अजूनकाही
सुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेला ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट नुकताच ‘अॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला. उत्तर प्रदेशमधील प्रतापगंज येथील कठपुतलीची ‘गुलाबो सिताबो’ ही लोककला खूप प्रसिद्ध आहे. या कलेतून समाजप्रबोधनाचे काम केले जाते. या कठपुतलीच्या खेळात दोन स्त्री पात्रे असतात आणि ते सतत एकमेकांशी भांडत असतात. त्यातून संगीतमय पद्धतीनं कथा सांगितली जाते.
‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमादेखील अमिताभ बच्चन (मिर्झा) आणि आयुष्मान खुराणा (बांकी) या दोन पात्रांच्या सतत चाललेल्या वादाची कथा आहे. कथेचं केंद्र लखनौमधील ‘फातिमा महल’ हवेली आहे. हवेलीची मालकीण बेगम असते. तिचे पती मिर्झा हवेली स्वतःच्या नावे केव्हा होईल, अशी मनीषा बाळगून असतात. बांकी त्या हवेलीत राहणारा एक भाडेकरू असतो. भाड्याच्या पैशावरून मिर्झा आणि बांकी यांच्यात सतत भांडणं सुरू असतात. दोघांनाही हवेलीचा मालक बनण्याची इच्छा असते. या दोघांव्यतिरिक्त हवेलीवर शहरातील राजकीय नेते आणि बिल्डर यांचीही नजर असते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सुजित सरकार आणि जुही चतुर्वेदी यांनी बनवलेला हा सिनेमा मानवी जगण्याचं मूल्य आणि भौतिकवाद यांतील फरक स्पष्ट करतो. भौतिकवादात जगताना माणसानं गुंडाळून ठेवलेली मूल्यं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. भौतिकवादात गुरफटून जाऊन मानवी जीवनात मूल्य म्हणजे काय हे समजलं नाही, तर कवडीमोल होणाऱ्या आयुष्याला सामोरं जावं लागतं. जर ते मूल्य जाणण्यात आपण यशस्वी झालो, तर आपलं जीवन समृद्ध आणि अमूल्य होतं, असा आशय सांगणारी ही कथा आहे.
गरीब-श्रीमंतीची व्याख्या जाणल्याशिवाय मूल्याची व्याख्या करता येत नाही. गरीब-श्रीमंत हा मानसिक प्रवाह आहे, मानवी मनाची एक अवस्था आहे. मनानं श्रीमंत असू तर आपणास जगण्याचं मूल्य समजू शकतं आणि तरच आपण प्रेम करू शकतो. म्हणूनच या सिनेमातील मानसिकदृष्ट्या गरीब असणारी पात्रं मूल्य न समजल्यानं जगण्यात येणाऱ्या पराभवाला सामोरं जाताना दिसतात.
कथेत एकीकडे मूल्य न समजलेली पात्रं म्हणजे मिर्झा-बांकी आणि दुसरीकडे मूल्य जाणलेली पात्रं म्हणजे हवेलीची मालकीण बेगम व भाडेकरू बांकीची बहीण गुड्डू आहेत. गुड्डूचं जगणं आणि म्हाताऱ्या बेगमचं आजवरचे जगणं हे कथेला स्त्रीवादी विचारातून पुढे आणतात. मूल्य आणि किंमत यात फरक करताना ही दोन पात्रं महत्त्वाची ठरतात. म्हाताऱ्या बेगमचं जुन्या पडक्या हवेलीवर प्रेम असतं. तिच्यासाठी हवेली अमूल्य असते.
हवेलीतल्या एका छोट्या खोलीत भाड्यानं राहणारी गुड्डूचं स्वत:चं घर बनवण्याची धडपड सुरू असते. ती तिच्यासाठी अमूल्य असते. त्यासाठी गुड्डू कोणतीही किंमत मोजण्यास तयार असते. फुटकळ नैतिकतेत न अडकता घर मिळवण्यासाठी केलेल्या तडजोडी तिला नगण्य वाटतात. अशा या दोन स्त्री पात्रांमुळे कथा आणखी दमदार होते.
हा सिनेमा कथेच्या पात्रांबरोबर कथादेखील समृद्ध करत जातो. सर्व पात्रं कथेच्या अवतीभोवती फिरत कथेला एक निश्चित आकार देतात. सुजित सरकार यांची कथा हाताळण्याच्या नेमक्या याच शैलीमुळे चित्रपट कैक पटीनं उमदा होतो. गेल्या वर्षी ऑस्कर अवॉर्ड मिळालेला कोरियन चित्रपट ‘पॅरासाईट’च्या पठडीतील ‘गुलाबो सिताबो’ आहे. तो पात्रांना घेऊन कथा उभी करतो आणि मानवी जगणं उलगडवण्याचा प्रयत्न करतो. ‘पॅरासाईट’मध्ये पात्रांची ज्या पद्धतीनं फरफट होताना दिसते, त्याच पद्धतीनं या सिनेमातील पात्रांची जगण्यातील मूल्य न समजल्यानं होणारी फरफट दिसते.
‘पॅरासाईट’ आणि ‘गुलाबो सिताबो’चा क्लायमॅक्स हेलावून टाकतो. कथेबद्दल आपण पुन्हा विचार करू लागतो, हे या सिनेमांचं यश आहे. जागतिक सिनेमा लक्षात घेतला तर ‘गुलाबो सिताबो’ त्यामध्ये निश्चित आपलं स्थान निर्माण करू शकतो.
यातला अमिताभ बच्चन यांचा अभिनय कमालीचा बहरलेला आहे. मिर्झा या मुस्लीम म्हाताऱ्याची भूमिका करत असताना बच्चन पूर्णतः त्या पात्राशी एकरूप होतात. आयुष्मान खुराणाचा अभिनय सपोर्टिंग असला तरी कथेत तो मिर्झासोबत समांतर पुढे जातो. जफर (बेगम), सृष्टी श्रीवास्तव (गुड्डू), तसेच विजय राज, ब्रिजेंद्र काला यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
..................................................................................................................................................................
लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.
advbaabar@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment