अजूनकाही
‘आ रहा हूं...’ असं म्हणत काही दिवसांपूर्वी ‘रईस’चा ट्रेलर आला. शाहरूख खानची दुसरी इनिंग, राहुल ढोलकियासारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आणि नवाजउद्दीन सिद्दीकीसारखा कसलेला अभिनेता. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचली होती. ठरल्याप्रमाणे २६ जानेवारीच्या मुहूर्तावर शाहरूखचा 'द मोस्ट अवेटेड' चित्रपट ‘रईस’ प्रदर्शित झाला!
हिंदी चित्रपट खरंच बदलत आहे. वेगवेगळे प्रवाह त्यात मिसळत आहेत. आर्ट सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा, क्लास-मास प्रेक्षकवर्ग यातील दरीही कमी झाली आहे. ‘दंगल’, ‘एअरलिफ्ट’, ‘तनु वेड्स मनू’, ‘नीरजा’, ‘उडता पंजाब’, ‘पिंक’सारख्या अतिशय भिन्न असणाऱ्या आणि वेगळी वाट निवडणाऱ्या चित्रपटांवर प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम करत आहे. महत्त्वाचं म्हणजे ते प्रेम तिकीटबारीवरसुद्धा दिसत आहे. त्याचा उच्चांक म्हणून सलमान खानसुद्धा ‘बजरंगी भाईजान’ सारखा संवेदनशील चित्रपट घेऊन आला! पण या सगळ्यात शाहरूखच मागे का?
त्याला कारणं आहेत. ‘स्वदेस’सारखा सुंदर चित्रपट फारसा चालला नाही, ‘पहेली’सारख्या हटके फँटसी असलेल्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, ‘फॅन’मध्ये केलेला प्रयत्नही पुरता फसला आणि नुकताच आलेला ‘डियर जिंदगी’ तर खुद्द शाहरूखच्या चाहत्यावर्गानेच नाकारला.
त्यामुळे पुन्हा शाहरूख नेहमीच्या वाटेवर परतला आहे!
परिणामी ‘रईस’ हा तद्दन धंदेवाईक, मसाला चित्रपट आहे. तो तसा असण्यावर काहीच आक्षेप नाही. पण त्यातला मसाला जर जीव ओतून टाकला असता तर त्याचीही मजा घेता आली असती! 'ओल्ड वाईन इन न्यू ग्लास' म्हणावं तरी पंचाईत. म्हणजे तो ग्लास, केवळ चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे म्हणून नवीन म्हणावा का, असा प्रश्न पडतो?
चित्रपटाची पटकथा तशी बेताची (आणि काहीशी उथळ प्रेमकथेत भरकटणारी) आहे. गुजरातसारख्या दारूबंदी असलेल्या राज्यात रईस (शाहरूख खान) हा महत्त्वाकांक्षी तरुण स्वतःचा विदेशी दारूचा व्यापार सुरू करतो. मग त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, डावपेच, विरोधी व्यापारी, राजकारण आणि त्याच्या मागावर असलेला पोलिस अधिकारी जयदीप मुजुमदार (नवाजउद्दीन सिद्दीकी) अशा भरपूर गोष्टी ‘रईस’मध्ये अपेक्षेप्रमाणे येत राहतात. बऱ्याच ठिकाणी अगदी अलीकडेच सुरू झालेल्या 'नार्कोस' या नेटफ्लिक्सवरील मालिकेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अस्सलतेचा अभाव अनेकदा जाणवत राहतो.
‘टॉम अँड जेरी’ आठवतंय? तसाच इथं उंदीर-मांजराचा (चोर-पोलिसांचा) खेळ आहे. म्हणजे त्यात डाव-पेच आहेतच. पण ‘टॉम अँड जेरी’ पाहताना जसं आपण धम्माल हसतो, तसं ‘रईस’ पाहताना एक-दोन वेळेसच, तेही अतार्किक गोष्टींमुळे मनापासून हसू येतं. चित्रपट सुरू होतो तो रईसच्या बालपणापासून. सुरुवातीचा एक प्रसंग छान जमला असल्यामुळे आणि घटनांचा वेग जास्त असल्यामुळे आपल्या अपेक्षा वाढतात. पण पुढे चित्रपट यथातथा होत जातो. पटकथेत फारसा दम नसल्यामुळे आणि विनाकारण मध्ये मध्ये येणाऱ्या तब्बल अर्धा डझन गाण्यांमुळे आपण थकून जातो.
चित्रपट अॅक्शन- थ्रिलर जॉनरचा असल्यामुळे अॅक्शनमध्ये दम असायला हवा होता. तो आहेसुद्धा. पण काही काही दृश्यं व्हिडीओ गेममधील असल्यासारखी वाटतात. म्हणजे भिंतीवर कशाचाही आधार न घेता चढणं, इमारतीवरून चालत्या ट्रकमध्ये उडी मारणं आणि तेवढंच नव्हे तर त्याच बरोबर एक लाथसुद्धा...वगैरे वगैरे.
८०-९० च्या दशकात उभारलेली ही कथा सामान्य असली तरी तो काळ, माहोल उभा करण्यात दिग्दर्शकाला पुरतं यश आलंय. त्यात के. यू. मोहाननच्या सिनेमॅटोग्राफीचा आणि राम संपथच्या बॅकग्राउंड स्कोअरचा वाटा महत्त्वाचा आहे. खास करून ‘रईस’ची ट्यून मजा आणते.
‘रईस’चे ‘मियाँभाई की डेरिंग’, ‘थाने की चाय’, ‘शेरोंका जमाना’ असे काही संवाद मात्र चमकदार आहेत. शाहरूख आणि नवाज जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा तर ते जास्त खुलतात हे सांगायला नको. शिट्टीचा प्रसंग, नवाजची एंट्री, रोडरोलरचा प्रसंग, कॅरम खेळतानाचा प्रसंग, प्री- क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स असे काही प्रसंग चांगले जमून आले आहेत.
अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर शाहरूख ‘रईस’च्या भूमिकेत चांगला वाटतो. म्हणजे त्याचा एकूणच अंदाज, पेहराव (चष्मा, डोळ्यात काजळ) वगैरे छान आहे. पण व्यक्तिरेखेचा आलेख जरी चढता-उतरता असला तरी तो आपल्यापर्यंत म्हणावा तितका पोहचत नाही. अर्थात शाहरूख त्याचं काम चोख करतो, पण लिखाणातील उणीवा जाणवत राहतात. म्हणजे दिग्दर्शकाला शाहरुखला चित्रपटाचा हिरो करायचं आहे, व्हिलन की अँटी हिरो हे समजलं नसावं असं वाटत राहतं. ‘वन्स अपॉन…’मधील सुलतान मिर्झासुद्धा बऱ्याच वेळेला त्याच्यात डोकावत राहतो.
नवाजुद्दीनसुद्धा शाहरूखच्या समोर उभा असल्यामुळे त्यांच्यातील जुगलबंदी मस्त रंगणार अशी अपेक्षा होती. ती काही अंशी खरी ठरते. पण त्याहून त्यांचे वैयक्तिक प्रसंग जास्त चांगले वाटतात, हे सुद्धा तितकंच खरं. नवाजला म्हणावा तेवढा वाव नाहीये याची खंत मनात राहते. तरीसुद्धा तो आपल्या वाट्याला आलेले प्रसंग, संवाद आणि व्हॉइस ओव्हर नरेशन मस्त रंगवतो. किंबहुना काही प्रसंगांत शाहरूखपेक्षा वरचढही ठरतो.
माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रीला का घेतलं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणं साहजिक आहे. म्हणजे अभिनयाची बाराखडीही येत नसलेली अभिनेत्रीच घ्यायची होती, तर त्यांची आपल्या इथं कुठे कमी होती? मोहम्मद अय्युब मात्र लक्षात राहतो. शाहरूखच्या समोर त्याचं रिअॅक्ट होणं नक्की भावतं. त्या दोघांच्या लहानपणीचे प्रसंगसुद्धा पुढे चांगले येतात. अतुल कुलकर्णी यांना अभिनयास थोडा तरी वाव आहे, पण उदय टिकेकर यांना तेवढाही नाही.
त्यामुळे अपेक्षा ठेवून गेलात तर पदरात फारसं काही पडणार नाही. स्टारडमच्या कोशात अडकलेल्या शाहरूखचा पूर्वापार चालत आलेला चित्रपट पाहायला जातोय, या विधानाशी जर तुम्ही स्वतः प्रामाणिक असाल तर मात्र एकदा बघायला हरकत नाही.
लेखक एमबीबीएस करत असून चित्रपट आस्वादक आहेत.
ashutosh.jarandikar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment