‘बॅड बॉय बिलिनियर्स - इंडिया’ : ही सिरीज या ‘उद्योगी’ व्यावसायिकांची महती सांगण्यासाठी निर्माण केली आहे? 
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर 
  • ‘बॅड बॉय बिलिनियर्स - इंडिया’चे पोस्टर
  • Sat , 17 October 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र बॅड बॉय बिलिनियर्स - इंडिया Bad boy billionaires-India विजय मल्ल्या vijay malla निरव मोदी nirav modi सुब्रतो रॉय Subrata Roy

‘बॅड बॉय बिलिनियर्स - इंडिया’ ही बहुचर्चित वेबसिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. ‘लिकर बॅरन’ नावाने प्रसिद्ध असलेले विजय मल्ल्या, पंजाब नॅशनल बँकेमधील लाखो रुपयाच्या स्कॅममुळे आम जनतेला माहीत झालेले निरव मोदी आणि सर्वसामान्य लोकांकडून पाच-दहा रुपये गोळा करून त्यांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाणारे सुब्रतो रॉय यांच्या घोटाळ्यावर आधारित ही तीन भागांची वेबसिरीज. यातल्या प्रत्येक डॉक्युमेंटरीचा ८० टक्के भाग सदर महाभाग कसे महान होते, त्यांच्यामध्ये उद्यमशीलता कशी ठासून भरलेली होती, त्यांच्याकडून कशी स्फूर्ती घ्यावी, अशा आशयाच्या त्यांच्या ‘सृहृदां’च्या मुलाखती दाखवून त्यांना ‘संत’पदी पोहोचवण्याचे काम करते. हे घोटाळे कसे झाले, त्याचा तपशील याविषयी या बेवसिरिजमध्ये फारसे काही हाती लागत नाही. त्यामुळे ‘पहाड खोदा नहीं, चुहा निकला नहीं’ अशी आपली भावना निर्माण होते.

आर्थिक घोटाळे अनेक देशांत झाले, त्यावर अनेक डॉक्युमेंट्री निघाल्या, चित्रपट तयार झाले. त्यांचा ढाचा कसा असतो आणि त्यामधून काय साध्य झाले, हे प्रथम जाणून घ्यायला हवे. ‘डर्टी मनी’ ही सिरिअल नेटफ्लिक्सवर २०१८मध्ये आली होती. तिच्या पहिल्या सिझनच्या सहा भागांत वोक्सवॅगनने प्रदूषण होत नसल्याचा केलेला खोटा दावा, अमेरिकेतील रोख कर्जाच्या प्रकरणात केलेली फसवणूक, बॉश हेल्थ कंपनीने (पूर्वीची व्हॅलीयंट फार्मास्युटीकल) औषधांच्या किमती वाढवून केलेला घोटाळा, एचएसबीसी आणि इतर बँकांनी केलेल्या मनी लाँन्ड्री घोटाळ्यात दिग्गज कसे सुखरूप सुटले, कॅनडीयन मपल सिरप प्रकरणात झालेली कोट्यवधी रुपयांची अफरातफर अशा प्रकरणांवर अनेक अर्थतज्ज्ञ, बँकर्स यांचे भाष्य आहे, ज्यामधून ही प्रकरणे मुळापासून समजण्यास मदत होते.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

‘द बिग शोर्ट’ या अॅडम मॅके यांच्या चित्रपटात २००७-०८ साली अमेरिकेत घडलेला हाउसिंग लोन बबल नर्मविनोदी पद्धतीने समजावून सांगितला आहे. ‘द इनसाईड जॉब’ या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंटरीमध्ये हेच लेहमन ब्रदर्स प्रकरण आणि त्यामुळे लाखो लोक बेरोजगार कसे झाले, याचा साद्यंत तपशील मुळातून समजतो. डॉक्युमेंटरी कशा असाव्यात, त्या तयार करण्याचा उद्देश काय, हे त्या निर्माता-दिग्दर्शकांना पूर्णपणे माहीत असल्यामुळे त्या अफरातफरी कशा घडल्या, हे तपशिलात समजून घेण्यासाठी त्या पुनःपुन्हा बघितल्या जातात. 

भारतातही आजवर अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले, परंतु त्याचा चिकित्सकपणे मागोवा घेणाऱ्या डॉक्युमेंटरी भारतात अद्याप निघालेल्या नाहीत. त्यामुळे ‘बॅड बॉय बिलिनियर्स – इंडिया’ या वेबसिरीजच्या चार भागांमधून माहीत नसलेले काही नवे हाती लागेल, अशा अपेक्षेने आपण बघण्यास सुरुवात करतो आणि आपल्याला असा प्रश्न पडतो की, ही सिरीज संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यास निर्माण केली आहे की, या उद्योगी व्यावसायिकांची महती सांगण्यासाठी? 

‘द किंग ऑफ गुड टाइम्स’ या भागामध्ये विजय मल्ल्या यांनी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेने साम्राज्य कसे उभे केले, ते मनाने कसे दिलदार होते, पार्ट्या कशा द्यायचे, हेच ७५ टक्के भागात दाखवले आहे. डायलन मोहन ग्रे दिग्दर्शित या भागाच्या सुरुवातीला लंडनच्या कोर्टाबाहेर कॉफी घेत घेत वार्ताहरांना “तुम्हाला मी काही सांगणार नाही” असे स्मितहास्य करत रुबाबात सांगताना मल्या दिसतात. ज्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्यातील अनेक जण मल्ल्याप्रेमी आहेत. एकजण म्हणतो- “विजय मल्ल्या रोज रात्री झोपताना हा विचार करत असेल की, मी लोकांचे पैसे का दिले नाहीत.” विजय मल्ल्याचा सुपुत्र आपल्या वडिलांची महती सांगतो- “माझे वडील निरागस आहेत आणि त्यांना अकारण गोवले गेले आहे.” दुसरा मल्ल्याभक्त म्हणतो- “थोडे दिवस थांबा, हेच लोक त्याच्या पायाशी येतील.... आता त्याचे थोडे वाईट दिवस आहेत. अन्यथा विजय महान आहे”. त्यानंतर मल्ल्याची छाप असलेल्या जंगी पार्टीमध्ये वेगवेगळे स्टार्स आणि दिग्गज लोकांची “विजय मल्ल्या काहीही करतो, ते स्टायलिश असते, राजाला साजेसे असते…” अशी वाक्ये ऐकायला येतात.

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

किरण मुजुमदार शॉ, शोभा डे त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. बेंगलोरमध्ये पहिले पब स्थापन करणारा ट्रेंडसेटर उद्योगपती नंतर कसा बहकत गेला, त्याचे कुठे चुकले याबद्दल कोणी काहीच बोलत नाही. अनेक सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना एका रात्रीत बेकार करणारा उद्योगपती पैसे मागण्याबद्दल मोर्चे सुरू असतानाही त्याच रात्री स्टायलिश पार्टीवर लाखो रुपये खर्च कसा करतो, याचे उत्तर कुठेच मिळत नाही. आयडीबीआय बँकेसारख्या अनेक बँका अमाप खर्च वाढत चाललेल्या किंगफिशर विमान उद्योगाला कोणतीही चौकशी न करता कर्ज देत राहिल्या.  हे सर्व बघताना फक्त आयडीबीआय बँकेचे मुख्य कार्यालय दिसते. त्याबद्दल आयडीबीआय, स्टेट बँक, रिझर्व्ह बँक यापैकी कोणीही काहीही बोलताना दिसत नाही. रिझर्व्ह बँकेच्या २००९-१० वार्षिक इन्स्पेक्शनमध्ये २० कोटी डॉलरच्या कर्जाबद्दल कोणालाही काहीही गैर कसे आढळले नाही, याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नाही. मल्ल्या भारतामधून केव्हा पळाला, कसा पळाला, आता कुठे राहतो, त्याची आत्ताची देणी काय आहेत, किंगफिशर अल्कोहोल उद्योग विकला त्याचे पैसे कुठे वापरले, तेव्हा लाखो डॉलर्स कर्ज देणाऱ्या बँकांचे उच्चपदस्थ कोण, याबद्दल कुठेही काहीही नाही. डॉक्युमेंटरीच्या शेवटी आपल्याला वाक्य बघावे लागते ‘भारतामध्ये न परतण्यासाठीचा विजय मल्ल्याचा लढा लंडनमधून सुरू आहे’, जणू काही एक महनीय व्यक्तिमत्त्व लंडनमधील झोपडीमधून ‘भारत छोडो आंदोलन’ अविरतपणे करत आहे!

‘डायमंड्स आर नॉट फॉरएव्हर’ या भागामध्ये निरव मोदीने कसा दागिन्यांचा आंतरराष्ट्रीय ब्रँड तयार केला, याबद्दल दाखवलं आहे. पण पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेमधून ‘लेटर ऑफ क्रेडिट’द्वारे लाखो रुपयांचा घोटाळा कसा केला गेला, हे गुलदस्त्यातच राहतं. बँकेचा एक क्लार्क आपण कसे निरागस, हे सांगताना दिसतो. पण एवढा मोठा घोटाळा बँकेच्या स्टाफ आणि उच्चपदस्थांच्या ‘सहकार्या’शिवाय होऊ शकतो? तो नेमका झाला कसा, हे समोर येत नाही. निरव मोदीने कसा अनेकांना रोजगार दिला, भारताची मान कशी उंचावली, हे आवर्जून सांगणारे लोक तो निसटला कसा वगैरेबद्दल मौन बाळगतात. काही मॉडेल्सना कामाचा मोबदला या स्वरूपात मिळालेले माणिक/मोती/हिरे नकली होते एवढाच तपशील समजतो. ‘एका उद्देशाचा ध्यास घेतलेला उद्योगपती’ कुठेतरी थोडासा चुकला तर त्याचे एवढे अवडंबर कशाला, असा काहींचा निरागस प्रश्न ऐकून आपल्यावर हताश व्हायची पाळी येते. ‘निरव लढवय्या आहे, तो या दुष्टचक्रामधून सुखरूप बाहेर येईल,’ अशा आशावादाने या जोहाना हॅमिल्टन दिग्दर्शित डॉक्युमेंटरीचा शेवट होतो.            

‘द वर्ल्ड’स बिगेस्ट फॅमिली’ या भागामध्ये ‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय किती निरागस आहेत, हे दाखवले आहे. लाखो गरिबांनी रोज पाच–दहा रुपये साठवून सहाराकडे सुपूर्त केले आणि ते पुनर्गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून करोडो रुपये कसे बुडवले हा प्रश्न शरत प्रधान या पत्रकाराने तीन दशके धसाला लावला, त्यामुळे निदान सत्य बाहेर आले. परंतु तुरुंगातही हे महान व्यक्तिमत्त्व स्फूर्तिदायक पुस्तक लिहिण्यात कसे मग्न होते वगैरे तपशील दाखवला जातो. तीन वर्षांत पैसे दामदुप्पट करून देणार, या सहारा योजनेला अनेक गरीब लोक भुलले आणि त्यांच्या आयुष्याची कमाई ठराविक लोकांचे इमले बांधण्यात वापरली गेली. परंतु डॉक्युमेंटरी बघताना आपण सहारा वैभव बघत राहतो, तो निरागस मनुष्य कसा दुर्दैवी फेऱ्यात अडकला आहे, सेबीसारख्या यंत्रणेला काहीही कसे सापडले नाही, असे आपल्याला सांगितले जाते. खरे तर सहारा कंपनीच्या उच्चपदस्थांनी पुरावे देताना एका ट्रकमध्ये ठेवीदारांची नावे आणि दुसऱ्या ट्रकमध्ये त्यांचे पत्ते अशा पद्धतीने अनेक ट्रक माहिती पुरवली, ज्याचा कधीही मेळ घालता येणार नाही.    

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................    

चौथा भाग ‘सत्यम’ प्रसिद्ध रामलिंग राजू यांच्यावर दाखवला जाणार होता, परंतु त्यावर न्यायालयाने त्यावर तूर्त स्थगिती आणली आहे. या मालिकेचा एकूण रागरंग बघता त्यामध्येही शोध घेऊन काही माहिती मिळेल, अशी आशा करण्यासारखी परिस्थिती नाही.

शोध पत्रकारिता म्हणजे काय? एखाद्या प्रकरणाचा मुळापासून शोध घेणे आणि त्यामधून मिळालेल्या धाग्या-दोऱ्यांमधून त्या प्रकरणाचा, पूर्णतः किंवा अंशतः छडा लावणे. राजकीय लागेबांधे, भारतीय अर्थव्यवस्थेमधील उणीवा, नियंत्रण यंत्रणेमधील त्रुटी आणि त्याची कारणे, पाच-दहा हजार रुपये बुडवणाऱ्या सर्वसामान्य माणसाला तगादा लावून जिणे नकोसे करणाऱ्या बँका अवघ्या बँकिंग व्यवस्थेला लुटणाऱ्याला कशा पायघड्या घालतात, त्याला परदेशी जाऊ देतात आणि खर्चिक पार्ट्या देणाऱ्याच्या आसपास घुटमळणारी चित्रपटसृष्टी, मॉडेल्स, पेज थ्री कल्चर आणि त्या सर्वाला भूलणारी सर्वसामान्य जनता असे बरेच काही डॉक्युमेंटरीमध्ये दाखवता आले असते. पण इथं तर अफरातफर करणाऱ्या बड्या धेंडांची महती सांगण्याचा तोकडा प्रयत्न त्यांचेच भक्त करतात. त्यामुळे डॉक्युमेंटरी करणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकांच्या हेतूबद्दल शंका येते.

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......