अजूनकाही
'डिअर जिंदगी'च्या परीक्षणात ('डिअर जिंदगी' : बालिश कामासाठी शाबासकी, ‘अक्षरनामा’, १० डिसेंबर २०१६, http://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/273) शाहरुख खानच्या 'ब्रॅंड'बद्दल थोडं बोललो होतो. त्याला खरं तर भारतातला आजच्या काळातला ‘गंधर्व’च म्हणायला हवं, ते जास्त योग्य राहील. चित्रपटात तो पडद्यावर आला की, प्रेक्षकांची ‘आरती’ सुरू होते! फक्त शब्दांच्या ऐवजी आरोळ्या आणि घंटीच्या जागेवर शिट्ट्या!! मग तो चित्रपटात त्या पुढे काही का करेना. सलमान तसा आमचा शाहरुख!!! चित्रपटभक्तांची ही श्रद्धास्थानं म्हणायला हरकत नाही. शाहरुखची खरी ताकद ‘रईस’मधील एका दृश्यात आपल्याला दिसते. जेव्हा तो स्वतःच्या रक्ताळलेल्या पाठीवर चाकूंनी फटके देत असतानाही ‘सेक्सी’ दिसतो तेव्हा... क्वचितच कलावंत हे साध्य करू शकत असतील.
तसं 'रईस'चे निर्माते त्याची कथा काल्पनिक आहे असं म्हणतात, तर अब्दुल लतीफ या गुजरातमधील डॉनचा मुलगा मुशताख शेख म्हणतो की, त्यांनी त्याच्या वडिलांच्या आयुष्याची कथा ढापून त्यांना चुकीचं दाखवलं आहे. खरं काय कोणास ठाऊक! फरक तरी काय पडतो? बऱ्याच प्रसिद्ध गुंडांवर या आधीच चित्रपट येऊन गेले आहेत. त्याची सुरुवात ‘सत्या’पासून झाली असं म्हणायला हरकत नाही. त्या नंतर ‘कंपनी’, ‘वास्तव’, ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘सरकार’सारख्या चित्रपटांनी गुंडांवरील गोष्टींचं मार्केट पूर्ण गिळून टाकलं आहे. आता काही उरलेल्या गुंडांवर चित्रपट अधूनमधून येतात. असो.
‘रईस’ला आपण काल्पनिकच समजूया.
एखाद्या काल्पनिक चित्रपटाची पटकथा लिहिणं कदाचित काही बाबतीत थोडं सोप्पं जात असावं. ‘रईस’ची पटकथा त्याच्या गोंधळलेल्या एडिटिंगमुळे पूर्णपणे पारखणं थोडं अवघड जाऊ शकतं. तरी पटकथेचं प्रमुख ध्येय ‘रईस इन्टू रॉबिनहुड' असं असावं. त्यातल्या काही बाबी प्रेक्षकांना कळाव्या आणि ते त्या विसरू नयेत म्हणून त्या वारंवार पात्रांच्या तोंडून वदवून घेण्याची दक्षता घेतली आहे. त्यासाठी पात्रांमध्ये होणारे बदल, त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचा प्रवास अशा शुल्लक गोष्टी बाजूला केल्या आहेत.
रईस (शाहरुख) सगळ्यात भारी, आसिया (माहिरा खान) सुंदर व सदा प्रेमळ, मजुमदार (नवाजुद्दीन सिद्दीकी) विक्षिप्त पण प्रामाणिक पोलिस ऑफिसर, सनी लिओन सेक्सी वगैरे वगैरे. ‘बनिये का दिमाग और मियाँभाई की डेरिंग’, ‘कोई भी धंदा छोटा नहीं होता...’, वगैरे वगैरे. या ट्रेलरमध्ये पाहिलेल्या गोष्टी चित्रपटात पुन्हा अनेक वेळा. पात्रांचं सॉलिड ब्रॅंडिंग! त्या बरोबर दृश्य व घटना फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपवर येणाऱ्या फॉर्वर्डससारख्या पटापट पुढे सरकत जातात.
क्राईम सिनेमामधील संवाद हे बऱ्याचदा संस्मरणीय असतात. प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यात ते कल्पित संवाद कधीतरी बोलण्याची सुवर्णसंधीसुद्धा मिळते! ‘रईस’मध्ये असे बरेच संवाद आहेत. त्यांचे नुसते शब्द प्रेक्षकांना भावले नाही तरी त्यांच्या संवादफेकीमध्ये अतिशयोक्ती कुठेच कमी पडलेली नाही! ही शाब्दिक रत्ने मुख्यतः दोन पुरुषांमधल्या ‘तलवारबाजी’चाच भाग आहेत!!
उदाहरणार्थ, रईस मजुमदारला काही तरी भारी बोलणार, मग मजुमदार त्याला तोडीस तोड उत्तर देणार. त्यावर रईस जबाबी हल्ला चढवणार. मग असा कलगी-तुरा करत रईस अर्थातच जिंकणार. एण्ड ऑफ सीन!!!
माझ्या मते तरी पण हे संवाद किंचित अपुरे वाटतात. मग माझ्या लक्षात आलं की, प्रत्येक भारी संवादाच्या शेवटी त्याला मनातल्या मनात एखादी शिवी जोडली तर तो पूर्णत्वाला गेल्यासारखा वाटतो. ‘रईस’मधील ते भारी संवाद ऐकताना वा नंतर घरी परतल्यावर तुम्ही हा प्रयोग करून बघा.
साधारण १९६० ते ९० मधला काळ ‘रईस’मध्ये दाखवल्यामुळे यातील कला दिग्दर्शन खूपच महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांना पडद्यावर दाखवला जाणारा काळ हा खरा वाटला पाहिजे. हे साध्य करण्यासाठी रईसचा त्या काळातला चष्मा, फाउंटन पेन, एक जुनी गाडी, एक जुनी मोटारसायकल, काही जुने टेलिफोन इत्यादी गोष्टींचा चित्रपटात समावेश केला आहे. चित्रपटात कुठे रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या बाटल्या दिसतात, त्या ८०-९०च्या दशकात भारतात मिळत होत्या का? अर्थात एवढा पुढचा आणि अनावश्यक विचार टाळावा. अशा अजून काही विसंगती सापडल्यास, त्या कल्पनाशक्ती वापरून दुर्लक्षित केल्यास ‘रईस’चा आनंद अनुभवता येतो. अखेर त्याचं कथानक काल्पनिक आहे!
यातला शाहरुखचा अभिनय नेहमीप्रमाणे आहे. माहिरा खानचा तिला मिळालेल्या काही भागात अभिनय आहे. नवाजउद्दीनला चित्रपट बघून अभिनय ‘किती करायचा’ हे आता जमायला लागलं आहे. अतुल कुलकर्णीचाही अभिनय असला तरी ‘व्हिलन’ म्हणून तो खरा/भीतीदायक/ तिरस्करणीय वाटत नाही. बाकीच्यांचाही अभिनय आहेच. रईसवर अनंत प्रेम करण्याचा किंवा त्याला घाबरण्याचा किंवा त्याच्यावर चिडण्याचा. स्पष्टतेला अजिबात धक्का लागू न देणं हे प्रशंसनीय आहे.
असं म्हणतात की, जॅकी चॅन अॅक्शन सीन्सच्या दिग्दर्शनाला आणि एडिटिंगला प्रचंड महत्त्व देतो. चित्रपटाचं अती विश्लेषण करणाऱ्यांचा एक आवडता, 'एव्हरी फ्रेम अ पेंटिंग' नावाचा यु-टुब चॅनेल आहे. त्यावर जॅकीच्या अॅक्शन सीन्सबद्दलच्या तत्त्वांबद्दलचा ‘व्हिडिओ निबंध’ पाहिल्यास त्याचं म्हणणं कदाचित नीट समजून घेता येईल. ‘रईस’मधील मारामारी या तत्त्वांना अजिबात धरून नसली तरी ती भारीच आहे. शाहरुख या, म्हणजे पन्नाशीपारच्या, वयातही स्लो मोशन सर्कस मारामारी इतक्या सहजपणे पार पाडू शकतो हे लक्षात येईलच. प्रत्येक लढाईच्या एडिटिंगमध्ये प्रभावीपणा, आशय, अवकाश, सत्याभास आणि अशा इतर मोठ्या शब्दांवर वेळ वाया न घालवता ढिशूम, ढिश्क्याव आणि धडाम अशा अकृत्रिम भावनांवर योग्यपणे लक्ष्य केंद्रित करून मजेचा उच्च बिंदू गाठला आहे.
‘रईस’च्या शेवटच्या प्रसंगाबद्दल बोललंच पाहिजे. एरवी कथानकाबद्दल फार बोलू नये या मताचा असलो तरी पुढची काही वाक्यं त्या नियमचा अपवाद समजावीत. चित्रपट बघायच्या आधी गोष्ट कळू नये अशी इच्छा निर्माण झाली असल्यास खालील १९९०च्या शाहरुख खानच्या फोटोनंतर कृपया पुन्हा वाचन सुरू करावं.
तर, चित्रपटाचा शेवट. रईसकडून एक चूक घडते आणि तो १९९२ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात उगाच अडकतो. पर्फेक्ट अशा रईसला आपण दोन तासांनंतर पहिल्यांदा कासावीस होताना पाहतो. तो स्वतःच मरण पत्करतो. इथं इतका वेळ हलकेपणे पुढे सरकणारा चित्रपट एकदम खूप जड वाटू लागतो. वाईट तर वाटतंच, पण त्याचबरोबर आश्चर्यचा धक्काही बसतो. म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रवासात, कथेचा असा अंत होईल याचा काहीच मागमूस ठेवलेला नाही. अशी वळणं सहसा रचलेल्या कथांमध्ये नसतात, खऱ्या आयुष्यात असतात. अब्दुल लतीफचा अंत असाच झाला होता, पण तो कदाचित योगायोग असेल.
चांगले चित्रपट आपल्या बॉलिवुडमध्ये इतके कमी का बनतात? चित्रपटांच्या नावाखाली नुस्ती ‘पॉर्नोग्राफी’च का बघायला मिळते? नाही, मी फक्त ‘रईस’मधल्या सनी लिओनच्या आयटम साँगबद्दल बोलत नाही आहे. आपल्याला 'माइंडलेस एण्टरटेंनमेंट' हीच श्रेणी खूप हवीहवीशी का वाटते? काहीतरी खळबळजनक आणि काहीही खळबळजनक यातील अंतर एवढंही कमी नसतं, नाही. आपलं ‘डोकं’ वा ‘बुद्धी’ आपल्याला वाटतं, त्यापेक्षा अजून खूप जास्त तहानलेलं असेल का?
लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.
yashsk@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment