आज ‘गॉडफादर’चा बाप, मारिओ पुझो जन्माला आला!
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
मिलिंद दामले
  • मारिओ पुझो आणि गॉडफादर या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि सिनेमाचे पोस्टर
  • Thu , 15 October 2020
  • कला-संस्कृती इंग्रजी सिनेमा मारिओ पुझो Mario Puzo द गॉडफादर The Godfather

१९७५ साली जेव्हा ‘गॉडफादर-२’ला ‘बेस्ट अ‍ॅडॉप्टेड स्क्रीन प्ले’चं अ‍ॅवार्ड मिळालं, तेव्हा मारिओ पुझोंनी त्यांच्या आभाराच्या चार शब्दांतले दोन शब्द त्यांच्या ‘गॉडफादर्स’साठी वापरले. ते म्हणाले, “माझ्या तिन्ही गॉडफादर्सचे आभार, ज्यांनी माझं पुस्तक पडद्यावर आणण्यासाठी मदत केली. ते पुस्तक मी जसा विचार केला, तसं त्यांनी पडद्यावर आणलं! त्यासाठी त्यांचे आभार.” ही क्लिप पाहताना “फ्रेंडशिप इज एव्हरीथिंग. फ्रेंडशिप इज मोअर दॅन टॅलेंट. इट इज मोअर दॅन गव्हर्मेंट. इट इज ऑलमोस्ट द इक्वल ऑफ फॅमिली.” या वाक्याची आठवण झाली. हे अर्थातच मारिओ पुझोंचं वाक्य. ‘गॉडफादर’ सिनेमाच्या यशाचं, किंबहुना त्याच्या बनण्याचं श्रेय Francis Ford Coppolaला जातं, असं पुझो म्हणतात आणि आपल्या मित्रांचे आभार मानतात.

पुझोंना ‘गॉडफादर-१’ आणि २ साठी ‘बेस्ट अ‍ॅडॉप्टेड स्क्रीन प्ले’चं अकादमी अ‍ॅवार्ड मिळालं. इथं एक प्रश्न उपस्थित होतो, तो असा की, आभार कोणी कोणाचे मानायचे? मारिओ पुझोंनी त्या तीन गॉडफादर्स साकारणाऱ्या अभिनेत्यांचे आभार मानायचे, ज्यांनी तो रुपेरी पडद्यावर साकारला, की, त्या तीन गॉडफादरनी मारिओ पुझोंचे आभार मानायचे, ज्यांनी त्यांना जन्माला घातलं?

आज १५ ऑक्टोबर २०२० म्हणजे ‘गॉडफादर’च्या बापाची जन्मशताब्दी. ‘गॉडफादर’ने काय केलं? मारिओ पुझोंसाठी काय केलं हा खूप छोटा प्रश्न उरतो, जेव्हा ‘गॉडफादर’चं संपूर्ण सिनेजगतावर असलेलं गारुड आपण पाहतो. या एका चित्रपटाने अनेक चित्रपटकर्मी घडवले. एका वेगळ्या प्रकारचा सिनेमाची जगाला ओळख करून दिली. पुस्तक का सिनेमा, असा प्रश्न पडलेल्यांना दोन्ही वाचायला आणि पाहायला लावलं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका माफिया डॉनला नायक बनवलं.

संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या भाषेतल्या, वेगवेगळ्या तऱ्हेवाईक दिसणाऱ्या, वेगवेगळ्या रंगरूपात पेश झालेल्या अनेक छोट्या-मोठ्या गॉडफादर्सना जन्माला घातलं. ‘गॉडफादर-१’च्या रिलीजपासून आजपर्यंत आपण अनेक चित्रपट, अनेक खलनायक आणि नायकांमध्ये ‘गॉडफादर’, त्याची भाषा, त्याचा पेहराव, त्याची अदा, त्याचा न्याय बघत आलो. ‘अरे, यार हा तर ‘गॉडफादर’!’ असं आपण आपल्या देशात किती वेळा म्हटलं, याचा प्रत्येकानं विचार करावा.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

मारिओ पुझोंचा जन्म न्यू यॉर्क शहराच्या हेल किचन या भागात झाला. त्याचे आई-वडील अर्थातच इटलीहून आलेले स्थलांतरित होते. वडील न्यू यॉर्क सेंट्रल रेलरोडमध्ये ट्रकमॅन म्हणून कामाला लागले होते. पुझो १२ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला, त्याच्या आई आणि सहा भावंडांसोबत सोडून निघून गेले. हे वाचताना हमखास आठवण येते ती ‘गॉडफादर’मधल्या एका वाक्याची. ते वाक्य म्हणजे- ‘A man who is not a father to his children can never be a real man.’

मारिओ पुझो त्या परिस्थितीत मोठा झाला आणि अमेरिकन एअरफोर्सकडून त्याने दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. त्या युद्धात तो जर्मनीमध्ये गेला होता. युद्ध संपल्यावर त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्याने एका जर्मन तरुणीशी विवाह केला. त्यांना पाच मुलं झाली.

‘The Last Don’मध्ये पुझो लिहितात- ‘Power isn't everything... it’s the only thing.’ या वाक्याची खरी ओळख व्हायला पुझोंना खूप वर्षं वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांच्यातल्या पॉवरफुल लेखकाची ओळख जगाला पटली. वयाच्या ३०व्या वर्षी मारिओ पुझोंची पहिली लघुकथा अमेरिकेच्या ‘vanguard’मध्ये प्रकाशित झाली. वर्ष होतं १९५० आणि कथेचं नाव होतं – ‘The Last Christmas’. १९५५ साली त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, ज्याचं नाव होतं – ‘The Dark Arena’.

१९६०मध्ये Bruce Jay Freidman या व्यक्तीने मारिओ पुझोला सहायक संपादक म्हणून नोकरी दिली आणि पुरुषांसाठी असलेल्या नियतकालिकामध्ये ते लिखाण करू लागले. त्यांच्याकडे दुसऱ्या महायुद्धाच्या अनेक आठवणी आणि किस्से होते. युद्धात त्यांनी भाग घेतला होता आणि खूप जवळून त्याच्याकडे बघितलं होतं. त्यांच्यातला लेखक त्यांना युद्धावर लिहिण्यासाठी बळ देत होता. शेवटी मारिओ पुझोंनी आपलं मूळ नाव बाजूला ठेवलं आणि ‘मारिओ क्लेरी’ (Mario Cleri) हे नाव घेतलं. या नावाने ते लिखाण करू लागले. याच टोपणनावाने त्यांनी दुसऱ्या महायुद्धाची सत्यकथा आणि धाडसी कहाण्या ‘True Action’ या नियतकालिकात प्रकाशित केल्या.

वयाची पन्नाशी जवळ आली होती. लेखक म्हणून हवं तसं नाव झालं नव्हतं. सर्वसामान्यांना आणि ज्याला आपण ‘पब्लिक’ म्हणतो अशांना आवडेल, रुचेल असा काहीतरी लिहावं असं मारिओ पुझोंना वाटत होतं. यशाची चव त्यांनाही चाखायची होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एका मुलाखतीमध्ये मारिओ पुझो असं म्हणतात की, “तरुण असताना मी लिहीन ते लोकांनी वाचलं पाहिजे असं म्हणणारा लेखक जसजसा प्रगल्भ होत जातो, तेव्हा त्याला खऱ्या रसिक वाचकांची ओळख पटायला लागते. वाचकाला काय आवडतंय, त्याला काय हवंय, हे त्याला कळायला लागतं आणि मग त्याच्यासाठी लिखाणाची सुरुवात होते.’’

मारिओ पुझोंचं नाव जगभरात व्हायला खूप वर्षं जावी लागली. त्यांच्या वयाच्या ४९व्या वर्षी म्हणजे १९६९ मध्ये त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध काम ‘The Godfather’ प्रकाशित झालं. पुझो असं म्हणतात की, ‘गॉडफादर’ लिहिणं हे त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलेलं नसून त्यांनी संघटित गुन्हेगारीच्या घेतलेल्या शोधातून तयार झालेला अर्क आहे.

‘गॉडफादर’ या पुस्तकानं इतिहास घडवला, त्याने मारिओ पुझोंचं आयुष्य बदलून टाकलं. ते ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या ‘बेस्ट सेलर’च्या यादीमध्ये सलग ६७ आठवडे होतं आणि त्या पुस्तकाच्या ९० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. सिसिलीमधल्या गावापासून सुरू झालेला ‘गॉडफादर’चा प्रवास ला वेगास आणि हॉलिवुडसकट संपूर्ण अमेरिका व्यापून टाकणारा होता. रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलं.

‘गॉडफादर’ने त्याच्या जन्मदात्यासाठी हॉलिवुडचेही दरवाजे उघडले, त्यातला एक मारिओ पुझोंचा होता. Francis Ford Coppola या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने या पुस्तकावर सिनेमा करायची इच्छा व्यक्त केली आणि मारिओ पुझोंनी ती उचलून धरली. पुस्तकावरून सिनेमा बनायची ही काही पहिलीच वेळ नव्हती, पण पुस्तकाचा इतिहास सिनेमानं मोडला. अनेक खाचखळग्यांतून जात जात शेवटी सिनेमा पूर्ण झाला. ‘The Godfather’ या नावानं तो १९७२ साली अमेरिकेमध्ये लागला. ‘प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर’ असं म्हणावं इतका तो उत्तम जमून आला. पहिल्याच प्रयत्नात त्याला अ‍ॅकडेमी अवार्डची ११ नामांकनं मिळाली आणि तीन पुरस्कार मिळाले.

त्यातलं एक मारिओ पुझोंचं होतं ‘अ‍ॅडॉप्टेड स्क्रीन प्ले’साठीचं. त्या पुरस्कार सोहळ्याला ते उपस्थित नव्हते म्हणून त्यांच्या मुलीने तो स्वीकारला. त्यांच्या अनुपस्थिची उणीव त्यांनी १९७५ मध्ये भरून काढली. ‘गॉडफादर-२’च्या ऑस्करच्या यशात पुझोंचा वाटा मोठा होता. जोडी तीच होती - Francis Ford Coppola आणि मारिओ पुझो. त्यानंतर मध्ये बराच काळ जावा लागला आणि मग १९९०मध्ये ‘The Godfather-३’ आला. Francis Ford Coppola आणि मारिओ पुझो दोघांची अशी इच्छा होती की, या तिसऱ्या भागाचं नाव ‘The Death of Michael Corleone’ असं असावं. मात्र पॅरामाउंट पिक्चर्सने त्याच्यावर लाल बावटा दाखवला आणि ‘गॉडफादर’ हेच हुकमी नाव त्याच्यासोबत कायम ठेवून ‘३’ या नावानं तो प्रकाशित केला.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या सप्टेंबर महिन्यात ‘गॉडफादर-३’च्या ३०व्या वर्षी पॅरामाउंटने घोषणा केली की, ‘Mario Puzo’s The Godfather, Coda : The Death of Michael Corleone’ या नावानं तो पुन्हा प्रदर्शित केला जाईल आणि मारिओ पुझोच्या जन्मशताब्दी वर्षात त्याची Blur Ray DVDपण बाजारात येईल. मारिओ पुझोंनी अजूनही काही सिनेमांचं लेखन केलं, पण त्यांना तितकं यश मिळू शकलं नाही, पण त्यांची ताकद दाखवायला ‘गॉडफादर’मधील कुठलंही दृश्यं आपण पाहू शकतो. सिनेमा बनवणाऱ्या अनेक दिग्दर्शकांचं ‘गॉडफादर’मधलं आवडतं दृश्य कोणतं, असाही एक शोध घेता येऊ शकेल.

‘Revenge is a dish that tastes best when served cold’, या वाक्याला जिवंत करणारी अनेक दृश्यं ‘गॉडफादर’मध्ये आहेत. पिक्चर कंपनीच्या मालकाला त्याच्या आवडत्या, विशेष लाडक्या असणाऱ्या घोड्याचं डोकं त्याच्याच बिछान्यावर मिळतं, हे दृश्य चित्रपटकलेचा आणि एकुणातच अभ्यासाचा विषय आहे.

मारिओ पुझोंच्या मृत्युनंतर त्यांच्या शेवटच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ज्याचं नाव होतं – ‘Omerata’. समीक्षक असं लिहितात की, हे पुझोंचं लिखाण नाही. हे लिखाण पुझोच्या नावावर कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीनं केलं आहे. असो.

आज मारिओ पुझोंच्या जन्मशताब्दी निमित्तानं आपण जर इंटरनेटच्या मायाजालावर नजर टाकली तर असं लक्षात येतं की, त्यांच्या अवतरणांनी इंटरनेट भरून गेलं आहे. त्यांनी लिहिलेली काही वाक्यं अजरामर आहेत आणि नकळतपणे ती लोकांच्या तोंडून अव्याहतपणे वापरली जात आहेत. सहजसोपी वाक्यं, ज्यात जीवनाचं सार आहे. आपण म्हणतो- ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’. पुझो म्हणतात – ‘The lawyer with the briefcase can steal more money than the man with the gun.’

‘गॉडफादर’ हा अशा वाक्यांनी खचाखच भरलेला आहे. ‘I’m gonna make him an offer he can't refuse’ हे वाक्य म्हणजे अनेक सिनेमांची गंगोत्री आहे. ‘गॉडफादर’ वाचताना, पाहताना असं लक्षात येतं की, चमकदार वाक्यं म्हणजे संपूर्ण चित्रपट नव्हे, किंवा पुस्तकही नव्हे. अनेक ठिकाणी न बोलता खूप काही सांगून जातोच की ‘गॉडफादर’! त्याच्या यशात अनेकांचा वाटा आहे हे निर्विवाद.

मारिओ पुझोंना एका मुलाखतीमध्ये असं विचारण्यात आलं की, पुस्तक चांगलं आहे की सिनेमा? त्यावर ते म्हणाले की, “जगातले सर्वोत्तम सिनेमे काढायचे ठरल्यावर तुम्ही ‘गॉडफादर-१’ला वगळू शकत नाही… पण पुस्तकाचं तसं नाही. ते खूप मोठा आवाका घेतं. त्यामुळे त्याची मी तुलना करू शकत नाही.’’ म्हणूनच कदाचित पुझोंना ‘गॉडफादर-४’ हा चित्रपट लिहायचा होता. त्यांच्या डोक्यात आराखडा तयार होता, तो जर बनला असता तर कदाचित एक वेगळा इतिहास लिहिला गेला असता.

आजच्या दिवशी शंभर वर्षांपूर्वी ‘गॉडफादर’चा जन्मदाता, त्याचा ‘बाप’ जन्माला आला, पण मारिओ पुझोंच्या शब्दांत सांगायचं तर ‘Great men are not born great, they grow great…’

मारिओ पुझोंच्या जन्मशताब्दी दिनी त्यांना सर्व चित्रपट रसिकांकडून मानवंदना!

..................................................................................................................................................................

लेखक प्रा. मिलिंद दामले ‘भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान’ (FTII, पुणे)मध्ये टीव्ही दिग्दर्शन विभागाचे प्रमुख व प्राध्यापक आहेत.

mida_1978@yahoo.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख