अजूनकाही
शाळेत शेवटच्या बाकावरच्या मुलांना काही किंमत नसते. शिक्षकांना कोणावर राग काढायचा असेल तर ही मुले निवडली जातात. काही मुले हुशार आहेत, हे सिद्ध करण्यासाठी आधी अशा मुलांना प्रश्न विचारला जातो आणि त्यांना उत्तर नाही आले, याचा सोहळा साजरा करून पहिल्या बाकावरच्या मुलांना प्रश्न विचारला जातो. यामुळे अप्रत्यक्षरीत्या वर्गातील सर्व मुलांवर हुशारीने बरोबर उत्तर देण्याची एक दहशत बसते. अशा मुलांना कधी स्नेहसंमेलनातील नाटक वगैरेत भाग घेऊ दिला जात नाही, भलेही त्यांना अभिनय उत्तम येत असला तरीही. या मुलांना काही वाचता येत नसेल तर त्यांचे वाचन कसे सुधारेल याचा विचार करण्यापेक्षा वर्गात त्यांची टर उडवली जाते. यामुळे ही मुले अभ्यासात आणि कोणत्याही शालेय उपक्रमात मागेच राहतात, कारण शाळा त्यांची अशा प्रकारे विशेष ‘काळजी’ घेते. परिणामी शाळेत ‘ढ’ मुलांना अधिक ‘ढ’ आणि ‘हुशार’ मुलांना अधिक ‘हुशार’ बनवण्याची व्यवस्था निर्माण केली जाते.
यावर काय उपाय असू शकतो, याचे उत्तर म्हणजे नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झालेला गुजराती सिनेमा ‘ढ’. तसा हा सिनेमा २०१७ सालचा आहे. त्या वेळी तो थिएटरमध्ये जाऊन काहींनी पाहिलाही असेल. त्या वेळी याचे बरेच कौतुकही झाले आहे. २०१८ साली या सिनेमाला ‘बेस्ट गुजराती फिल्म’ आणि ‘नॅशनल फिल्म अवार्ड’ असे दोन मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. ज्यांना त्या वेळी हा सिनेमा पाहता आला नाही, त्यांनी आता जो नेटफ्लिक्सवर जरूर पाहावा.
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
एका शाळेतल्या एका वर्गात शेवटच्या बाकावर बसणारे तीन मित्र अभ्यासात मन लागत नसल्यामुळे एका जादूच्या खेळाला हजेरी लावतात. जादूचे अचाट आणि अफाट प्रयोग बघून त्यांना मनोमन वाटायला लागतं की, आपल्यालाही अशी जादू करता आली तर? पण आपल्याला जादू शिकवणार कोण? यावर उपाय म्हणून ते तिघे मित्र जादुगाराला पत्र लिहितात की, आम्हाला अशी जादू शिकवा की, आम्हाला परीक्षेत पास होता येईल. जादूगाराकडून उत्तर स्वरूपात एक पार्सल येते, ज्यामध्ये एक खेळणे असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर जादूची कांडी कशी फिरते, हे सर्व लहान मुलांनी आणि आपल्यातले लहान मूल जपलेल्या किंवा हरवलेल्या पालकांनी बघण्यासारखे आहे.
लहान मुलांवरील सिनेमा कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून ‘ढ’ची निवड करणे क्रमप्राप्त आहे. हा सिनेमा सुरू होताच आपण दाद देतो. सहामाही परीक्षा सुरू होते आणि एक जाडजूड मुलगा उत्तरपत्रिकेवर हनुमानाचे नाव घेऊन स्वतःचे नाव लिहायला सुरुवात करतो, तिथपासून खऱ्या गंमतीला सुरुवात होते. चित्रपट बघताना आपल्याला आपले शालेय जीवन आठवते.
काही मुले कसे हुशारी दाखवून ‘मास्तरांची’ मने जिंकून घेण्याचा आटापिटा करतात, काही मुले इतकी निर्ढावलेली असतात की, शिक्षकांची बोलणी खाऊन खाऊन त्यांच्यात एक कोडगेपणा आलेला असतो. त्यामुळे वर्गात कितीही जाहीर उद्धार झाला तरीही मुले फार मनाला लावून न घेता अभ्यास न करणे सुरूच ठेवतात.
.................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
हे सर्व प्रांजळपणे कथा स्वरूपात लिहिणाऱ्या मनिष सैनी आणि आदित्य विक्रम सेनगुप्ता यांचे विशेष कौतुक. सैनी यांनी पटकथा लिहिताना निनाद पारेख व पार्थ त्रिवेदी यांच्या संवादाची जोड देऊन एकेक प्रसंग असे लिहिले आहेत की, शाळेतला वर्ग कोणताही नाटकीय प्रसंग न घडता त्यातल्या बारकाव्यांसह आपल्यासमोर साकार होतो. काही चित्रपटात शाळकरी मुले पोक्तपणा दाखवून पोपटपंची केल्यासारखे बोलतात, तसे ‘ढ’मध्ये होत नाही. ९७ टक्के मार्क मिळाल्यावरही तीन टक्के मार्क कमी पडल्यामुळे चिंताग्रस्त असलेला दिनेश प्रत्येकाने आपल्या वर्गात बघितलेला असतो. परीक्षेत आपल्याला उत्तर येत नसताना एखादा हुशार विद्यार्थी ‘पुरवणी’ आणि दोरा मागतो, तेव्हा किती त्रास होतो, याचीही हा सिनेमा देतो.
कहान (गुनगुन), करन पटेल (वकील), कुलदीप सोढा (बजरंग) हे तीन बालकलाकार या सिनेमाचे नायक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, मठ्ठपणा, तिघांनी एकमेकांना केलेल्या खाणाखुणा आपल्याला थेट शाळेच्या वर्गात घेऊन जातात. शाळेमधील या तिघांचे स्वप्नरंजन आपल्याला भावते. आपल्यालाही शाळेत असताना कोणीतरी जादूगार यावा आणि त्याने जादूची कांडी फिरवावी असे वाटलेले असते. आफ्रिकेत आपले कुणी काका असावेत आणि त्यांनी अचानक येऊन त्यांची सर्व संपत्ती आपल्याला द्यावी असेही वाटत असते. तशी जादू दाखवता दाखवता चित्रपट मुलांना आणि आपल्याला ताळ्यावर आणतो.
मनिष सैनी यांना कास्टिंगबद्दल शंभर गुण द्यायला हवेत. नसिरुद्दीन शाह यांनी पाहुणा कलाकार म्हणून जादूगाराची भूमिका लीलया केली आहे. अर्चन त्रिवेदी (आजोबा) प्रेक्षकांची मने जिंकतात. ब्रीजेन्द्र काला (हिंदी शिक्षक), सुनील विश्रानी (गणित शिक्षक) हे टिपिकल सरकारी शिक्षक वाटतात. सागर देसाई यांच्या पार्श्वसंगीतामध्ये ढोलक आणि गुजराती लोकसंगीतामधील वाद्ये वाजतात. मेघधनुष यांचे संगीत दिग्दर्शन ठीकठाक.
सिनेमा बघताना आपण मुलांच्या जादुई स्वप्नातला फोलपणा ओळखूनही त्यांना साथ देतो, हे दिग्दर्शक मनिष सैनी यांचे आणि कॅमेरामन प्रल्हाद गोपकुमार यांच्या सिनेमॅटोग्राफीचे वैशिष्ट्य आहे.
उत्तम सिनेमाला भाषेचे बंधन नसते, याचे प्रत्यंतर ‘ढ’ बघताना येतो. गुजराती भाषेचे हिंदी भाषेशी असणारे साम्य आणि चित्रपटाच्या विषयाशी असलेली आपली जवळीक, या दोन्हीमुळे आपण पहिल्या दहा मिनिटांत या सिनेमाशी समरस होऊन एकदम शाळेत प्रवेश घेतो. अर्थात हे कौशल्य दिग्दर्शक मनिष सैनी यांचे आहे. त्यांनी आपल्याला शाळेचे विश्व आणि समाजाला आरसा बेमालूमपणे दाखवला आहे. आरसा बघायला कुणाला आवडत नाही? त्यामुळेच चित्रपटात शेवटच्या प्रसंगाप्रमाणे आपण म्हणतो, ‘रुक, रुक, रुक, एsss रिव्हर्स ले’.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment