अजूनकाही
हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी, ३ जुलै २०२० रोजी पहाटे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. ‘एक दो तीन’, ‘हमको आज कल है इंतजार’, ‘चोली के पिछे क्या है’, ‘निंबुडा निंबुडा’, ‘डोला रे डोला’ अशा अनेक गाण्यांचं त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं.
..................................................................................................................................................................
सरोज खान ज्या हिंदी सिनेमासृष्टीत वावरल्या, ती अतिशय झगमगाटी, बेगडी, अतर्क्य, अविश्वसनीय आणि कल्पनातीत म्हणावी अशीच दुनिया आहे. सिनेमे पाहून माणसं बदलतातच असं नाही, पण त्यांची करमणूकच नक्कीच होते. कारण सिनेमातल्या अनेक गोष्टी सामान्य माणसांना आपल्या वाटतात, तशा सिनेमातल्या अनेक गोष्टी अविश्वसनीय वाटाव्या अशाही असतात. मुळात मानवी जगही तसंच असतं. त्यामुळे माणसांचा सिनेमाही त्याला अपवाद नाही.
याच सिनेमाजगात वावरलेल्या सरोज खान यांचं व्यक्तिगत आयुष्यही एखाद्या सिनेमासारखंच होतं. नेमकेपणानं सांगायचं तर त्यांचं व्यक्तिगत आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरलेलं होतं, तर सिनेमाजगातलं त्यांचं काम खणखणीत यशाचं धनी होतं.
भारत-पाक फाळणीनंतर सरोज खान यांचं कुटुंब पाकिस्तानातील आपला व्यवसाय सोडून भारतात, मुंबईत आलं आणि गर्भश्रीमंतीतून कफल्लक या अवस्थेला आलं. फाळणी व स्वातंत्र्य या धामधुमीतच २२ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांना ‘नजराना’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्या होत्या अवघ्या तीन वर्षांच्या. त्यानंतर पुढची दहा वर्षं, म्हणजे १९५०च्या दशकात त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांत काम केलं.
नंतर ‘हावडा ब्रीज’(१९५८)मधील ‘आईये मेहरबां’ या गाण्यात त्यांना मधुबालांसोबत नृत्य करण्याची संधी मिळाली. या गाण्यासाठी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे पाहून सरोज नृत्यामधील अनेक बारकावे शिकल्या. सोहनलाल यांनीही या मुलीमधली चुणूक ओळखली. त्यांनी तिच्याकडून कठोर मेहनत करून घेतली. नृत्यातली सरोज यांची लगन आणि कसब पाहून सोहनलाल त्यांच्या प्रेमात पडले. त्या ४३ वर्षांच्या मास्टरजींनी १३ वर्षांच्या मुलीसोबत एकतर्फी लग्नही लावून टाकलं. अर्थात तीही त्यांच्या नृत्यकौशल्याच्या प्रेमात होती. पण सोहनलाल तेव्हा विवाहित होते. त्याची खबर सरोज यांना एका मुलीची आई झाल्यावर लागली.
तेव्हा सोहनलाल हे नृत्यदिग्दर्शनातलं मोठं प्रस्थ होतं. सरोज त्यांच्या पत्नी झाल्यावर त्यांच्या प्रमुख सहाय्यकही झाल्या. सोहनलाल परदेशी गेलेले असताना सरोज यांना ‘दिल ही तो है’ (१९६१) या चित्रपटातील गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. पुढे ‘डॉ. विद्या’ (१९६२) या सिनेमासाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं. त्यातील त्यांचं काम वैजयंतीमाला यांना खूप आवडलं.
१९६२ ते ७३ असं जवळपास दशकभर सरोज यांनी पती सोहनलाल यांच्याबरोबर काम केलं. पण त्यांनी आपल्या मुलांना स्वत:चं नाव लावू दिलं नाही, तेव्हा त्या त्यांच्यापासून विभक्त झाल्या. पुढे त्यांनी १९७५मध्ये उद्योजक सरदार रोशन खान यांच्याशी लग्न केलं.
पुढे त्यांना अभिनेत्री साधना यांनी ‘गीता मेरा नाम’ (१९७४) या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी बोलावलं. पण सुभाष घईंच्या ‘हिरो’ (१९८३)नं त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. त्यानंतर आलं ‘तेजाब’(१९८८)मधील ‘एक दो तीन’. नंतर ‘चालबाज’ (१९८९), त्यानंतर ‘सैलाब’ (१९९०). या तीन चित्रपटांसाठी सरोज खान यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
‘हवाहवाई’ (मिस्टर इंडिया, १९८७), ‘मैं तेरा दुष्मन दुष्मन’ (नगीना, १९८६), मेरे हाथो में (चांदनी, १९८९) ही त्यांनी केलेली श्रीदेवीसोबतची; तर ‘एक दो तीन’ (तेजाब, १९८८), ‘तम्मा तम्मा लोगे’ (ठाणेदार, १९९०), ‘धक धक करने लगा’ (बेटा, १९९२) ही माधुरी दीक्षितसोबतची त्यांची गाणी प्रचंड गाजली.
‘तेजाब’नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ‘बेटा’, ‘खलनायक’, ‘नगीना’, ‘चांदनी’, ‘डर’, ‘बाजीगर’, ‘मोहरा’, ‘याराना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायंगे’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘देवदास’, ‘गुरू’, ‘फना’, ‘सावरिया’, ‘जब वुई मेट’, अशा अनेक चित्रपटांतील गाणी त्यांनी केली. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्या कितीतरी गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन त्यांचं आहे. गोविंदा, आमीर खान हे त्यांचे नृत्याच्या बाबतीत आवडते अभिनेते होते. गोविंदासारखं नृत्य कुणालाही करता येत नाही असं त्यांचं मत होतं.
२००५मध्ये त्या ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शो डान्सच्या परीक्षक म्हणून काम केलं. ‘उस्तादो के उस्ताद’, ‘झलक दिखला जा’ या शोसाठी काम केलं. काही काळ ‘नचले विथ सरोज खान’ हा स्वत:चा शो केला.
वर सरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या काही गाण्यांचे व्हिडिओ दिले आहेत. ते पाहिल्यावर सिनेमा, त्यातील पात्रं, गाणं, त्याचा स्वभाव या सगळ्याचा विचार करून सरोज खान नृत्यदिग्दर्शन कसं करत हे पाहायला मिळतं. नृत्य म्हणजे केवळ अंगविक्षेप नाही आणि लवचीक शरिराच्या कलात्मक कसरतीही नाहीत. नृत्य म्हणजे लयबद्ध अदाकारी. ती सरोज खान यांच्या नृत्य दिग्दर्शनात पुरेपूर दिसून येते.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment