‘पावसाचा निबंध’, ‘पायवाट’ आणि ‘बिबट्या’ हे तिन्ही लघुपट वेळ काढून बघायलाच हवेत!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर
  • ‘पावसाचा निबंध’, ‘पायवाट’ आणि ‘बिबट्या’ या लघुपटांची पोस्टर्स
  • Fri , 23 October 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र नागराज मंजुळे Nagraj Manjule पावसाचा निबंध Pavsacha Nibandh पायवाट Paywat बिबट्या Bibtya

‘पावसाचा निबंध’, ‘बिबट्या’ आणि ‘पायवाट’ हे नागराज मंजुळे यांचे प्रत्येकाने अनुभवावेत असे तीन लघुपट नुकतेच ‘Zee 5’वर रिलीज झाले आहेत. लघुपटामध्ये थोड्या वेळेत आणि कमीत कमी शब्दांमध्ये आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान असते. याची दुसरी बाजू दृश्यकलेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. ती म्हणजे लघुपट करताना दिग्दर्शक स्वातंत्र्य घेऊ शकतो आणि आपल्या मनाप्रमाणे विषय मांडू शकतो. लघुपट चालेल की नाही, अशी गणिते विषय किंवा मांडणीवर विपरीत परिणाम करत नाहीत. त्यामुळे आणि भारतातल्या वस्तुस्थितीची जाणीव होण्यासाठी हे तिन्ही लघुपट बघणे गरजेचे आहे.

पाऊस सुरू झाल्यानंतर शालेय शिक्षकांकडून हमखास दिला जाणारा विषय म्हणजे ‘पावसाचा निबंध’. म्हणजे खरे तर प्रत्येकाने आपल्याला आलेला अनुभव शब्दांत मांडणे अपेक्षित असते, परंतु शाळेमध्ये स्वतःच्या शब्दांत अनुभव व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नसते. गुण मिळवण्याच्या दृष्टीने शिकवले जाणारे शिक्षण मुलांमधील सर्जनशीलता घालवून टाकते आणि पाठांतर करण्यास भाग पाडते. शाळेतील शिक्षक मुलांच्या भाषेत न बोलता ‘स्वर्गीय जागा’, ‘अनुभूती’ असे बोजड शब्द वापरून मुलांना पावसाचा विषय त्यांच्या डोक्यावरून कसा जाईल याची खबरदारी घेताना दिसतात. ‘वर्डस्वर्थ’सारखी उदाहरणे देऊन शिक्षक सांगतात की, “स्वर्गीय जागेमध्ये आपण पाऊस या विषयावर छानसा निबंध लिहूया. जर आपण निबंध लिहिला नाही तर तो निसर्गाचा अपमानच असेल. निबंध लिहिला नाही तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही.” ही वाक्ये त्या निरागस मुलांच्या कानावर आदळतात आणि शिक्षणाबद्दल घृणा निर्माण करतात. 

बाहेर पाऊस कोसळत असता चिखलातून वाटा तुडवत घरी गेल्यानंतर काय दिसते, तर पावसामुळे सगळीकडे पाणी गळत असते. दहा बाय दहाच्या टीचभर घरामध्ये ओल पसरू नये म्हणून जिकडे तिकडे मिळतील ती भांडी ठेवावी लागतात. त्याच वेळी पाण्याचे थेंब निबंधाच्या वहीवर पडतात, ज्यावर लिहिलेले असते – गृहपाठ – पावसाचा निबंध.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

या २४ मिनिटांच्या लघुपटामधील प्रत्येक फ्रेम आपल्याला काही सांगते. ‘नाळ’, ‘देऊळ’, ‘सैराट’ अशा सिनेमांचे सिनेमॅटोग्राफर सुधाकर रेड्डी यांचा कॅमेरा संवादापलीकडे जाऊन कसा बोलतो ते ‘ऐकण्यासारखे’ आहे. मुसळधार पाऊस  पडत आहे, नभ मेघांनी आक्रमिले आहेत. कोणाला हा पाऊस आवडेल, पण त्याच्यामुळे रोजचे जीणे मुश्किल होत असेल तर त्याचे मनोहारी वर्णन कसे करता येईल? पावसाचे वातावरण कधीतरी धबधबा बघणाऱ्यांसाठी रम्य असेल, पण इतर वेळी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्या घरात नको इतक्या पाण्याने जीव नकोसा केला तर निबंध कसा लिहिणार, केव्हा आणि कुठे बसून?

‘फॅन्ड्री’ या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी बराच पाऊस पडायचा. त्यामुळे शुटिंग अनेक वेळा थांबवावे लागायचे. त्याच वेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बालपणीच्या पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्यांनी पावसाबद्दलचा अनुभव कॅमेराबद्ध करण्याचे ठरवले. कथा व पटकथा लेखक नागराज मंजुळे यांनी मुलांमधील निरागसता, विदारक परिस्थितीचे दर्शन कौशल्यही घडवले आहे. त्यामुळे या मितभाषी लघुपटाचा उद्देश सफल झाला आहे. कुतुब इनामदार यांचे संकलन उल्लेखनीय. अविनाश सोनावणे यांनी साउंडचा केलेला विचार तिथल्या परिस्थितीची आपल्याला जाणीव करून देतो. 

मेघराज शिंदे या बालकलाकाराने आणि गार्गी कुलकर्णी यांनी अभिनय केला आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. त्यांनी गावातले जिणे विलक्षण ताकदीने उभे केले आहे. वर्गातील मुले लिहून आणलेला निबंध वाचून दाखवताना बाहेर अंगठे धरण्याची शिक्षा मिळालेला विद्यार्थी आणि निबंध ऐकताना मोबाईल बघणारे शिक्षक आपण बघतो आणि अस्वस्थ होतो.  

‘पायवाट’ हा मिथुनचंद्र चौधरी लिखित-दिग्दर्शित १४ मिनिटांचा लघुपट गावातील शाळकरी मुलीच्या आयुष्यातील एका दिवसाची दिनचर्या दाखवतो. यातल्या कुतुब इनामदार यांच्या छायाचित्रणामधून वस्तुस्थिती बघताना आपल्या मनात विचारांचे काहूर उठते. मुला-मुलींमध्ये आपण कसा भेदभाव करतो, मुलींना कोणत्या दिव्यामधून जावे लागते. पुण्यासारख्या शहराजवळ असलेल्या खेडेगावात आई-वडिलांना शेतावर मजुरी करण्याचे रोज प्रत्येकी १५० रुपये मिळतात. त्यावर त्यांची गुजराण होत असते. घरातील सर्व कामे करून शाळेत जाणारी मुलगी अनेक प्रकारच्या मानसिक तणावांमधून जाते, तरीही ती न डगमगता शाळेत जाते.  

नागराज मंजुळे (निर्माता), गार्गी कुलकर्णी (दिग्दर्शिका), अविनाश सोनावणे (साउंड डिझाईन), कुतुब इनामदार (संकलक), अर्चना बोऱ्हाडे (सिनेमटोग्राफर) या टीमचा ‘बिबट्या’ हा १९ मिनिटांचा लघुपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो की, सर्वांत हिंस्त्र कोण? हा लघुपट आपल्याला त्या गावाच्या नैसर्गिक वातावरणात घेऊन जातो, आपण आज्जींच्या बरोबर त्या शाळकरी मुलीच्या शोधात बाहेर पडतो आणि आपण विसरतो की, आपण एखादा लघुपट बघत आहोत.    

लॉकडाऊनच्या काळात आपण मोबाईलवर शिक्षण देण्याच्या आणि घेण्याच्या वल्गना करतो, जग किती जवळ आले आहे, यांसारख्या सुरस कथांमध्ये रमतो, आपण शिक्षणामध्ये किती प्रगती केली आहे, याबद्दल बोलत राहतो, पण शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर काय परिस्थिती आहे, हे बघायला जात नाही. रोज दीडशे ते तीनशे रुपये उत्पन्न मिळवणाऱ्या घरातील मुला-मुलींना स्मार्ट फोनवर शिक्षण घ्या असे बिनदिक्कतपणे सांगतो. शहरापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या घरात रोजचे वृत्तपत्र येत असेल आणि त्यामुळे त्या गावातील मुलांना सामान्यज्ञान असेल असे गृहीत धरतो. अशी मुले पावसाचे विहंगम वर्णन करणारा निबंध कसा लिहिणार? अशा घरात राहणाऱ्या मुलींच्या मानसिक ताणतणावाची कल्पना आपल्याला शहरात बसून कशी करता येईल? नव्या शैक्षणिक धोरणामध्ये ही मुले कुठे आहेत? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत राहतात. 

‘पावसाचा निबंध’, ‘पायवाट’ आणि ‘बिबट्या’ हे तिन्ही लघुपट वेळ काढून बघायलाच हवेत.  आपल्याला लघुपटाकडे फार गांभीर्याने बघण्याची सवय नाही. ती लावून घ्यायला हवी. अशा कलाकृती सर्वांपर्यंत पोहोचल्या तर आपल्याला कलेचा आनंद घेता येईल आणि ‘इंडिया’ व ‘भारत’ यातला फरकही कळेल. वस्तुस्थितीशी नाळ तोडून स्वप्नांचे इमले बांधता येत नाहीत. 

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......