चला, जरा सुशांतसिंग राजपूतच्या चित्रपटातील ‘हिंदू-मुस्लीम मैत्री’ आणि इतर ‘गैरसोयीच्या सत्या’बद्दल बोलूया…
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अन्ना एम. एम. वेट्टीकाड
  • सुशांतसिंग राजपूत
  • Mon , 10 August 2020
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा सुशांतसिंग राजपूत Sushant Singh Rajpu केदारनाथ Kedarnath पीके PK काई पो चे Kai Po Che पद्मावत Padmaavat

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला. अभिनेता सुशांतसिंग राजपूतने या चित्रपटात मन्सूर नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे. केदारनाथच्या स्थानिक लोकांनी हिंदूचे तीर्थक्षेत्र असलेल्या केंद्रामध्ये एक नवीन हॉटेल आणि इतर व्यावसायिक दुकाने बांधण्याविषयी चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित केलेली असते. मन्सूर त्या बैठकीला हजर असतो. त्या बैठकीत मन्सूर केदारनाथ येथील संवेदनशील पर्यावरणीय हितसंबंधाच्या काळजीपोटी असा पर्याय सुचवतो की, दरवर्षी केदारनाथला येणाऱ्या भक्तांच्या संख्येवर निर्बंध घालायला हवेत, तेव्हा बैठकीमधील तणाव ठळकपणे दिसून येतो. मन्सूर मुस्लीम असतो आणि तो हिंदू यात्रेकरूंना प्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिराकडे ने-आण करण्याचे हमाली काम करत असतो. बैठकीत एक जण त्याला विचारतो, “तू आमच्यामध्ये कोठून आलास?” तेव्हा तो व्यक्ती मन्सूरच्या हस्तक्षेपाकडे स्पष्टपणे एक अपमानकारक घुसखोरी म्हणून पाहतो. मन्सूरला आश्चर्य वाटते. तो म्हणतो, “परंतु आम्ही तर इथे कितीतरी काळापासून राहत आलेलो आहोत.... आम्ही इथलेच आहोत.’’

‘केदारनाथ’ चित्रपटातील हा क्षण एकेकाळच्या सर्वसमावेशी समाजाचा भाग असलेल्या या भारतीय मुस्लिमांच्या ‘इतर’पणाचे मर्मभेदी दर्शन आहे. या ‘इतर’पणाला वर्तमान सार्वजनिक चर्चा विश्वामधून उग्रपणे चाललेल्या ‘इस्लामोफोबिया’ने (मुस्लिमांबद्दल इतरांना वाटणारी भीती) अधिकच लक्षणीय केलं आहे. आणि अलीकडील काही मुख्य बॉलिवूड निर्मात्यांनी या ‘इतर’पणाला दृढ केलं आहे, त्यास उत्तजेन दिलं आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतरच्या आठवड्यांमध्ये तुम्ही कल्पना केली असेल की, ‘केदारनाथ’मधील हे दृश्य त्याच्या कामाचा व्यापकपणे गौरव करण्याच्या चर्चेसाठी पुन्हा पुन्हा घेतले जाईल, परंतु तसे घडलेले नाहीये.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या निधनानंतर त्याचं मनारेजंक चित्रपटचरित्र, भारतातील मानसिक आरोग्याच्या जाणिवेचा अभाव, नैराश्य, आत्महत्या, बॉलिवूडमधील उच्चभ्रूपणा, देशातील सगळ्या व्यवसायातील वशिलेबाजी, भारतीय चित्रपट-उद्योगातील जात-वर्ग विभाजन अशा सगळ्या विषयांचे एखाद्या समंजस समाजात गंभीरपणे विश्लेषण केले गेले असते. या उलट भारतात विवेकावर कुरघोडी करत खळबळजनक गोष्ट केंद्रस्थानी आणल्या गेल्या. त्यामुळे मागील काही आठवडे गोंगाटाच्या वावटळीत निघून गेले आहेत. वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांना किंवा सुशांतसिंगच्या जीवन व कार्याला या गोंगाटाने कसलाही न्याय दिलेला नाहीये.

शांत व संयमीपणाच्या जागी सोशल मीडियावर आपल्याला काय पहायला मिळालं? तर गोंधळ....गोंगाट. सुशांतसिंगच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर विचित्र मतमतांतरे नोंदवली गेली. बॉलिवूडच्या सिताऱ्यांच्या मुलींबद्दल वापरलेले स्त्री-द्वेष्टी अपशब्द, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यावर झालेली समलिंगीपणाची टीका, मुस्लिमांबद्दलची भीती आणि राजपूतच्या शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ (तो मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. त्याचे परीक्षण करणाऱ्या समीक्षकांना लेखक चेतन भगतने दिलेली धमकी) इत्यादी गोष्टींनी सोशल मीडिया भरून गेला आहे. दरम्यान वृत्तमाध्यमे कंगना रनोटच्या चर्चांनी व तिच्या सुशांतसिंगबद्दलच्या मोहीमेने भरून गेली आहेत.

बॉलिवूडची कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी वाट्याला आलेला संघर्ष व त्यातून झालेला त्रास, बॉलिवूडमधील ‘परिवारवादा’ला तिने दिलले आव्हान, तसे करण्यासाठी तिने दाखवलेले धाडस व शौर्य आणि अलिया भट (अभिनेत्री सोनी राझदान व निर्माता – दिग्दर्शक महेश भटची मुलगी) ते तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर (या दोघीही कंगना रनोटसारख्याच चित्रपटसृष्टीची कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या अभिनेत्री आहेत!) अशा विविध स्त्री अभिनेत्रींविषयीच्या तिच्या मतांनी वृत्तमाध्यमे भरून गेली आहेत.

या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती बाजूला ढकलली गेली. ती व्यक्ती म्हणजे स्वत: सुशांतसिंग राजपूत - एक खरा राजपूत.

एका निश्चित मर्यादेपर्यंत ही मिथक निर्मिती नैसर्गिक आहे. प्रतिभासंपन्न, यशस्वी, देखणा व तरुण कलावंताच्या अकाली मृत्यूने धक्का बसलेल्या व शोकग्रस्त झालेल्या लोकांचा हा एक अटळ प्रतिसाद आहे. तो साहजिक असाच आहे.

असे असले तरीही व्यापक पातळीवरून पाहिल्यावर असे दिसते की, ज्या लोकांनी या अभिनेत्यामध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नव्हती, त्या लोकांनी ही खेळी खेळलेली आहे. आता सुशांतसिंगचा मृत्यू त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी त्यांना मदत करतोय असे दिसते. उजव्या शक्ती कंगना रनोटच्या मदतीसाठी संपूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरल्या आहेत. कंगना रनोट ही उजव्या शक्तीची अत्यंत प्रसिद्ध अशी कार्यकर्ती पुढारी आहे. त्यामुळे त्यांना सुशांतसिंगचा मृत्यू त्यांच्या कथानकामध्ये साचेबद्ध करणं गरजेचं झालं आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : भारत ‘बाबरी मशिदी’कडून ‘राममंदिरा’कडे; तुर्कस्तान ‘चर्च’, ‘म्युझियम’कडून ‘मशिदी’कडे

..................................................................................................................................................................

सुशांतसिंगने २०१८ साली ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राजपूतांच्या कर्णी सेनेने केलेल्या हिंसेचा जोरदार विरोध केला होता. त्यावरून कर्णी सेनेने त्याला धमक्या दिल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टी सोयीच्या सतरंजीखाली ढकलल्या गेल्या आहेत. त्या वेळेला सुशांतसिंगने काही काळासाठी याचा निषेध नोंदवण्यासाठी स्वत:चे आडनाव काढून टाकले होते. परिणामी, जहालवादी ऑनलाईन उजव्या शक्तींनी निर्दयीपणे सुशांतसिंगला ट्रोल केले होते. त्याच्या मृत्युपासून यादृच्छिक जल्पकांनी असा एक सिद्धान्त पसरवला की, सुशांतसिंगने त्याच्या पसंतीनुसार हे असं पाऊल उचललं नव्हतं, तर बॉलिवूडमधील ताकदवान दबावगटाच्या दबावाखाली येऊन त्याने असा निर्णय घेतला होता. त्याने या चित्रपट-उद्योगाशी अनुरूप होण्यासाठी त्यांच्या मागण्यांसमोर शरणागती पत्करली. त्याला त्यांनी हताश केले होते.

सुशांतसिंगने ‘पद्मावत’ चित्रपटाबाबात घेतलेली भूमिका हा कदाचित त्याचा सर्वोत्तम क्षण होता. वास्तव असं आहे की, जे लोक आज सुशांतसिंगच्या बाजूने बोलण्याचा दावा करत आहेत, तेच लोक हा सर्वोत्तम क्षण त्याच्या वारश्यातून मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हेतूंबद्दल ही एक धोक्याची घंटा समजायला हवी.

सुशांतसिंगबद्दल दुसरं गैरसोयीचं सत्य असं आहे की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चित्रपटात पुन्हा पुन्हा येणाऱ्या हिंदू-मुस्लीम समीकरणाचा माध्यमांच्या चर्चांमध्ये साधा उल्लेखही आला नाही. २०१८मध्ये अनेक राज्यातील भाजप सदस्यांनी ‘केदारनाथ’ या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मूलतत्त्ववादी ज्याला ‘लव्ह-जिहाद’ (ही संकल्पना अशा निंदनीय कारस्थान सिद्धान्तासाठी वापरली जाते, ज्यानुसार मुस्लीम पुरुष हिंदू स्त्रियांना त्यांच्या जाळ्यात ओढतात) म्हणतात, त्यास हा चित्रपट प्रोत्साहन देतो, असा आरोप या सदस्यांनी केला होता. ‘केदारनाथ’ येथील पवित्र ठिकाणी केलेले प्रणयाचे चित्रण हिंदूंच्या भावनांना ठेच पोचवते, असे त्यांचे म्हणणे होते. चित्रपटाचा केंद्रीय कथानक बिंदू हा त्यांच्या संतापाचा विषय होता. मंदाकिनी नावाची एक उच्च जातीय हिंदू स्त्री सुशांतसिंगने भूमिका वठवलेल्या मन्सूरच्या प्रेमात पडते. मंदाकिनीची भूमिका सारा अली खान या अभिनेत्रीने साकारली होती.

सुशांतसिंगच्या अल्प कारकीर्दीमध्ये चित्रपटातील त्याच्या या दुसऱ्याच भूमिकेने बरोब्बर याच कारणासाठी सांप्रदायिक/पितृसत्ताक व्यवस्था संतापली होती. २०१४मध्ये राजकुमार हिरानी यांचा ‘पीके’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देशाच्या सीमा ओलांडून सुशांतसिंगला सरफराज नावाच्या एका पाकिस्तानी तरुणाच्या भूमिकेत सादर केले होते. जग्गू (अनुष्का शर्मा) ही भारतीय हिंदू मुलगी सरफराजच्या प्रेमात पडते. ‘पीके’ या चित्रपटामुळे हे जबरदस्त अधोरेखित झाले की, जेव्हा तुम्हाला एका विशिष्ट सामाजिक गटावर अविश्वास दाखवण्यासाठी घडवले जाते, तेव्हा सुनिश्चित पूर्वग्रहदूषितपणा कशा पद्धतीने कार्यान्वित होतो. इतर कारणांबरोबरच या चित्रपटाचे स्वागत मोठ्या आंदोलनांनी झाले होते.

गेली अनेक दशके हिंदी चित्रपटांनी आंतर-समुदाय प्रणय चित्रीत केला आहे, परंतु हिंदी चित्रपट निर्मात्यांनी त्यास धोका न पत्करता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बहुसंख्याकवादी लोकांचा क्रोध आवरण्यासाठी त्यांनी हे असं केलं असण्याची शक्यता आहे. प्रेमात पडणारी स्त्री अल्पसंख्य समुदायाची आणि प्रेमात पडणारा पुरुष बहुसंख्य समुदायाचा सदस्य राहील, याची त्यांनी काळजी घेऊनच चित्रपटांची कथानकं लिहिल्याचं दिसं. पितृसत्ताक समाजात स्त्रियांकडे, त्या ज्या कुटुंबात आणि समुदायात जन्मतात त्यांची ‘प्रथम मालमत्ता’ म्हणून पाहिलं जातं. त्यानंतर त्या स्त्रिया ज्या पुरुषाशी विवाह करतात, त्या पुरुषाच्या कुटुंबाकडे आणि समुदायाकडे त्या स्त्रीची मालकी हस्तांतरित केली जाते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जे लोक या तर्कशास्त्राला मान्यता देतात त्यांच्यासाठी जर एखाद्या स्त्रीने समुदायाच्या बाहेरच्या पुरुषाशी विवाह केला, तर ती स्त्री स्वत:च्या समुदायाला (म्हणजेच ज्या समुदायात तिचा जन्म झाला आहे) कायमची मुकते. दुसऱ्या बाजूला ती स्त्री आणि तिचे गर्भाशय तिच्या नवऱ्याकडील लोकांसाठी एक मिळकत वा कमाई असते.

मी सुशांतसिंगला व्यक्तिश: ओळखत नव्हते. एकदा माझी त्याच्यासोबत दीर्घ आणि दिलखुलास बैठक झाली होती एवढेच. तरीही मला त्याचे चित्रपट माहीत आहेत. त्याच्या सात वर्षांच्या बॉलिवूड  कारकिर्दीमध्ये हिंदू-मुस्लीम मैत्रीचा धागा आपणास पाहायला मिळतो. तो धागा अशा काळात पाहायला मिळाला जेव्हा भारतातील हिंदू-मुस्लीम तणाव सर्वोच्च पातळीवर पोचलेले आहेत आणि बॉलिवूडमधील अनेक लोकांनी व्यवस्थसमोर शरणागती पत्करली आहे.

सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर त्याच्या स्वयंघोषित, स्वहितपूजक प्रवक्त्यांनी ध्वनित केलेल्यापेक्षाही या तरुण कलावंताकडे बरंच काही होतं, असं हा धागा दाखवून देतो. हे बिडंबनात्मक आहे की, त्याच्या हयातीत ज्या शक्तींनी त्याच्या चित्रपटांवर आणि त्याने स्वत:च्याच प्रभावी समुदायाच्या विरोधी घेतलेल्या बहुचर्चित खंबीर भूमिकेवर टीका केली, त्याच शक्ती आता त्याच्या मृत्यूनंतर त्याला स्वत:च्या सोयीप्रमाणे साचेबद्ध करण्याचा आटापिटा करताहेत.

विडंबनात्मक अशा कारणामुळे की, सुशांतसिंगने ‘काई पो चे’, ‘पीके’ आणि ‘केदारनाथ’ या चित्रपटांमधून साकारलेल्या व्यक्तिरेखांनी मूलतत्त्ववाद्यांच्या धार्मिक अस्मितेच्या भिंगामधून मनुष्यांकडे पाहण्यास नाकारले. या जीवन दृष्टिकोनाचे निरोगी उदाहरण स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या ‘चार कदम’ या गीतामध्ये सापडू शकते. ‘पीके’ या चित्रपटात प्रारंभी जग्गू आणि सरफराज यांच्यावर चित्रीत केलेल्या गाण्यामध्ये या ओळी येतात -

बिन पूछे मेरा नाम और पता

रस्मों को रख के परे

चार कदम बस चार कदम

चल दो ना साथ मेरे.

..................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख https://www.firstpost.com/ या पोर्टलवर २३ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद : प्रा. राजक्रांती वलसे, बारवाले महाविद्यालय, जालना

rajkranti123@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख