यायलाच हवी. केवळ स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी उफाळून येणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाजात देशभक्तीपर गाणी वाजवून शांत होणाऱ्या आपल्या तथाकथित देशप्रेमाचं हे नाटक अगदी व्यवस्थित शवविच्छेदन करतं. कसलीही घोषणाबाजी न करता.
मराठा रेजिमेंटमध्ये असलेल्या कमांडो रवी शेलार याला आर्मी ट्रेनिंगचा त्रास होतो. ट्रान्सफरची वारंवार विनंती करूनही त्याच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केलं जातं. एकदा त्याच्यावर ‘कोड मंत्र’ लागू होत असताना त्याचा खून होतो. कोड मंत्र म्हणजे झालेल्या बारीकसारीक चुकांसाठी सैनिकांना त्यांच्या वरिष्ठांकडून दिली जाणारी अनधिकृत शिक्षा. रवी शेलारचा मृत्यू हा खून आहे की आत्मघात? की अपघाती मृत्यू? की आणखी काही? त्याच्या भावाचा विक्रम शेलारचा या मृत्यूशी संबंध काय? शशिकांत जाधव, लेफ्टनंट थत्ते, कर्नल निंबाळकर यांचा या केसशी संबंध काय? ही केस हातात घेणारी वकील अहिल्या देशमुख हिला या केसबद्दल इतकी आत्मीयता का? केसचा निकाल काय लागणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाटकातच पाहणं योग्य ठरेल.
सस्पेन्स थ्रिलरची किनार असलेली ही कोर्ट केस वरवर पाहता फक्त एका आरोपीच्या सुटकेसाठी रचली आहे, असं वाटत असलं तरी त्यातील विविध कंगोरे हळूहळू नाटक जसं उलगडत जातं, तसे आपल्यासमोर येतात. त्यानिमित्ताने अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात. ऐषोआरामात जीवन कंठत असलेल्या आपल्यासारख्या अनेकांच्या देशभक्तीच्या बेगडी संकल्पनांना सुरुंग लावतात. माणूस मोठा की देश यावर विचार करायला भाग पाडतात. 'त्यांचे' सैनिक मेले की, आपल्याला जे कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं, ते माणुसकीच्या पातळीवर किती नीचपणाचं लक्षण आहे, हे पटवून देतात.
या सगळ्या खेळात शेवटी बळी जातोय तो माणसाचाच, हे जे आपल्याला दिसत नाहीये किंवा जे दिसूनही आपण जाणूनबुजून दुर्लक्षित करण्याएवढे गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत, ते पुनःपुन्हा पटवून देतात. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मग तो शिस्तीचा असो किंवा कर्तव्याचा, तो नाशाकडेच कसा घेऊन जातो, हे दाखवून देतात. या नाटकातली बरीच दृश्यं अंगावर येतात. शुगर कोटेड संवाद ऐकण्याची आणि अश्रू ढाळण्याची आपली सवय, जिला आपण संवेदनशीलतेच्या गोंडस नावानं आंजारतो, गोंजारतो, तिला पार दूरवर भिरकावून देतात. इथं आपल्यासमोर एक खून होतो, स्वतःच्या डोक्यात गोळी घालून एक आत्महत्या होते, अनन्वित अत्याचार होतात, छळ होतात. आपण किती सुरक्षित जगात वावरत आहोत आणि किती सुखी आहोत, याची खरी जाणीव होते.
मुक्ता बर्वेने साकारलेली तडफदार अहिल्या देशमुख अविस्मरणीय आहे. तितकाच अजय पूरकरांनी साकारलेला कर्नल प्रतापराव निंबाळकरही. इतर सर्व कलाकारांनीही आपापली कामं चोख बजावली आहेत. पण खरं कौतुक वाटतं ते रंगमंचावरील खऱ्याखुऱ्या सैनिकांचं ज्यांनी आजवर कधीही अभिनय केला नसूनही इतका देखणा आणि शिस्तबद्ध प्रयोग इतरही अनेक जबाबदाऱ्या सांभाळत सादर केला आहे. त्यासाठी त्या सर्वांना सलाम. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना सर्वच अप्रतिम.
थोडक्यात, आर्मीला साजेशा शिस्तीत आणि दिमाखात या प्रयोगाची रचना झाली आहे. लवकरच द्विशतकही साजरं करण्याचा योग यावा, यासाठी सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा.
लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment