‘सिरीयस मेन’ : विषय चांगला, अभिनय उत्तम, मात्र विस्कळीतमुळे तो ना ब्लॅक कॉमेडी होऊ शकला, ना परिणामकारक
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘सिरीयस मेन’ची पोस्टर्स
  • Mon , 05 October 2020
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा सिरीयस मेन Serious Men नवाजुद्दिन सिद्दिकी Nawazuddin Siddiqui सुधीर मिश्रा Sudhir Mishra मनू जोसेफ Manu Joseph

काही वर्षांपूर्वी आलेली मनु जोसेफ यांची ‘सिरीयस मेन’ ही कादंबरी ‘पेन’ ओपन बुक अवार्ड २०११ आणि ‘द हिंदू लिटररी प्राईझ’ विजेती ठरल्यामुळे बहुचर्चित ठरली होती. मुलांसाठी पालकांची चालणारी गळेकापू स्पर्धा कुठे जाणार, हा या कादंबरीचा विषय. या कादंबरीवर त्याच नावाने सिनेमा आला असून तो नुकताच नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला आहे.

आपल्या आजूबाजूला अनेक पालक आपल्या आशा-आकांक्षा आपल्या अपत्यांकडून पूर्ण करण्याचा आटापिटा करताना दिसतात. जे स्वत:ला जमले नाही, ते मुलांकडून करून घेतात. मी लहानपणी तबला शिकलो नाही, आता तू या तबल्याच्या क्लासला जा. मुलेही मारून मुटकून क्लासला जातात, तिकडे वेळ काढतात आणि परत येतात. तबल्याच्या क्लासमध्ये जे कानावर पडते, ते त्यांना पचत नाही, कारण असे काही शिकण्यापूर्वी तसे संगीत कानावर पडणे आवश्यक असते. घरामध्ये असे कोणतेही कार्यक्रम ऐकले जात नसतील, पालक आपल्या मुला-मुलींना कार्यक्रमात घेऊन जात नसतील तर तबला – गाणे – नृत्य यांची आवड कशी निर्माण होणार? पण हातात पैसा असलेला वर्ग ‘हजाराच्याऐवजी पाच हजार घ्या, पण याला झाकीर हुसेन बनवा’ असा आग्रह धरतात.

असे पालक चाचणी परीक्षेत तीसपैकी अठ्ठावीस मार्क पडले तरी मुलांना झापतात आणि दोन मार्कांसाठी शाळेतल्या शिक्षकांशी वाद घालतात. आपल्या पाल्याला किती मार्क पडले यापेक्षा इतरांना किती पडले, वर्गात प्रथम कोण आले, याची चौकशी ते आधी करतात. अशा पालकांना आपल्या पाल्याने अष्टपैलू व्हावे असे वाटत असते. त्यासाठी ते लाखभर रुपये फी पहिलीपासून असलेल्या तथाकथित ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये नाव घालतात, पहिली-दुसरीत शिकणाऱ्या मुलांना शाळेपूर्वी अबॅकस, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, सायन्स अशा तीन-चार क्लासेसमध्ये आणि शाळा सुटल्यावर गायन, ‘बॉलिवुड डान्स’ अशा दार्शनिक कलांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी पाठवतात.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

अशा सर्व कला येण्यामागचा उद्देश रिअॅलिटी शो मध्ये नाव कमावण्याचा असतो. त्या कलांना पूरक वातावरण निर्मिती घरी करण्यासाठी पालकांना वेळ नसतो. त्यामुळे कला बहरत नाहीतच, पण मुलांना या चक्रात अडकल्याचा विलक्षण कंटाळा येतो. पालकांना मात्र आपण मुलांसाठी किती करत आहोत, याचा अभिमान वाटायला लागतो. हीच मुले आठवीत गेल्यानंतर आयआयटी वगैरेची पूर्वतयारी करून घेणाऱ्या क्लासेसमध्ये पाठवली जातात आणि त्यांचे नाव तबला-नृत्य अशा क्लासेसमधून ‘उज्ज्वल करिअर’च्या नावाखाली काढले जाते.  

कथा

‘सिरीयस मेन’ ही मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणाऱ्या अशा एका पालकाची कथा आहे. नायक (नवाजुद्दिन सिद्दिकी) ऑफिसमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे दुःखी असतो. त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तो एका ‘थिअरी’नुसार विचार करतो आणि त्याप्रमाणे ‘जुगाड’ करत राहतो. मोठमोठाले अवघड आणि न समजणारे शब्द संभाषणात वापरले तर लोकांवर चांगले इम्प्रेशन पडते, हे त्याच्या लक्षात येते. आपल्या ‘शास्त्रज्ञ’ बॉसकडून तो ते शिकतो आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये जाताना मोबाईलवर असेच काहीबाही बोलत लीलया प्रवेश मिळवतो. अशाच कुलंगड्या करून मुलगा आदीसाठी प्रतिष्ठीत शाळेत प्रवेश मिळवतो. लहान मुलाच्या तोंडून मिळणाऱ्या अगम्य भाषेतील उत्तरांनी आदी (आकाशनाथ दास) एका रात्रीत लिटल चॅम्प उर्फ वंडरबॉय बनतो. त्यासाठी वडील जे जुगाड करतात, त्याचे दूरगामी परिणाम त्या मुलाच्या मनावर होतात हे या चित्रपटात दाखवले आहे. ओजा (इंदिरा तिवारी) ही नायकाची पत्नी भक्तिभावाने नवऱ्याचे कारनामे अचंबित होत बघत असते, कारण ती मिळणाऱ्या क्षणिक सुखाला भुलते.

दिग्दर्शन, एडिटिंग आणि सिनेमॅटोग्राफी

‘हजारो ख्वाहिशे ऐसी’फेम दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांना हा विषय ब्लॅक कॉमेडी स्वरूपात सादर करायचा होता, परंतु त्याचे भान सुरुवातीपासून सुटलेले दिसते. लहान मुलाच्या ताणतणावावरील हा चित्रपट सुरू होतो नायक-नायिका सेक्स करताना दाखवून! ओटीटी म्हणजेच ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिसद्वारे हे चित्रपट घराघरांत पोहोचत असले तरी याचा अर्थ मिळालेले स्वातंत्र्य कसेही वापरावे असा नाही. पालकांनी मुलांवर लादलेले अपेक्षांचे ओझे हा सिनेमाचा विषय असला तरी तो पालकांनी मुलांशिवाय बघावा असं तर सांगायचं नाही ना? पहिल्या तीन मिनिटांत मुलाच्या आई-वडिलांची सेक्स पोझिशन आणि त्यामागचा नायकाचा ‘विचार’ दाखवून दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे?

मात्र शास्त्रीय शब्द नायकाच्या कानावर कसे पडतात आणि त्याचा तो कसा उपयोग करून घेतो, हे दिग्दर्शक सुधीर मिश्रा आणि सिनेमॅटोग्राफर अलेक्झांडर सुरकाला यांनी चांगल्या पद्धतीनं दाखवलं आहे. त्यामुळे हा सिनेमा तुकड्या तुकड्यात चांगला वाटतो, पण त्याचा एकसंध परिणाम होत नाही. 

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

माध्यमांतर

मूळ कादंबरीत चाईल्ड प्रोडीजी करण्याचे स्वप्न बघणारा बाप (दलित नायक), त्या बापाची ऑफिसमध्ये बॉसकडून होणारी अवहेलना, बॉस म्हणजे डायरेक्टरचे संस्थेमध्ये काम करणाऱ्या रिसर्चर बरोबर असलेलं प्रेमप्रकरण, नायक बॉसचा बदला घेण्यासाठी त्याचा कसा वापर करतो वगैरे अनेक धाग्यांची गुंफण केली आहे. परंतु या कादंबरीवर पटकथा लिहिताना अभिजित खुमान, भावेश मंडला, निखिल नायर आणि निरंजन भट्ट या चौघांचा बराच गोंधळ झालेला दिसतो. हा गोंधळ दिग्दर्शक आणि विशेषतः संकलक सावरून घेऊ शकतात, परंतु अतनू मुखर्जी यांनी त्या कथेमधील काहींचा गुंता करून ठेवलाय, जो आपल्याला सिनेमा त्रयस्थपणे आणि तटस्थपणे बघण्यास भाग पाडतो. त्यामुळे आपण सिनेमातल्या बाप-लेकाच्या कथेमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतत नाही. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अभिनय

हा सिनेमा नवाजुद्दिन सिद्दिकीच्या अभिनयासाठी बघावा. तो नैसर्गिक अभिनयाने आपल्या मनाचा ठाव घेतो. बापाची तगमग, त्याचे स्वगत, त्याची विचार करण्याची पद्धत आणि बायको-मुलगा-बॉस-शाळा-ऑफिस या सर्व पातळीवर होणारी तारेची कसरत नवाजुद्दिनने अप्रतिमरीत्या दाखवली आहे. आकाशनाथ दास या चिमुरड्याने तो शाळेतला मुलगा, चाईल्ड प्रोडीजी, टीव्हीच्या मुलाखतीमधले भेदरलेपण, पराभूत मनोवृत्तीने स्टेजवर येणे हे सर्व फार सुंदररीत्या दाखवले आहे. इंदिरा तिवारीने उभी केलेली ओजा ही पत्नी लाजवाब. ‘चाची ४२०’सह अनेक चित्रपटांतून लक्षवेधी भूमिका साकारलेला नसर यांनी याही भूमिकेचे बेअरिंग उत्तमरीत्या पकडले आहे. संजय नार्वेकर (राजकारणी), श्वेता प्रसाद (राजकारण्याची सहाय्यक) यांची निवड आणि अभिनय उत्तम. चाळीतल्या छोट्या खोलीतले वातावरण सत्यतेचा उत्तम आभास निर्माण करते. 

‘जाने भी दो यारो’, ‘पुष्पक’, ‘फस गये रे ओबामा’ यांयासारखे सिनेमे उत्कृष्ट ब्लॅक कॉमेडी आहेत. ‘सिरीयस मेन’चा विषय चांगला, अभिनय उत्तम, मात्र दिग्दर्शन-एडिटिंगमधल्या विस्कळीतमुळे तो ना ब्लॅक कॉमेडी होऊ शकला, ना परिणामकारक.

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख