अजूनकाही
‘c u soon’ हा मल्याळम सिनेमा १ सप्टेंबर रोजी ‘अॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला आहे. महेश नारायनन यांचं दिग्दर्शन आणि फहाद फासील यांनी निर्मिती असलेला हा सिनेमा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. करोना काळात अडचणीत सापडलेली हिंदी चित्रपटसृष्टी नव्या कल्पना शोधत असताना मल्याळम चित्रपटसृष्टी एक नवी धाडसी कल्पना घेऊन आली आहे. मोबाईल-कम्प्युटरवर चित्रीकरण करत चित्रपटनिर्मितीचा नवा कल्पक पायंडा मल्याळम चित्रपटसृष्टीने या सिनेमाच्या निमित्ताने पाडला आहे.
कोणत्याही बिकट परिस्थितीत तुम्ही सर्व गोष्टी गुंडाळून, दाबून ठेवू शकता, पण कलेला कैद करता येत नाही. कला नेहमीच मोकळ्या हवेत श्वास घेते.
सिनेमाच्या सुरुवातीला मोबाईल-कम्प्युटरवर चित्रित होत असलेली दृश्ये आणि बरेचसे संवाद केवळ मॅसेजेसच्या माध्यमातून दाखवले जात असताना असं वाटू शकतं की, अशी माध्यमं वापरून चित्रपट थ्रिलिंग कसा काय होऊ शकेल? पण नेमकी हीच भावना काही वेळानंतर बाजूला पडू लागते आणि आपण कथेत गुंतत जातो. अतिशय कल्पक दृष्टीने केलेल्या एडिटिंगमुळे कथा वेगानं पुढे जाते.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘कॉल हिम एडी’ - ‘स्पर्शा’बाबतचे भयानक आणि भयंकर गैरसमज दूर करणारा लघुपट
..................................................................................................................................................................
सिनेमाची कथा सुरू होते दुबईस्थित जिमी कुरियन (रोशन मॅथ्यू) आणि अनुमोल (दर्शना राजेंद्रन) यांच्या ‘टिंडर डेटिंग अॅप’च्या चॅटिंगपासून. त्यानंतर व्हिडिओ चॅटिंग आणि नंतर एकमेकांबद्दल प्रेम. पुढे जिमी व्हिडिओ कॉलवरून आई आणि बहिणी समोर अनुला लग्नासाठी विचारतो. केवळ डेटिंग अॅप आणि व्हिडिओ कॉलवरून हे सगळं घडत असल्यानं जिमीची आई धास्तावते. मुलीचं कुटुंब किंवा इतर काहीही माहीत नसताना केवळ आभासी गोष्टींवरून मुलगा आयुष्याचा साथीदार निवडत आहे, याची भीती तिला वाटू लागते. जिमीची आई तिचा पुतण्या केविनला (फहाद फसील) आपली भीती दाखवते आणि त्या मुलीची माहिती मिळवायला सांगते.
केविन एका सॉफ्टवेअर कंपनीत संजना नावाच्या मुलीच्या हाताखाली काम करत असतो. त्यामुळे सतत केविनचा इगो हर्ट होत असतो. तो कोणत्याही प्रकारे तिला सहकार्य करत नसतो. ऑफिसच्या एका ऑनलाइन मिटिंगमध्ये तिला ‘बिच’ अशी शिवीगाळही करतो. केवीनची स्त्रियांबद्दलची असंवेदनशीलता टोकाची असते. अशा स्वभावाचा केविन आपल्या भावाच्या मदतीसाठी अनुला व्हर्च्युअली ट्रॅक करायला लागतो. फेसबुक अकाउंट, आयपी अड्रेसवरून डेटा गोळा करून तो जिमीच्या आईला कळवतो की, मुलगी खूप ‘ऑथेंटिक’ आहे, आणि कॅथलिकदेखील आहे.
‘कॅथलिक’ आहे, हे सांगताना केवीनच्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद त्या वेळी दाखवला आहे!
केविनने दिलेला ग्रीन सिग्नल पाहून पुढे जिमी-अनुचा संवाद वाढत जातो. एके दिवशी अनु स्वतःला मारहाण झालेला व्हिडिओ जिमीला पाठवते. दुबईत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणं गुन्हा आहे, हे माहीत असतानादेखील भावनिक होऊन जिमी तिला घरी घेऊन येतो. थोड्याच दिवसांनी अनु अचानक जिमीचं घर सोडून जाते आणि पुढे जिमी अडचणीत येतो. अनुला शोधल्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. तो पुन्हा केविनला विनंती करतो. तो पुन्हा व्हर्च्युअल ट्रॅकिंग आणि तिचे फेसबुक अकाउंट हॅक करून माहिती मिळवू लागतो. अनुचा तपास करत असताना तिच्यासोबत घडलेल्या भयानक गोष्टी त्याच्या समोर येऊ लागतात.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : भक्तीचा बुरखा पांघरून भक्तांचा गैरफायदा घेणाऱ्या ढोंगी आध्यात्मिक बाबाचा समाचार घेणारी वेबमालिका
..................................................................................................................................................................
केरळी लोकांचे गल्फ देशांशी असणारे संबंध आणि त्यातून होणारे गंभीर गुन्हे, यावर कथा येऊन पोचते. एकूणच व्हर्च्युअल जगात तपास करत असताना प्रत्यक्ष जगात घडणाऱ्या घटना पाहून केवीन अस्वस्थ होतो. पुढे हे सर्व करत असताना एका हॅकिंगसाठी केविनला संजनाची गरज भासते आणि तीही एका स्त्रीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, हे समजून त्याला मदत करायला तयार होते.
थोडक्यात या सिनेमात व्हर्च्युअल जग आणि त्याच्याशी संबंधित दोन पुरुषी मानसिकततेची बांधणी पटकथेतून केली आहे. एकीकडे व्हर्च्युअल जगात प्रेम शोधणारा जिमी आणि त्याच्या समोर येणारी आव्हानं, तर दुसरीकडे मिसोजिनिस्ट केविनला व्हर्च्युअल जगामुळे स्त्रियांसंबंधी असणाऱ्या गंभीर समस्यांचं होणारं दर्शन आणि त्याच्यात स्त्री जातीबद्दल निर्माण होणारी संवेदनशीलता, हा या सिनेमाचा आशय आहे.
दोन वेगवेगळ्या पुरुषी मानसिकतेचं वर्णन करताना एकाच व्हर्च्युअल जगाची तुलना दोघांच्या नजरेतून कशी भिन्न प्रकारची दिसते, हे नेमकेपणानं दाखवलं आहे. म्हणूनच चित्रपट व्हर्च्युअल विश्वावर आधारला जरी असला तरी तो जिवंत अनुभव वाटू लागतो. शेवटी दोघांच्या मनावर होणारा सकारात्मक परिणाम आशादायी वाटतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आजच्या तरुण पिढीचा व्हर्च्युअल जगाशी असणारा संपर्क आणि त्यातून समोर येणारं वास्तव किती निराळं असू शकतं, याचीही जाणीव करून देणारा हा सिनेमा आहे. व्हर्च्युअली कनेक्ट असणं आणि फिजिकली कनेक्ट असणं, यातील फरकही स्पष्ट करतो. व्हर्च्युअल जगात वावरत असताना आपण किती सहजपणे ट्रॅक केले जाऊ शकतो, याची कल्पना या सिनेमातून होते.
केवळ आयफोनवर चित्रीकरण केलेला हा सिनेमा एक अनोखा प्रयोग आहे. गुगल ड्युओसारख्या माध्यमातून साधलेला संवाद असल्यानं सर्व दृश्यं केवळ चेहऱ्यावर केंद्रित आहेत, तरीदेखील ती अडचणीची वा त्रासदायक वाटत नाहीत. फहाद फासील, रोहन मॅथ्यू आणि दर्शना राजेंद्रन या तिघांनीही आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे निभावल्या आहेत.
याआधीही अशा प्रकारचे सिनेमे आलेले आहेत, नाही असं नाही, पण ‘c u soon’मधील कथा, अभिनय, एडिटिंग, चित्रीकरण पाहता हा सिनेमा ‘मैलाचा दगड’ ठरतो. तो प्रादेशिक भाषेत असला तरी जग कवेत घेण्याचं धाडस दाक्षिणात्य कलाकारांमध्ये आहे, हे दृष्टीस आल्यावाचून राहत नाही. आपण सामोरं जात असलेल्या काळाला बाजूला सारून हा सिनेमा कलाविश्वात एक नवा धाडसी प्रयोग मांडतो. सिनेमाच्या शेवटी ‘हे चित्रपटातील पात्रांचं व्हर्च्युअल आयुष्य तुम्ही पाहिलं, पाहुयात त्यांचं खरं आयुष्य सिनेमागृहात... c u soon...’ असं सांगत नवी आशादेखील देतो.
..................................................................................................................................................................
लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.
advbaabar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment